

राज्यपाल कोशारी यांच्या विरोधात आजऱ्यात शिवसैनिक आक्रमक
संभाजी चौकात केले जोडे मारो आंदोलन

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर आजरा तालुक्यातील शिवसैनिक आक्रमक झाले असून शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील व तालुकाप्रमुख राजू सावंत, युवराज पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक मोर्चाने येऊन येथील संभाजी चौकामध्ये राज्यपाल कोशारी यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
शिवाजीनगर येथील विठ्ठल मंदिरापासून मोर्चा सुरुवात झाली मोर्चा संभाजी चौकात आल्यानंतर राज्यपाल कोशारी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बोलताना शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पवार म्हणाले, राष्ट्रीय पक्षाचे समर्थन करणाऱ्या राज्यपालांना महाराष्ट्राच्या अस्मितेबद्दल विधाने करताना भान राहिले नाही. वारंवार त्यांच्याकडून आक्षेपार्ह विधाने केली जात आहेत शिवसैनिक हे कदाचित खपवून घेणार नाही प्रसंगी त्यांचे गाठोडे बांधून आणि दिल्लीला पाठवून असा इशाराही दिला.
दयानंद भोपळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारा राज्यपाल महाराष्ट्राच्या पवित्र आदर्शाचा अवमान करण्याचे काम करत आहेत. वय झाल्यामुळे त्यांना काय बोलावे हे कळत नाही त्यामुळे त्यांनी आता राजीनामा द्यावा असे आवाहन करत त्यांचा निषेध केला. संजय येसादे यांचेही मार्गदर्शनपर भाषण झाले.
आंदोलन प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख ओंकार माद्याळकर, भिकाजी विभुते, महेश पाटील, आनपाल तकिलदार, समीर चांद, मारुती डोंगरे, दिनेश कांबळे, प्रकाश सासुलकर, सुनील डोंगरे, लहू सावरकर, शिवाजी आढाव, गुड्डू खेडेकर,शैलेश पाटील, संदीप पाटील, रवी यादव, सागर नाईक, दयानंद चंदनवाले, शरद कोरगावकर, वसंत भुईंबर, बबलू घोडके,राजेंद्र पाटील,अजित सुतार,राजू बंडगर,हणमंत पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.


अखेर पत्नीच्या आत्महत्या प्रकरणी देवर्डे येथील पतीविरोधात गुन्हा नोंद
गुरुवारी विहीरीत सापडला होता मृतदेह

देवर्डे (ता. आजरा) येथील सौ.दीपा दिगंबर पाटील या ४५ वर्षीय महिलेच्या आत्महत्या प्रकरणी भाऊ अरुण लिंगाप्पा गुरव पाटील (रा. सुपे तालुका चंदगड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती दिगंबर मारुती पाटील (रा. देवर्डे ता. आजरा) यांच्या विरोधात सौ.दीपा यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली आहे. गुरुवार दिनांक १७ नोव्हेंबर रोजी दीपा यांचा मृतदेह स्थानिक विहिरीमध्ये आढळून आला होता.

याबाबत अधिक माहिती अशी, गुरुवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सौ.दीपा यांचा मृतदेह देवर्डे येथील पाटील यांच्या विहिरीमध्ये आढळून आला. दिपा यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या माहेरच्या मंडळींना समजतात सुपे येथून मोठ्या संख्येने ग्रामस्थ आजरा ग्रामीण रुग्णालयात हजर झाले.मृत्यूबाबत संशय व्यक्त करत मृत्यूचे नेमके कारण समजल्याशिवाय मृतदेह ताब्यात देऊ नये, असा पवित्रा त्यांनी घेतला. शुक्रवारी दुपारपर्यंत हा वाद सुरू होता. अखेर स्थानिक सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारूगडे, तहसीलदार विकास अहिर, नायब तहसीलदार डी.डी. कोळी डॉ. अशोक फर्नांडिस व आजरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी यांच्या नातेवाईकांशी चर्चा करून शवविच्छेदनानंतर व्हीसेरा राखून ठेवला आहे तो अधिक तपासणी करता प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असून तेथून अहवाल आल्यानंतरच सौ.दीपा यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल असे स्पष्ट केले. त्यानंतर दीपा यांच्या माहेरच्यांनी मृतदेह ताब्यात देण्यास संमती दर्शविली.
हा वाद गेले चार दिवस धुमसत होता. अखेर सौ. दीपा यांचा भाऊ अरुण गुरव पाटील यांनी दीपाचे पती दिगंबर पाटील यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. सौ.दीपा यांना मुलगी झाल्यावर दिगंबर हा वारंवार तू पहिली मुलगी जन्माला घातलीस तुला मुलगा कधी होणार? मला लवकर मुलगा पाहिजे या बाबीवरून वाद घालून दीपा यांना त्रास देत होता. दरम्यान त्यांच्या मुलीने प्रेम विवाह केल्या नंतर पुन्हा मुलीकडे दिपा यांनी लक्ष न दिल्याने सदर प्रकार घडला असा आरोप करत मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. भरीस भर म्हणून दिगंबर याने वारसा हक्काने आपल्या वाटणीला येणारी शेतजमीन व घर जबरदस्तीने संमती पत्रावर सही घेऊन भावाच्या नावावर केल्याने दीपा व दिगंबर यांच्यात वाद निर्माण झाला होता. या वादातून दिगंबर यांनी त्यांना जीव देण्याचा सल्ला दिला.या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर दीपा यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असे या फिर्यादीत म्हटले आहे.
या फिर्यादीवरून दिगंबर यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून त्यांना अटक झाली आहे.




