शनिवार दि.४ आक्टोंबर २०२५

खोट्या सोन्यावर खरे पैसे उचलले
आजरा पोलिसांत आठ जणांविरोधात गुन्हा नोंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ग्राहाकांशी संगणमत करून सोनेतारण कर्ज पुरवठा करणाऱ्या मुथूट फिनकॉर्प कंपनीच्या आजरा शाखेमध्ये २१ लाख ५२ हजार १८३ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी आजरा पोलिसात आठ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
येथील मुथूट फिनकॉर्प कंपनीचे सराफी काम करणाऱ्या सराफासह अन्य सात जणांनी सोन्याच्या खऱ्या दागिन्यांऐवजी परस्पर बनावट दागिने ठेवून दागिन्यांचा अपहार केला असल्याची फिर्याद संदीप शिवाजीराव जामदार वय ४५ वर्षे व्यवसाय एरिया मॅनेजर मुथूट फिनकॉर्प लिमिटेड रा. कसबा सांगाव सध्या रा. मडगाव यांनी दिल्याने आठ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
यामध्ये दिनकर रामचंद्र वडर कानडेवाडी ता. गडहिंग्लज, स्नेहल शिवाजी माडभगत दर्डेवाडी ता. आजरा, इर्शाद अहंमद चांद, फकीरवाडा आजरा, शांताराम पांडुरंग कांबळे,कानडेवाडी ता. गडहिंग्लज, गणेश आनंदा सावंत,अवचित नगर, बांबवडे ता. शाहुवाडी ,गुणाजी विष्णू नेवगे पोळगाव ता. आजरा,विजय तानाजी देसाई कानडेवाडी ता. गडहिंग्लज व नोवेल जोसेफ लोबो, शिवाजीनगर,आजरा यांच्या विरोधात हा गुन्हा नोंद केला आहे.
पोलीस निरीक्षक संजय पाटील पुढील तपास करीत आहेत.

अनेक वर्षांनंतर धामणे गावात फिरली लालपरी

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील धामणे या गावामध्ये अनेक वर्षानंतर आज पहिल्यांदा दुपारनंतर बस धावू लागली.
धामणे गावातील नागरिक व शालेय विद्यार्थी हे दैनंदिन कामकाजासाठी व शालेय शिक्षणासाठी गडहिंग्लज येथे नियमितपणे ये-जा करत असतात . दुपारी एक नंतर त्यांना ये-जा करण्यासाठी कोणतीही बस सेवा उपलब्ध नव्हती. गेली वर्षभर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष श्री. विजय गंगाराम लोखंडे व गिरणी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. अंबाजी वसंत गुरव यांच्या अथक प्रयत्नाने व पाठपुराव्यामुळे तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाॊ मुश्रीफ यांच्या प्रयत्नामुळे ३ ऑक्टोबर पासून गडहिंग्लज ते धामणे एसटी सेवा सुरू केली.यासाठी गडहिंग्लज आगाराचे डेपो मॅनेजर राणे यांचे सहकार्य लाभले.
धामणे गावातील नागरिक व धामणे गावातील माता भगिनी यांनी उपस्थित राहून एसटी चालक व वाहक यांचे स्वागत केले.
याप्रसंगी धामणे गावातील युवा कार्यकर्ते शिवाजी पाटील ,अविनाश आडावकर, संदीप गुरव, वसंत गुरव, वसंत पोटे, अण्णाप्पा रामू तेजम यांसह इतर नागरिकही उपस्थित होते.

मुमेवाडीत वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम आणि शैक्षणिक साहित्य वाटप

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मुमेवाडी (ता. आजरा) येथील प्राथमिक विद्यामंदिर व महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात वृक्षारोपण, शाळा परिसरातील स्वच्छता मोहीम तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी सहाय्यक अभियंता सुधीर कुपटे यांनी विद्यार्थ्यांना घरगुती वीज वापरताना विजेची बचत कशी करावी आणि विजेचे संभाव्य धोके कसे टाळावेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैभव कांबळे उपस्थित होते. स्वागत बजरंग पुंडपळ व अंजना जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रामदास मोरवाडकर यांनी मानले.
या उपक्रमाला महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सचिन पाटील, कर्मचारी संदीप सावरकर, रोहन संकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
या संयुक्त उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव, स्वच्छतेचे महत्त्व तसेच ऊर्जाबचतीबद्दल जागरूकता निर्माण झाली.

