

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार निवडणूक रिंगणातून बाहेर पडणार…
एक तारखेला माघार घेण्याचा निर्णय.

आजरा :ज्योतिप्रसाद सावंत...
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार आजरा साखर कारखाना निवडणुकीतून कारखान्याचे हीत डोळ्यासमोर ठेवून कारखान्यावर खर्चाचा अतिरिक्त बोजा होऊ नये यासाठी निवडणुकीतून माघार घेणार असल्याचे आज राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंददादा देसाई व जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
सत्ता संघर्षाचा परिणाम आजरा कारखान्याच्या एकंदर कारभारावर होऊन पुन्हा कारखाना आर्थिक अडचणीत येऊ नये यासाठी हा निर्णय घेत असल्याचे मुकुंदराव देसाई व सुधीर देसाई यांनी स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले बहुतांशी उमेदवार उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे कारखाना निवडणुक राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. या निर्णयावर कितपत ठाम राहणार यावर ही आता पुढचे भवितव्य अवलंबून रहाणार आहे.

ना कोणता फॉर्म्युला…
ना जागा वाटप...जिल्ह्याच्या नेत्यांसमोर एरंडाचे गु-हाळ

✍️✍️✍️ज्योतिप्रसाद सावंत
आजरा साखर कारखान्याच्या उमेदवारीचा माघारीचा दिवस जस-जसा जवळ येत आहे, तसतशा राजकीय हालचाली गतिमान होत आहेत. जिल्हा पातळीवरील नेत्यांना स्थानिक पातळीवरील नेत्यांनी बिनविरोधचे साकडे घातले आहे. परंतु स्थानिक पातळीवरचे नेते एकत्र येण्यास तयार नाहीत. त्यामुळे हे बिनविरोधचे सुरू असलेले प्रयत्न म्हणजे एरंडाचे गुऱ्हाळ आहे असेही स्पष्ट होऊ लागले आहे. ना ऊस ना रस… केवळ चर्चाच… असा हा प्रकार असल्याचे दिसत आहे. यामध्ये अपक्षांना विश्वासात घेतले जात नसल्याने बिनविरोधचा नेमका अर्थ काय ? असा सवाल सभासद उपस्थित करू लागले आहेत.
काल सोमवारी स्थानिक नेत्यांच्या व वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीच्या फे-या पार पडल्या. निवडणूक बिनविरोध करायची झाली तर पक्षनिहाय जागावाटप कसे असावे याच्यावरही काथ्याकुट करण्यात आले. काहींना वरिष्ठ नेत्यांचा हा निर्णय पटला तर काहींनी याबाबत वेगळा विचार करण्यास सुरुवात केली आहे. मावळत्या सभागृहातील बलाबल लक्षात घेऊनच प्रतिनिधित्व मिळावे यासाठी विविध गट, पक्षांचे कार्यकर्ते व नेते प्रयत्नशील आहेत. आज याबाबत चित्र स्पष्ट होईल.
बिनविरोधच्या या चर्चेमध्ये भविष्यात आपल्याच गटाचे कारखान्यात वर्चस्व कसे राहील याची देखील दक्षता सर्वच मंडळींकडून घेतली जात आहे. त्यामुळेच एकीकडे बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करत दुसरीकडे जास्तीत जास्त जागा आपल्या गटाच्या पदरात कशा पडतील याचीही फिल्डिंग पद्धतशीरपणे लावली जात आहे. यासाठी जुने दाखलेही दिले जात आहेत.
हे सर्व सुरू असताना अपक्षांना मात्र काडीचीही किंमत दिली जात नाही हे वास्तव आहे.अनेक अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेली मंडळी ही मातब्बर आहेत याचा सोयीस्कर विसर जिल्हास्तरीय नेत्यांसह स्थानिक नेत्यांना पडलेला दिसतो. कारखाना वरील निवडणूक खर्चाचा बोजा कमी करणे या उद्देशाने निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू आहेत परंतु नेतेमंडळींनी जवळ केलेली गट व पक्षांची पिल्लावळ म्हणजे कारखान्यातील संपूर्ण सभासद नव्हेत याचेही भान ठेवणे आवश्यक आहे.
एकीकडे जिल्हास्तरावर बिनविरोधच्या जोर बैठका सुरू असल्या तरी दुसरीकडे मात्र अपक्षांतून संताप सुद्धा व्यक्त केला जात आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रमुख नेते मंडळींनी बिनविरोध चा निर्णय घेतलाच तर शेवटपर्यंत सर्वसामान्य सभासदांना मतदानाला सामोरे जावे लागणार नाही असे म्हणणे सध्यातरी मूर्खपणाचे ठरत आहे. अपक्षांनी जर उमेदवारी ठेवली तर निवडणूक प्रक्रियेकरता येणारा लाखोंचा खर्च हा करावाच लागणार आहे, याचेही भान जिल्हास्तरीय व स्थानिक नेत्यांनी ठेवण्याची गरज आहे.
अपक्ष व इतर इच्छुकांचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय बिनविरोधचा फॉर्म्युला यशस्वी होऊन कारखान्याला निवडणूक खर्चापासून वाचवणे केवळ अशक्य आहे.
ऊस पिकवणारे कट्ट्यावर…?
तालुक्यात स्वतः शेतात राबून ऊस पिकवणारे अनेक बडे शेतकरी आहेत, जे कारखान्यात संचालक म्हणून जावू इच्छितात परंतु राजकीय साठमारीत असे शेतकरी पात्रता असूनही संचालक पदापासून दूरच आहेत. तर उसाचा काहीही संबंध नसणारी मंडळी मात्र संचालक पदाची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत.


