

राष्ट्रवादीच्या गुगलीने कारखाना वर्तुळात खळबळ

✍️✍️✍️ज्योतिप्रसाद सावंत
एकीकडे तडजोडीच्या बैठका सुरू असतानाच दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केल्याने कारखाना वर्तुळात चांगलीत खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीने टाकलेल्या गुगलीमुळे विरोधक देखील बुचकळ्यात पडले आहेत. राष्ट्रवादीची नेमकी खेळी काय ? याविषयी आता तर्क- वितर्क लढविले जात आहेत.हे सर्व सरळ वाटत असली तरी या खेळीला अनेक घटनांची पार्श्वभूमी आहे .
राष्ट्रवादी काँग्रेसची तालुक्यातील पकड उत्कृष्ट आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांसह प्रमुख सहकारी संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत मिळालेल्या एकतर्फी विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस व सत्ताधारी मंडळींनी साखर कारखाना निवडणूक जिंकण्याचे मनसुबे आखले होते. त्या दृष्टीने योग्य त्या हालचालीही सुरू होत्या. असे असताना बिनविरोधचे प्रस्ताव पुढे येऊ लागले. कारखान्याची असणारी आर्थिक स्थिती व भविष्यातील अडचणी विचारात घेऊन निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी तालुक्यातून सभासदांचा रेटा सुरू झाला. निवडणूक बिनविरोध करत असताना जागा वाटपाचा मुद्दा कळीचा विषय ठरला. प्रत्येक गटा- तटाला प्रतिनिधित्व देताना जिल्हास्तरीय नेते मंडळींनाही मोठी कसरत करावी लागली. बैठकामध्ये निघालेले पर्याय मान्य नसणे व निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास असे असताना राष्ट्रवादीला दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप होत होता.
एकीकडे हे सर्व सुरू असतानाच सत्ताधारी मंडळींमधील अंतर्गत संघर्षही चव्हाट्यावर येत होता. संचालकामध्ये आपापसात असणारे मतभेद, एकमेकांशी केल्या जाणाऱ्या कुरघोड्या यामुळे सत्ताधाऱ्यांमध्येही फारसे अलबेल आहे असे म्हणता येत नव्हते. सत्ताधाऱ्यामधील काही मंडळींना एकत्र ठेवण्याचे आव्हान वरीष्ठ नेतेमंडळीं समोर होते.त्यातच कारखान्याची आर्थिक स्थिती पाहून अनेकांनी निवडणुकीतून बाजूला होण्याचा निर्णयही घेतला होता.
या सर्व बाबी स्थानिक राष्ट्रवादी नेतृत्वासह जिल्हा नेतृत्वाच्या लक्षातही येत होत्या. अखेर दोन्ही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी एकत्र येऊन निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या माध्यमातून दाखल केलेल्या सर्व उमेदवारांनी माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. थोडक्यात झाकली मूठ सव्वा लाखाची… असाच हा प्रकार झाला. तर राष्ट्रवादीची ही केवळ स्टंटबाजी व दबावतंत्र असल्याची चर्चाही काल दिवसभर सुरू होती.
या निर्णयाने विरोधक मात्र चांगलेच धास्तावले आहेत. राष्ट्रवादीने हा निर्णय घेण्यामागचा नेमका उद्दिष्ट आहे ? याची चर्चा आता सुरू झाली आहे. जिल्हा बँकेमध्ये राष्ट्रवादीचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे वर्चस्व आहे. कारखाना आर्थिक अडचणीत असताना जिल्हा बँकेच्या सहकार्या शिवाय कारखान्याची चाके फिरू शकत नाहीत हे देखील विरोधकांना चांगलेच माहित आहे. अशोकअण्णा चराटी व हसन मुश्रीफ यांच्यातील संबंध यापूर्वीच ताणले गेले आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे जिल्हा बँक संचालक सुधिर देसाई व अशोकअण्णा चराटी यांचे विळ्या भोपळ्याचे सख्य आहे. यामुळे कारखाना चालवताना अनेक अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकंदर परिस्थिती पाहता राष्ट्रवादीने टाकलेली ही गुगली राजकीय वर्तुळात संभ्रमावस्था निर्माण करणारी आहे. अजूनही यामध्ये वरिष्ठ नेते मंडळी हस्तक्षेप करू शकतात. परंतु असा हस्तक्षेप झाला नाही तर मात्र विरोधकांना सुमारे पावणे दोनशे कोटी रुपयांचा बोजा डोक्यावर घेऊनच कारखान्याच्या पुढच्या वाटचालीची सुरुवात करावी लागणार आहे हे निश्चित…
आज दुसरा बॉम्ब फुटण्याची शक्यता
राष्ट्रवादीने निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी सुरू झाले आहेत.राष्ट्रवादीचा हा निर्णय धक्कादायक आहे. अशाच पद्धतीने दुसरा धक्का आज संध्याकाळपर्यंत तालुका वासीयांना पहावयास मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आम. सतेज पाटील यांची जबाबदारी वाढली
राष्ट्रवादी काँग्रेसने आजरा साखर कारखान्याच्या निवडणूक रिंगणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आमदार सतेज पाटील यांची समर्थक मंडळी नेमकी काय भूमिका घेणार? याकडेही तालुकावासीयांचे लक्ष लागून आहे. राष्ट्रवादीच्या या निर्णयानंतर आमदार सतेज पाटील यांची जबाबदारी वाढली आहे. कारखान्याचे नेतृत्व करणाऱ्या उर्वरित मंडळींना आता आमदार सतेज पाटील हा आशेचा किरण दिसत आहे.


