
मसोली-रायवाडा परिसरात बिबट्याचा वावर हल्ल्यात म्हैस ठार… शेतकरी बचावला…
आजरा तालुक्यातील मसोली व रायवाडा परिसरात बिबट्याचा वावर असून बिबट्याच्या हल्ल्यात एक म्हैस ठार झाली आहे,तर पांडुरंग सुतार नावाचा शेतकरी सुदैवाने बचावला आहे. या प्रकारामुळे मसोली – रायवाडा परिसरातील नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना वनविभागाने दिल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की…
मसोली येथील पांडुरंग सुतार हे दुपारी आपली जनावरे चारण्यासाठी मसोली-रायवाडा दरम्यानच्या परिसरात गेले होते. यावेळी शेजारील झुडपातून अचानक आलेल्या बिबट्याने त्यांच्या म्हैैशीवर हल्ला केला यामध्ये म्हैस मृत पावली. सदर प्रकार सुतार यांच्या समोरच घडल्याने घाबरून सुतार यांनी तिथून पळ काढला.
सदर हल्ला हा वाघाकडून झाल्याची चर्चा होती मात्र वनविभागाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता पावलांची ठसे व हल्ल्याचा प्रकार यावरून सदर हल्ला हा बिबट्याने केला असल्याचे सांगितले. या परिसरातील शेतकरी मंडळींनी खबरदारी घेण्याचे आवाहनही परिक्षेत्र वनाधिकारी स्मिता डाके यांनी केले आहे.
……………………………..

साखर कारखान्यासह विविध निवडणुकांसाठी जोर बैठका सुरू
(ज्योतिप्रसाद सावंत)
गेले काही दिवस प्रलंबित असणाऱ्या आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीसह आजरा नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत. पावसाचा जोर कमी होताच या निवडणुकांचे कार्यक्रम जाहीर होणार असल्याने राजकीय वर्तुळात जोर बैठका सुरू झाल्या आहेत. राज्यातील राजकीय संदर्भ बदलल्याने अप्रत्यक्षरीत्या याचे बरे वाईट परिणाम तालुकास्तरीय राजकारणात जाणवू लागले असून राजकीय वातावरण गोंधळाचे बनले आहे .
तालुक्यातील राजकारणामध्ये पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पार्टी,मित्रपक्ष अशा लढतीचे चित्र पुन्हा- पुन्हा पहावयास मिळत होते. या लढतीमध्ये जिल्हास्तरावरील माजी आमदार महादेवराव महाडिक,आम.प्रकाश आबिटकर,मंत्री हसन मुश्रीफ, माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील,मंत्री चंद्रकांतदादा पाटील आदींनी वेळोवेळी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
परंतु गेले वर्षभर सुरू असलेल्या राज्यस्तरीय राजकीय घडामोडी पाहता तालुका पातळीवर काम करणाऱ्या मंडळींची चांगलीच गोची झाल्याचे दिसत असून कार्यकर्त्यांकडून तसे बोलले जात आहे. तालुक्यातील राजकारणामध्ये राष्ट्रवादी वरचढ ठरत होती. परंतु राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आता मात्र राष्ट्रवादीची ताकद कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वेसर्वा व आमदार सतेज पाटील यांचे निकटवर्तीय अशी ओळख असणारे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे यांनी राष्ट्रीय काँग्रेस पासून बाजूला होण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सध्या नेमके कोण आहेत ? हा प्रश्न तर आहेच परंतु त्याचबरोबर पक्षाचे तालुक्यातील अस्तित्वही अडचणीत आल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. आमदार प्रकाश आबिटकर हे शिवसेनेच्या मुख्यमंत्री शिंदे गटाचे असले तरी तालुक्यात उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्तेच सक्रिय असल्याचे दिसते. अद्याप शिंदे गटाची कार्यकारिणी जाहीर झालेली नाही तर शिंदे गटाचे अधिकृत लेबल घेण्यास कार्यकर्तेही राजी दिसत नाहीत. त्यामुळे स्थानिक आमदार शिंदे गटाचे तर बहुतांशी कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या गटाचे अशी स्थिती दिसते.
