mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

मंगळवार दि.११ मार्च २०२५

शिक्षणाच्या आयचा घो…

गावा गावांच्या वेशीवर पडत आहेत फुटके कोहाळे, लिंबू, नारळ आणि बाहुल्या…

ज्योतिप्रसाद सावंत

       हातात मोबाईल घेऊन विज्ञान युगाच्या बढाया सुरू असतानाच अजूनही गावागावात वेशींवर केवळ अंधश्रद्धेपोटी फुटके कोहाळे, लिंबू, नारळ आणि बाहुल्यांसारखे साहित्य वारंवार आढळत असल्याने शिक्षणाच्या आयचा घो…म्हणण्याची वेळ आजरा शहरवासीयांसह तालुकावासीयांवर आली आहे. तालुक्यात ठीक- ठिकाणी बुवा, बाबा व महाराजांनी मांडलेला बाजार याला कारणीभूत असल्याचे बोलले जाते.

        निसर्गरम्य अशा चित्रा आणि हिरण्यकेशी नदीच्या काठावर वसलेल्या आजरा तालुक्यामध्ये गावागावात महाराज, बुवा व बाबांनी आपली बुवाबाजीची दुकाने थाटली आहेत. याचा परिणाम म्हणून परीक्षा आली की परीक्षा केंद्रावरच नारळ फुटू लागले आहेत. निवडणुका आल्या की कोपऱ्या कोपऱ्यावर लिंबू आणि काळ्या बाहुल्या पडू लागल्या आहेत. तर अमावस्या पौर्णिमेसह अधेमध्ये गावांच्या वेशीवर व तिठृठ्यांवर कुंकू- गुलालाने माखलेले कोहाळे व नारळ दिसतात. घाट व नदीच्या काठावर तर अशा साहित्याची आकर्षक मांडणी केलेली दिसते.

       अलिकडे असे प्रकार वाढू लागले असल्याने अंधश्रद्धेच्या या जोखडातून तालुकावासीय बाहेर पडला तरी कधी ? हा प्रश्न दिवसेंदिवस अनुत्तरीतच बनू लागला आहे हे निश्चित…

पाणी प्रश्नी आज आजऱ्यात सर्वपक्षीय मोर्चा…

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      गेली दोन अडीच वर्षे आजरा शहरांमध्ये पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत कारभाराविरोधात विरोधात आज मंगळवारी सकाळी दहा वाजता नगरपंचायतीवर सर्वपक्षांच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चा थांबवण्यासाठी पोलीस विभागासह शासकीय विभागाने केलेल्या प्रयत्नांना अपयश आल्याने मोर्चा निघणारच असे सर्व पक्षांच्या वतीने यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे.

      काल सोमवारी मोर्चाप्रश्नी उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले, आजरा सहाय्यक पोलिस निरीक्षक नागेश यमगर व नगरपंचायत अधिकारी यांच्या समवेत संबंधितांशी चर्चा झाली.

      आजऱ्याची नवीन नळ पाणी पुरवठा योजना अपूर्ण आहे. जुन्या योजनेतून मिळणारा पाणी पुरवठा अनियमित आहे.यामुळे आजरेकर हैराण झाले आहेत. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नवीन योजना रेंगाळली त्यामुळे दोन वर्षाचा पाणीपट्टी माफ करावी अशी मागणी मोर्चा समितीने केली मात्र यावर निर्णय झाला नाही. अधिकाऱ्यांसमवेतची चर्चा फिसकटली त्यामुळे आजचा मोर्चा निघणारच असे परशुराम बामणे व सदस्यांनी सांगितले आहे.

        यावेळी नाथा देसाई, विजय थोरवत, पांडुरंग सावरतकर, रवी भाटले, गौरव देशपांडे, वाय. बी. चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

पाणी पुरवठा सुरळीत होणार : अशोक चराटी

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा शहर व उपनगरासाठी मंगळवारपासून पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती माजी नगरसेवक अशोक चराटी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

       अशोक चराटी म्हणाले, नविन पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास आली आहे. दोन महिन्यात ती कार्यान्वित होईल.सध्या पाणी पुरवठा जुन्याच योजनेतून होत आहे. नवीन पाईप लाईन घालताना कांही ठिकाणी जुन्या पाईप फुटत आहेत त्यामुळे पुरवठा करताना व्यत्यय येत आहे.परोलीतून सायफन पद्धतीने पाणी थेट एकता कॉलनीतील टाकीमध्ये सतत पडत असून त्यामुळे यापुढे सुरळीत पाणीपुरवठा होण्यास अडचण येणार नाही. नगरपंचायती मार्फत वेळापत्रक केले जाणार असून मंगळवारपासून पाऊण तास सर्व शहर व उपनगरात पाणी मिळेल.आमचा नगरसेवक पदाचा कार्यकाल जरी संपला असलि तरी कर्तव्य भावनेतून पाणी प्रश्नाकडे आम्ही पहात असून पाठपुरावा सुरु आहे.

       जेथे पाईप लाईनचे काम पूर्ण झाले आहे त्या गल्ल्यातील कॉक्रीट रस्त्याचे कामही सुरु होणार असून जून पर्यंत शहरातील रस्तेही पूर्ण होतील अशी माहिती चराटी यांनी दिली.