रस्त्याचा प्रश्न निकाली न लागल्यास सोमवारी अर्धनग्न अवस्थेत रास्ता रोको आंदोलन
बहुजन मुक्ती पार्टीचा इशारा
आजरा:प्रतिनिधी
बहुजन मुक्ती पार्टी तर्फे प्रशासनाकडून मौजे मलिग्रे रस्त्याचा प्रश्न निकाली न लागल्यास सोमवार दि.४ रोजी अवस्थेत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मलिग्रे, ता. आजरा, जि. कोल्हापूर येथील सर्वे नं. १८७ मधील गट नं. १००६, १००७, १०३१, १०३४, १०३५ मधुन जाणारा नकाशामध्ये नोंद असणारा पाणंद रस्ता खुला करून मिळणे करिता एक वर्षापासून प्रशासनाला निवेदन दिले आहे, त्याच बरोबर आंदोलने देखिल केलेली आहेत.तरी देखील मौजे मलिग्रे येथील पिडीत व्यक्ती डॉ. इंद्रजीत जाधव यांना घराकडे जाण्याकरिता रस्ता मिळत नाही. भारत देशाला स्वातंत्र्य मिळुन ७५ वर्षे झाली तरी देखील मलिग्रे मधील बांधव रस्त्याच्या प्रतिक्षेत आहेत, आणि प्रशासन जाणिवपूर्वक सदर गोष्ठीसाठी विलंब करीत आहेत, हि अतिशय लाजिरवाणी गोष्ठ आहे. २५ नोव्हेंबर २०२३ रोजी एक वर्षे पूर्ण झाले.मात्र प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे, खोटी आश्वासने ह्याखेरिज दुसरे काहिही मिळालेले नाही असा असा आरोप करण्यात आला आहे.
हि अतिशय गंभीर आणि कायदयाच्या विरोधातील बाब आहे. येत्या चार दिवसात सदर रस्त्याचा प्रश्न निकाली न लागल्यास सोमवार दि. ०४ डिसेंबर २०२३ रोजी प्रशासन विरोधात घंटा वाजवून अर्धनग्न अवस्थेत रास्ता रोको आंदोलन करत असून त्यामुळे होणाऱ्या नुकसानिस सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असा इशारा बहुजन मुक्ती पार्टी तर्फे देण्यात आला आहे.



उत्तूर येथे ‘दिपोत्सव २०२३ ‘ उत्साहात.

आजरा:प्रतिनिधी
त्रिपुरारी पौर्णिमा व देव दिपावली चे औचित्य साधून उत्तूर (ता. आजरा) येथील नव कृष्णा व्हॅली स्कूल व ज्युनियर कॉलेज, कृष्णा व्हॅली अॕग्री अॕडव्हान्स्ड सेंटर, सहयाद्री निसर्ग मंडळ, जिजाऊ फाउंडेशन व आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था, कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने उत्तूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ‘परिसरात १००० पणत्या प्रज्वलित करून पाणि वाचवा, जीवन वाचवा, पृथ्वीला वाचवा ‘असा संदेश देणेत आला. सरपंच किरण आमणगी यांचे हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर शिववंदना, व शिवरायांच्या जयघोषात १००० पणत्या प्रज्वलित करणेत आल्या.
उपक्रमाचे हे दूसरे वर्ष असुन कार्यक्रमासाठी ग्रा. पं. सदस्य महेश करंबळी, विजय सावेकर, केशव पाटकर, विकास हत्तरगी, किरण चव्हाण, पर्यावरण मित्र जिल्हाध्यक्ष डॉ. गुरुप्रसाद कुलकर्णी, विजय पाटील, सोनु भाईगडे, प्रमोद गुरव, छत्रपती युवा ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
पाणी बचतीचा संदेश देणारी प्रतिभा सुतार यांनी रेखाटलेली रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
यावेळी श्रेया पोवार, हर्षद कार्तिक व डॉ. गुरुप्रसाद कुलकर्णी यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. प्राचार्य रामकृष्ण मगदूम’ यांचे मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी नियोजन केले.
संध्या मोरबाळे यांनी सूत्रसंचालन केले.



निधन वार्ता
पास्कू डिसोजा

ग्रामपंचायत वाटंगीचे पहिले सरपंच ,माजी तंटामुक्त अध्यक्ष, कै, पास्कु जेरोन डिसोजा (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. अंतिम कार्य उद्या बुधवार दि,२९ रोजी सायंकाळी चार वाजता होणार आहे.


