

कशासाठी हा अट्टाहास…?

✍️✍️✍️ ज्योतिप्रसाद सावंत
‘मृत्युंजय’कार शिवाजीराव
सावंत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जिल्हा परिषद ,कोल्हापूर (महाराष्ट्र शासनाच्या) वतीने बांधण्यात आलेल्या स्मृती दालनाचे आज उद्घाटन होत आहे परंतु एकीकडे यापूर्वी आजरा ग्रामीण रुग्णालयाला ‘मृत्युंजय’कारांचे नाव देण्याचा झालेला प्रयत्न हा यशस्वी झाला की नाही ? असा प्रश्न जाणकारांकडून उपस्थित केला जात असताना दुसरीकडे सुमारे ७० लाख रुपये खर्चून पार्किंग करता पुरेशी जागा नसतानाही बांधण्यात आलेल्या या देखण्या दालनाची देखभाल कोण करणार ? की एखाद्या संस्थेच्या घशात हे दालन घालून शासन रिकामे होणार? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जर या दालनाची देखभाल होणार नसेल व पहिल्या पावसातच या दालनाला गळत्या लागण्याची शक्यता असेल तर मग दालनाच्या उभारणीचा व घाई गडबडीने उद्घाटनाचा अट्टाहास कशासाठी? असा साधा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मागील पंचवार्षिक काळात महसूल मंत्री असताना चंद्रकांतदादा पाटील, तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक व आजऱ्याचे दुसरे सुपुत्र जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे तुषार बुरूड यांच्या प्रयत्नातून ‘मृत्युंजय’कारांच्या जन्म गावी त्यांच्या स्मृती जपण्याच्या उद्देशाने हे दालन उभे झाले आहे. तब्बल पाच वर्षे बांधकाम रेंगाळल्यानंतर कसेबसे काम आटोपून सभागृहाच्या उद्घाटनाची औपचारिकता पूर्ण केली जात आहे.
रंगरंगोटी पूर्वी या दालनाची अवस्था पाहिली असती तर निश्चितच उद्घाटनानंतर पहिल्याच पावसात या दालनाच्या स्लॅबला गळत्या लागणार हे स्पष्ट आहे.
वीस-बावीस वर्षांपूर्वी ‘मृत्युंजय’कारांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती जपण्याच्या उद्देशाने अनेकांनी विविध संकल्प जाहीर केले. आजरा ग्रामीण रुग्णालयाला त्यांचे नाव देणे हा त्याचाच एक भाग होता. समारंभ पूर्वक कोनशीला बसवून हा सोहळा उत्साहात पार पाडला गेला प्रत्यक्षात वीस -बावीस वर्षानंतर कागदोपत्री आज ही ‘मृत्युंजय’कारांचे नाव रुग्णालयाच्या लिखापडीत कुठेही दिसत नाही. त्याकरीता कोणी प्रयत्नही केलेले दिसत नाहीत.
शासन दरबारी सेवेत असणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपैकी बहुतांशी अधिकाऱ्यांना मृत्युंजय ही कादंबरी भावली आहे. तसे अनेकांकडून वेळोवेळी सांगण्यात येते. संपूर्ण देशभरात वाचकांनी डोक्यावर घेतलेल्या या कादंबरीने खपाचे विक्रम गाठले आहेत. सर्वसामान्य वाचक मात्र कादंबरीची किंमत पाहून इच्छा असूनही कादंबरी वाचू शकत नाही. शासनाला खरोखरच जर ‘मृत्युंजय’कारांच्या साहित्यिक योगदानाची जाण असेल तर त्यांनी अत्यल्प दरात सदर कादंबरी सर्वसामान्य वाचकांकरीता उपलब्ध करून द्यावी. ती प्रत्येक शाळा महाविद्यालयांमध्ये शासनामार्फत कशी उपलब्ध होईल याकडे लक्ष द्यावे. मराठी भाषा समृद्धीचे प्रतिक असणारी ही कादंबरी निश्चितच यामुळे सर्वसामान्य वाचकांपर्यंत सहजपणे पोहचेल. यासाठी आज कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या मंडळींकडून प्रयत्नांची अपेक्षा करण्यास कांहीच हरकत नाही.
‘मृत्युंजय’कारांचे श्रद्धास्थान असा परिचय असणाऱ्या शिवाजीनगर घाट परिसरातील ह.भ.प.पू.संत लक्ष्मणबुवा मोरजकर महाराज यांच्या समाधी स्थळी अनेक ‘मृत्युंजय’ कार प्रेमी व भक्तगण हजेरी लावत असतात परंतु हा परिसर अद्यापही उपेक्षित आहे.
शिवाजीनगर घाटासह या समाधी परिसरामध्येही सुशोभीकरण करून घेण्याची गरज प्रकर्षाने पुढे येत आहे. याकरिता स्थानिक आमदार प्रकाश आबिटकर हे प्रयत्नशील आहेत.परंतु इतर उपस्थित राहणाऱ्या राजकीय मंडळींनीही योग्य तो निधी लावून या परिसराचे सुशोभीकरण करण्यास हातभार लावण्याची गरज आहे.
या साध्या बाबी जर होत नसतील तर मग अशा कार्यक्रमांचा कशासाठी अट्टाहास…?
अनेकांना कार्यक्रमाचे निमंत्रण नाही
तालुक्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, शिक्षण, संस्कृती, सामाजिक, राजकीय,सहकार व शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना या कार्यक्रमाचे निमंत्रणच मिळाले नसल्याचे सांगितले जात आहे .
स्मृती दालन आहे कुठे?
शहरातील अनेकांना हे स्मृती दालन कोठे आहे याची माहिती नाही. उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कोठेही शासकीय यंत्रणेने बॅनर्स लावलेले नाहीत. उद्घाटन झाल्यानंतर दालन पाहण्यासाठी शहरवासीय भेट देणार आहेत. किमान हे दालन उघडे राहील व दालनाची किल्ली शोधावयास लागणार नाही याची खबरदारी आता संबंधितांनी घेण्याची गरज आहे.


