mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरक्रीडागुन्हाजीवनमंत्रटेक्नोलॉजीठळक बातम्यादेशबिझनेसभारतमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयरोजगारविदेशसामाजिकस्थानिक

मंगळवार – सातच्या बातम्या

मंगळवार

११ ऑगस्ट २०२६

धामणे घाटात बिबट्याची रस्त्यावर एन्ट्री !

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

रात्रीच्या वेळी धामणे घाटातून प्रवास करणाऱ्या दोघांना अचानक बिबट्याचे दर्शन झाल्याने काही काळ परिसरात खळबळ उडाली. सोमवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास संताजी घोरपडे साखर कारखान्यातील काम आटोपून उत्तूरकडे परतणाऱ्या रणजीत धुरे व शशिकांत नाईक यांच्या वाहनासमोरच बिबट्या रस्त्यावर आला. अचानक समोर आलेल्या बिबट्याला पाहून दोघांनी वाहन पुढे न नेता जागेवरच थांबवले. काही क्षण बिबट्या रस्त्यावर थांबला. त्यानंतर त्याने घाटाच्या परिसरातून चव्हाणवाडीच्या डोंगराच्या दिशेने धाव घेतली. बिबट्या निघून गेल्यानंतरच वाहन पुढे नेण्यात आले.

धामणे घाटात बिबट्याचे दर्शन झाल्याने या मार्गावरून रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी बहिरेवाडी परिसरातही बिबट्याचा वावर आढळून आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे धामणे घाट, चव्हाणवाडी व उत्तूर परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांनी रात्री एकट्याने शेताकडे जाणे टाळावे, शक्यतो समूहाने जावे तसेच घाट व डोंगर परिसरातून प्रवास करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

आजऱ्यात पुन्हा बिबट्याचे दर्शन…

रविवारी सायंकाळी खुलेआम दर्शन दिलेल्या बिबट्याने पुन्हा एक वेळ सोमवारी सकाळी ‘घोळ’ नावाच्या शेतात देसाई कुटुंबीयांना दर्शन दिले.

 गोकुळच्या दूध उत्पादकांना मताच्या अधिकारासाठी व्यापक चळवळ उभारण्याचा निर्धार 

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

गोकुळच्या दूध उत्पादकांना मताचा अधिकार मिळण्याबरोबरच गोकुळच्या विकासाची भूमिका घेऊन जिल्हाव्यापी चळवळ उभी करण्याचा निर्धार आजरा येथे झालेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात घेण्यात आला मेळाव्याचे अध्यक्षस्थानी श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई होते

सुरुवातीला कॉ. संजय तरडेकर यांनी मेळाव्या मागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की गोकुळच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीमध्ये दूध उत्पादकांना मताचा अधिकार मिळाला पाहिजे त्यासाठी आजचा हा मेळावा आयोजित केला आहे.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई यांनी मांडणी करताना ही लढाई एकाच वेळी प्रशासन आणि शासनासोबत ही करावी लागणार आहे गोकुळच्या विकासाबद्दल आणि दूध उत्पादकांच्या न्यायासाठी प्रशासनासोबत तर उत्पादकांना मताचा थेट अधिकार मिळावा यासाठी सरकारसोबत संघर्ष करावा लागणार आहे. हा संघर्ष सगळे मिळून नेटाने उभा करूया. आणि सरकारला निर्णय करायला भाग पाडुया असे आवाहन केले.

शिवसेनेचे तालुकाध्यक्ष युवराज पवार यांनी गोकुळ हा दूध उत्पादकांच्या जीवावरच उभा आहे त्यामुळे गोकुळच्या कारभारात उत्पादकांना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, अशी भूमिका मांडली.

