mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

बुधवार दि.१२ मार्च २०२५

आधी स्वच्छता…
मग दहन करावी लागतात प्रेते

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजरा येथील वडाचा गोंडसह शिवाजीनगर परिसरातील स्मशानभूमी या भटक्या कुत्र्यांची निवासस्थाने बनल्या असून एखादी व्यक्ती मरण पावल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी संबंधित स्मशानभूमीत प्रेत घेऊन गेल्यानंतर प्रथम स्मशानभूमी परिसराची स्वच्छता करण्याशिवाय पर्याय राहत नाही.

        काल गांधीनगर मधील रहिवासी भीमराव सुबराव कांबळे यांचे आकस्मित निधन झाले. त्यांचा मृतदेह अंतिम विधीसाठी स्मशानभूमीकडे नेण्यात आले. त्यावेळी स्मशान भूमीमध्ये सर्वत्र कचरा व अस्ताव्यस्त पडलेले साहित्य अशी स्थिती होती. या परिस्थितीत अंत्यविधी करायचे कसे ? असा प्रश्न संबंधितांना पडला.

     अखेर गांधीनगर मधील धर्मवीर नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यकर्ते गांधीनगर मधील वारकरी संप्रदाय व गांधीनगर मधील ग्रामस्थ यांनी भीमराव यांचा मृतदेह बाजूला ठेवून प्रथमतः संपूर्ण स्मशानभूमी स्वच्छ करून घेऊन मग त्यांच्या पार्थिवाला अग्नी देत अनोख्या पद्धतीने स्वच्छतेचा संदेश देत कांबळे यांना श्रद्धांजली वाहिली.

गवत,पिसवा व विखुरलेले साहित्य…

     या दोन्हीही स्मशानभूमीमध्ये मोठ्या संख्येने भटक्या कुत्र्यांचा वावर असल्याने सर्वत्र पिसवा व कुत्र्यांकडून विखुरले गेलेले साहित्य आढळून येते. नगरपंचायतीने किमान ज्या ठिकाणी प्रीती दहन केली जातात ती ठिकाणे बंदिस्त करून गेट लावण्याची गरज आहे.

पाणीप्रश्नी सर्वपक्षीयांची आजरा नगरपंचायतीवर मोर्चाने धडक

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा शहरातील नागरिकांना नियमित पाणी मिळावे व रेंगाळलेली नवीन पाणीपुरवठा योजना त्वरित मार्गी लागावी या मागणीसाठी नागरिकांनी आजरा नगरपंचायतीवर धडक मोर्चा काढला.आजरा शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते व आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती यांच्यावतीने पाण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

          छत्रपती संभाजी चौक ते आजरा नगरपंचायत कार्यालय असा नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा काढण्यात आला.

          छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. दरम्यान नगरपंचायत प्रशासक व आजरा भुदरगडचे प्रांताधिकारी हरीश सूळ यांच्यासोबत आजरा शहरातील पाणी प्रश्नाबाबत येत्या चार दिवसात बैठक होऊन शहरवासीयांच्या पाणी पट्टी बाबतचा निर्णय होणार आहे असे प्रमुख आंदोलक , मुख्याधिकारी सुरज सुर्वे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ठरले.

        यावेळी बोलताना कॉ. संपत देसाई म्हणाले, पाण्यासाठी महिलांना मोर्चा काढावा लागतो ही खेदाची गोष्ट आहे. २७ कोटी रुपये खर्च करून नागरिकांना मुबलक पाणी मिळत नसेल, तर मग पैसा नेमका गेला कुठे? हे तपासणे गरजेचे आहे. घरापर्यंत पाणी येण्यासाठी झारीतले शुक्राचार्य अडचणीचे ठरत आहेत. हे झारीतले शुक्राचार्य ओळखण्याची गरज आहे. आजरा शहराच्या पाणी प्रश्नाबाबत नगरपंचायत प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे. ज्या क्षणी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले त्या क्षणापासून नागरी सुविधा देण्याची जबाबदारी नगरपंचायतीवर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

       जनता बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई म्हणाले, आजरा शहरातील पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडाला आहे. त्यातच पाणी योजनेच्या कामासाठी रस्त्यांची देखील मोठ्या प्रमाणावर खुदाई झाली आहे. पाण्याचे नियोजन बिघडल्यामुळे माता-भगिनींना मनस्ताप सहन करावा लागत आहे.नद्या उशाला आणि कोरड घशाला… अशी शहरवासीयांची परिस्थिती झाली आहे. नगरपंचायतीला या प्रश्नाचे फारसे गांभीर्य नसल्याचा आरोप त्यांनी केला.