आजऱ्यात संविधान दिन साजरा

आजरा: प्रतिनिधी
आजऱ्यामध्ये संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला.सर्व प्रथम संविधानाची शपथ देण्यात आली. नंतर संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
प्राचार्य आनंद मेणसे बेळगाव यांचे “संविधान की मनुस्मृती “या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी डॉ. नवनाथ शिंदे होते.
प्रास्ताविकामध्ये संतोष कांबळे यांनी सध्या संविधान कसे धोक्यात आहे, यावर सविस्तर आपले मत मांडले.
प्राचार्य आनंद मेणसे यांनी संविधान ‘ की मनुस्मृती ‘ यावर बोलताना मनुस्मृती मध्ये काय आहे आणि मनुस्मृतीच्या १२अध्याय,२६९५ खंडापैकी काही खंडात दलित आणि स्त्रियावर कशी बंधने लादली गेली होती, त्यांना शिक्षण आणि समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कसे रोखले गेले होते, त्यांची कशी पिळवणूक केली जात होती याबाबत सविस्तर सांगितले.
महात्मा फुले, गांधीजी आणि आंबेडकर यांनी दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले असेही यावेळी त्यांनी विषद केले.
जवळ जवळ २०० वर्षे मनुस्मृती संविधान म्हणून देशात अंमलात होती त्यासाठी देशाच्या लोकशाहीला पूरक संविधान लिहिण्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महात्मा गांधी यांनी कशी दिली त्याचप्रमाणे आंबेडकरांच्या मनात गांधीजी विषयी किती आदर होता हेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पुन्हा एकदा मनुवादी आपले डोके वर काढू पाहत आहेत. यासाठी संविधान रक्षणाची जबाबदारी आपणा सर्व भारतीयांची आहे असेही यावेळी त्यांनी सांगितले.
आपल्याला देशात एक मजबूत आणि आदर्श लोकशाही टिकवून समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांचे जतन करायचे असेल तर संविधान वाचविणे काळाची गरज आहे असे डॉ. नवनाथ शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.
कार्यक्रमास काशिनाथ मोरे, अजय देशमुख, इनास फर्नांडिस, मिनिन परेरा, डॉ. उल्हास त्रिरत्ने, युनूस सय्यद, हसन तकीलदार, जुबेर माणगांवकर,सुनीत चंद्रमणी, शशिकांत सावंत, निवृत्ती कांबळे, भिकाजी कांबळे, मनीषा गुरव मनीषा कांबळे, सुमन कांबळे, आणि सर्व संघटनांचे कार्यकर्ते हजर होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनिल कांबळे यांनी केले.आभार सुनील कामत यांनी मानले.


