गुरुवार दिनांक ८ मे २०२५



तीन आमदार… तीन जि.प…
तरीही महायुतीसमोर आव्हान…
आजरा : ज्योतिप्रसाद सावंत
स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणूक नगारे वाजू लागले आहे. आजरा तालुक्यातील तीनही जिल्हा परिषद मतदार संघात महायुतीचे आमदार असल्याने यावेळी महायुतीला जिल्हा परिषद निवडणुकीत मोठी संधी आहे. परंतु इच्छुकांची प्रचंड संख्या व या मोठ्या संख्येमुळे उमेदवारी न मिळाल्यास होणारे अंतर्गत शह-काटशहाचे राजकारण, बंडखोरीची शक्यता यामुळे महायुतीसमोर जिंकण्याचे मोठे आव्हान राहणार आहे.
आजरा नगरपंचायत झाल्यामुळे आजरा शहर वगळून पेरणोली या जिल्हा परिषद मतदारसंघाची रचना करण्यात आली आहे. या मतदारसंघाचे विधानसभेत आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर हे प्रतिनिधित्व करीत आहेत तर उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि चंदगड विधानसभा मतदारसंघात शिवाजीराव पाटील यांच्याकडे जिल्हा परिषदेची महायुतीची जबाबदारी राहणार आहे.
पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघात मंत्री आबिटकर यांच्याप्रमाणेच मंत्री मुश्रीफ यांचेही कार्यकर्ते आहेत. राज्य पातळीवरचे राजकारण काहीही असले तरीही राष्ट्रवादीचे दोन्ही गट व काँग्रेस येथे एकत्रित काम करताना दिसतात. त्यामुळे महायुतीतून उमेदवारी कोणाला मिळणार यावरच यश अपयश अवलंबून राहणार आहे.
हीच अवस्था वाटंगी जिल्हा परिषद मतदार संघात आहे. महायुती करता काम करणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार राजेश पाटील यांनी विधानसभा निवडणुकीनंतर या मतदार संघाशी संपर्क कायम ठेवला आहे. तर विधानसभा निवडणुक निकालानंतर विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील यांचे कार्यकर्ते फुल फॉर्ममध्ये आहेत. विधानसभेतील घसघशीत मताधिक्य अनेकांना जिल्हा परिषदेच्या उमेदवारीकरीता खूणावू लागले आहे. परंतु येथे राजेश पाटील यांच्या कार्यकर्त्यांची शिवाजीराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांसोबत जाण्याची मानसिकता दिसत नाही. त्यामुळे बंडखोरी अटळ दिसते.
उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघात मंत्री मुश्रीफ यांना यावेळी विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण येथून विधानसभेला आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते व जिल्हा परिषदेचे काँग्रेसकडून उमेदवारीचे दावेदार उमेश आपटे यांनी मंत्री मुश्रीफ यांना रसद पुरवली आहे.
तालुक्यात शिवसेना उ.बा.ठा. राष्ट्रवादी शरद पवार गट व राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची चांगलीच मोट बांधली गेलेली आहे. त्यामुळे महायुतीपेक्षाही महाविकास आघाडीला एकसंघपणाचा फायदा अधिक होण्याची शक्यता आहे.
गेल्या सहा-सात वर्षांमध्ये जिल्हा परिषद डोळ्यासमोर ठेवून अनेकांनी आपापल्या मतदारसंघात मशागत केलेली आहे व ही मंडळी थांबण्याच्या स्थितीत नाहीत. परंतु गट- तट, अंतर्गत हेवेदावे, बंडखोरी टाळण्याचे महायुती समोरील आव्हान संपुष्टात न आल्यास याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पंचायत समिती नकोच…
जिल्हा परिषदेच्या तुलनेमध्ये पंचायत समितीकरिता इच्छुकांची संख्या कमी दिसते. पंचायत समिती सदस्यपदापेक्षा गावची सरपंचपदाची जबाबदारी बरी असे म्हणणारेही अनेक जण दिसू लागले आहेत.


वारंवार अपघात होऊनही साळगाव तिठ्ठयाचा बाजारच…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील आजरा- गडहिंग्लज महामार्गावर साळगाव तिठ्ठ्यावर गेल्या महिन्याभरात दुचाकी स्वारांच्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांना मृत्यूला सामोरे जावे लागले. येथे रस्त्याशेजारी उभी केली जाणारे वाहने यास कारणीभूत असल्याचे प्राथमिक निष्कर्ष पुढे आल्याने मध्यंतरीच्या कालावधीमध्ये येथील वाहने हटवण्यात आली होती. परंतु पुन्हा एकदा वाहन चालक येथे वाहने तर उभी करू लागले आहेतच परंतु त्याच बरोबर येथे आता विक्रेतेही आपल्या विविध वस्तू विक्रीसाठी ठेवून ग्राहकांची गर्दी करू लागल्याने पुन्हा एक वेळ हे ठिकाण धोकादायक होऊ लागले आहे.
बाहेरगावाहून येणाऱ्या वाहन चालकांना साळगाव मार्गावरून येणारी वाहने सहजासहजी दिसत नाहीत. रस्त्याशेजारी उभी केली जाणारी वाहने याला कारणीभूत आहेत. २८ मार्च रोजी आजरा येथील संदीप सुतार तर २ एप्रिल रोजी साळगाव येथील रजाक शेख या दोघांचा अपघाती मृत्यू एकाच ठिकाणी याच फाट्यावर झाला आहे.
हे वळण धोकादायक वळण बनले असल्याने येथील रस्त्याशेजारील वाहने काढण्याबरोबरच येथे फिरत्या विक्रेत्यांचे स्टॉल्स मांडण्यास बंदी घालण्याची गरज अधोरेखित होत आहे.


