गुरूवार
दि.२९ ऑक्टोबर २०२६

पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या विजयाचा आजऱ्यात जल्लोष

आजरा : प्रतिनिधी
विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील पुणे मतदारसंघासह तीन जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवल्याबद्दल आजरा येथे आघाडीच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला.
पुणे, नाशिक आणि नागपूर या तिन्ही पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. आजरा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी कार्यकर्त्यांनी एकत्र येत घोषणा देत आनंद साजरा केला.
यावेळी विक्रम देसाई, संजयभाऊ सावंत, रवी भाटले, अमित सामंत, जॉन फर्नांडिस, वकीब खेडेकर यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आजऱ्यात फायनान्स कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांकडून १०.६२ लाखांचा अपहार…
आजरा पोलिसांत गुन्हा दाखल
आजरा : प्रतिनिधी
आजरा येथील भारत फायनान्स इन्क्ल्युजन लिमिटेड कंपनीच्या शाखेत कर्जदारांकडून कर्जफेडीपोटी जमा केलेली रक्कम कंपनीत भरता स्वतःकडे ठेवून १० लाख ६२ हजार ४५ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी चार कर्मचाऱ्यांविरोधात आजरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण ४७ सदस्य तथा कर्जदारांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांत दाखल नोंदीनुसार, भारत फायनान्स इन्क्ल्युजन लिमिटेड कंपनीची शाखा आजऱ्यातील समर्थ कॉलनी येथे आहे. या शाखेतील कर्मचाऱ्यांनी १० एप्रिल २०२४ ते २६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत कर्जदारांकडून कर्जफेडीची रक्कम स्वीकारली. मात्र, संबंधित रक्कम कंपनीत जमा न करता स्वतःकडे ठेवल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात प्रथमेश विजय कुंभार (वय २६)प्लॉट नंबर ९३, ई वॉर्ड, माया निवास, संत गोरा कुंभार वस्ती, वसंत बापट कॅम्प, कोल्हापूर, ज्ञानेश्वर जगन्नाथ पवार (वय २५रा. खरसोळी, पोस्ट फुलचिंचोली, ता. व जि. सोलापुर), साहिल संजय लोखंडे (वय २२ रा. कोळींद्रे, ता. आजरा, जि. कोल्हापूर) आणि पंकज संजय तेलशींग (वय २८ रा. गणपती मंदीर जवळ कुपवाड MIDC, एरिया सांगली, जि. सांगली) या चार कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंद झाला आहे. संबंधित कर्मचारी कंपनीत फिल्ड असिस्टंट आणि ब्रँच मॅनेजर या पदांवर कार्यरत असल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे. यापैकी दोघांना अटक करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, संबंधित कालावधीत ४७ कर्जदारांकडून कर्जफेडीच्या स्वरूपात एकूण १० लाख ६२ हजार ४५ रुपये स्वीकारण्यात आले. ही रक्कम कंपनीच्या शाखेत जमा न करता तिचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम ३१४, ३१६(५) आणि ३१८(४) अन्वये नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार करीत आहेत. कर्जदारांकडून स्वीकारलेल्या रकमेचा अपहार झाल्याच्या आरोपामुळे परिसरात चर्चा सुरू असून, तपासातून या प्रकरणातील पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत.

ऊसदरासाठी आंदोलनाची व्याप्ती वाढवणार : राजू शेट्टी
गावोगावी ऊस वाहने अडविण्याचा इशारा.