कोळींद्रे येथे संविधान दिन उत्साहात

आजरा: प्रतिनिधी
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संविधान गट, कोळिंद्रे आणि संविधान सन्मान परिषद यांच्या वतीने भारतीय संविधान संवर्धन व लोकजागर अभियान मार्फत 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन कोळिंद्रे गावात साजरा करण्यात आला.
सुरुवतीला संविधान अभिमान रॅली कॅन्डल मार्च घेऊन गावात अतिशय उत्साहाने काढण्यात आली यावेळी संविधानाबाबत आणि संविधानातील मूल्यांबाबत घोषणा देण्यात आल्या. यामध्ये मुला मुलींचे स्त्री पुरुष कार्यकर्ते व लोक उपस्थित होते.
कोळिंद्रे ग्रामपंचायत भारत देशाच्या नकाशा काढून त्या नकाशाभोवती पेटत्या मेणबत्ती ठेवून चित्रकला करण्यात आली होती.
त्यानंतर ग्रामपंचायत संविधान सभेला सुरुवात झाली. सुरुवातीला भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
या सभेमध्ये बोलताना समीर खेडेकर म्हणाले, भारतीय संविधान बनवताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाच का निवडले कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे अखंड भारताला घेऊन जाण्याची क्षमता होती. त्यांच्या विद्वत्तेच्या मुळेच संविधान बनवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. मुस्लिम समाजासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी योगदान दिलेले आहे.
यानंतर सुरेश बुगडे म्हणाले, याच काळात संविधानाच्या जागर करण्याची गरज का निर्माण झालेली आहे. कारण हा जो काळ आहे. हा हुकूमशाहीकडे जाणारा काळ आहे लोकशाही तोडून ठोकशाहीकडे जाणारा काळ आहे. त्यामुळे भारतीय संविधानाचा जागर होणे गरजेचे आहे .

त्यानंतर संग्राम सावंत म्हणाले, संविधानाचा प्रचार वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांच्यामध्ये संविधानाची ओळख होण्यासाठी भारतीय संविधान संवर्धन व लोकजागर अभियानाची सुरुवात केलेली आहे. संविधानानुसार देशाचा कारभारची अंमलबजावणी व्हावी. तसेच हे संविधान नाचे संवर्धन करणे ही गरज आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सदाशिव हेब्बाळकर म्हणाले, संविधान दिन साजरा करताना भारतीय नागरिकाची मान उंचवणारा दिवस आहे. आपणा सर्वजण संविधान दिनाच्या निमित्ताने एकत्र आलो.हे महत्त्वाचे आहे. इथून पुढेही ग्रामपंचायत आपणास अशा कार्यक्रमासाठी मदत करेल.
यावेळी मनोहर पाटील ग्रा.प. सदस्य; नंदा जाधव व मेघा जाधव ग्रा.प. सदस्या तसेच शंकर उगाडे, विष्णू वाके, तानाजी बुगडे, अरुण भोगले, संतराम कुराडे, अण्णा सावंत, शिवाजी उंडगे,अशोक बुगडे, महादेव सुतार, संजय कांबळे, लक्ष्मी कांबळे, जयश्री कांबळे,पूजा कांबळे, तुळसा कांबळे,मंगल कांबळे अक्षय कांबळे यांच्या मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचलन नारायण कांबळे यांनी केले. शेवटी राष्ट्रगीत म्हणून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाचे संयोजन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संविधान गट, कोळिंद्रे आणि संविधान सन्मान परिषद व कोळिंद्रे ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले होते.


