mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

गुरुवार दि.१३ मार्च २०२५

मलप्रभांच्या जिद्दीने शेकडो झाडे आगीपासून बचावली…

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       संवेदना फलोद्यान हारूर येथे अचानक वणवा लागल्याचे समजताच हातातील सर्व कामे टाकून संवेदना सदस्य आनंदा कदम यांच्या पत्नी सौ.मलप्रभा आनंदा कदम या त्या ठिकाणी तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. जीवाची पर्वा न करता आग विझेपर्यंत स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या शेवटपर्यंत आगीशी लढत राहिल्या. अखेर आग विझवण्यात यश आले.शेकडो झाडे आगीपासून बचावली…

       प्रयत्नांची पराकाष्टा करून त्यांनी सदर आग विझवली. संवेदनाच्या स्वयंसेवकांनी मोठ्या कष्टाने हे फलोद्यान उभारले आहे. फलोद्यानामधील झाडांची मोठी हानी मलप्रभांमुळे टळली.

        संवेदनाकडून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला आहे.   

‘रवळनाथ’मुळे मुकबधिर विद्यार्थ्यांनी लुटला ‘छावा’ चित्रपटाचा मनमुराद आनंद…

३ शाळेतील १२५ विद्यार्थी सहभागी 

       गडहिंग्लज : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      येथील श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे गडहिंग्लज शहरातील निवासी मुकबधिर विद्यालय, साई मुकबधिर विद्यालय, गिजवणे आणि चैतन्य अपंगमती विकास विद्यालय, कडगाव या तीन शाळेतील १२५ विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील ‘ छावा ‘ हा ऐतिहासिक हिंदी चित्रपट दाखविण्यात आला, रवळनाथचे ब्रॅंड ॲम्बेसिडर डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी देशभर चालविलेल्या चांगुलपणाची चळवळ अंतर्गत रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

        मुकबधिर असणा-या विद्यार्थ्यांना इतिहासातील व्यक्तीरेखा समजाव्यात, त्यांचे कार्य समजावे, आपला गौरवशाली इतिहास कळावा तसेच त्यांचे मनोरंजन व्हावे यासाठी चित्रपट हे दृक श्राव्य माध्यमच प्रभावी ठरु शकते, त्यामुळे छावा हा सध्या चहुचर्चित असणारा चित्रपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला.

      मुकबधिर विद्यार्थी सर्वसामान्य मुलांप्रमाणे सहजपणे चित्रपटगृहामध्ये जावून चित्रपट पाहू शकत नाहीत. त्यांच्यासाठी हा अनुभव विलक्षणच होता. चित्रपट पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत झाला होता. अत्यंत शिस्तबद्धपणे आपल्या शिक्षकांच्या सुचनांचे पालन करत त्यांनी चित्रपट पाहिला हे कौतुकास्पद होते.

       मध्यांतरामध्ये विद्यार्थ्यांना खळनाथतर्फ खाऊ वाटप करण्यात आले. मुकबधिर विद्याथ्यांना चित्रपट दाखविण्यासाठी येथील मराठा चित्रमंदिरचे श्री. तुषार रेडेकर यांनी देखील विशेष सहकार्य केले.

        प्रारंभी संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले यांनी विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला.

      या उपक्रमाबद्दल साई मुकबधिर विद्यालयाचे शिक्षक श्री. दत्तात्रय कुंभार यांनी रवळनाथ परिवाराचे आभार मानले, यावेळी रवळनाथच्या उपाध्यक्षा सौ. मौना रिंगणे, संचालक डॉ. संजय चौगुले, श्री. महेश मजली, सौ. रेखा पोतदार, ज्ञानदीप प्रबोधिनीचे सचिव श्री. संदीप कागवाडे, सीईओ श्री. डी. के. मायदेव यांच्यासह प्राचार्य साताप्पा कांबळे, प्राचार्या सरिता रजपूत, प्राचार्य मेघा मोकाशी व रवळनाथचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

संजय गांधी निराधार योजनेच्या आजरा तालुकास्तरीय समिती अध्यक्षपदी अल्बर्ट डिसोझा यांची फेरनिवड

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     गेल्या पाच वर्षातील संजय गांधी निराधार योजनेच्या आजरा तालुकास्तरीय समितीचे कामकाज पाहून समितीचे अध्यक्ष अल्बर्ट नातवेद डिसोजा यांची या समितीच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे.

       पालकमंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांनी या निवडीमध्ये कोणतेही पक्षीय राजकारण न आणता केवळ काम पाहून डिसोझा व त्यांच्या सहकाऱ्यांना पुन्हा संधी दिली आहे.

        या निवडीबद्दल डिसोझा यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

      उत्तूरला आज जोमकाई देवीची यात्रा

         उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       उत्तूर – चव्हाणवाडी (ता. आजरा) गावचे ग्रामदैवत जोमकाई देवीची यात्रा आज गुरुवारी (ता. १३) साजरी होत आहे.

       जोमकाई देवी जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. उत्तूरपासून तीन कि.मी.वरील चव्हाणवाडीच्या डोंगराच्या पायथ्याशी देवीचे मंदिर वसले आहे. मंगळवारी व शुक्रवारी देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येतात. हुताशनी पौर्णिमेला देवीच्या मुख कमलावर सूर्य किरणे पडतात. या दिवसाची पर्वणी साधून यात्रा साजरी होते. काल जागरादिवशी सायंकाळी पालखी सोहळा पार पडला.

    महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्या

वंचित बहुजन सह विविध संघटनांची मागणी

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      बौद्ध गया महाविहार कायदा १०४९ रद्द होऊन बिहार राज्यातील बौद्धगया या ठिकाणी महाबोधी विहार हे बौद्ध धम्मीयांच्या ताब्यात नसून ते तेथील हिंदूंच्या ताब्यात असल्याने महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावे अशी मागणी विविध संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.

        बौद्धांचे धर्मगुरूंचे प्रबोधनांचे महाबोधी महाविहार असून तेथे जगातून बौद्ध अनुयायी येऊन बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन मन परिवर्तन करून तेथे माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे व एकमेकांवर निस्वार्थी प्रेम करावे हा संदेश मिळत असतो.

         यामुळे कायदा १९४९ रद्द करण्यात यावा तसेच तेथील व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे महाविवाह ब्राम्हणवाद्यांच्या ताब्यातून मुक्त करून बौद्ध धम्मीयांच्या ताब्यात देण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे याबाबतचे लेखी निवेदन आजरा तहसीलदारांना देण्यात आले असून निवेदनावर वंचित बहुजन युवा आघाडीसह भारतीय बौद्ध सभा, वंचित बहुजन आघाडी, अंधश्रद्धा निर्मूलन संघटना, रिपब्लिकन सेना, चर्मकार सेवा संघ, अंधश्रद्धा निर्मूलन संघटना, फुले शाहू आंबेडकर संविधान संवर्धन विचार मंच आजराच्या कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

        यावेळी संघटनेचे आजरा तालुका युवा अध्यक्ष संतोष मासोळे, जीवन शेवाळे, संदीप कांबळे, भिकाजी कांबळे, काशिनाथ मोरे, शिवाजी सम्राट यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

       आजऱ्यातील आरटीओ कॅम्पमध्ये ८५ वाहन चालकांना परवाने

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

          येथील शासकीय विश्रामगृह परिसरात पहिलाच आरटीओ कॅम्प झाला. आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील वहानधारक सहभागी झाले होते. प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापुर यांच्या मार्फत कॅम्प झाला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यासाठी सहकार्य केले.

       मोटर वाहन निरीक्षक युनस सय्यद, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक निकीता नाईक, प्रविण साताळे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प झाला. दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टरच्या चालकांना ८५ पक्के वाहन परवाने देण्यात आले. ८७ शिकाऊ वाहन परवाने देण्यात आले. या वेळी चार चाकी, दुचाकी गाड्यांचे पासिंग झाले. या कॅम्पला वहानधारक व वाहन चालकांमधुन उत्तम प्रतिसाद मिळाला.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९  

 

संबंधित पोस्ट

पोलीस असल्याचे भासवून वृद्धा कडून 35 हजार रुपयांचे दागिने लंपास …पावसाचा पत्ता नाही… रामतीर्थ धबधबा मात्र सुरू…

mrityunjay mahanews

आजरा तलाठ्याच्या प्रतापांची तक्रार थेट आयुक्तांकडे…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

बेलेवाडीत दर्शन…? लिंगवाडीत हल्ल्यात बैलाचा मृत्यू

mrityunjay mahanews
error: Content is protected !!