mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

सोमवार दि.१० मार्च २०२५

प्रवाशांना ठेऊन बस गेली

आजरा आगाराचे तीन कर्मचारी निलंबित…

कारवाईबाबत उलट सुलट चर्चा…?

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       नियोजित वेळेपूर्वी बस सोडल्याचा ठपका ठेवत आजरा आगाराच्या कमलाकर नामदेव आत्राम, प्रशांत शिवाजी देसाई व पांडुरंग एकनाथ गुरव या वाहक,चालकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वरिष्ठांनी निलंबनाची कारवाई केली असली तरीही या कारवाईबाबत एसटी वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहे.

      याबाबत आगार व्यवस्थापक प्रवीण पाटील यांनी दिलेली माहिती अशी…

     २६ फेब्रुवारी रोजी परेल- आजरा ही बस फेरी सायंकाळी सहा वाजता सुटण्याऐवजी वाहन चालक व वाहकांनी संगनमताने सदर फेरी चार वाजताच सोडली यामुळे प्रवाशांचे नुकसान झाले. कांही प्रवाशांना नाहक मनस्ताप भोगावा लागला. त्यानंतर दुसऱ्या डेपोच्या गाडीने संबंधित प्रवाशांची व्यवस्था करण्यात आली. या प्रकरणाचा चौकशीचा भाग म्हणून तिघांनाही निलंबित करण्यात आले आहे.

      याप्रकरणी प्रवासी संघटना आक्रमक झाली असून कोल्हापूरवासीय प्रवासी संघटनेचे सचिव मच्छिंद्र पाटील यांनी दिलेली माहिती अशी…

    परेल येथील वाहतूक नियंत्रक यांनी सायंकाळी सहा वाजता आजऱ्याच्या दिशेने सुटणाऱ्या गाडीचे वेळापत्रक बदलून ‌ सदर बस दुपारी चार वाजताच सोडली. सदर बदलाची कोणतीही कल्पना प्रवाशांना देण्यात आली नव्हती. परिणामी डिलाईल रोड येथे सहा वाजण्याच्या सुमारास बस फेरीच्या प्रतीक्षेत असणारे प्रवासी तेथेच अडकून राहिले. याबाबत आजरा येथील आगार व्यवस्थापकांशी वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही आगार व्यवस्थापकांनी व जिल्हा वाहतूक नियंत्रकांनी कोणत्याही प्रकारची सदर प्रकार सुरू असताना दखल घेतली नाही.परेल वाहतूक नियंत्रकांना पाठीशी घालण्याच्या दृष्टीने नाहक चालक व वाहकांवर कारवाई करण्यात आली असल्याचा आरोपही त्यांनी केला.

       एकंदर या निलंबन प्रकरणाची एस.टी.वर्तुळात उलट- सुलट चर्चा सुरू झाली आहे.

एकाला घासून गेला…

दुसरा घाबरून पडला…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा – गडहिंग्लज मार्गावर समोरून येणाऱ्या गव्याला घाबरून भांबावून गेलेल्या मोहम्मद शेख या वाडा गल्ली येथील व्यक्तीचा दुचाकीवरील तोल गेल्याने खाली पडून तो जखमी झाला. तर मेंढोली येथील महादेव गंगाजी नांदवडेकर हा ७५ वर्षीय वृद्ध दुपारच्या दरम्यान बारी नावाच्या शेतात काम करत असताना गवा घासून गेल्याने गव्याचे शिंग लागून किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे.

      नांदवडेकर यांच्यावर आजरा ग्रामीण रुग्णालयात तर शेख यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

चाफवडे हायस्कूलचा नूतन इमारत उद्घाटन सोहळा उत्साहात

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       जनता शिक्षण संस्था आजारा संचलित चाफवडे हायस्कूल, चाफवडे या शाळेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते व संस्थेचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे, उपाध्यक्ष विलास नाईक, सचिव रमेश कुरुणकर, डॉ .दीपक सातोसकर यांच्यासह संचालक व मान्यवर उपस्थित होते.