सोमवारी पाटबंधारे खात्याच्या विरोधात आजरा तहसील कार्यालयावर मोर्चा

आजरा: प्रतिनिधी
अन्यायी पाणीपट्टी वाढ आणि जलमापक यंत्राची सक्ती रद्द करावी याबरोबरच महावितरणच्या अनागोंदी कारभाराविरोधात सोमवार दि ४ रोजी आजरा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय आज किसान भवन येथे झालेल्या मोटरपंप धारक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात करण्यात आला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती अल्बर्ट डिसोझा होते.
यावेळी बोलताना मेळाव्याचे निमंत्रक आणि श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई म्हणाले की राज्य सरकारचे पाटबंधारे खाते आता शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. जलमापक यंत्रांची सक्ती करून शेतकऱ्यांच्या पाणी वापराच्या नैसर्गिक हक्कावरच गदा आणू पाहतय, शेतकऱ्यांचे पाणी पळविण्याचा असाच प्रयत्न २०१४ साली झाला होता. सत्ताधारी आणि विरोधी असलेल्या २८८ आमदारांनी एकत्र येत रात्री १२ वाजता पाण्याचे अग्रक्रम बदलून पिण्याच्या पाण्यानंतर शेती ऐवजी उद्योगांना पाणी देण्याचे धोरण आखले. शेतकऱ्यांच्या पाण्यावरच मध्यरात्री दरोडा घातला. याविरोधात श्रमिक मुक्ती दलाच्या पुढाकाराने शेतकऱ्यांनी संघर्ष करून सरकारला धोरण बदलायला लावले. त्यामुळे यावेळी सुध्दा शेतकरी हा निर्णय बदलायला भाग पाडतील.
माजी सभापती अल्बर्ट डिसोझा म्हणाले, कुठलाच शेतकरी पाणी फुकट मागत नाही, पण अन्यायी पाणीपट्टी शेतकरी खपवून घेणार नाही. तालुक्यातील सर्व शेतकरी एकत्र येऊन पाटबंधारे खात्याचा हा निर्णय आपण बदलायला भाग पाडूया. सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेऊन या लढ्यात शेतकऱ्यांनी सामील व्हावे.
कॉ संजय तर्डेकर म्हणाले, तालुक्यातील कुठल्याच धरणाला कालवे नाहीत त्यामुळे आम्ही पाणी मोटर बसवून उचलून घेतो. त्यामुळं पासल पाणी आणि उचलून घेयलेलं पाणी याची पाणीपट्टी समान असता कामा नये. याविरोधात सर्वांनी मिळून आवाज उठवूया.
यावेळी संभाजी सावंत, प्रकाश मोरुस्कर, कॉ. शांताराम पाटील, हरिबा कांबळे, निवृत्ती कांबळे यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. मेळाव्याला बाबुराव नाईक, जोतिबा चाळके, सर्जेराव देसाई, बजरंग पाटील, उदय कोडक, संकेत सावंत, सचिन देसाई, संभाजी पाटील, शंकर पाटील, सुनील पाटील , दशरथ घुरे, मारुती पाटील, बाळासाहेब कोडक यांच्यासह मोटरपंप धारक शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. सुरेश शिंगटे यांनी स्वागत केले.


व्यंकटरावमध्ये एन.सी.सी. दिवस उत्साहात संपन्न

आजरा: प्रतिनिधी
येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये २६ नोव्हेंबर एनसीसी दिवस तसेच भारतीय संविधान दिवस उत्साह संपन्न झाला.
एनसीसी दिनानिमित्त शिवराज महाविद्यालयामध्ये एम ए चे शिक्षण घेत असणारी नरेवाडी या गावची सुकन्या कु. सुकन्या सुबराव रणदिवे या विद्यार्थिनीला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले होते. त्यांचा सत्कार प्रशालेचे माजी प्राचार्य , संचालक व माजी एनसीसी ऑफिसर सुनील देसाई यांची हस्ते करण्यात आला .
सुकन्या हिने आपल्या मनोगतामध्ये एनसीसी मधील विविध परीक्षा, कॅम्पस यशस्वीपणे पार करत असताना घेतलेल्या कष्टाची तसेच आपल्या जिद्दीचे कथन प्रशालेतील एनसीसी कॅडेटना केले.. (विद्यार्थी व विद्यार्थिनी) सुनील देसाई यांनी आपल्या मनोगतामध्ये आपल्या कार्यकाळात एनसीसी मधून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त बाणवत मार्गदर्शन केले व अनेक विद्यार्थी आज अधिकारी पदावर कार्यरत असल्याचे सांगितले. व त्याप्रमाणे आजच्या विद्यार्थ्यांनी ध्येय ठेवून अभ्यास व परिश्रम करण्याचे आवाहन केले.
प्राचार्य आर. जी. कुंभार यांनी मनोगतामध्ये स कोल्हापूर जिल्ह्यातील फार कमी शाळेमध्ये एनसीसी हा विषय आहे आणि सध्या मुलींची सुद्धा एन.सी.सी.सुरू आहे. यामध्ये खेडोपाड्यातील मुलीही स्वतःला सिद्ध करत पुढे जाऊन सैन्य व पोलीस दलात सेवा करण्याचे ध्येय उराशी बाळगून एन सी सी चे शिक्षण घेत आहेत. याचे कौतुक वाटते असे सांगितले व एनसीसी दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर भारतीय संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम घेत आपल्या ज्ञानाचा परिपूर्ण वापर करून भारतीय संविधान लिहिले . या संविधानाची एक प्रत सर्वांच्या घरी असणे महत्त्वाचे आहे असे सांगितले.
मुंबई येथील २६-११ च्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले जवान पोलीस तसेच नागरिक यांना श्रद्धांजली वाहिली.
या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षिका,सौ.व्ही.जे.शेलार, एम. एम.देसाई श्रीम.ए बी.पुंडपळ, कलाशिक्षक श्रीकृष्णा दावणे, क्रीडा शिक्षक सुनील पाटील उपस्थित होते.
प्रास्ताविक एनसीसी ऑफिसर महेश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन पी व्ही पाटील यांनी तर आभार एम. एम. देसाई यांनी मानले.