भाकप  पक्षाचे कॉ. शांताराम पाटील यांनी भूमिका मांडताना हा संघ आमच्या घामावर उभा आहे घामाचे योग्य दाम उत्पादकांना मिळालेच पाहिजे.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना कॉ.देसाई म्हणाले, वरवर ही लढाई गोकुळची वाटत असली तरी सगळ्या सहकारी दूध उत्पादकांच्या बाबत धोरण बदलणारी लढाई आहे. जे काढतात दुधाची धार, त्यांनाच मताचा अधिकार  हे आपल्या लढ्याचे स्लोगण असेल. यावेळी संजय देसाई व्हिडी जाधव श्री कुलकर्णी यांनीही आपले मनोगत व्यक्त केली श्री सुरेश शिंगटे यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले सूत्रसंचालन केले यावेळी संजय घाडगे नामदेव भगरे शिवाजी इंगळे यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आजरा महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापनावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न.

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा महाविद्यालय , आजरा येथे ‘राष्ट्रीय सेवा योजना’ (NSS) व ‘जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण’, कोल्हापूर यांच्यावतीने ‘आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन व प्रशिक्षण’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे'(NDRF) प्रमुख इन्स्पेक्टर महेश शिंदे व त्यांच्या पथकातील जवान उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधून आपत्ती व्यवस्थापन, विविध नैसर्गिक आपत्ती,यामध्ये पूर परिस्थितीमध्ये बचाव कार्य कसे केले जाते, तसेच अपघातामध्ये रक्तस्त्राव झाल्यास घ्यावयाची काळजी, आपत्ती काळामध्ये एखाद्या रुग्णाच्या हृदयाची CPR कशी करावी तसेच आपत्काळामध्ये संपर्क कसा साधावा यासंदर्भात प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. किरण पोतदार उपस्थित होते तर उपप्राचार्य प्रा. डी. पी. संकपाळ,पर्यवेक्षक मनोज पाटील, कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रीय सेवा योजना( NCC) अधिकारी डॉ. अविनाश वर्धन यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. रत्नदीप पवार यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. रूपाली पिळणकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

निधिअभावी उत्तूरच्या विकासकामांना ब्रेक

काँग्रेस-राष्ट्रवादीतील मतभेदांचा विकासकामांवर परिणाम ?

उत्तूर : मंदार हाळवणकर 

उत्तूर (ता. आजरा) येथील विविध विकासकामे निधीअभावी रखडल्याचे चित्र असून, अनेक मूलभूत प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. ग्रामसभेत विकासकामांसाठी ठराव होऊनही प्रत्यक्ष कामांना अपेक्षित गती मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या तिन्ही स्तरांवर प्रतिनिधित्व असतानाही विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्याने प्रश्न कायम आहेत.
उत्तूर ग्रामपंचायतीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस गटाची सत्ता आहे. मात्र गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीपासून दोन्ही गटांतील अंतर्गत मतभेदांचा काही विकासकामांवर परिणाम होत असल्याचे  दिसत आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघातील गाव असूनही निधीअभावी कामे रखडत असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कुंभार गल्लीतील गणपती मार्गाचा पश्न…
कुंभार गल्लीतील गणपती उत्सवासाठी ये-जा करण्याच्या मार्गाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हा मार्ग करण्यासाठी ग्रामसभेत ठराव करण्यात आला होता. मात्र, अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे ग्रामसभेतील ठरावानंतरही कामांना प्रत्यक्ष गती का मिळत नाही, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

पाणी योजना दोन वर्षांपासून अपूर्ण
गावातील पाणी योजनेचे काम गेल्या दोन वर्षांपासून अपूर्ण आहे. कामासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध असतानाही योजना पूर्णत्वास गेलेली नाही. त्यामुळे योजनेचा लाभ पूर्ण क्षमतेने मिळण्यास विलंब होत आहे.

पार्किंग, मैदान, अतिक्रमणाचे प्रश्नही कायम
मेन रोडवरील पार्किंगचा प्रश्नही अद्याप कायम आहे. वाढती वाहतूक आणि अनियोजित पार्किंगमुळे मुख्य रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम होत आहे. याशिवाय मैदान, अतिक्रमण आणि पाणीपुरवठा यांसारखे प्रश्नही प्रलंबित आहेत. इंदिरानगरमधील प्रॉपर्टी कार्ड तसेच स्टँडचा वर्षानुवर्षे रखडलेला प्रश्नही अद्याप मार्गी लागलेला नाही.

