

लक्ष्मण कुंभार- परळकर यांचे निधन
भाजपाचे आजरा तालुक्यातील ज्येष्ठ नेते कै. बाबुरावजी कुंभार यांचे बंधू लक्ष्मण हरी कुंभार -परळकर (वय ८१ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे निधन झाले. व्यवसायाने इंजिनियर असणाऱ्या परळकर यांच्या पश्चात मुलगा,तीन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. आजरा तालुका भाजपा अध्यक्ष सुधीर कुंभार यांचे ते चुलते होत.
….
आजऱ्यात आज ‘नार्वेकर पेट्रोलियम’ चे उद्घाटन

आजरा- आंबोली मार्गावरील एमआयडीसी नजीक उभारण्यात आलेल्या ‘नार्वेकर पेट्रोलियम’ या हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल पंपाचे उद्घाटन गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्या हस्ते होणार आहे.
अत्याधुनिक पद्धतीने बांधण्यात आलेल्या या पेट्रोल पंपावर २४ तास पेट्रोल, डिझेल भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. याचबरोबर प्रथमोपचार सुविधा, मुबलक पाणी, मोफत हवा, सुरक्षित पार्किंग, नायट्रोजन हवा, महिला व पुरुषांकरिता स्वतंत्र स्वच्छतागृहे, आग प्रतिबंधक साधने, पेट्रोल डिझेल व पॉवर पेट्रोल भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. लवकरच सीएनजी गॅसची सुविधाही उपलब्ध होत असल्याची माहिती चालक नामदेवराव नार्वेकर व सूर्यकांत उर्फ रोहित नामदेव नार्वेकर यांनी दिली.
आज बुधवार दिनांक १५ मार्च २०२३ रोजी सकाळी अकरा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत सदर उद्घाटन सोहळा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


स्वामी विवेकानंद पतसंस्थेतर्फे आज कार्यक्रम
गायन आणि वादन क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱे आजरेकर कलाकार आज बुधवार दि. १५ मार्च रोजी आजरा येथे पहिल्यांदाच एकाच मंचावर येत आहेत. येथील सुवर्णमहोत्सवी स्वामी विवेकानंद सहकारी पतसंस्थेच्यावतीने आयोजित ‘आपली माणसं, आपली गाणी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा योग साधण्यात येत आहे. बाजार मैदान आजरा येथे कै. दाजी टोपले खुल्या नाट्यगृहामध्ये सदर कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता होणार आहे.
……










