

🟠’कुणी म्हणते बाल हनुमान, तर कुणी मारते दगड…
हायपर ट्रायकॉसिस आजाराने ग्रस्त तरुणाची कथा

मध्य प्रदेशमधील रतलाम जिल्ह्यातील ललीत पाटीदार या १७ वर्षांच्या युवकाला गावातील लोक बाल हनुमान म्हणतात, तर वर्गातील मुलं त्याला घाबरून असतात. वानरासारखा दिसणार ललीत आपला चावा घेईल, अशी भीती या मुलांना वाटते आणि ही मुलं त्याला मंकीबॉय म्हणून चिडवतात.
ललीतला अत्यंत दुर्मिळ असा वेअर वुल्फ आजार आहे. या आजाराला हायपर ट्रायकॉसिस असेही म्हटले जाते. या आजारात संपूर्ण चेहऱ्यावर केस उगवतात. ललीतचा चेहरा आणि शरीरावर लांब केस आहेत. “माझ्या घरात सगळेच नॉर्मल आहेत. वडील शेतकरी आहेत. मी १२वीमध्ये आहे आणि वडिलांना शेतीत मदत करतो.”असे ललित सांगतो.
जन्मपासून ललीतच्या शरीरावर केस आहेत. पण तो सहा वर्षांचा झाल्यानंतर केस जास्त असल्याचे त्याच्या पालकांना जाणवले. त्यांनी एका डॉक्टरला दाखवल्यानंतर ललीतला वेअर वुल्फ आजार असल्याचे निष्पन्न झाले. यावर कोणताच उपाय नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
ललीत म्हणतो, “लहान मुलं मला घाबरतात. लहानपणी मुलं मला घाबरतात हे समजत नव्हते. नंतर लक्षात येऊ लागले की माझ्या सर्व शरीरावर केस आहेत आणि इतर मुलांना असे केस नसतात. लहान मुलांना वाटते की मी प्राणी आहे आणि त्यांचा चावा घेईन. पण आता वर्गात मित्र झाले आहेत आणि मी त्यांच्यासोबत खेळतो,” असे ललीत सांगतो.
चेहऱ्यावरील केस लांब झाले की कापावे लागतात, दाढीसारखेच हे केस वाढत असतात, असे तो सांगतो. “हा आजार दुर्मिळ आहे, फार कमी लोकांना असा आजार झालेला आहे. म्हणजेच मी इतरांपेक्षा वेगळा आहे. आपले वेगळेपण आपले सामर्थ्य ठरते,” असे तो आत्मविश्वासाने सांगतो.(source:-jagaran)


सेंद्रिय शेती व प्रक्रिया उद्योगात आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर शासकिय योजनांचा लाभ घ्यावा – कृषी अधिकारी मोमीन.
आजरा महाविद्यालयात कार्यशाळा

आजरा तालुक्यातील भात, काजू, फणस व नाचणी या पिकांची उत्पादने जागतिक गुणवत्तेची आहेत.यावर युवकांनी स्थानिक प्रक्रिया उद्योग उभारून आपले उत्पादन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवून उद्योजक बनता येते. नोकरीच्या मागे न लागता सेंद्रिय शेती व प्रक्रिया उद्योगात आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर शासकिय योजनांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी के. एम. मोमीन यांनी केले. ते आजरा महाविद्यालयात सेंद्रिय शेती व अन्नप्रक्रिया उद्योग यावर आधारित एक दिवशीय कार्यशाळेत बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सादळे होते.
सेंद्रिय शेती व अन्नप्रक्रिया उद्योग याबाबत शासनाच्या विविध योजना व अनुदान आणि लाभार्थी बाबत कृषी मंडळ अधिकारी डॉ.निलकुमार ऐतवडे यांनी सविस्तर माहिती दिली.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेतून वैयक्तिक, सामूहिक लाभार्थी, शासकीय योजना व अनुदानासंदर्भात आर्थिक मापदंड व प्रक्रिया याबाबतची माहिती PMFME योजनेच्या जिल्हा समन्वयक श्रीमती धन्वंतरी देसाई यांनी दिली.
शेतीमध्ये कृषीरसायन मुक्त व निसर्गपुरक आरोग्यदायी उत्पादने कशी घ्यावी, शून्य खर्चामध्ये विष्यमुक्त शेती कशी करावी यासंदर्भात सेंद्रिय शेती अभ्यासक व मिशन ऑरगॅनिक चे संस्थापक मा.राहुल टोपले यांनी मार्गदर्शन केले आणि सेंद्रिय शेती द्वारे सुदृढ व सशक्त भारताचे स्वप्न साकार करण्याचे आव्हान केले.
कार्यशाळेस आजरा, गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातील १३ महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यशाळेचे आयोजन डॉ. रणजीत पवार यांनी केले. डॉ. मल्हारराव ठोंबरे यांनी प्रास्ताविक, व प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे यांनी सूत्रसंचालन तर डॉ. संजय चव्हाण यांनी आभार मानले.