       यावेळी बोलताना आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले, अशोक अण्णा चराटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अण्णा-भाऊंच्या पश्चात शैक्षणिक कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू ठेवले आहे. ग्रामीण भागातील मुलांना माध्यमिक शिक्षणाची सोय या शाळेच्या माध्यमातून होत आहे ‌‌. ग्रामीण भागामध्ये तयार होणारे विद्यार्थी पुढे जाऊन भागाचा विकास करण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे ग्रामीण भागातही चांगले विद्यार्थी घडवण्याचे काम या मंडळींनी चालवले असल्याचे सांगितले.

       यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते आमदार शिवाजीराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अशोक अण्णा चराटी, विलासराव नाईक यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

      कार्यक्रम प्रसंगी बामनादेवी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष मनोहर पवार, विजयकुमार पाटील, अभिजीत जालकर, अनिकेत चराटी,आबासाहेब मोहिते, नूरजहाँ सोलापुरे, दशरथ अमृते, के.व्ही.येसणे यांच्यासह चितळे ग्रामस्थ उपस्थित होते.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अंजना कांबळे यांनी स्वागत प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. सुनिता मुरुकटे यांनी केले तर आभार श्री. प्रवीण कांबळे यांनी मानले.

संवेदना फाऊंडेशनतर्फे महिला दिन उत्साहात

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        महिला सशक्तीकरणाचा जागर करत संवेदना फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनाचा भव्य आणि प्रेरणादायी सोहळा चैतन्य सभागृह आजरा येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला महिलांसह युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

        कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून दिवाकर कृष्ण पुरस्कारप्राप्त लेखिका सौ. निलम माणगावे उपस्थित होत्या. त्यांच्या “घे ऊंच भरारी” या प्रेरणादायी व्याख्यानाने उपस्थित महिलांना आत्मसन्मान, स्वावलंबन आणि ध्येयपूर्तीसाठी नवचैतन्य मिळाले. पारंपरिक रिती रिवाज ,अंधश्रद्धा यांच्या विळख्यात अडकलेली स्त्री. स्त्री -पुरुष समानता ,पुरुषांचे भावनिक आणि मानसिक सबलीकरण यासारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

       यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य    करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला,यामधे MPSC, पोलीस भरती सैन्यभरती ,कला आणि क्रिडा अशा अनेक क्षेत्रातील मुली व महिलांचा समावेश होता .

       संवेदना फाउंडेशनतर्फे “हरपवडे धनगरवाडा” गावाला दळण यंत्र प्रदान करून ग्रामीण महिलांच्या दैनिक गरजांसाठी महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. या उपक्रमामुळे गावातील महिलांना आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा मिळणार आहे.

      कार्यक्रमाचे आयोजन संवेदना महिला शक्ति या उपक्रमांतर्गत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.गीताताई पोतदार होत्या. सौ.भारती चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत महिला सक्षमीकरणासाठी फाउंडेशनच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची माहिती दिली.

       आजरा गांधीनगर येथील नैसर्गिक आपत्तीत घर गमावलेल्या सौ. गायकवाड कुटुंबाला ५०००/- रोख रक्कम, जीवनोपयोगी साहित्य, आणि त्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले.

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मिलन केसरकर यांनी केले तर आभार सौ.धनश्री देसाई यांनी मानले.

       या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संवेदना सदस्य श्री.संतराम केसरकर, डॉ. प्रविण निंबाळकर, श्री. निलेश कांबळे, सौ. भैरवी सावंत, सौ. माधुरी पाचवडेकर, सौ.समिधा देशमुख ,सौ. वैशाली वडवळेकर, सौ. होडगे, सौ. शिंत्रे , श्री प्रशांत हरेर,श्रीतेज कवळेकर,विकी रॉड्रिग्ज, श्री समीर चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले.

लाडक्या बहिणींना ५०० रुपयेच….?

