स्वामी विवेकानंद पतसंस्था ही जिल्हयातील अग्रगण्य पतसंस्था : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील
आजरा येथे श्री लक्ष्मी देवी उद्यान लोकार्पण सोहळा उत्साहात

आजरा येथील स्वामी विवेकानंद पतसंस्था ही नेहमीच सर्वसामान्यांच्या पाठीशी राहिली आहे .लहानात लहान व्यक्तींना मदतीचा हात पुढे करून त्यांना उभे करण्याचे काम या संस्थेने केले आहे.आजरा शहरवासीयांची गरज लक्षात घेऊन उत्कृष्ट पद्धतीचे उद्यान उभे केले हे कौतुकास्पद आहे.भविष्यातही छोट्या- मोठ्या उद्योगांना कमीत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा बचत गटांसह सर्वसामान्यांना स्वावलंबी बनवण्याकरता मदत करावी असे आवाहन भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केले. आजरा येथे स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या लक्ष्मीदेवी उद्यान लोकार्पण सोहळ्यामध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर होते.

सुरुवातीस चंद्रकांत दादा पाटील व मान्यवरांच्या हस्ते सदर उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. स्वागतपर भाषणात बोलताना संस्थेचे अध्यक्ष जनार्दन टोपले यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. सर्वसामान्यांच्या कल्याणाचे स्वप्न घेऊन संस्थेचे कामकाज सुरू ठेवले आहे सामाजिक बांधिलकी म्हणून विविध विधायक उपक्रम संस्थेमार्फत राबवले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संस्था लहान असली तरी संस्थेची स्वप्ने मोठी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

माजी भाजपा जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके म्हणाले, भारतीय जनता पार्टीचे मूळ हे आजरा तालुक्यात आहे. स्व. बाबुराव कुंभार यांचे भाजपा करिता असणारे योगदान फार मोठे आहे. सर्वसामान्यांना विविध सोयी देण्यासाठी नगरपंचायतीने शहरातील खुल्या जागा ताब्यात घेऊन त्या विकसित कराव्यात अशा सूचनाही त्यांनी केल्या.

माजी आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाच वर्षाच्या मंत्रिपदाच्या कालावधीत उचंगी सारखे प्रकल्प मार्गी लागण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यामध्ये ज्या काही मोजक्या पतसंस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे त्यामध्ये स्वामी विवेकानंद पतसंस्थेचा समावेश निश्चितच आहे. जनसंघ व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी आदर्श पद्धतीने आणि पतसंस्था चालवली आहे. घनसाळ तांदूळ व स्थानिक काजू याला मोठी बाजारपेठ असल्याने तालुक्याचे भवितव्य उज्ज्वल असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी म्हणाले, शहरांमध्ये उद्यानाची कमतरता निश्चितच जाणवत होती त्यावेळी स्वामी विवेकानंद पतसंस्थेने श्री लक्ष्मी देवी यात्रा कमीटीची जागा विकसित करण्याचे ठरविले. त्या वेळी कोणतीही हरकत न घेता तातडीने याला मंजुरी देण्यात आली. आजरा तालुक्यातील सहकार निश्चितच आदर्शवत आहे. राजकारण एका बाजूला व संस्थात्मक कामे एका बाजूला अशी या तालुक्याची परंपरा आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आजरा अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे,प्रकाश वाटवे, नाथाजी पाटील, प्रा.डॉ. सुधीर मुंज, दिवाकर नलवडे, भाजप तालुका अध्यक्ष सुधीर कुंभार, जयकुमार मुळे, संभाजी इंजल, मारुती मोरे, प्रभाकर कोरे, प्रताप कोंडेकर अरुण यांनी, अबुताहेर तकिलदार, रमेश कारेकर, आनंदा कुंभार, बापू टोपले, अल्केश कांदळकर,सरव्यवस्थापक अर्जुन कुंभार यांच्यासह मान्यवर, संस्थेचे संचालक, कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे पत्रकार समीर देशपांडे यांनी केले, तर आभार उपाध्यक्ष दयानंद भुसारी यांनी मानले.
अण्णांच्या वक्तव्यावर हाळवणकर यांचा टोला
‘मी भाजपाचा असून येथून पुढे शेवटपर्यंत भाजपातच राहणार’ असे अशोकअण्णा चराटी यांनी जाहीररीत्या सांगितले. तर हाच धागा पकडत माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी अशोकअण्णा यांनी केलेली भविष्यवाणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कितपत खरी ठरणार? असा टोला लगावला…
कोरीवडे येथे चोरी… टीव्ही सह इतर साहित्य केले लंपास
कोरीवडे (ता.आजरा ) येथील धनाजी मारुती सोनार यांच्या घराचा कडी-कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केला व टीव्ही, होम थिएटरसह साहित्य लंपास केले.
या बाबतची फिर्याद आजरा पोलीस स्टेशनला धनाजी सोनार यांनी दिली असून आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

आजरा तालुक्यात जोरदार पाऊस
आजरा शहर व परिसरात गुरुवारी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली.दिवसभराच्या उकाड्या नंतर विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाला आहे.पावसाबरोबरच जोरदार वारे असल्याने आंब्यासह काजू पिकाचे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे.पावसामुळे काही काळाकरता वीजपुरवठा खंडित झाला होता.

आज (गुरुवारी) मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय पुढील प्रमाणे –
• डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेत वन्यप्राण्यांमुळे शेतपिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी “सौर उर्जा कुंपणाचा” समावेश.(वन विभाग)
• देशातील पहिल्याच महाराष्ट्र जनुक कोष (Maharashtra Gene Bank) प्रकल्पास मान्यता(वन विभाग)
• येरवडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पदनिर्मिती (कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग)
• पोलीस अधिकारी, अंमलदार यांना पूर्वीप्रमाणे शासकीय घरबांधणी अग्रिम देणार(गृह विभाग)
• विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग समाजाच्या आरक्षण व सवलतींचा, इतर लाभांचा सर्वंकष अभ्यास करुन अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीच्या शिफारशी.(इतर मागास बहुजन कल्याण)
• गळीत हंगाम २०२१-२०२२ मधील अतिरिक्त उस गाळप करण्यासाठी देण्यात येणाऱ्या सवलती, वाहतूक उतारा व साखर उतारा घट अनुदान देण्यास मान्यता(सहकार विभाग)
अठरा तालुक्यातील कायम विना अनुदानित महाविद्यालयांना १०० टक्के अनुदान
( उच्च व तंत्रशिक्षण विभाग)
सामाजिक न्याय विभागाच्या चार महामंडळांची भागभांडवल मर्यादा वाढविली(सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)
राज्यात विविध विभागांत रेडिएशन ओन्कोलॉजी युनिट, कॅथलॅब्स, शस्त्रक्रियागृहे, डायलिसिस यंत्रे स्थापन करणार(सार्वजनिक आरोग्य विभाग)





