शुक्रवार दि.३ आक्टोंबर २०२५


अखेर त्याचा मृत्यू…
अपघातानंतर तब्बल बारा दिवस देत होता मृत्यूंशी झुंज

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संभाजी चौकात भरधाव कंटेनरने उभ्या स्थितीत असणाऱ्या चार चाकीला जोरदार धडक दिल्याने जखमी झालेल्या संजय गोपाळ यादव यांचा तब्बल १२ दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला. यादव यांचा कोणताही दोष नसताना त्यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
२० सप्टेंबर रोजी संभाजी चौकामध्ये रात्रीच्या वेळी बाहेर गावाहून कुटुंबीयांसोबत आलेले यादव हे येथील मॉर्निंग स्टार हॉटेलच्या समोरील भागामध्ये आपली चारचाकी उभा करून गाडीत बसले होते. दरम्यान एका भरधाव कंटेनरने चालकाचा ताबा सुटल्याने त्यांच्या चार चाकीला जोरदार धडक दिली यामध्ये त्यांच्यासह कुटुंबातील आणखी दोघे जण जखमी झाले. अत्यंत बेताची परिस्थिती व जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या यादव यांच्या मृत्यूनंतर आजरावासीयांनी त्यांच्या उपचारा करता येणारा खर्च करण्यासाठी वर्गणी काढण्यासही सुरुवात केली होती. अत्यंत गुंतागुंतीच्या अशा शस्त्रक्रिया त्यांच्यावर करण्यात आल्या. यामध्ये त्यांच्या कुटुंबीयांचे पैसेही बरेच खर्च झाले. परंतु तब्येतीने साथ न दिल्याने व गंभीर जखमी झालेल्या यादव यांचा अखेर ऐन दसऱ्या दिवशी सकाळी मृत्यू झाला. मृत्यूचे हे वृत्त शहरात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वडील असा परिवार आहे. वडाचा गोंड स्मशानभूमीत त्यांच्यावर आज शुक्रवारी सकाळी आठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दोघे अटक…
काय हे आहे पनवेल प्रकरण…?

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पनवेल येथील सराफाला लुटल्याप्रकरणी आजरा तालुक्यातील शेळप गावातील दोघांना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पनवेल पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी …
करंजाडे, तालुका पनवेल जिल्हा रायगड येथील विराज विजय शिरकांडे हे २४ वर्षीय सराफ सागर , शुभम व केतन यांच्यासह ब्रिझा या वाहनाने मुंबई झवेरी बाजार येथून करंजाडे/ पनवेलच्या दिशेने येत असताना अटक केलेल्या संबंधित दोघांसह अन्य दोघेजण पोलीस कर्मचाऱ्यांच्या वेषात चॉकलेटी रंगाच्या ईर्टीका कार जवळ थांबून आपण पोलीस आहोत असे सांगत सराफाची गाडी अडवली व अटल सेतू वरून आपण मर्यादेपेक्षा जादा गतीने आला आहात असे सांगत त्यांना शिवीगाळ करत गाडीचे दरवाजे उघडून गाडीतून खाली उतरण्यास सांगितले. यावेळी स्वतःजवळील फायबर काठीने विराज शिरकांडे यांच्यासह त्यांच्यासोबत असणारे केतन सुरवसे यांना मारहाण केली व शिरकांडे यांच्यासोबत असणारी सोने, रोख रक्कम व व्यवसायातील मोबाईल ठेवण्यासाठी असलेल्या बॅगा व केतनचा मोबाईल गाडीमध्ये ठेवून फिर्यादी व साक्षीदारांना आरोपीच्या ताब्यातील इर्टीका गाडीमध्ये बसवले. अटल सेतूकडे जाणाऱ्या रोडने घेऊन जाऊन गाडीत त्यांना दमदाटी केली. त्यांच्याकडे फोन, घड्याळ व रक्कम काढून घेऊन त्यांना रस्त्यावर सोडून त्यांची ब्रीजा कार करंजाडे कॉलेज रोडकडे निर्जन ठिकाणी घेऊन जाऊन कार मध्ये असलेल्या बॅगा व त्यामधील रोख रक्कम, सोने, मोबाईल फोन असे चोरी करून लंपास केले.
पोलीस दप्तरी लाखो रुपयांचा हा मुद्देमाल असल्याचे प्राथमिक फिर्यादीत नोंद झाले आहे.
सदर घटना घडल्यानंतर पनवेल पोलिसांसह कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार समीर कांबळे यांनी मोठ्या शिताफिने तालुक्यातील आरोपींना पकडण्यात यश मिळवले.
सध्या अटक केलेल्या दोन्ही आरोपींना पनवेल पोलिसांनी पुढील तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

