mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

मंगळवार  १ जुलै २०२५              

त्या ‘ मृतदेहाची ओळख पटली…?

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      १९ जून रोजी आजरा महागाव मार्गावरील संताजी पुलाखाली सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून तो मृतदेह बेळगुंदी तालुका बेळगाव येथील मल्लाप्पा भरमू थळवार या ४२ वर्षीय व्यक्तीचा असल्याचे स्पष्ट होत आहे.

      मल्लाप्पा हा सेंट्रींग कामगार म्हणून आजरा येथे आला होता. आजरा पोलीस स्टेशनच्या शेजारीच असणाऱ्या एका बांधकामावर तो काम करत असे. व्यसनी व त्याला फिट्स चा त्रास असल्यामुळे त्याच्या इतर सहकाऱ्यांनी त्याला बस मध्ये बसवून गावी पाठवण्याचा निर्णय घेतला.  तो बसमधून मध्येच उतरून गावी न जाता आजरा येथेच थांबला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह जोरदार पावसात पाण्याबरोबर वाहून आल्याचे स्पष्ट झाले होते.

     दरम्यानच्या कालावधीत त्याच्या मृतदेहाची ओळख न पटल्याने अंत्यसंस्कार करण्यात आले होते. डीएनए तपासणीनंतरच मृतदेहाच्या ओळखीवर अंतिम शिक्कामोर्तब होईल.

ओळखीला विलंब कारण…

      मल्लाप्पा हा बेळगुंदी येथे गावी गेला आहे असा त्याच्या आजरा येथील सहकाऱ्यांचा समज झाला तर तो आजरा येथे कामावर आहे असा त्याच्या बेळगुंदी येथील कुटुंबीयांचा समज होता यामुळे त्याच्या मृत्यूची कल्पना दोन्हीकडेही आली नाही. त्यामुळे त्याच्या मृत्यूबद्दल सर्वजण अनभिज्ञ होते.

बेपत्ता…

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजरा तालुक्यातील देवकांडगाव पैकी विनायकवाडी येथून बाळू ज्ञानू तेजम ही ५२ वर्षीय व्यक्ती २७ जून पासून बेपत्ता असल्याची वर्दी पत्नी नीता बाळू तेजम यांनी आजरा पोलिसात दिली आहे.

      २७ जून रोजी घरातून निघून गेलेले तेजम हे अद्याप परतलेले नाहीत ते आजरा साखर कारखान्याचे हंगामी कामगार आहेत.

तरुणी बेपत्ता…

     आजरा शहर येथून १९ वर्षीय तरुणी २९ जूनपासून बेपत्ता असलेची वर्दी संबंधित तरुणीच्या पालकांनी आजरा पोलिसांत दिली आहे.

      २९ तारखेला पहाटे चार वाजता राहत्या घरातून सदर तरुणी कोणालाही न सांगता निघून गेली आहे. आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम…

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      कोल्हापूर जिल्हयाचे पालक मंत्री, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुंटूब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांचा वाढदिवस आजरा शहरातील अनाथ व गरजू शालेय मुलांच्या उपस्थितीत आजरा शिवसेना संपर्क कार्यालयात जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करणेत आला.

       या मुलांच्या हस्ते केक कापूण साजरा करण्यात आला.  मुलांना दप्तर, छत्री, जेवणाचा डबा, पाणी बॉटल, वहया, पेन, कंपास त्याच बरोबर इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

      यावेळी पालकमंत्री आबिटकर प्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरपंचपद आरक्षण सोडत आज

  आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     २३ जून २०२५ रोजी च्या शासनाच्या सुधारित आदेशानुसार आजरा तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींकरता सरपंच पदाचे आरक्षण सोडत सकाळी ११ वाजता प्रशासकीय इमारतीमध्ये काढण्यात येणार आहे.

       ग्रामपंचायतींच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी यापूर्वी जाहीर झालेल्या २३ पैकी २०१० ते आजतागायत नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता राखीव न राहिलेल्या ग्रामपंचायतींमधून एका ग्रामपंचायती करिता नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण सोडत निघणार असल्याचे समजते.

      पेरणोली, बहिरेवाडी खानापूरसह मोजक्या ग्रामपंचायतींचा विचार…?

      नागरिकांचा मागास प्रवर्ग याकरिता गेली पंधरा वर्षे पेरणोली, बहिरेवाडीसह खानापूर ग्रामपंचायतींचे सरपंच पद आरक्षित झालेले नव्हते. यामुळे यापैकी एखाद्या ग्रामपंचायतीचे सरपंच पद नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता आरक्षित होण्याची शक्यता आहे. अशी इतर मोजकी गावे शोधून सोडत होण्याची शक्यता आहे. इतर आरक्षणावर कोणताही परिणाम होईल असे दिसत नाही.

   आजरा कारखान्यामध्ये विद्युत सुरक्षा सप्ताह उत्साहात

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      वसंतराव देसाई आजरा तालुका सहकारी साखर कारखान्यामध्ये विद्युत सुरक्षा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.

     यावेळी उपस्थित कर्मचारी व अधिकारी यांना विद्युत सुरक्षा कशाप्रकारे घ्यावी. याची सविस्तर माहिती देण्यात आली.
उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेची शपथ सेफ्टी ऑफिसर रमेश देसाई यांनी दिली. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. के. सावंत, जनरल मॅनेजर टेक्निकल एम. आर. पाटील, लेबर ऑफिसर सुभाष भादवणकर, इलेक्ट्रिक इंजिनियर आनंदा वडवळेकर, सर्व उपखाते प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री सडक योजनेच्या बंधाऱ्या नजीकच्या रस्त्याला भगदाड…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे आजरा तालुक्यातील सर्वच बंधारे पाण्याखाली केले होते . पावसाचा जोर कमी होताच बंधारे पुन्हा खुले झाले आहेत.
परंतु अनेक बंधाऱ्यांची दुर्दशा झाली आहे. आजरा – कोवाडे मार्गावरील हाजगोळी बंधाऱ्याला रस्त्याखालील भराव खचल्याने भले मोठे भगदाड पडले असून मुख्यमंत्री सडक योजनेतून तयार करण्यात आलेल्या या रस्त्याचा दर्जा स्पष्ट झाला आहे.

      रस्ता वाहतुकीकरता धोकादायक बनल्याने या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे.

निवड…

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      अखिल भारतीय ग्राहक पंचायत कोल्हापूरच्या कार्यकारणी सदस्यपदी खेडे ता. आजरा येथील रामदास अनंत चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. यापुर्वी रामदास चव्हाण हे आजरा तालुका कार्यकारणी अध्यक्ष होते.

     कोल्हापूर येथे शनिवारी झालेल्या प्रांत सदस्य बैठकीत निवड करण्यात आली.

छायावृत्त…

       आजरा शहरातील सर्वात जुनी शाळा असणाऱ्या कुमार भवनच्या प्रवेशद्वारावरच चिखलाचे साम्राज्य पसरले असून येथून ये – जा करताना शिक्षक वर्गासह विद्यार्थी व पालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

पाऊस पाणी...

      आजरा तालुक्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढला असून काल सोमवारी पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. मंगळवारी पहाटेपर्यंत पाऊस सुरूच होता. पावसामुळे चित्री व आंबे ओहोळ प्रकल्पातील पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ होत आहे. सर्फनाला  प्रकल्प पूर्ण क्षमतेने यापूर्वीच भरला आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!