शुक्रवार दिनांक ९ मे २०२५



रस्त्यांची दुर्दशा …
पावसाळ्यात शहरवासीयांचे होणार हाल…?

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शहरातील नवीन नळ पाणीपुरवठा योजनेचे रेंगाळलेले काम, या कामामुळे शहरभर झालेली खुदाई व नवीन रस्ते व गटर्स करण्याकरता येणाऱ्या मर्यादा, जुन्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या वाढलेल्या गळत्या यामुळे यावर्षी आजरा शहरवासीयांचे पावसाळ्यात प्रचंड हाल होणार असे दिसू लागले आहे.
नवीन नळ पाणीपुरवठा योजना अद्याप पूर्णत्वास गेलेली नाही. मे महिन्याचा पहिला पंधरवडा संपत आला तरीही यामध्ये म्हणावी तशी प्रगती दिसत नाही. यापुढे शहरातील रस्ते होणार कधी ? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे. न पाणीपुरवठा योजने करता केलेली खुदाई शहरवासीयांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे. उन्हाळभर धुळीचे साम्राज्य तर पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य अशा विचित्र परिस्थितीला शहरवासीयांना सामोरे जावे लागत आहे. मुरूम टाकून ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजवण्याचा प्रयत्नही यशस्वी होईल असे दिसत नाही.
पावसाळ्यात शहरवासीयांना गल्लोगल्ली पाण्याची डबकी पहायला मिळणार आहेत. शहरात सुमारे शंभरभर ठिकाणी जुन्या पाणीपुरवठा योजनेला गळत्या लागलेल्या आहेत. या गळत्या काढण्याकरता दुर्लक्षच होताना दिसत आहे. परिणामी नळ पाणीपुरवठा योजनेचे निम्मे पाणी गटर्समधून वाहताना दिसते.
एकंदर या वर्षी पावसाळ्यात शहरवासीयांसमोर चिखल, डबकी व रोगराई यांचे आव्हान राहणार आहे.


कानोली येथील महालक्ष्मी यात्रा उत्साहात संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कानोली ता.आजरा या गावची तेरा वर्षाने झालेली महालक्ष्मी यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
तालुक्यातील पुर्वभागात झालेल्या कानोली यात्रेला भाविकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. उन्हाळी सुट्ट्यामुळे मंबईकर ग्रामस्थ सहकुटुंब यात्रेत सहभागी झाले होते. माहेरवासीनी लक्ष्मी देवीची ओटी भरण्यासाठी व माहेरच्या माणसांना भेटण्याच्या ओढीने हजर झाल्या होत्या.पै पाहुणे, मित्र परिवार याच्या भेटी गाठीने यात्रेत तुफान गर्दी झाली होती
यात्रेच्या मुख्य दिवशी रात्री उशिरापर्यंत जेवणावळी सुरू होत्या. यात्रा कमिटी अध्यक्ष संभाजी आपगे , संरपंच सौ. सुषमा पाटील, ग्रामपंचायत सदस्य, यात्रा कमिटी सदस्य मुंबई मंडळ , सहकारी संस्थाचे पदाधिकारी, आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन याच्या सहाय्याने यात्रा सुरळीत पार पडली.
यात्रेमुळे मोठी आर्थिक उलाढाल झाली.


पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते रविवारी उत्तूर येथे सन्मान सोहळा

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर येथील लोकशाहीर द. ना. गव्हाणकर प्रतिष्ठान यांच्या वतीने विविध क्षेत्रातील गुणीजनांना पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. ११ मे रोजी उत्तूर आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पुरस्कारकर्त्यांचा सन्मान होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भैरू सावंत आणि सुरेश शिंत्रे यांनी दिली.
साहित्य, कला, शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १७ जणांचा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. येथील महादेव मंदिर येथे सकाळी ११ वाजता कार्यक्रम होणार आहे. यावेळी आयएएस वृषाली कांबळे, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर, सरपंच किरण आमणगी, विलास पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.


पशुसंवर्धन योजनांचा लाभ घेण्याची संधी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जाणार आहेत. अनुसूचित जाती, जमाती व नवबौद्धांना या योजनांच्या ७५ टक्के अनुदानाचा लाभ घेता येईल.
गतवर्षी निवडणुकांमुळे अर्ज करता आले नव्हते. प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांनाच लाभ दिला होता. यंदा नव्याने अर्ज करता येणार आहेत. विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी दोन दुधाळ म्हशींसाठी एक लाख ३४ हजार ४४३ रुपये तर दोन गायींसाठी एक लाख १७ हजार ६३८ रुपये अनुदान आहे. दहा शेळ्या व एक बोकड गट वाटपासाठी ७७ हजार ६५९ रुपये दिले जाणार आहेत. तसेच जिल्हा आदिवासी घटक योजनेतून अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनाही यांचा लाभ घेता येईल. १०० मिश्र कुक्कुट पक्षाच्या गटासाठी १४ हजार ७५० रुपये अनुदान आहे. या योजनांत महिलांसाठी ३३ टक्के तर अपंगांसाठी ५ टक्के आरक्षण आहे. योजनांच्या लाभासाठी ३ मे ते २ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत अशी माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ.
पी.डी. ढेकळे यांनी दिली.


मुकुंददादांना ए.वाय. यांच्या शुभेच्छा

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा कारखाना चेअरमनपदी श्री.मुकूंददादादा देसाई यांची निवड झालेबद्दल ए.वाय.पाटील यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. आजरा कारखाना संचालक उदयराज पवार,रणजीत देसाई, जनता बँकेचे व्हा. चेअरमन अमित सामंत, संचालक विक्रम देसाई ,वसंत देसाई, पांडुरंग दोरुगडे, विश्वास पाटील यावेळी उपस्थित होते.

कै.केदारी रेडेकर हायस्कूलमध्ये व्यक्तिमत्व विकास शिबीर संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेद्रेवाडी येथील कै. केदारी रेडेकर हायस्कूलमध्ये दोन दिवसीय व्यक्तिमत्व विकास शिबीर पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन रेडेकर संस्था समुहाच्या अध्यक्षा अंजनाताई रेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव पांडूरंग शिप्पुरकर, पेद्रेवाडी व हाजगोळी गावातील पालक उपस्थित होते.
यावेळी रविंद्र पाटील यांनी योगाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर उत्तम पाटील यांनी स्पर्धा परिक्षेचे मार्गदर्शन केले. इंद्रजित बंदसोडे यांनी मुलांना चित्रकला व गायन मनोरंजन व्यक्तीमत्व विकास यावर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना अंजनाताई रेडेकर यांनी प्रत्येक दिवसाचा आनंद घेण्यासाठी प्रत्येकालाच शारिरिक आणि मानसिकरित्या सक्षम होण्यासाठी योगसाथना किती महत्वाची आहे हे स्पष्ट केले.
मुख्याध्यापक सुनील एस. एम. चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.