खेळताना बालीकेचा मृत्यू

आजरा:प्रतिनिधी
होन्याळी, ता. आजरा येथे ऊस तोडणी सुरू असताना जवळच उसाच्या शेजारील पाणंदीमध्ये खेळणाऱ्या मीना परशराम प्रजापती या सव्वा वर्षीय बालिकेचा अचानकपणे मृत्यू झाला.
कुटुंबीय ऊसतोडी मध्ये व्यस्त असताना खेळत असलेल्या सदर. बालिकेकडे पालकांचे लक्ष गेले असता ती निपचित पडलेली आढळली. उपचाराकरीता तिला दवाखान्यात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबतची वर्दी वडील परशराम मुरारीलाल प्रजापती, रा. तरेगाव जंगल,बेटला,छत्तीसगड यांनी आजरा पोलिसांत दिली आहे पोलीस पुढील तपास करीत आहेत. मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.


खेडे येथे शॉर्टसर्किटने आग
चार लाखांचे नुकसान

आजरा:प्रतिनिधी
खेडे ता.आजरा गावच्या हद्दीमध्ये आजरा गडहिंग्लज मार्गाशेजारी शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीमध्ये आंबा व काजू पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
शनिवारी दुपारी अचानकपणे सदर आग लागली. आगीची व्याप्ती मोठी असल्याने झपाट्याने आंबा,चिक्कू व काजूची झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यामध्ये उत्तम मोहिते,दत्तात्रय कोंडुसकर, नंदकुमार देसाई यांचे सुमारे चार लाखांचे नुकसान झाले आहे.
आग लागल्याबरोबर अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले. सुमारे तासाभरानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. आग लागलेल्या ठिकाणापासून शंभर फूट अंतरावर इंडेन गॅसचे गोदाम आहे सुदैवाने आगीची झळ तिथपर्यंत पोहोचू शकली नाही. गतवर्षी देखील याच ठिकाणी आग लागून नुकसान झाले होते.


आज धनगरवाड्यांवर ४ कोटी ७ लाख रुपयांच्या रस्ते कामाचा शुभारंभ

आजरा: प्रतिनिधी
आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून आजरा तालुक्यातील नावलकरवाडी ते धनगर वाडा रस्ता (२ किमी), किटवडे ते धनगरवाडा रस्ता (३ किमी), आवंडी ते धनगरवाडा रस्ता अशा एकूण ४ कोटी ७ लाखांच्या विकास कामांचा आज आवंडी धनगरवाडा, (ता. आजरा) येथे होणार आहे.
या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार आबिटकर प्रेमी व सर्व ग्रामस्थ, नावलकरवाडी, किटवडे, आवंडी यांनी केले आहे.


जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत निर्णय न झाल्यास धरणाचे काम बंद पाडणार…
सर्फनाला धरणग्रस्तांच्या बैठकीत निर्धार….

