


उद्या आजरा बंद
टोल विरोधात मोर्चाची जंगी तयारी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संकेश्वर – बांदा राष्ट्रीय महामार्गावरील आजऱ्याजवळील टोलला हद्दपार करण्यासाठी उद्या सोमवार, दि. २४ जून रोजी आजरा बंदचे आवाहन व्यापारी असोसिएशनने केले आहे. टोलमुक्ती संघर्ष समितीच्या वतीने मोर्चा काढला जाणार आहे. मोर्चाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर रवळनाथ मंदिरात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
आजरा तालुकावासीय टोल भरणार नाहीत, या मुद्द्याशी ठाम आहेत. रस्त्यासाठी आलेला खर्च राज्य सरकारने केंद्र सरकारला द्यावा; पण आम्ही टोल देणार नाही. धरण व रस्ता आमच्या तालुक्यात; जमिनी आमच्या गेल्या व टोलही आम्हीच भरायचा का? जमिनीची भरपाई देताना आमच्यावर अन्याय का? असेही प्रश्न आजच्या बैठकीत उपस्थित झाले. बैठकीत मोर्चा यशस्वी करण्यासाठी आजरा बंद ठेवून मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिवाकर नलवडे यांनी शहरातील सर्व व्यापारी आपली दुकाने बंद ठेवून मोर्चात सहभागी होतील, असे जाहीर केले. यावेळी कॉ.संपत देसाई ,मुकुंदराव देसाई,रवी भाटले,सुधीर देसाई, संभाजी पाटील, युवराज पोवार,दिगंबर देसाई,प्रभाकर कोरवी, विक्रम देसाई, रशीद पठाण, प्रकाश मोरुस्कर, जनार्दन टोपले, युवराज पोवार, संजयभाऊ सावंत, बंडोपंत चव्हाण, शरीफ खेडेकर,सी.डी.सरदेसाई प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

विकासकामांच्या पाठपुराव्यात कमी पडणार नाही : आम. प्रकाश आबिटकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहराचा विकास झपाट्याने होत असून शहराच्या विकासाच्या पार्श्वभूमीवर विधायक कामांच्या पाठपुराव्यात कदापिही कमी पडणार नाही अशी हमी आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली.
महामार्ग रुंदीकरणाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगरवासीयांना केलेल्या सहकार्याबद्दल येथील रहिवाशांकडून कृतज्ञतापूर्वक सत्कार समारंभ पार पडला. यावेळी आमदार आबिटकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणपतराव डोंगरे होते.
शाल, श्रीफळ, विठ्ठल- रुक्मिणीची मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते आमदार प्रकाश आबिटकर यांचा सत्कार करण्यात आला.
स्वागत व प्रास्ताविकपर भाषणात पत्रकार ज्योतिप्रसाद सावंत यांनी आमदार आबिटकर यांनी कशा पद्धतीने सहकार्य केले व तालुक्याच्या विकासासाठी गेल्या दहा वर्षात केलेल्या विविध कामांचा आढावा घेतला.
सत्काराला उत्तर देताना आमदार आबिटकर पुढे म्हणाले, कर्तव्य भावनेतून विकास कामे केली जातात. परंतु ज्यावेळी केल्या कामाबद्दल ज्यांच्यासाठी आपण हे करतो आहोत त्यांच्याकडून पाठीवर थाप पडली की उत्साह दुणावतो, नवीन कामे करण्याची स्फूर्ती मिळते.
शिवाजीनगर घाट परिसर विकासासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल त्याचबरोबर चित्री प्रकल्पातील पाण्याचा आजरा तालुकावासीयांना लाभ होण्यासाठी केटीवेअर बंधाऱ्यांची मागणी ही करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यातील सर्फनाला प्रकल्प प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाला योग्य न्याय देऊन मार्गी लागला ही आपल्या आयुष्यातील सर्वात समाधानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रम प्रसंगी संभाजी इंजल, गणपतराव डोंगरे,दत्तात्रय मोहिते यांनी आपल्या मनोगतात आमदार प्रकाश आबिटकर यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. यावेळी जितेंद्र भोसले यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी माजी सरपंच शिवाजी गुडूळकर, रामचंद्र इंजल, सुरेश देसाई, विजय पोवार, सुधाकर कोरवी, प्रभाकर कोरवी,नाथ देसाई ,आनंदा कुंभार, परशुराम बामणे, वाय.जी इंजल, प्रकाश हरमळकर, विजय थोरवत, शिवाजीराव इंजल, सचिन भोई, श्रीकांत देसाई, संतोष भाटले, सुधिर देसाई, रवींद्र सुतार,योगेश पाटील,विनोद बिल्ले, राजू करमळकर राकेश करमळकर, प्रशांत बिल्ले,राजेंद्र कदम, अरुण नाईक,राजेंद्र कबुरे,अमोल सुतार,गुंडूभाई वाळके,सुभाष मोरजकर, पांडुरंग कोले, प्रशांत बिल्ले, गौरव देशपांडे, राजू विभुते,सुयोग जाधव,सूरज जाधव, सुरेश डोणकर ,तानाजी डोणकर, समीर तकीलदार, सलाम काकतीकर, निलेश घाटगे यांच्यासह शिवाजीनगर विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समीर मोरजकर यांनी आभार मानले.