आजरा येथे किल्ला स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

आजरा: प्रतिनिधी
दीपावली निमित्त नगरसेवक अभिषेक शिंपी यांनी आयोजित केलेल्या किल्ला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला.
प्रथम क्रमांक ..कुंभार गल्ली सौरभ गुरव रुपये पाच हजार व प्रमाणपत्र.,
द्वितीय क्रमांक.. सिद्धार्थ नगर सुशांत कांबळे .रुपये तीन हजार व प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक. विभागून. नबापूर गल्ली प्रवीण भोसले.. रुपये एक हजार व प्रमाणपत्र.
तृतीय क्रमांक.. खंडोबा तालीम मंडळ कुणाल राजेश विभुते.. रुपये एक हजार व प्रमाणपत्र.
उर्वरित सर्व सहभागी एकूण १५ स्पर्धकांना प्रोत्साहनपर प्रत्येकी पाचशे रुपये व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
उत्तेजनार्थ स्पर्धक..
मोहित संभाजी नेवरेकर,अक्षय आनंद चिटणीस गोठण गल्ली,सिद्धेश संदीप नांदवडेकर सुतार गल्ली,अविनाश सुतार सुतार गल्ली,आयुष सुतार सुतार गल्ली,दीपक आनंद पोवार गांधीनगर,सिद्धार्थ शिवगंड चाफेगल्ली,वैभव जयवंत दोरूगडे,श्रीजीत सावंत रवळनाथ कॉलनी,आर्यन दोरूगडे सोमवार पेठ,समर्थ पांडुरंग पांगम पारपोलकर कॉलनी,कार्तिक रमेश दळवी.. चाळोबा गल्ली,कैवल्य बापट
या पारितोषिक वितरण समारंभासाठी परशुराम बामणे , अश्विन डोंगरे,अशोक पोवार, विक्रम पटेकर, धनाजी पारपोलकर, अमित खेडकर, इमरान सोनेखान, असिफ सोनेखान, विक्रम देसाई, संदीप पारळे, आनंदा कुंभार ओमकार माध्याळकर ,इब्राहिम इंचनाळकर, गोपाळ पाटील. आदी मान्यवर व विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
किल्ला स्पर्धेच्या नियोजनाचा उद्देश अभिषेक जयवंतराव शिंपी माजी नगरसेवक व संचालक आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
सूत्रसंचालन पी. व्ही. पाटील यांनी केले. एम. ए. पाटील यांनी आभार मानले.


निधन वार्ता…
सुशिला देसाई

आजरा येथील सेवानिवृत्त शेती अधिकारी जयसिंगराव अमृतराव देसाई (जिजामाता कॉलनी) यांच्या मातोश्री सुशिला अमृतराव देसाई यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले . त्यांच्या पश्चात मुलगा दोन मुली नातवंडे असा परिवार आहे.रक्षा विसर्जन बुधवारी दिनांक २९ रोजी सकाळी ९ वाजता आहे.