आजरा न्यायालय येथे शनिवारी राष्ट्रीय लोकअदालत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील दिवाणी न्यायालय क. स्तर, आजरा येथे शनिवार ता. १० मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे. या लोकन्यायालयात दाखलपूर्व प्रकरणे आणि न्यायालयातील प्रलंबित खटले ठेवण्यात येणार आहेत.
पक्षकारांमध्ये आपसात तडजोडीने अधिकाधिक खटले निकाली झाल्यास पक्षकारांचा वेळ, पैसा यांची बचत होणार आहे. लोकअदालतीच्या अधिक माहितीसाठी आजरा तालुका विधीसेवा समितीशी संपर्क करावा. या दिवशी अधिकाधिक तडजोडपात्र प्रकरण ठेवून लोकअदालत यशस्वी करण्याचे आवाहन अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, आजरा व आजरा बार असोसिएशन तर्फे
आर. पी. थोरे अध्यक्ष, तालुका विधी व सेवा समिती, आजरा यांनी केले आहे.


सिरसंगीचे सेवानिवृत्त
लेफ्टनंट सुभेदार विजय वांजोळे यांचा सत्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिरसंगी येथील लेफ्टनंट सुभेदार विजय विठ्ठल वांजोळे यांनी सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ पार पडला .
स्वागत व प्रस्ताविक सरपंच संदीप चौगुले यांनी केले. सुरुवातीला गावातून वांजोळे यांची कुटुंबासह गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील आबालवृद्धाकडून वांजोळे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. आजरा तालुका सैनिक संघटनेकडून विजय वांजोळे यांना पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष श्री.दत्तात्रय मोहिते होते.
यावेळी आजरा कारखाना व्हा. चेअरमन सुभाषराव देसाई, संचालक दिगंबर देसाई ,सी. आर. देसाई, तालुका शेतकरी संघाचे संचालक मधुकर येलगार यांनी आपल्या मनोगतात सुभेदार विजय वांजोळे यांनी सिरसंगी गावचा संपूर्ण तालुक्यात नावलौकिक वाढवल्याचे सांगितले. त्याचबरोबर वांजोळे यांनी निवृत्तीनंतर सामाजिक कार्यात उतरावे असा सल्लाही दिला.
यावेळी विजय वांजोळे यांचा सपत्नीक ग्रामपंचायत व गावातील विविध संस्थांमार्फत सत्कार करण्यात आला.वांजोळे यांनी सत्काराला उत्तर देताना १९९९ च्या कारगिल युद्धातील अनुभव कथन केले. त्या वेळच्या कठिण प्रसंगाची आठवणी सांगितल्या.
कार्यक्रमास पांडुरंग टकेकर, संतोष चौगुले, दत्तात्रय येलगार, हनुमंत वांजोळे, सुभेदार आनंदा टेकेकर, प्रवीण मातवणकर, धोंडीराम देसाई, अशोक चौगुले , दत्तात्रय गुरव, शिवाजी होडगे, भीमराव मयेकर , विजय देसाई , प्रभाकर पाटील, विजय होडगे, रमेश देसाई, श्रावण पाटील, भिकाजी देसाई, विनोद होडगे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
आभार माजी सैनिक संजय कांबळे यांनी मानले.


निधन वार्ता
बापू सावंत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिवाजीनगर आजरा येथील तालुका खरेदी विक्री संघाचे सेवानिवृत्त कर्मचारी राजाराम उर्फ बापू सावंत (वय ८४ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पाच विवाहित मुली, जावई, एक विवाहित मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. शिवाजीनगरचे कार्यकर्ते विजय उर्फ बाळासाहेब सावंत यांचे ते वडील व सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एम. जालकर यांचे सासरे होत.
रक्षा विसर्जन शुक्रवार दिनांक ९ रोजी सकाळी आहे.
वसंत सुतार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
होन्याळी येथील वसंत कृष्णा सुतार (वय ८० वर्षे) यांचे मंगळवार दिनांक ६ मे २०२५ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुले, सूना , नातवंडे असा परिवार आहे. आजरा येथील उपक्रमशील शिक्षक सुनील सुतार यांचे ते वडील होत.
रक्षा विसर्जन शुक्रवार दिनांक ९ मे २०२५ रोजी होन्याळी येथे मूळ गावी होईल.




