mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

मंगळवार दि.४ मार्च २०२५

तालुक्याच्या ग्रामीण भागातही ‘छावा ‘ची क्रेझ

गावागावात दाखवला जात आहे चित्रपट

          आजरा ,: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      शहरी भागाप्रमाणेच आजरा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये छावा चित्रपटाची क्रेझ असून तालुक्यात अनेक ठिकाणी युवा वर्गाला हा चित्रपट दाखवला जात आहे. याकरीता गावोगावची तरुणाई पुढाकार घेत आहे.

      सध्या छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास सुरू असल्याने ग्रामीण भागातील वातावरण शिवमय झाले आहे. मुळातच छावा कादंबरीचे लेखक शिवाजीराव सावंत हे आजरा तालुक्यातील असल्याने व चित्रपट जगभर चर्चेत असल्याने या चित्रपटाची ग्रामीण भागातही क्रेझ निर्माण झाली आहे.

       व्हाट्सअप स्टेटससह सोशल मीडियावर छावा चित्रपटातील संवादांची रेलचेल दिसत आहे. चित्रपटाबद्दल प्रचंड आकर्षण निर्माण झाल्याने या आयोजित केलेल्या विशेष शोजना बालगोपालांसह तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

एमआयडीसीच्या विस्तारीकरणासाठी नारायण बागेऐवजी अन्य पर्यायी जागेचा विचार करण्याची मागणी

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजरा शहरालगत असलेली संस्थानकालीन नारायण बाग ही आजरा शहराचे हृदय असल्याने आजरा शहराला प्रदूषणमुक्त ठेवायचे असल्यास एमआयडीसीच्या विस्तारीकरणासाठी नारायण बागेऐवजी अन्य पर्यायी जागेचा विचार करण्याची मागणी श्रमिक मुक्ती दलातर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे लेखी निवेदन आजरा तहसीलदारांना देण्यात आले आहे.

      आजरा तालुक्यात अनेक प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनीचे वाटप अजून झालेले नाही. उचंगी धरणाची उंची दोन मीटर वाढवल्याने अजून किमान २५ हेक्टर जमीन आवश्यक आहे त्यामुळे सदरची जमीन प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राखीव ठेवण्याची गरजही असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

      कोणत्याही विभागाचा विकास व्हायचा असेल तर उद्योगधंदे वाढले पाहिजेत. त्यासाठी एमआयडीसी आवश्यक आहे. पण ती शहराचे अथवा नागरी वस्तीचे आरोग्य धोक्यात आणणारी नसावी. आजरा शहरालगत असलेली नारायण बाग ही आजरा शहराचे हृदय आहे. ही बाग फार पूर्वी म्हणजे संस्थान काळापासून आजरा शहराला स्वच्छ हवा पुरवत आली आहे. या बागेच्या बाजूने अलिकडे आजरा शहराचा विस्तार होऊन नागरी वस्ती झाली आहे. नारायण बाग मधील आजरा आणि पारेवाडी महसूल क्षेत्रातील १५/१६ हेक्टर जमीन ही एमआयडीसीच्या विस्तारीकरणासाठी दिली जाणार आहे. खरतर कोणत्याही शहरालगत एमआयडीसी उभा करणे हे शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असते. त्यामुळे एमआयडीसी उभा करतांना ती शहरापासून आणि नागरी वस्तीपासून दूर उभी केली जाते.

      असे असतांना ज्या नारायण बागेला आजरा शहराचे हृदय समजले जाते. पश्चिमेकडून येणारा वारा आजरा शहराला स्वच्छ हवा पुरवत आला आहे. तोच वारा इथे एमआयडीसी झाल्यास आजरा शहरात प्रदूषित हवा आणि पाणी घेऊन येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी होणारे एमआयडीसीचे विस्तारीकरण थांबले पाहिजे. अजूनही या तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी किमान २५ ते ३० हेक्टर जमीन आवश्यक आहे. सदरची जमीन ही प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राखीव ठेवण्यात यावी. त्यामुळे एमआयडीसीचे विस्तारीकरण झालेच पाहिजे, या मुद्द्याशी आम्ही सहमत आहोत पण ते विस्तारीकरण नारायण बागेऐवजी अन्य ठिकाणी करावे करण्यात आली आहे.

       निवेदनावर कॉ. संपत देसाई,प्रकाश मोरुस्कर , दशरथ घुरे , नारायण भडांगे , विष्णू मांजरेकर, संभाजी चव्हाण, दत्तात्रय बापट, विजय पाटील इत्यादींच्या सह्या आहेत

मुक्ती संघर्ष समितीची विविध मागण्या संदर्भात अधिकाऱ्यांशी बैठक

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      भारत नगर मधील मूलभूत व पायाभूत गरजा पूर्ण करण्यासाठी “संघर्ष मोर्चा “चे नियोजन होते परंतु रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून कायद्याचा व पोलिसप्रशासनाच्या विनंतीस मान राखत संघर्ष मोर्चा रद्द करण्यात आला व पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने आजरा नगर पंचायत, विज विभाग तसेच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाली.

      यावेळी भारत नगरमधील विविध समस्या, पायाभूत सुविधा तसेच विज कनेक्शनसाठी फिडर, पथदिवे बसवण्यासाठी सकारात्मक चर्चा घडून आली.

