
वाहनावर खेळ महागात पडला…
चिमूरड्याचा जीव गेला…

आजरा:प्रतिनिधी
मोठ्या व्यक्तींचे ड्रायव्हिंगचे अनुकरण अनेकदा लहान मुले करत असतात. बंद गाडीवर व गाड्यांजवळ खेळणे हा त्यांचा आवडीचा छंद. हा छंद वाटंगी येथील एका तीन वर्षीय बालकाच्या जीवाशी आला. अंगावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने दारातच या बालकाचा मृत्यू झाला.
मंगळवारी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास अविनाश आनंदा मलगोंडे रा. वाटंगी ता. आजरा यांनी आपला सोनालीका ट्रॅक्टर नं. (MH09-FV-0175) हा शेडच्या चढ़ावाला लावला होता. घरातील लहान मुले ट्रॅक्टरवर व आजूबाजूला खेळत होती. ट्रॅक्टर अचानकपणे न्यूट्रल होऊन पाठिमागील चाकाजवळ खेळत असलेल्या सम्राट दयानंद मलगोंडे या तीन वर्षीय बालकाच्या डोक्यावरुन गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
या अपघाताची नोंद आजरा पोलिसात झाली आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.
सभासदांच्या विश्वासाचा विजय:सुधीर देसाई

आजरा:प्रतिनिधी
आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत मिळालेले घवघवीत यश हे कार्यकर्त्यांचे सामूहिक प्रयत्न व सभासदांनी दाखवलेला विश्वास याचे यश आहे अशी प्रतिक्रिया श्री रवळनाथ विकास आघाडीच्या विजयानंतर बोलताना आघाडीचे प्रमुख जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांनी दिली.
यावेळी देसाई म्हणाले, सत्ता कोणाचीही येऊ दे पण ती एकतर्फी असावी अशी आपली सुरुवातीपासून भूमिका होती. सुदैवाने सभासदांनी आपला कौल राष्ट्रवादीच्या
बाजूने दिला आहे. कारखान्याची सद्यस्थिती सर्वांना माहीत आहे. अनेक आव्हाने कारखान्यासमोर आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील माजी आमदार के. पी. पाटील यांनी राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून कारखाना सुस्थितीत आणण्याकरता मदतीचे आश्वासन दिले आहे. कारखान्यामध्ये रवळनाथ विकास आघाडीच्या पाठीशी या मंडळींसह गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे, भाजपाचे संग्रामसिंह कुपेकर, माजी संचालक दिगंबर देसाई कारखान्याची जुनी जाणती संचालक मंडळी, कर्मचारी व सभासद, चंदगड, आजरा गडहिंग्लज तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांनी केलेले सहकार्य यामुळे आपणाला विजयापर्यंत जाता आले.
सभासदांनी दिलेल्या या कौलामुळे निवडून आलेल्या मंडळींची जबाबदारी निश्चितच वाढली आहे. ज्येष्ठ नेते मंडळी, तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष मुकुंददादा देसाई, नूतन सर्व संचालक यांचे मार्गदर्शन व सहकार्याने सभासद व ऊस उत्पादकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा निश्चित प्रयत्न राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.

५१ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे गवसे येथे दिमाखात उद्घाटन

आजरा: प्रतिनिधी
आजरा तालुस्तरीय विज्ञान प्रदर्शन येथील बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल, गवसे येथे आयोजित करण्यात आले असून त्याचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जनता एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अशोकआण्णा चराटी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अर्जुन आबिटकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विज्ञान दिंडी व दिपप्रज्वलनाने झाले. यावेळी विविध कक्षाचे उद्घाटन मान्यवरांच्या संपन्न झाले.
विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीला चालना देण्याच्या दृष्टीने विज्ञान प्रदर्शने ही काळाची गरज आहे. यातूनच पुढे भविष्यात चांगले वैज्ञानिक घडतील असा विश्वास यावेळी प्राचार्य अर्जुन आबीटकर यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने राबवल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमांना आपले सहकार्य राहील असे आश्वासन यावेळी अशोकअण्णा चलाखी यांनी दिले.
सदर कार्यक्रमास गट शिक्षणाधिकारी श्री. शरद मगर, आजरा अर्बन बँकेचे चेअरमन श्री. रमेशआण्णा करुणकर, विस्तार अधिकारी विलास पाटील, गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव, पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेट्ये, सर्व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, प्राथमिक माध्यमिक- विभागाचे विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक, मुख्याध्यापक पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक चंद्रकांत घुणे यांनी केले तर सुत्रसंचलन अनिल कांबळे यांनी केले. आभार संतोष कालेकर यांनी मानले.
दर्गा गल्ली येथील विहीर दुरुस्तीची मागणी

आजरा:प्रतिनिधी
दर्गा गल्ली,आजरा येथील तकीलदार वस्तीत जुनी विहीर असून सदर विहीर ढासळली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे.
अंदाजे १९४०-५०च्या दशकातील ही विहीर असून या विहिरीचे सुमारे ३००ते ३५० लोक पिण्यासाठी पाणी वापरत आहेत, त्याचप्रमाणे सध्या नळ पाणीपुरवठ्यास एक दिवस आड पाणी येत असल्यामुळे येथील लोकांना याच विहिरीचा आधार आहे.
ही विहीर ढासळल्यामुळे पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून ही विहीर तातडीने दुरुस्त करून द्यावी अशा मागणीचे निवेदन शिवसेना (उद्धव ठाकरे गट)चे कार्यकर्ते रेहान तकीलदार यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीला दिले आहे.
यावेळी शिवसेनेचे शम्स तकीलदार, बाबाजान तकीलदार, परवेज तकीलदार, मोईन तकीलदार,तोहीद तकीलदार,सुशील लतीफ, मजीद तकीलदार, इ कार्यकर्ते उपस्थित होते.



