

अल्पवयीन मुलीचे अपहरण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आरदाळ तालुका आजरा येथून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञातांककडून अपहरण करण्यात आले असल्याची फिर्याद आजरा पोलिसात दाखल झाली आहे.
११ मार्च रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आरदाळ येथे सदर घटना घडली असल्याचे मुलीच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

आजऱ्यात पोलिसांचे संचलन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
लोकसभा निवडणुका व रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर आजरा शहरांमध्ये पोलिसांनी संचलन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून संचलन फेरी काढण्यात आली. यामध्ये पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान, अधिकारी अग्निशमन दलाच्या गाड्या सहभागी करण्यात आल्या होत्या.

गव्यांचा साळगावात धुमाकूळ… ऊस पिकाचे नुकसान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
साळगाव ता. आजरा येथे गेले दोन दिवस गव्यांनी धुमाकूळ घालत पांडुरंग कांबळे यांच्या एकरभर उसाचे मोठे नुकसान केले आहे.
जंगल क्षेत्रामध्ये चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ लागली आहे तसतसे गवे शेती पिकाकडे आपला मोर्चा वळवत असून ऊस पिकाची लावण रातोरात फस्त करत असल्याने शेतकरी वर्गाकडून गव्यांच्या बंदोबस्ताची मागणी केली जात आहे.

मृतदेह ठेवण्यासाठी शीतगृहाची व्यवस्था ग्रामीण रुग्णालयात करावी…
रूग्ण कल्याण समितीच्या बैठकीत मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा भागातील बऱ्यापैकी लोक मुंबईस्थित असल्यामुळे त्यांच्याशी संबंधित एखादी निकटवर्तीय व्यक्ती मृत पावल्यास नातेवाईक येईपर्यंत बराच कालावधी जातो यासाठी मृतदेह ठेवण्यासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये शीतगृह असावे अशी मागणी रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीत करण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ .सुप्रिया देशमुख बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या.
रुग्णालयाच्या सोयी सुविधांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. तसेच रुग्णालयात प्रसूतीची व्यवस्था सुरु झाल्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या हस्ते वैद्यकीय अधिकारी डॉ.चेतन शिखरे यांचा सत्कार करण्यात आला .तसेच प्रसुतीसाठी आलेल्या महिला रुग्णांना पिण्यासाठी गरम पाणी मिळावे अशी व्यवस्था करण्यात यावी असे सुचविण्यात आले. ५० बेडच्या हॉस्पिटलच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची मागणी करावी असेही सुचविण्यात आले.
बैठकीस वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील, चेतन शिखरे शामसुंदर सागर, पंचायत समितीतील आरोग्य, महिला व बालकल्याण विभागाचे कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी, आमदार प्रतिनिधी विजय थोरवत, नगरपंचायत प्रतिनिधी संजय यादव तसेच रूगणालयातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

देऊळवाडी येथील रस्सिखेच स्पर्धेत उत्तुरचा आदर्श गणेश मंडळ संघ विजेता

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
देऊळवाडी गावामध्ये यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या भव्य ओपन रस्सीखेच स्पर्धेत स्पर्धेत आदर्श गणेश मंडळ, उत्तुर ने प्रथम क्रमांक पटकावला. किणी ग्रामस्थ मंडळाने द्वितीय वज्रकाया करंबळी मंडळाने तृतीय तर रवळनाथ पोळगाव मंडळाने चतुर्थ क्रमांक पटकावला. आवंडी धनगरवाडा संघास उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले
स्पर्धेचे नियोजन मंडळाचे अध्यक्ष युवराज पोवार यांनी केले. स्पर्धेचे उद्घाटन देऊळवाडी- सातेवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. यशोदा युवराज पोवार यांच्या हस्ते तसेच उपसरपंच संजय सावंत यांच्या हस्ते झाले. उद्घाटनाचा सामना बाल गणेश मंडळ देऊळवाडी यांनी जिंकला.
यावेळी देऊळवाडी, सातेवाडी, खानापूर, विटे, लाटगाव, पोळगावसह परिसरातील प्रेक्षकांनी गर्दी केली होती.

निवड…
ॲड. देवदास आजगेकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ॲड. देवदास आजगेकर यांची नोटरी पब्लिक ( भारत सरकार ) पदी निवड झाली आहे. आजगेकर हे प्रतीथयश व नामांकित वकील आहेत.