आजऱ्यात दसरा जल्लोषात
भावपूर्ण वातावरणात दुर्गामातेला निरोप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरासह परिसरात दसरा जल्लोषात साजरा करण्यात आला दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक वस्तू सोने, चांदी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती. सायंकाळी उशिरापर्यंत सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांच्या दुर्गामाता मुर्त्यांचे विसर्जन सवाद्य मिरवणुकांंसह सुरू होते.
पावसाने उघडीप दिल्याने दिवसभर दसऱ्याचा जल्लोष जाणवत होता. दुपारी तीन वाजता पारंपारिक वाद्यांच्या निनादात ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिरातिल पालखी निघाली. पालखीचे ठीक ठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले. निमजगा माळ येथे सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला.
रात्री उशिरा नवरात्रोत्सव मंडळांच्या दुर्गामाता मुर्त्यांच्या विसर्जन मिरवणुका निघाल्या.
सवाद्य निघालेल्या या मिरवणुकांमध्ये तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.

विद्यावर्धिनी पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संस्थेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चैतन्य सभागृहात आयोजित करण्यात आली होती. दीपप्रज्वलनाने सभेची सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्य सहकार बोर्ड यांचे वतीने श्री. देसाई यांनी सुरवातीला सभासद तसेच कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले. संस्थापक चेअरमन श्री. बळवंत शिंत्रे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रथम सत्रामध्ये सालाबादप्रमाणे नवोदय, शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध परीक्षा, दहावी, बारावी परीक्षेत यश मिळविलेल्या सभासदांच्या पाल्यांच्या तसेच शिष्यवृत्ती, नवोदय, प्रज्ञाशोध, एन. एम. एम. एस. मार्गदर्शक शिक्षक सभासदांना सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. वयाची ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांना मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाअंतर्गत पुरस्कार प्राप्त शाळांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचे संस्थापक श्री. सुभाष विभुते यांची शिक्षण विस्तार अधिकारी पदी पदोन्नती झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने तसेच संस्था परिवारातील कर्मचारी यांच्या मार्फत सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
दुसऱ्या सत्रामध्ये संस्थेच्या सन २०२४/२०२५ च्या अहवालावर चर्चा झाली. संस्था बळकटीकरणासाठी वेळप्रसंगी लाभांश कमी करुन निधी मध्ये वाढ करण्याचा ठराव जेष्ठ सभासद श्री. संभाजी इंजल यांनी मांडला. त्याला सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. संस्थेचे सभासद श्री.राजाराम नेर्लेकर यांनी ताळेबंदा विषयक चांगल्या सुचना केल्या. यावेळी सभासदांना १५ टक्के प्रमाणे लाभांश जाहीर करण्यात आला. विषय पत्रिकेवर ईद सर्वच विषयांवर सविस्तर चर्चा करून मंजूरी देण्यात आली. सभेला मुख्य शाखेसह उत्तूर शाखा संचालक व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. जेष्ठ सभासद श्री. निवृत्ती कोलते सरांनी सत्काराबद्दल आभार व्यक्त करुन संस्थेच्या कामकाजाविषयी तसेच प्रगती विषयी समाधान व्यक्त केले. श्री. एकनाथ गिलबिले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. व्हा. चेअरमन श्री. पांडुरंग शि्पुरकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले..

राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ‘युनेस्को’च्या यादीतील १२ किल्ल्यांच्या चित्रफितीचे सादरीकरण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जागतिक पर्यटन दिनाचे (२७ सप्टेंबर) औचित्य साधून, आजरा महाविद्यालय, आजरा येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाने एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झालेल्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांच्या वैभवाची माहिती देणारी चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहानिमित्त (२२ सप्टेंबर ते २९ सप्टेबर) आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
यावेळी डॉ. रणजीत पवार यांनी आपल्या भाषणात या १२ किल्ल्यांना ‘युनेस्को’चा दर्जा मिळणे हे केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी किती महत्त्वाचे आहे, यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, ‘या किल्ल्यांनी केवळ स्वराज्याचे रक्षण केले नाही, तर मराठा स्थापत्यकला, जलव्यवस्थापन आणि युद्धनीतीचे अद्वितीय वैश्विक मूल्य जगासमोर सिद्ध केले आहे. या किल्ल्यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पर्यटन वाढेल आणि त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे.’
या कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे यांनी भूषविले . तर कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील, उपप्राचार्य श्री. दिलीप संकपाळ, पर्यवेक्षक श्री. मनोज पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अविनाश वर्धन यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रा. रत्नदीप पवार यांनी केले. या कार्यक्रमाला प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे, प्रा. अनिल निर्मळे, प्रा. विठ्ठल हाक्के, प्रा. विनायक चव्हाण, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निधन वार्ता
जानबा कातकर

खेडे तालुका आजरा येथील जानबा बैजू कातकर (वय ८० वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवार दिनांक ४ ऑक्टोबर रोजी आहे.


