

भादवण येथील महिलेचा
आज-याजवळील चित्री नदीपात्रात मृतदेह आढळला.
भादवण (ता.आजरा) येथील सौ. भारती विष्णू जोशीलकर या ५५ वर्षीय महिलेचा आज-याजवळील चित्री नदीपात्रात मृतदेह आढळला. सौ. जोशिलकर या शनिवार दिनांक ९ पासून बेपत्ता होत्या. आज त्यांचा मृतदेह चित्रा नदीच्या पात्रात तरंगताना आढळला. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
याबाबतची वर्दी विक्रम विष्णू जोशीलकर यांनी आजरा पोलिसात दिली आहे .मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.पुढील तपास आजरा पोलिस करीत आहेत.


‘उत्तर’च्या लढतीकडे आजरेकरांचे लक्ष लागून…

‘कोल्हापूर उत्तर’ मतदारसंघातून आज-याच्या कन्या श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव या विधानसभा निवडणुकीला सामो-या जात असून संपूर्ण आजरा तालुकावासीयांचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिले आहे.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या आजऱ्यातील कार्यकर्त्यांसह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचेही काही कार्यकर्ते त्यांच्या प्रचाराकरीता गेले आहेत. अत्यंत चुरशीची लढत होत असल्याने संपूर्ण आजरा तालुकावासीयांचे लक्ष या लढतीसह निकालाकडे लागून राहिले आहे.


आजरा अर्बन बँकेची शाखा बांबवडे स्थलांतर व नवीन एटीएम शुभारंभ कार्यक्रम उत्साहात...

दि आजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बांबवडे शाखेचे नवीन जागेमध्ये स्थलांतर आणि नवीन एटीएम सेंटरचा शुभारंभ गोकुळ दूध संघाचे संचालक श्री. कर्णसिंह गायकवाड यांचे हस्ते व जिल्हा परिषद सदस्य व के. डी.सी.सी. बँकेचे संचालक श्री. सर्जेराव पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला .
सदर कार्यक्रमावेळी श्री. कर्णसिंह गायकवाड व श्री. सर्जेराव यांच्या यांनी बँकेविषयी ,गौरवोद्गगार काढून शाहुवाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांना उद्योग व शेतीसाठी सर्व सहकार्य दिल्याबद्द्ल संचालक मंडळाचे आभार मानले.
या कार्यक्रमप्रसंगी बँकेचे चेअरमन डॉ. अनिल देशपांडे यांनी सर्वाचे स्वागत केले. अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख श्री. अशोकअण्णा चराटी यानी बँकेमार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सुविधांची माहिती दिली. तसेच व्हा. चेअरमन श्री. किशोर भुसारी व त्यांच्या पत्नी सौ. निरूपमा भुसारी यांचे हस्ते नवीन जागेत सत्यनारायण पूजा करणेत आली.
याप्रसंगी बँकेचे सर्व संचालक व बांबवडे शाखेचे मार्गदर्शक श्री. विठ्ठल भ. तोडकर, श्री. अमृत पा. वाकडे, मलकापुर शाखेचे मार्गदर्शक श्री. अविनाश रा. सोनटक्के, श्री. ज्ञानदेव महाडीक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रशांत गंभीर उपस्थित होते.

पारेवाडी येथे आरोग्य शिबिर उत्साहात

आरोग्यवर्धिनी केंद्र पारेवाडी येथे पारेवाडी पेठेवाडी भागातील लोकांसाठी आरोग्य चिकित्सा शिबीर पार पडले.
या शिबिरामध्ये भागातील रक्तदाब, मधुमेह ,कॅन्सर तपासणी यासह संसर्गजन्य रोग तसेच नियमित रक्तदाब मधुमेह व इतर रक्त चाचण्या करण्यात आल्या.
शिबिरासाठी वेळवट्टी गावच्या सरपंच सौ. देसाई व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री, युनूस सय्यद, आरोग्य सेवक यांनी केले.