व्यंकटराव येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात संपन्न

येथील व्यंकटराव शिक्षण संकुलात राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त यांच्या प्रतिमेचे पूजन आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे संचालक श्री. पांडुरंग जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव श्री. अभिषेक शिंपी यांनी ज्या गांधीजींनी सत्याचा मार्ग दाखवला त्या गांधीजींबद्दल आज समाजामध्ये खोटे- नाटे पसरवून छोटी छोटी मुलं त्यांच्याबद्दल उद्विग्न भावना व्यक्त करताना दिसत आहेत. गांधींजींचे खरे विचार या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य आपण जबाबदारी पूर्वक करणे गरजेचे आहे. हा विचार खऱ्या अर्थाने मुलांपर्यंत पोहचवायचे कार्य शिक्षकांवर अवलंबून आहे .त्याचबरोबर तोच विचार देशाला आणि समाजाला पुढे नेणारा आहे .एकमेकांवर ईर्षा करण्यापेक्षा साधी रहाणी, खेड्याकडे चला, कृषी संसाधनाला महत्त्व द्या. हे महात्मा गांधीजींनी आचरणातून शिकविले. गांधीजी फक्त स्वातंत्र्य सैनिकच नव्हते तर ते तत्त्ववादी, मानवतावादी अशा विचाराचे पुरस्कर्ते होते. त्यांनी मांडलेल्या आणि जगलेल्या तत्त्वांचा विचार समाजातील शेवटच्या घटकालाही पुढे नेणारा आहे असे विचार मांडले.
सौ.एन.सी.हरेर यांनीही आपल्या मनोगतातून राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे जीवन कार्य कथन केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक श्रीकृष्णा पटेकर, श्री सचिन शिंपी, श्री सुधीर जाधव प्राचार्य श्री एम एम नागुर्डेकर पर्यवेक्षिका सौ व्ही जे शेलार प्राथमिक मुख्याध्यापक श्री.आर. व्ही.देसाई, श्री.शिवाजी पारळे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री. पन्हाळकर, तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन सौ.एल. पी.कुंभार, प्रास्ताविक श्री.पी.व्ही.पाटील यांनी व आभार एन.एन.पाष्ठे यांनी मानले.
उत्तूरमध्ये गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान व अभिवादन

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन तसेच विविध स्वच्छता उपक्रम राबवण्यात आले.
पार्वती-शंकर बालमंदिरात गांधीजी व शास्त्रीजींच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली. स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ हनुमान मंदिर येथे सरपंच किरण आमनगी व ग्रामपंचायत सदस्य महेश करंबळी यांच्या उपस्थितीत झाला. या मोहिमेत महादेव मंदिर, हनुमान मंदिर, विठ्ठल मंदिर, लक्ष्मी मंदिर, हरिमंदिर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर स्वच्छ करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष बसवराजआण्णा करंबळी, उपाध्यक्ष विश्वनाथआण्णा करंबळी, सेक्रेटरी सुरेश मुरगुडे यांचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान, ग्रामपंचायतीच्या वतीने राष्ट्रीय स्वच्छता दिन देखील उत्साहात संपन्न झाला. मुख्यमंत्री पंचायतराज अभियान व गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त गावातील तळ्याचा परिसर स्वच्छ करण्यात आला. सुरुवातीला गांधीजी व शास्त्रीजी यांच्या प्रतिमेचे पूजन स्वच्छता कर्मचारी व संयुक्त हिंदवी स्वराज्य मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले.
सरपंच किरण आमणगी यांनी स्वागतपर मनोगतात सांगितले की, “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ३१ डिसेंबरपर्यंत प्रत्येक रविवारी गावातील नागरिक व तरुण मंडळांच्या सहकार्यातून स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.”या उपक्रमाला ग्रामपंचायत सदस्य महेश करंबळी, संजय उत्तुरकर, राजेंद्र खोराटे, भैरू कुंभार, संदेश रायकर, सरिता कुरुंणकर, सुवर्णा नाईक, सुनीता केसरकर, अनिता घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.
रोझरीत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात

शाळेत स्वच्छता मोहीम राबवून सर्व विद्यार्थी व शिक्षकांच्या सहकार्यातून शाळेचा संपूर्ण परिसर स्वच्छ करून श्रमदानाचे महत्व पटवून देऊन या दिनी या थोरांच्या कर्तृत्वाची आणि योगदानाची ओळख महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त देण्यात आली.
या समयी शाळेतील आश्लेषा पाटील, आराध्या कानतोडे , आराध्या देसाई या विद्यार्थिनींनी आपली मनोगते व्यक्त केली तर श्री आशिष फर्नांडिस,श्री. मनवेल बार्देस्कर यांनी आपल्या मनोगतातून थोरांच्या जीवनाचा परिचय करून दिला या समयी मोठ्या संख्येने सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सूत्रसंचालनाची धुरा वैभवी मोहिते व आदिबा खान या विद्यार्थिनींनी सांभाळून घेतली तर त्यांना मार्गदर्शन सौ.शैलजा कांबळे यांनी केले या समयी पर्यवेक्षक श्री.विजय केसरकर, श्री.डॉमिनिक डिसोझा,श्रीमती.एलिझाबेथ फर्नांडिस , श्री.स्टीफन डिसोझा सह सर्व शिक्षकवृंद व शिक्षेकत्तर कर्मचारी उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे मनोगत व आभार शाळेचे प्राचार्य अँथोनी डिसोझा यांनी केले.
आजरा हायस्कूलमध्ये गांधी जयंती उत्साहात

येथील आजरा हायस्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यानंतर सौ.बी.पी. पाटील यांनी महात्मा गांधींच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर सौ. एस.एस. कुराडे यांनी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा जीवनपटावर विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक ए. एल. तोडकर उपमुख्याध्यापिका सौ. एच.एस.कामात यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते आभार सौ.व्ही.पी.हरेर यांनी मांडले.

मुस्लिम युवकांचे कार्य कौतुकास्पद -अशोकआण्णा चराटी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील राहत खिदमत फाउंडेशनतर्फे स्वस्थ नारी- सशक्त परिवार अभियानासह सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णाभाऊ समूहाचे अध्यक्ष अशोकआण्णा चराटी हे होते.
वैभवलक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर व संत गजानन ब्लड स्टोरेज महागाव यांच्या संयुक्त विद्यमाने २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
उर्दू हायस्कुल प्रांगणात उदय इंदुलकर व डॉ. सुरजीत पांडव यांचे हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. तसेच कु. सिद्धी अनिल देसाई हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत राज्य कर निरीक्षक वर्ग-२
(एस टी आय) पद संपादन केल्याबद्दल, सत्कार करण्यात आला.
यावेळी अशोकआण्णा चराटी यांनी मुस्लिम समाजात आता भरपूर सकारात्मक बदल होत आहेत. आज मुस्लिम युवक युवती शिक्षणक्षेत्रात चांगली कामगिरी करीत आपला ठसा उमटवीत आहेत. मुलीं शिक्षणात चांगला ठसा उमटवित आहेत असे सांगितले.
डॉ. यशवंत चव्हाण म्हणाले, एस.जी.एम. हॉस्पिटलच्या माध्यमातून जास्तीत जास्त रुग्णांना सुविधा देण्याचे प्रयत्न करत आहोत. यावेळी अझहर बागवान,नागेश यमगर, सहाय्य्क पोलीस निरीक्षक,,अमजद मीरा,अध्यक्ष लकी फाऊंडेशन ग्रुप, गडहिंग्लज, आशपाक किल्लेदार , नौशादभाई बुडडेखान, अनिकेत चराटी, किरण कांबळे डॉ.अमीर मुजावर (दंत सहाय्य्क, ग्रामीण रुग्णालय आजरा), डॉ. युनूस सैय्यद, समीर चांद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यासिन सैय्यद यांनी केले. आभार राहतचे अध्यक्ष मौजुद माणगावकर यांनी मानले.

निधन वार्ता
कृष्णा चव्हाण
चव्हाणवाडी . ता आजरा येथील माजी सरपंच कृष्णा आनंदा चव्हाण ( वय ९७ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा, सून, पत्नी, नातवंडे असा परिवार आहे.
कै. मुकुंदराव आपटे यांचे जवळचे सहकारी असा त्यांचा तालुक्याला परिचय होता.
अर्जुन शिवगण

सुलगाव ता. आजारा येथील अर्जून लक्ष्मण शिवगण ( वय ६९ वर्षे) यांचे दीर्घ आजाराचे निधन झाले
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुना, नातवंडे विवाहित मुलगी असा परिवार असून ‘सरपंच’ या नावाने ते सुलगावकरांना परिचित होते.
सदाशिव डोंगरे

भादवण ता. आजरा येथील माजी सैनिक श्री.तातेराव उर्फ सदाशिव ईश्वर डोंगरे (वय ६५ वर्षे ) यांचे आकस्मित निधन झाले
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.