        नाथ देसाई म्हणाले, सध्या आजरा शहराला कोणीही वाली राहिला नाही. शहरातील नवीन पाणी योजनेचा एकंदर कारभार म्हणजे ‘दाल में कुछ काला’ असा प्रकार तर आहेच पण आता सब दाल काली असे दिसू लागले आहे. ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली तेथेच आजरावासीयांची ‘पंचाईत” झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

           अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे म्हणाले, २७ कोटीच्या नव्या पाणी योजनेचे पाणी अद्यापही सुरू झालेले नाही. काळ्या यादीतील ठेकेदाराला पाणी योजनेचे काम देऊन असा भ्रष्ट ठेकेदार आजरेकरांच्या माथी मारण्याचे पाप कोणी केले  हे तपासले पाहिजे. गेले दोन वर्ष आजरा शहरवासीयांना व्यवस्थित पाणी मिळालेले नाही, त्यामुळे दोन वर्षाची पाणीपट्टी आजरा नगरपंचायतीने माफ करावी, अशी मागणी ही त्यांनी केली. यावेळी दयानंद भोपळे यांनी नवीन पाणीपुरवठा योजनेचा खरा कॉन्ट्रॅक्टर दाखवा आणि बक्षीस मिळवा असे म्हणण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. इथून पुढे आता आजरेकर फसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

      सौ.लता वर्टेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.दरम्यान मोर्चातील शिष्टमंडळाने नगरपंचायत मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांच्याकडे गेल्या दोन वर्षात शहरवासीयांना व्यवस्थित पाणीपुरवठा झालेला नाही, त्यामुळे दोन वर्षाची पाणीपट्टी माफ करावी असे सांगितले. याचा निर्णय प्रशासक घेऊ शकतात असे सुर्वे यांनी शिष्टमंडळाला सांगितले. त्यानुसार जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई यांनी प्रशासक तथा प्रांताधिकारी हरीश सूळ यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानुसार सूळ यांनी आगामी चार दिवसात आजरा शहराच्या पाणी प्रश्नाबाबत बैठक घेऊन पाणीपट्टी बाबत निर्णय घेऊ असे सांगितले.

       यावेळी जनार्दन टोपले, संजयभाऊ सावंत, सुधीर कुंभार, रवींद्र भाटले, विजय थोरवत, नौशाद बुड्डेखान, विक्रमसिंह देसाई, सचिन इंदुलकर, गौरव देशपांडे, पांडुरंग सावरकर, जोतिबा आजगेकर, बंडोपंत चव्हाण, यशवंत चव्हाण, राजू विभुते, प्रकाश देसाई, कृष्णा पटेकर, कृष्णा पाटील, सचिन बिरजे, उदयराज पाटील, राजू चंदनवाले गुरु देसाई प्रकाश सावंत संजय जोशी संतोष बांदिवडेकर संजय इंगळे यांच्यासह स्वप्नाली गावडे, सुशीला कांबळे, मंगल वंजारे, रोजीना कुतीनो, सुरेखा पवार, अनिता शिंत्रे, रंजना नेवरेकर, मीना पाटील, संगीता बुरुड, नाजमीया आगा, मस्ताना आगा, शीला पाचवडेकर, स्वप्नाली गाइंगडे, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

शिवीमचा पहिला लेखक कार्यकर्ता पुरस्कार संपत देसाई यांना जाहीर….


          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाच्यावतीने हा पुरस्कार सुरू केला आहे जेष्ठ विचारवंत डॉ. बाबूराव गुरव यांनी दिलेल्या दोन लाख रुपये रकमेच्या व्याजातून हा पुरस्कार यावर्षी पासून सुरू केला आहे. रुपये ११ हजार, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

     आज बुधवार दि १२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी शिवीमच्या अधिवेशनात हा पुरस्कार त्यांना दिला जाणार आहे. कॉम्रेड संपत देसाई यांनी सांस्कृतिक क्षेत्रात आणि धरणग्रस्त कष्टकऱ्यांच्या साठी केलेल्या कामाची नोंद म्हणून हा पहिला पुरस्कार त्यांना दिला जात आहे.

       सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल आजरा येथे मुकुंदराव देसाई,, सुधीर देसाई यांच्या हस्ते नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी परशुराम बामणे, रणजीत देसाई, रवी भाटले, संजयभाऊ सावंत  यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मोटर पंप व फिल्टर सवलतीच्या दरात विक्री सुरू

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

         श्री.अशोकअण्णा चराटी व श्री. अनिरुध्द उर्फ बाळ केसरकर यांच्या सौजन्याने खास शेतकऱ्यांसाठी होळी निमित्त ५०% सवलतीने मोटर पंप व पाणी फिल्टर विक्रीचे उद्घाटन भाजप तालुका अध्यक्ष अनिरुद्ध(बाळ) केसरकर यांच्या हस्ते झाले.

         यावेळी माजी नगरसेवक सिकंदर दरवाजकर,मारुती बिरजे,अंकुश चौगुले, रुपेश परीट, शुभम पाटील,रोहित बुरुड,गौतम भोसले, अनिकेत देऊसकर,महेश पारपोलकर,सतीश शिंदे, कुणाल भोसले, व मंडळाचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

           यावेळी अनिरुद्ध केसरकर यांनी शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.सदर योजना ही मंगळवार दि,१८ मार्च पर्यंत सुरू आहे असेही त्यांनी सांगितले.

जागतिक महिलादिनानिमित्त ओजस्वी सखी मंच चंदगड तर्फे विशेष कार्यक्रम

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      जागतिक महिलादिनानिमित्त ओजस्वी सखी मंच चंदगड तर्फे विशेष कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, पुणे शहर उपाध्यक्षा सौ. जानकी मडगावकर – सातोसकर होत्या.

       कार्यक्रम प्रसंगी ज्या महिलांनी पतीच्या निधनानंतर एकटीने प्राप्त परिस्थितीशी झगडत रहाटगाडा ओढला अशा स्त्रीयांचा विशेष सन्मान केला. ॲड. माया पाटील यांनी यावेळी महिलांचे कायदेशीर अधिकार व हक्क याविषयी मार्गदर्शन केले.

       यावेळी ओजस्वी सखी मंचच्या संस्थापिका सौ. सुधा नेसरीकर यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

आरटीओ कॅंप सुरू
तुडुंब गर्दी…

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       वाहन चालकांच्या मागणीवरून आजरा येथे पुन्हा एक वेळा प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी शासकीय विश्रामगृह परिसरात प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा/ आरटीओंचा कॅम्प सुरू करण्यात आला आहे. काल या कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

        आजरा हे तालुक्याचे ठिकाण असून येथे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा कॅम्प भरावा अशी मागणी गेल्या कांही दिवसापासून सुरू होती. मध्यंतरी हा कॅम्प सुरू करण्यात आला होता. परंतु अचानकपणे कॅम्प बंद करण्यात आल्याने वाहन लायसन्ससह इतर सर्व कामांकरिता गडहिंग्लज अन्य ठिकाणी जावे लागत होते. आजरा येथे कॅम्प सुरू झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

क्रीडा संकुल येथे कॅम्प भरावा…

        शासकीय विश्रामगृह येथे सदर कॅम्प सुरू करण्यात आला असला तरी ही जागा चालकांची चाचणी घेण्याकरता अपुरी असल्याने शक्य झाल्यास हा कॅम्प आजरा क्रीडा संकुल येथे घेण्यात आल्यास अधिक सोयीचे होणार आहे.

निधन वार्ता
मारुती चव्हाण


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजरा येथील मारुती शामराव चव्हाण (वय ८२ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, विवाहित मुलगी, सून जावई, नातवंडे असा परिवार आहे.

        सेवानिवृत्त कृषी अधिकारी सी.डी.सरदेसाई यांचे ते सासरे व सुजय देसाई यांचे वडील होत.

         रक्षा विसर्जन आज बुधवार दिनांक १२ रोजी सकाळी आहे.

सौ. मालुताई कालेकर

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       पेरणोली (ता. आजरा ) येथील सौ. मालुताई रमेश कालेकर. ( वय ६० वर्षे ) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले.

         त्यांच्या मागे पती, एक मुलगा, दोन विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे.

          रक्षा विसर्जन आज बुधवार ता. १२ रोजी सकाळी ९ वा. पेरणोली येथे आहे.

भिमराव कांबळे

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      गांधीनगर आजरा येथील भिमराव सुबराव कांबळे ( वय ७० वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

       त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुली, जावई नातवंडे असा परिवार आहे.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९  

 

संबंधित पोस्ट

जनता सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा नगरपंचायतीची बदनामी थांबवा… अमरीन मुल्लाचे यश… शृंगारवाडी ग्रामपंचायतीची पुरस्कारासाठी तपासणी

mrityunjay mahanews

अखेर मदन बापट यांना मृत्युने गाठलेच..

mrityunjay mahanews
error: Content is protected !!