यमेकोंड येथे `कर्नाटकी बेंदूर ‘ उत्साहात साजरा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
यमेकोंड येथे कर्नाटकी बेंदूर उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे यमेकोंड गावचे शेतकरी दिपक होडगे, उत्तम होडगे, विलास राजाराम, दत्तात्रय आडसोळ, महादेव कुंभार, धोंडीबा हरेर,नामदेव कुंभार, महादेव हरेर, विनायक तिबिले, शामराव कसलकर अशोक कसलकर,धोंडीबा कांबळे, पांडुरंग पंडित, उत्तम तिबिले व कु. सुयश दिपक होडगे यांनी आपल्या बैलजोड्या विद्या मंदिर यमेकोंड शाळेच्या आवारात नेऊन सजवल्या.
बैलमालकांसह सर्व ग्रामस्थांनी बैलजोड्यांची पूजा केली व करीच्या बैलांच्या मानाचा नारळ दत्तात्रय आडसोळ यांच्या हस्ते वाढवण्यात आला. त्यानंतर सर्व बैलजोड्यांची वाजत-गाजत, भव्य-दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये विद्या मंदिर यमेकोंड शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिपक संतु होडगे यांचे सहकार्य लाभले.

पोल्ट्रीचा कचरा…
आरोग्य खात्याचे दुर्लक्षच

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा-महागाव मार्गावर होनेवाडीनजिक पोल्ट्री शेड मधील कचरा टाकण्याचे काम सुरूच असून याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्षच होत असल्याबद्दल ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे.
होनेवाडीनजीक चाफ्याचा भाव या ठिकाणी सदर कचरा आणून टाकला जातो. यामध्ये मृत्यू कोंबड्या, बाद झालेली अंडी व इतर पोल्ट्रीचे साहित्य असते. अल्पावधीतच या सर्व साहित्य कुजत असल्याने येथे दुर्गंधी निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. वारंवार मागणी करूनही आरोग्य विभागाकडून संबंधितावर कारवाई का केली जात नाही? असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
शनिवारी असाच प्रकार सुरू असताना नागरिकांनी संबंधित वाहन चालकास पकडून वन खात्याला पाचारण केले. वन खात्याने तातडीने कचरा टाकण्यासाठी वापरण्यात येणारे वाहन ताब्यात घेतले आहे. नागरिकांनी मागणी केल्याशिवाय कारवाई का होऊ शकत नाही ? असा सवालही आता उपस्थित होत आहे.
यावेळी पोलीस पाटील रणजीत सुतार, कृष्णा पाटील, सरपंच प्रियांका आजगेकर,महेश पाटील, विश्वास सुतार यांच्यासह स्थानिक नागरिक व वनपाल निळकंठ उपस्थित होते.




