सोमवार १७ नोव्हेंबर २०२५




अबूताहेर तकिलदार यांचा ‘यु ‘ टर्न…
निर्णयाचा फेरविचार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
माजी पंचायत समिती सदस्य व आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सदस्य व शहीद अब्दुल हमीद विकास सेवा संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आबूताहेर तकिलदार यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक रिंगणातून बाहेर पडण्यासह निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याची बातमी प्रसिद्ध होते न होते तोच पुन्हा एक वेळ या निर्णयाचा फेरविचार सुरू केल्याने गेल्या २४ तासात पुन्हा एक वेळ ते चर्चेत आले आहेत.
तकीलदार यांनी रविवारी रात्री आपण नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक रिंगणातून बाहेर पडण्या बरोबरच संपूर्ण निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहण्याचे जाहीर केले होते. दरम्यान वरिष्ठ नेत्यांनी व अशोकअण्णा चराटी विरोधकांनी याची गंभीर दखल घेत तकिलदार यांच्याशी तातडीने संपर्क साधून त्यांनी आपल्या आघाडी सोबत राहावे यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली.
आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनीही त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सध्याच्या एकंदरीत घडामोडी पाहता त्यांची विरोधी आघाडीतील घर वापसी निश्चित झाल्याचेही समजते.
मंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्यावर जबाबदारी
अबूताहेर तकिलदार यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी, अन्याय निवारण समिती व मित्र पक्षांच्या आघाडीतच रहावे यासाठी त्यांचे मन वळवण्याच्या दृष्टीने स्थानिक आघाडी प्रमुखांनी मंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. तकिलदार यांना आघाडीतच ठेवण्याच्या दृष्टीने असणारी जबाबदारी या दोघांवर सोपवण्यात आली असल्याचेही समजते.