उत्तूर : प्रतिनिधी
ऊसाला योग्य दर मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. कारखाने सुरू करण्यापूर्वी ऊसदर जाहीर का केला नाही? शेतकऱ्यांनी आपल्या उसाचा दर विचारणे हा त्यांचा अधिकार आहे, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला. ऊसदरासाठी आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यात येणार असून, गावोगावी चौकात ऊस वाहने अडविण्याचा इशाराही त्यांनी दिला. धामणे (ता. आजरा) येथे जनजागृती रॅलीच्या सांगता सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सदानंद व्हनबट्टे होते.गेल्या दीड महिन्यापासून ऊसदरासाठी आंदोलन सुरू आहे. साखर उत्पादनातील रिकव्हरीचा हिशेब पारदर्शकपणे दाखविला जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करत ऊसदर, काटामारी आणि रिकव्हरीची केंद्रस्तरीय समितीमार्फत शहानिशा करण्यात येणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. ऊस वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांच्या माथी का मारला जातो, असा सवाल करत योग्य दर मिळेपर्यंत शेतकऱ्यांनी कारखान्यांना ऊस घालू नये, असे आवाहन त्यांनी केले. कारखाने सुरू ठेवण्यासाठी कर्मचारी व हितसंबंधितांच्या माध्यमातून ऊस पाठविण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. शेतकऱ्यांनी संयम राखावा, असे आवाहन करत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी २९ ऑक्टोबर रोजी दुपारी बैठकीसाठी बोलावल्याची माहिती त्यांनी दिली.
सभेपूर्वी पाटणे फाटा ते धामणे येथील संताजी घोरपडे साखर कारखाना परिसरापर्यंत जनजागृती रॅली काढण्यात आली.
उत्तूरमध्ये रॅलीचे स्वागत करण्यात आले. सभेत राजेंद्र गड्यान्नावर व तानाजी देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. महादेव पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी धोंडिराम सावंत, धनाजी उत्तूरकर, सुरेश राजाराम, एम. डी. सावंत, व्यंकटेश मुळीक, प्रशांत पोतदार, पराग देशमाने, मुकुंद पाटील, बाळासाहेब सावंत, राजू देशपांडे, सागर सरोळकर, राजू पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उत्तूरमधील प्रवाशांच्या गर्दीसाठी आजरा आगाराचे नियोजन…
ग्रामस्थांच्या मागणीला यश, पाच नव्या बसफेऱ्यांचे नियोजन

उत्तूर : प्रतिनिधी
उत्तूर हे २२ खेड्यांचे मध्यवर्ती ठिकाण असून व्यापार, वैद्यकीय सेवा आणि शिक्षणासाठी येथे दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन बसफेऱ्यांचे नियोजन करण्याची मागणी ग्रामस्थांनी गावसभेत आजरा आगारप्रमुखांकडे केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आगाराने विविध मार्गांवर बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे.
त्यानुसार सकाळी ६.१५ वाजता कोल्हापूर, दुपारी २.४५ वाजता गारगोटी, सायंकाळी ४.४५ वाजता आजरा, कोल्हापूर आजरा ११ . oo ,सायंकाळी ६.१५ वाजता मुरगूड आणि सकाळी ८.५० वाजता आजरा या वेळेत बससेवा सुरू करण्यात आली आहे.
या बसफेऱ्यांमुळे उत्तूरसह परिसरातील २२ गावांतील विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार आणि वैद्यकीय कामासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांची सोय होणार आहे. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी आजरा आगाराने केलेल्या या नियोजनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आगारप्रमुख पृथ्वीराज यांनी केले आहे आहे.
गाड्यांच्या नियोजनाबाबत आजरा आगार येथील अधिकाऱ्यांना निवेदन देताना सरपंच किरणआमनगी व ग्रामपंचायत अधिकारी सचिन ऐसादे ग्रामपंचायतच्या प्रस्तावानुसार आगार प्रमुखांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन नियोजन केले

जनता सहकारी गृहतारण संस्थेमार्फत CBS बँकींग बाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन शिबीर प्रशिक्षण

आजरा : प्रतिनिधी
जनता सहकारी गृहतारण संस्थेच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या ‘CBS बँकिंग’ (Core Banking Solution) या आधुनिक कार्यप्रणालीबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे चेअरमन श्री. मारूती मोरे यांनी सर्व उपस्थितांचे सहर्ष स्वागत केले व प्रास्ताविकातून या प्रशिक्षण शिबीरामागील उद्देश स्पष्ट केला. आधुनिक बँकेच्या कामकाजात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि ग्राहकांना जलद व पारदर्शक सेवा देण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात नमूद केले.
या प्रशिक्षण शिबिरात ‘कॉम्पसर्व्ह’ संगणक प्रशिक्षण संस्थेचे डायरेक्टर श्री. सुदाम पाटील तसेच त्यांचे सहकारी श्री. वसिम मनगोळे यांनी उपस्थितांना CBS कार्यप्रणालीविषयी सखोल आणि उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. CBS प्रणालीचा दैनंदिन बँकिंग कामकाजात कसा प्रभावीपणे वापर करावा, याविषयीचे प्रात्यक्षिक व तंत्रज्ञानाशी निगडित विविध पैलू त्यांनी सोप्या भाषेत कर्मचाऱ्यांना समजावून सांगितले.
या कार्यक्रमाचे आभार संस्थेचे मॅनेजर श्री. मधुकर खवरे यांनी मानले. या शिबिरास संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. मारुती कुंभार यांच्यासह सर्व शाखांचे शाखाधिकारी व कर्मचारी
उपस्थित होते. संपूर्ण शिबीर अतिशय उत्साहवर्धक व माहितीपूर्ण वातावरणात पार पडले.