      या चर्चेमध्ये मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत यांनी प्रश्नांचा भडीमार करीत भंबेरी उडवली. राजकारण महत्वाचे पण लोकांचे जीवनमान महत्वाचे नाही असं वाटतंय. आजऱ्यातील अशा आठ गटारी आहेत ज्या गटारीतून पाणी निचरा होणार नाही. त्यामुळे जो हेतू आहे तो साध्य होत नसेल तर काम करून फायदा काय? गटर आधी कि रस्ता आधी? असाही प्रश्न विचारला. ठेकेदाराकडून व्यवस्थित व चांगल्या दर्जाचे काम करून घेणेबाबत तसेच भारत नगरमधील स्थळ पाहणी करण्याची आग्रही मागणी केली त्यामुळे तातडीने स्थळ पाहणी करून प्रश्न सोडवण्यासाठीची हमी सर्व अधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार कामाचा उरक करण्याचे आश्वासन देण्यात आले.

      यावेळी नगरपंचायतीचे कार्यकारी अधिकारी राकेश चौगले, पाटबंधारे विभागचे सहा. अभियंता ए. एस. कचरे, कनिष्ठ अभियंता पी. बी. सुर्वे, विज विभागचे अभियंता निखिल मोगरे, पोलीस कर्मचारी तसेच भारत नगरमधील यावेळी मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत, जिल्हा संघटक समीर खेडेकर, तालुका संघटक मजीद मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते दिंगबर विटेकरी, भारतनगर मधील तौफिक माणगावकर, सल्लाउद्दीन शेख, मकसूद माणगावकर,खुदबूद्दीन तगारे, गुलाब शिकलगार,पापा लतीफ,सलीम नाईकवडे, आसिफ मुजावर,मुदस्सर इंचनाळकर, अब्दुलवाहिद सोनेखान सलीम शेख,यासीन सय्यद, नईम नाईकवडे, शौकत पठाण, आसिफ मुराद,सलीम ढालाईत, रहुफ नसरदी, सल्लाउद्दीन नसरदी,मोईन शेख,मुबारक नसरदी, आसिफ काकतीकर, कासिम लतीफ, मोहम्मद नसरदी,फहीम नसरदी, रहीम लतीफ, रशीद लाडजी,मुफीद काकतीकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

गायकवाड कुटुंबीयांना स्वराज्य तालमीकडून कौटुंबिक साहित्य

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      दोन दिवसापूर्वी गांधीनगर येथील आरती राहुल गायकवाड यांच्या घराला आग लागली होती,ह्या आगीत त्यांचे प्रचंड नुकसान झाले होते त्यांच्या घराची पाहणी करून तात्काळ मदत म्हणून लागणारे गृहोपयोगी साहित्य भाजपा तालुका अध्यक्ष व स्वराज्य तालीम संस्थापक अध्यक्ष अनिरुद्ध(बाळ) केसरकर यांनी दिले.

      यावेळी रुपेश परीट,शुभम पाटील,अवधूत केसरकर,रोहित बुरुड, गौतम भोसले, राहुल पेंडसे, अनिकेत देऊस्कर, रोहित गावांडाळकर,कुणाल भोसले, ओंकार तानवडे, आकाश शिंदे व स्वराज्य तालीम मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मडिलगे येथे आजपासून अखंड हरिनाम व पारायण सोहळा

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       मडिलगे ता. आजरा येथे विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये आज मंगळवार दि. ४ मार्चपासून हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

       सप्ताह कालावधीत दररोज सकाळी चार ते सहा या कालावधीत काकडा आरती सायंकाळी चार ते सहा हरिपाठ व सात ते बारा ज्ञानेश्वरी पारायण, हरिकीर्तन असा कार्यक्रम होणार आहे.

       सदर सप्ताह सोहळ्यास ह.भ.प. किरण खटावकर, डॉ. एच.डी. पन्हाळकर (उत्तुर), पूर्णानंद काजवे महाराज (कोगनोळी), अर्जुन जाधव (शिप्पूर), एकल महाराज (जोगेवाडी), आनंद पाटील महाराज (मळगे, कागल) इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

       काल्याचे कीर्तन व महाप्रसाद दिनांक ११ मार्च रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत होणार आहे.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९  

आजऱ्यात रमजानला उत्साहात सुरुवात

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा शहरांमध्ये रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली असून सायंकाळच्या वेळेस शहर गजबजून जात आहे.

       शहरामध्ये मुस्लिम बांधवांची संख्या मोठी असून ठिकठिकाणीच्या मस्जिद परिसरात व मुस्लिम वस्त्यांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सायंकाळच्या वेळी उपवास सुटल्यानंतर संभाजी चौक, बस स्थानक परिसरातील हॉटेल्स, कोल्ड्रिंक हाऊस, चायनीज सेंटर, चहाचे गाडे येथे गर्दी दिसत आहे.

       कपडे खरेदीलाही आतापासूनच प्राधान्य दिले जात असल्याचेही दिसत आहे. एकंदर आजरा शहरामध्ये रमजानचा माहोल तयार झाला आहे.

निधन वार्ता
महेश्वरी देसाई   

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

       निंगुडगे ता. आजरा येथील महेश्वरी मनोहर देसाई ( वय ५२ वर्षे ) यांचे हृदय विकाराच्या तीव्र धक्क्यांने निधन झाले.त्यां

         त्यांच्या पश्चात पती, दोन विवाहित मुली, दोन मुले, जावई, नातवंडे असा परिवार आहे. गडहिंग्लज साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी मनोहर देसाई यांच्या त्या पत्नी होत.

           रक्षाविसर्जन बुधवार दिनांक ५ रोजी सकाळी नऊ वाजता आहे.


शिवाजी देसाई (नेसरकर)

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

       सोहाळे ता. आजरा येथील शिवाजी भाऊ देसाई (नेसरकर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.निधन समयी त्यांचे वय ६० वर्षे होते.

        त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

दोन मुलांसह विवाहिता बेपत्ता…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!