         यावेळी माजी नगरसेवक विलास नाईक, किरण कांबळे, संभाजी पाटील, बाळ केसरकर, विजय पाटील, दशरथ अमृते, सुरेश गड्डी उपस्थित होते.

 

मानवतावादी विचारातूनच वैश्विक हिताचे अद्वितीय कार्य घडते : दीपा देशमुख

रवळनाथ संस्था समुहातर्फे महिलादिनानिमित्त व्याख्यान व सत्कार समारंभ

         गडहिंग्लज : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      भुतकाळात रमण्यापेक्षा व्यक्तीने वर्तमानात जगले पाहीजे आणि मानवतावाद हाच खरा धर्म आहे हे मान्य करायला हवे, आपण कसे जगले पाहीजे याविषयी आपल्याला पुस्तकांनी शिकवले आहे, त्यामुळे प्रत्येकाने विविधांगी वाचन संस्कृती जपायला हवी. त्यातून आपला व्यक्ती म्हणून सर्वांगीण विकास होईल आणि आपल्या मानवतावादी विचार व कृतीतून वैश्विक हिताचे अद्वितीय कार्य घडेल असे प्रतिपादन पुणे येथील ख्यातनाम लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या मा. दीपा देशमुख यांनी काढले.

         येथील श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटी मल्टी-स्टेट प्रधान कार्यालय , गडहिंग्लज, ज्ञानदीप प्रबोधिनी संचलित झेप ॲकॅडमी व श्री महालक्ष्मी वुमेन्स को-ऑप. क्रेडीट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित मार्गदर्शनपर व्याख्यान व यशवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभप्रसंगी उपस्थित महिलांना ‘ मला भेटलेल्या स्त्रिया ‘ या विषयावर मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी श्री रवळनाथ संस्था समुहाचे संस्थापक श्री. एम. एल. चौगुले होते.

       रेडिओ वेल्फेअर फाऊंडेशनच्या सीईओ तथा स्वदेश सेवा फाऊंडेशन पुणेच्या संस्थापक अध्यक्षा धनश्री पाटील, रवळनाथच्या उपाध्यक्षा सौ. मीना रिंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

       धनश्री पाटील म्हणाल्या , आधुनिकतेच्या नव्या जगात स्त्रियांसमोर पुर्वीसारख्या मोठ्या सामाजिक समस्या राहिलेल्या नाहीत. आजची स्त्री सक्षम होत आहे. स्त्रियांच्या जीवनात आर्थिक स्थिरता आल्यास ती स्वावलंबी बनेल, स्त्रिया या कुटुंबाचा किंबहूना समाजाचा कणा आहेत. त्यामुळे सशक्त आणि सक्षम महिला संस्कारक्षम समाज घडवू शकते. त्यामुळे स्त्रियांच्या उन्नतीसाठी रवळनाथ संस्था समुहाचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.

       श्री. एम. एल. चौगुले म्हणाले, स्त्रियांना सर्व क्षेत्रामध्ये काम व नेतृत्व करण्यास संधी दिल्यास, निश्तितच त्या प्रभावीपणे आपला ठसा उमटवतील असा आम्हाला विश्वास आहे, त्यामुळेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिलांना देखील व्यासपीठ मिळवून देण्यासाठी रवळनाथ संस्था समुह नेहमीच प्रयत्नशील आहे.

      प्रारंभी रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीच्या प्रधान कार्यालयाच्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून महसूल सहाय्यकपदी निवड झालेल्या कु. निकिता माने, कु. शालन धनगर, या विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला.

        यावेळी कु. निकिता माने व कु. शालन धनगर यांनी मनोगत व्यक्त केले.

       श्री रवळनाथच्या उपाध्यक्षा सौ. मीना रिंगणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सौ. कल्पना पाटील यांनी अतिथी परिचय करुन दिला. झेप ॲकॅडमीच्या अधीक्षक गौरी बेळगुद्री यांनी सुत्रसंचालन केले. श्री महालक्ष्मी वुमेन्स सोसायटीच्या अध्यक्षा सौ. उत्कर्षा पोतदार यांनी आभार मानले.

       कार्यक्रमास रवळनाथचे सीईओ श्री. डी. के. मायदेव यांच्यासह रवळनाथ व महालक्ष्मीचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांसाठी अल्प दरात औषध फवारणी वॉटर पंपासह वॉटर फिल्टर उपलब्ध

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजरा अर्बन बँकेचे अध्यक्ष भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोकआण्णा चराटी आणि भाजपाचे तालुकाध्यक्ष अनिरुध्द (बाळ) केसरकर यांच्या सौजन्याने होळी निमित्त खास शेतकऱ्यांसाठी ५०% सवलतीच्या दरात औषध फवारणी बॅटरी पंप,वॉटर फिल्टर वाटप करण्यात येणार आहे.

        मंगळवार दि.११ मार्च २०२५ ते मंगळवार १८ मार्च २०२५ या कालावधीत संबंधितांनी आधार कार्ड, रेशन कार्ड व एका फोटोसह शिवतीर्थ येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९  

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पिसाळलेल्या मांजराचा आज-यात धुमाकूळ…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!