विधान परिषद निवडणूक निकालाचे गणित बदलले…
महाविकास आघाडीचा तीन जागांवर झेंडा
विशेष प्रतिनिधी…
अत्यंत अतितटीने पार पडलेल्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या चुरशीच्या लढतीत काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजीत वंजारी यांनी भाजपचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांना पराभूत केल्याने महाविकास आघाडीच्या पदरात तिसरी जागा पडली आहे. छत्रपती संभाजी नगर येथील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. प्रतापसिंह पाटील, पुणे पदवीधर मतदारसंघातील हर्षदा देशमुख जाधव अशा तीन जागांवर महाविकास आघाडीने आपला झेंडा फडकवला आहे.
महायुतीला पुणे शिक्षक मतदार संघातील कौस्तुभ गावडे या भाजपाच्या तर अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातून शिंदेसेनेचे किरण सरनाईक अशा दोनच जागांवर समाधान मानावे लागले आहे.

आजचे पंचांग
दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
वार : गुरुवार
माह (अमावस्यांत) : आश्विन
माह (पूर्णिमांत) : कार्तिक
ऋतु : हेमंत
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : चतुर्थी तिथी (रात्री १०.०९ पर्यंत) त्यानंतर पंचमी तिथी
नक्षत्र : रोहिणी नक्षत्र (सकाळी ११.११ पर्यंत) त्यानंतर मृगशीर्ष नक्षत्र
योग : परिघ योग (३० ऑक्टोबर रात्री १२.०५ पर्यंत) त्यानंतर शिवा योग
करण : भाव करण (सकाळी ११.३७ पर्यंत) त्यानंतर बलवा करण
चंद्र राशी : वृषभ राशी (रात्री १०.०६ पर्यंत) त्यानंतर मिथुन राशी
सूर्य राशी : तूळ राशी
अशुभ मुहूर्त :
राहु काळ : दुपारी ०१.४८ ते दुपारी ०३.१४ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : सकाळी ११.५९ ते दुपारी १२.४५
सूर्योदय : सकाळी ०६.३९
सूर्यास्त : सायंकाळी ०६.०५
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत
आजरा तालुक्यात पारा घसरला… थंडीची चाहूल

आजरा : प्रतिनिधी
गेल्या चार दिवसांपासून आजरा तालुक्यात तापमानात कमालीची घट झाली असून थंडीची चाहूल लागली आहे.
सकाळी धुके आणि गार वारा, तर सायंकाळनंतर थंडीचा कडाका वाढल्याने बाजारपेठेत शुकशुकाट जाणवू लागला आहे. नागरिकांनी स्वेटर, शाली बाहेर काढल्या आहेत.
या बदलत्या वातावरणाचा परिणाम शेती पिकांवर आणि आरोग्यावरही जाणवत असून सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांची संख्या घटली असून चहा टपऱ्यांवर गर्दी वाढली आहे. अजून थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
(छाया : सचिन सटाळे )
निधन वार्ता
सुशीला देसाई
आजरा महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक श्री मनोज हणमंतराव देसाई यांच्या मातोश्री श्रीमती सुशीला हणमंतराव देसाई यांचे दिनांक २७ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.निधन समयी त्या ८६ वर्षांच्या होत्या.
त्यांच्या पश्चात मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.
महादेव कुंभार

पेठेवाडी ता.आजरा येथील सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक महादेव हणमंत कुंभार ( वय ७६ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
