
शिवाजी पाटील यांचे अपघाती निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मुरुडे, तालुका आजरा येथील शिवाजी कृष्णा पाटील (वय ४५ वर्षे ) यांचे दुचाकीला डंपरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ठाणे (मुंबई) येथे निधन झाले.
कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघ कळवा, ठाणेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या शिवाजी पाटील यांच्या दुचाकीचा रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान सदर अपघात झाला. अपघातात ते गंभीर जखमी झाले. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.
पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, बहीण,भाऊ असा परिवार आहे. आज मुरुडे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

संविधान मोडून काढण्यासाठी ‘ चारसो पार ‘ ची धडपड : संभाजीराजे छत्रपती

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सध्या भाजपाची ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्यासाठी सुरू असलेली धडपड म्हणजे केवळ संविधान मोडून काढण्याचे षडयंत्र आहे. हा षडयंत्राचा डाव हाणून पाडण्यासाठी व छ. शिवाजी महाराज, राजर्षी शाहू, महात्मा फुले, व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी शाहू छत्रपती यांना विजयी करा असे आवाहन संभाजी राजे छत्रपती यांनी केले.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू यांच्या प्रचारार्थ आयोजित संपर्क दौऱ्यात ते बोलत होते.
संभाजीराजे म्हणाले, महापुरुषांचे विचार संपुष्टात आणून ऐनवेळी संसदेच्या सर्वोच्च सभागृहांमध्ये सर्वसामान्यांच्या आवाक्या पलीकडचे विषय आणून मुख्य प्रश्नांना बगल देण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. अशावेळी सर्वसामान्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे. अन्यथा याची फार मोठी किंमत भविष्यात मोजावी लागेल.
डॉ. नंदिनी बाभुळकर म्हणाल्या, शाहू छत्रपतींसारखा आश्वासक व सुसंस्कृत चेहरा संसदेत जाण्याची गरज आहे. ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व सामान्यांच्या हिताच्या अनेक योजना राबविल्या, त्यांच्या जीवनामध्ये समृद्धी आणली अशा राजर्षी शाहू महाराजांच्या वारसांना विकास कामाबद्दल सांगण्याचीही गरज भासणार नाही.

गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर म्हणाल्या, गत वेळी संभाजीराजांना कोळींद्रे जिल्हा परिषद मतदार संघातून मताधिक्य दिले होते. यावेळी आपण गतवेळच्या मताधिक्यापेक्षा दुपटीने मताधिक्य निश्चितच देवू असा विश्वासही दिला.
कॉ.संपत देसाई, कॉ. अजय देशमुख, रामराजे कुपेकर, आजरा कारखाना संचालक अशोक तर्डेकर यांनीही ठिकठिकाणी मार्गदर्शन करून शाहू छत्रपतींना निवडून आणण्याचे आवाहन केले.
यावेळी मुकुंदराव देसाई, उमेश आपटे, संजयभाऊ सावंत,अभिषेक शिंपी, नौशाद बुड्ढेखान, अप्पी पाटील, रचना होलम, राजू होलम, राजू देसाई, अशोक पोवार, विक्रम पटेकर, रवी भाटले, युवराज पोवार , ‘ वंचित ‘चे संतोष मासाळे , विक्रम देसाई यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
केवळ सरकारवर अवलंबून राहू नका
कोळींद्रे जिल्हा परिषदेतील धरणांच्या लाभक्षेत्रातून वगळलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी परिषद घ्यावी. जेव्हा आम्ही पाण्यासाठी संघर्ष करू तेव्हा आपण आमच्या सोबत रहा असे आवाहन कॉ. संपत देसाई यांनी संभाजीराजेंना केले . हाच धागा पकडत संभाजी राजे यांनी पाणी देण्याच्या पार्श्वभूमीवर सरकारवर अवलंबून न राहता एक कृती आराखडा तयार करून सरकारलाच आपण सक्षम पर्याय देऊया, यासाठी आपण अग्रभागी असू असे सांगितले.

आजरा अर्बन बँकेच्या बेळगुंदी शाखेचे उद्या उद्घाटन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा अर्बन बँकेच्या ३३ व्या बेळगुंदी, ता.जि. बेळगावी शाखेचा उद्घाटन समारंभ उद्या मंगळवार दिनांक २३ एप्रिल २०२४ रोजी सर्व अद्ययावत सेवासह होत आहे. या भागात छोटे उद्योग आणि व्यवसाय उभे रहावेत आणि त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळावी हा दृष्टीकोन बँकेच्या व्यवस्थापनाने ठेवला आहे.
उद्घाटन समारंभाला बँकेचे ग्राहक, सभासद आणि हितचिंतक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आण्णा भाऊ संस्था समूह प्रमुख अशोक चराटी, अध्यक्ष रमेश कुरुणकर, उपाध्यक्ष सुनील मगदुम, संचालक सुरेश डांग, विलास नाईक, डॉ. दीपक सातोसकर, डॉ. अनिल देशपांडे, किशोर भुसारी, बसवराज महाळंक, मारुती मोरे, आनंदा फडके, प्रणिता केसरकर, श्रीमती शैला टोपले, अस्मिता सबनिस, सुर्यकांत भोईटे, किरण पाटील, संजय चव्हाण,ॲड.सचिन इंजल, मनोहर कावेरी, जयवंत खराडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी केले आहे.