आजरा: प्रतिनिधी
सर्फनाला धरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून पुनर्वसनाचे कांही प्रश्न अजूनही शिल्लक आहेत. पुनर्वसन कायद्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन आढावा घेतल्यानंतर पुनर्वसन पूर्ण झाले आहे याची खात्री केल्यानंतरच पुनर्वसन प्राधिकरणाची मान्यता घेऊन घळभरणीचे काम करावयाचे असते. पण अशी बैठक न घेताच आणि पुनर्वसनाचे कांही प्रश्न तसेच ठेऊन घळभरणीचे काम पाटबंधारे खात्याने सुरू केले आहे. याबाबत लेखी निवेदन देऊन श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली धरणाचे काम बंद करायला गेलेल्या सर्फनाला धरणग्रस्तांना २० रोजी बैठक घेण्याचे लेखी आश्वासन दिले होते. या लेखी पत्रानुसार दिनांक २० रोजी जिल्हाधिकारी यांच्यासोबत डॉ. भारत पाटणकर यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे या बैठकीत जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याबाबत सकारत्मक चर्चा होऊन निर्णय न झाल्यास धरणाचे काम बंद पाडले जाईल असा निर्णय आज धरणग्रस्तांच्या मेळाव्यात घेण्यात आला आहे.
श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ.संपत देसाई म्हणाले, तालुक्यातील आंबेओहोळ धरणात पाणी तुंबवून चार वर्षे झाली अजूनही शंभर प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन बाकी आहे. त्यामुळे एकदा धरणात पाणी अडविले की पुनर्वसनाचे प्रश्न वर्षानुवर्षे रखडतात हा अनुभव लक्षात घेऊन आम्ही सर्फनाला प्रकल्पाचे शंभर टक्के पुनर्वसन न झाल्यास केंव्हाही धरणाचे काम बंद पाडू.
यावेळी अशोक मालव, प्रकाश शेटगे, प्रकाश कविटकर, संतोष पाटील, हरी सावंत, कुंडलिक शेटगे, शंकर ढोकरे, श्रावण पवार, निवृत्ती शेटगे, अर्जुन शेटगे, गोविंद पाटील, कृष्णा ढोकरे, निवृत्ती पाटील, अर्जुन शेटगे यांच्यासह धरणग्रस्त स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने हजर होते.
२० तारखेला होणाऱ्या जिल्हाधिकारी बैठकीची पूर्वतयारी म्हणून प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, तहसीलदार समीर माने, सहाय्यक उपनिबंधक सुजय येजरे यांच्यासोबतआज सर्फनाला धारणस्थळावर प्रकल्पग्रस्तांची बैठक झाली.
बहिष्कार…
प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाचे प्रश्न अजूनही बाकी असल्याने उद्या धरणस्थळावर आ. प्रकाश आबिटकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमावर पारपोली गावठाण खेडगे धरणग्रस्तांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय आजच्या मेळाव्यात घेण्यात आला.


आजरा साखर कारखान्यावर आरोग्य शिबीर संपन्न

आजरा : प्रतिनिधी
गुरुवार दि.१५ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगी याचेमार्फत आजरा कारखाना कार्यस्थळ गवसे येथे सर्व रोग निदान शिबीर आयोजित करणत आले होते. या शिबीरामध्ये वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ.रविंद्र गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या कर्मचा-यांची आरोग्य तपासणी करणेत आली. यामध्ये १३८ कर्मचा-यांची मधुमेहासाठी चाचणी केली यामध्ये ९ नविन मधुमेहाचे तर १४ नविन रक्तदाबाचे रुग्णांचे निदान झाले. यामध्ये रक्त, लघवीची तपासणी करून हिमोग्लोबीनची तपासणीही केली. संबंधीतांना गोळया वाटप करण्यात आले.
या आरोग्य तपासणी शिबीरास कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे,प्र. कार्यकारी संचालक व्ही. के. ज्योती व अन्य अधिकारी यांनी भेट दिली व सहकार्य केले. यासाठी डॉ. जाधव, डॉ. गदळे, लॅब टेक्नीशियन गणेश देसाई, सुपरवायझर साबखान व वैद्यकिय स्टाफ त्याच बरोबर कारखान्याचे लेबर ऑफीसर सुभाष भादवणकर व त्यांचा स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेतले.


निधन वार्ता
भीमराव कबीर

पेद्रेवाडी ता. आजरा येथील भीमराव बाळकू कबीर ( वय ८६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली,सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. आजरा येथील औषध व्यावसायिक महादेव कबीर यांचे ते वडील होत.


छाया वृत्त…

ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा आजरा यांचे वतीने ग्राहक पंचायत दिनदर्शिकेचे तहसीलदार समीर माने यांचे हस्ते प्रकाशन करणेत आली .यावेळी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांच्यासह महादेव सुतार, काशिनाथ मोरे , व्ही.डी. जाधव , डॉ.धनाजी राणे, हिंदूराव कांबळे, सचिव संजय घाटगे उपस्थित होते.