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आठ मार्च रोजी अनेक महिलांच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेअंतर्गत देण्यात येणारा निधी जमा करण्यात आला आहे. परंतु सध्याच्या या जमा निधीमध्ये बराच घोळ आढळत असून अनेकांची नावे गायब झाली आहेत तर काहींच्या खात्यावर केवळ ५०० रुपयेच जमा झाल्याचे दिसत आहे. अद्यापही काही महिलांना पैसे जमा न झाल्याने पैसे मिळणार की नाही याबाबत संभ्रम आहे.

       मुरूडे येथील सौ. कविता अर्जुन भादवणकर यांच्या बँक खात्यावर फक्त रू. ५००/- जमा झाले आहेत. शासनाचा इतर कोणताही लाभ न घेता जमा होणाऱ्या रकमेमध्ये झालेली कपात, जमा न झालेले पैसे महिलांना बुचकळ्यात पाडत आहेत.

भारत जिंकले… आजऱ्यात जल्लोष

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      चॅम्पियन्स चषक करंडक जिंकत भारताने पुन्हा एक वेळ ‘चॅम्पियन’ असल्याचे क्रिकेट जगताला दाखवून दिले. चार गडी राखून भारताने दणदणीत विजय मिळवल्यानंतर आजरा शहरांसह तालुक्यात जोरदार जल्लोष करण्यात आला.

      भारत – न्यूझीलंड यांच्यातील अंतिम लढत असल्याने स्थानिक बाजारपेठेत दुपारपासून शुकशुकाट पसरला होता. सुट्टीचा दिवस असल्याने क्रिकेट प्रेमींनी हा अंतिम सामना पाहण्याचा आनंद लुटला.

       भारत विजयाच्या उंबरठ्यावर आल्यानंतर शहर व परिसरात जोरदार आतषबाजी करण्यात आली व भारताने विजय मिळवल्यानंतर पूर्ण तरुणाईने रस्त्यावर येत जल्लोष केला.

      रात्री उशिरापर्यंत हा जल्लोष सुरूच होता.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९  

हारूर येथे जागतिक महिला दिन उत्साहात

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       ग्रुप ग्रामपंचायत कानोली /हारूर वतीने हारूर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुषमा पाटील होत्या.

       स्वागत व प्रास्ताविक उपसरपंच स्वप्निल आर्दाळकर यांनी केले, यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उत्पादन शुल्क अधिकारी अक्षता कुपटे होत्या. यावेळी बोलताना कुपटे यांनी महिलांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य या बाबत माहिती दिली, प्रत्येक क्षेत्रात महिलांनी पुढे येऊन जबाबदारी स्वीकारली पाहिजे असे सांगितले, ग्रामीण भागातील मुलींनी शिकून आई वडिलांचे नांव उज्वल करावे असे आवाहन केले, यावेळी कृषी सहायक मनीषा पाटील यांनी कृषी विभागामार्फत महिलांनी करावयाचे उद्योग याबाबत माहिती दिली.

       यावेळी गावातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. हास्यकलाकार आत्माराम पाटील यांनी आपली कला सादर केली, कार्यक्रमास कृषी सहायक दादू ऐनापुरे ग्रा. प. सदस्या सौ. माया लोहार, दिपाली सुतार, सारिका भोसले, वासू पाटील, मिलिंद पालकर संतोष सावंत, नितीन घेवडे सुनिल लोहार परशराम तिप्पट सुनिल चौगुले मनोहर सुतार यांच्यासह अंगणवाडी सेविका संजीवनी कदम, मदतनीस अनिता सावंत यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

       आभार सुभाष पाटील यांनी मानले.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या …

mrityunjay mahanews

मडिलगे येथील एकाचा विहिरीत बुडून मृत्यू

mrityunjay mahanews

दरोड्यातील मुद्देमालासह आठ जण पोलिसांच्या ताब्यात…

mrityunjay mahanews

मणिपूर घटनेचा आज-यात मोर्चाद्वारे निषेध…

mrityunjay mahanews

निवडणूक विशेष… ताराराणी आघाडी

mrityunjay mahanews

पेद्रेवाडीत हत्ती…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!