ठराव कागदावरच राहणार का ?

ग्रामसभेत ठराव होतात, मात्र त्यानंतर निधी उपलब्ध होऊन प्रत्यक्ष काम सुरू होण्यास विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. निधीची कमतरता हे कारण असेल तर त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने प्रभावी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

गावसभेतील ठराव, उपलब्ध निधी आणि प्रत्यक्ष विकासकामे यांच्यातील दरी कमी करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. प्रलंबित कामांना प्राधान्य देऊन त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिल्यास उत्तूरमधील अनेक वर्षांचे प्रश्न मार्गी लागू शकतात. अन्यथा ठराव होत राहतील मात्र विकासकामांचा रखडलेला प्रवास कायम राहण्याची शक्यता आहे.

शिवसेनेची आजऱ्यात आज महाआरती

राम मंदिर दानपेटी व देणगी चोरी प्रकरणी आजरा येथे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या अध्यक्षतेखाली व शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख युवराज पोवार यांनी शिवसेनेच्या वतीने संभाजी चौकामध्ये आज सकाळी दहा वाजता महाआरतीचे आयोजन केले आहे. शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

निधन वार्ता 

कृष्णकांत कांदळकर

चाफवडे ता. आजरा गावचे सुपुत्र ,माजी. चेअरमन आजरा अर्बन बँक शाखा: मुंबई, माजी संचालक जनता एज्युकेशन सोसायटी, माजी संचालक आण्णा भाऊ आजरा तालुका सह. सुतगिरणी, माजी. कार्यकारी दंडाधिकारी, माजी सैनिक, सेंट्रल गव्हर्मेंट – अकाऊंट आँडीटर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. कृष्णकांत कांदळकर ९२ वर्ष यांचे  हृदयविकाराने मुंबई येथे  निधन झाले. त्यांनी नायर हॉस्पिटलमध्ये मरणोत्तर देहदान केले आहे.

त्यांचे मौजे. चाफवडे गावच्या विकास कामात व आजरा ग्रामिण विकास कामांत खुप मोठे योगदान आहे.

त्यांच्या पक्षात मोठा परिवार आहे.

सौ. धोंडूबाई पाटील

कानोली ( ता. आजरा ) येथील सौ. धोंडूबाई पांडुरंग पाटील ( वय ७४ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

कानोली ग्रुप ग्रामपंचायत सदस्य अनिल पांडुरंग पाटील यांच्या त्या आई होत.

त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन विवाहित मुली सून नातवंडे असा परिवार आहे, रक्षाविसर्जन बुधवार दि. १२ ऑगस्ट रोजी आहे.

आजचे पंचांग

दिनांक : ११ ऑगस्ट २०२६
वार : मंगळवार
माह (अमावस्यांत) : आषाढ
माह (पूर्णिमांत) : श्रावण
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : चतुर्दशी तिथी (१२ ऑगस्ट रात्री ०१.५२ पर्यंत) त्यानंतर अमावस्या तिथी
नक्षत्र : पुनर्वसू नक्षत्र (सकाळी १०.०८ पर्यंत) त्यानंतर पुष्य नक्षत्र
योग : सिद्धि योग (सायंकाळी ०६.५१ पर्यंत) त्यानंतर व्यातीपात योग
करण : विस्ती भद्रा करण (दुपारी ०३.२२ पर्यंत) त्यानंतर शकुनी करण
चंद्र राशी : कर्क राशी
सूर्य राशी : कर्क राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०३.५६ ते सायंकाळी ०५.३२ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१८ ते दुपारी ०१.०९
सूर्योदय : सकाळी ०६.२०
सूर्यास्त : सायंकाळी ०७.०८
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

शोकसभा…

पद्मश्री डॉ.डी. वाय. पाटील  यांना श्रद्धांजली वाहण्याकरीता आज मंगळवार दिनांक ११ रोजी जनता बँक सभागृहात दुपारी एक वाजता सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

जिल्हा बँक निवडणुकीत सुधीर देसाई यांचा विजय…. चराटी यांना धक्का

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!