जी अवस्था शिवसेनेची तीच अवस्था भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसची झाली आहे. भाजपाचे मूळ कार्यकर्ते व पक्षांतरीत होऊन आलेले कार्यकर्ते यांच्यामध्ये अंतर असल्याचे वेळोवेळी झालेल्या स्थानिक निवडणुकांमधून स्पष्टपणे जाणवते. विशेषत: आजरा तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजपाच्याच अशोक चराटी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या आघाडीच्या विरोधात असणाऱ्या जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीस मूळ भाजपा कार्यकर्त्यांनी पुरवलेली रसद हे अंतर स्पष्ट करून गेली.
तालुक्यात राष्ट्रवादीची बांधणी भक्कम असतानाच महिनाभरापूर्वी राज्य पातळीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतंत्र सवतासूभा मांडल्याने त्याचे परिणाम तालुक्याच्या राजकारणावर झालेले दिसतात. आजपर्यंत मंत्री मुश्रीफ यांचे नेतृत्व मानणारी कांहीं मंडळी मंत्री मुश्रीफ हे अजितदादा गटासोबत गेल्याने त्यांच्यापासून बाजूला झालेली दिसतात. अद्यापही शरद पवार यांचे नेतृत्व मानून राष्ट्रवादीत सक्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे.
होऊ घातलेल्या साखर कारखाना, नगरपंचायत व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नेमक्या आघाड्या कशा राहणार ? हा देखील प्रश्न कार्यकर्त्यांना सतावू लागला आहे. राज्यपातळीवर राजकीय सूत्रे बदलली असली तरी स्थानिक पातळीवर विविध पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येऊन त्यांच्यामध्ये मनोमिलन होईल अशी सुतराम शक्यता सध्या तरी दिसत नाही. वरिष्ठ पातळीवर काम करणारे नेते त्यांच्यामध्ये मनोमिलन घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असले तरीही राजकीय सोय लक्षात घेऊनच विचित्र स्थानिक आघाड्या होऊन या निवडणुका पार पडतील असे दिसत आहे.
एकंदर आजरा तालुक्याची सध्याची राजकीय स्थिती पाहता येणाऱ्या निवडणुकांमध्ये धक्कादायक व अनपेक्षित अशा आघाड्या तयार होण्याची शक्यता अधोरेखित होऊ लागली आहे.
आ.राजेश पाटील यांचे कार्यकर्तेही संभ्रमात ..
विधानसभा निवडणुकीत आमदार राजेश पाटील यांच्या विरोधात भाजपाचे शिवाजीराव पाटील यांनी कडवे आव्हान निर्माण केले होते. आगामी निवडणुकीतही शिवाजीराव पाटील यांचे तगडे आव्हान असणार आहे. भाजपा व अजितदादा गट एकत्र आल्याने भविष्यातील राजकारण कोणत्या दिशेने जाईल हे सध्यातरी अस्पष्ट आहे. यामुळे आमदार राजेश पाटील गटाचे कार्यकर्ते केवळ विधानसभा नव्हे तर स्थानिक निवडणुकाबाबतही संभ्रमात आहेत.
कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार… ?
गेल्या साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी व मित्रपक्षांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली भक्कम आघाडी तयार करून भाजपा व त्यांच्या मित्रपक्षांशी टक्कर दिली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी चे दोन्ही गट एकत्र राहून निवडणुकीला भाजपाच्या अशोकअण्णा चराटी व मित्रपक्षांच्या विरोधात सामोरे जातील असे दिसत आहे. परंतु राज्य व जिल्हा पातळीवरील नेत्यांना हे कितपत मान्य होईल याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
…………..