आजरा साखर कारखान्यात उत्पादित साखर पोत्यांचे पूजन ::

आजरा साखर कारखान्यात चालू गळीत हंगाम 2022-23 मध्ये उत्पादीत झालेल्या 55555 साखर पोत्यांचे पुजन कारखान्याचे संचालक श्री आनंदा सखाराम कांबळे यांच्या शुभहस्ते व चेअरमन श्री सुनिल अर्जुन शिंत्रेसाहेब व मा. संचालक मंडळ सदस्य यांचे उपस्थित आज 22/11/2022 रोजी संपन्न झाला.
आजरा साखर कारखान्यात या गळीत हंगामात 23 दिवसांत 68750 मे.टन ऊसाचे गाळप होऊन 64650 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असुन सरासरी 9.60 टक्के इतका साखर उतारा प्राप्त झालेला आहे. यावेळी कारखाना चेअरमन श्री सुनिल अर्जुन शिंत्रे यांनी कारखान्याचे गाळप नियोजना प्रमाणे व्यवस्थित सुरू असून, या गळीत हंगामात किमान 4.5 लाख मे.टन गाळप करणेसाठी योग्य नियोजन संचालक मंडळाने केले आहे. कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस वेळेत तोडणीसाठी आवश्यक असणारी तोडणी व वाहतुक यंत्रणा कारखान्याकडे पुरेशा प्रमाणात कार्यरत आहे. सद्या झालेल्या अती पावसाचा परिणामामुळे ऊसाचे प्रती हेक्टर उत्पादन घटले आहे. असे असतांना देखील कारखान्याने इतर कारखान्यांचे बरोबरीने ऊस गाळप करत असुन त्यांच्याच बरोबरीने प्रति टन रू.3000/- प्रमाणे होणारी ऊस बिलाची रक्कम विनाकपात एक रक्कमी ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वेळच्यावेळी पाठविणेचे नियोजन केले आहे. त्यानुसार 15 नोव्हेंबर 2022 अखेर पहिल्या पंधरवडयात आलेल्या ऊसाचे बिल देखील लवकरच ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा करणेचे नियोजन केले आहे. तसेच तोडणी वाहतुक यंत्रणेची बिलेही देणेची तरतुद केली आहे. येथुन पुढेही येणा-या ऊसाची बिलेही कोल्हापुर जिल्हा मध्य. सह. बँकेच्या सहकार्याने वेळेत आदा करणेचे नियोजन संचालक मंडळाने केले आहे. कारखान्याकडे नोंदविलेला संपुर्ण ऊस आणण्याची जबाबदारीही कारखाना व्यवस्थापनाची आहे. त्यासाठी तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला पिकविलेला संपुर्ण ऊस आजरा कारखान्यास पुरवठा करून सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.
या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक श्री. मुकुंदराव देसाई, श्री. दिगंबर देसाई, मा. संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर, सौ. सुनिता रेडेकर मा. संचालक श्री मारूती घोरपडे, श्री मधुकर देसाई, श्री. जनार्दन टोपले, श्री. राजेंद्र सावंत, श्री. मलिककुमार बुरूड, तसेच कारखान्याचे मा. कार्यकारी संचालक डॉ. श्री.टी.ए.भोसले. जनरल मैनेजर (टेक्नी) श्री. व्ही. एच. गुजर, सेकेटरी श्री. व्ही. के. ज्योती, मुख्य शेती अधिकारी श्री. एस.एन.व्हरकट, इन.चिफ केमिस्ट. श्री. बी. एम. घोळसे, खातेप्रमुख, कर्मचारी व ठेकेदार उपस्थित होते.




