


सुधीरभाऊंनी नियोजनबद्धरीत्या केला विरोधकांचा ‘ करेक्ट कार्यक्रम ‘

ज्योतिप्रसाद सावंत
आजरा साखर कारखाना निवडणुकीत ऐनवेळी आघाडीची स्थापना करून बिनविरोधची औपचारिकता शिल्लक असताना निवडणूक बिनविरोध झाली असे समजून गाफील राहणाऱ्या विरोधकांना राष्ट्रवादीने घसघशीत विजय मिळवून चांगलीच चपराक दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून एकत्र आलेल्या सर्वपक्षीयांचा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई यांच्या साथीने ‘ करेक्ट कार्यक्रम ‘ करण्यात जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यशस्वी झाले. राजकारणात सुधीर देसाई यांना आलेली समज यामुळे निश्चितच आधोरेखित झाली आहे. जिल्हा बँक, तालुका खरेदी विक्री संघानंतर आजरा साखर कारखान्यासारख्या शिखर संस्थेत राष्ट्रवादीने आपला झेंडा फडकवल्याने तालुक्यातील राष्ट्रवादीला उभारी आली तर आश्चर्य वाटू नये.
बिनविरोधच्या पार्श्वभूमीवर ठराविक जागांचा मागणी प्रस्ताव नेत्यांसमोर ठेवणे,त्यानंतर जागा कमी आहेत असे सांगून बिनविरोधच्या प्रक्रियेतून बाहेर पडणे आणि विरोधकांची पॅनल रचना जाहीर झाल्यानंतर नेत्यांचे मतपरिवर्तन करून स्वतःची स्वतंत्र आघाडी तयार करून राष्ट्रवादीच्या लेबलवर सभासदांसमोर आणणे व ती विजयापर्यंत येणे या सर्व गोष्टी निश्चितच सोप्या नव्हत्या.
शिंपी-चराटी गट, राष्ट्रीय काँग्रेस, भाजपा, शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र आल्याने विरोधक मंडळींचा आत्मविश्वास निश्चितच वाढला होता. सहजपणे आपण निवडणूक खिशात घालू अशा भावनेने विरोधक वावरत होते.समोर मुकुंद दादा देसाई, सुधीर देसाई ही मंडळी दिसत असल्याने निवडणूक प्रक्रियेची औपचारिकता व विजय यांची केवळ घोषणा बाकी असल्याची विधाने विरोधकांकडून केली जात होती. पण मुकुंददादा आणि सुधीर देसाई यांच्या पाठीमागे मंत्री मुश्रीफ, आमदार राजेश पाटील व माजी आमदार के. पी. पाटील यांची ताकद आहे हे सोयीस्कररित्या विसरल्याची जाणीव होत होती.
जिल्हा बँकेप्रमाणे एकीकडे स्थानिक सूत्रे आपल्या हातात घेऊन दुसरीकडे ही लढत राष्ट्रवादीची जिल्हास्तरीय नेते व विरोधक अशी असल्याचे वातावरण तयार करण्यात देसाई यांना यश आले. यामुळेच विरोधकांची राजकीय समीकरणे विस्कटू लागली. बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत आलेला अनुभव पाठीशी असल्याने मंत्री मुश्रीफ विरोधी जिल्ह्यातील नेते मंडळींनी ‘आजरा’च्या रणांगणात थेट उतरण्याचे टाळले. परिणामी एकीकडे मंत्री मुश्रीफ यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघातील उत्तूर विभागामध्ये कार्यकर्त्यांना रिचार्ज करण्यास सुरुवात केली असताना दुसरीकडे विरोधी आघाडीला जिल्हास्तरीय चेहराच राहिला नाही. बहुतांशी नेत्यांनी विरोधी आघाडीचा प्रचाराकडे पाठ फिरवल्याने ते एखादी मोठी सभा घेऊ शकले नाहीत. मंत्री मुश्रीफ व आमदार राजेश पाटील यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद निश्चितच धक्कादायक निकालाचे संकेत देत होता. ‘ देणार तर संपूर्ण सत्ता आमच्या ताब्यात द्या अन्यथा आम्हाला सत्तेची गरज नाही…’ काहीशी अशीच भूमिका मंत्री मुश्रीफ यांनी जाहीर सभांमधून सभासदांसमोर मांडण्यास सुरुवात केली होती. जिल्हा बँकेच्या मदतीशिवाय कारखाना चालू राहणार नाही हे सभासदांना पटवून देणार ते यशस्वी ठरले.
एकीकडे मंत्री मुश्रीफ हे वैयक्तिक टीका टाळत भाषणबाजी करत असताना दुसरीकडे के. पी. पाटील व विष्णुपंत केसरकर यांनी मात्र विरोधकांवर टीकेची झोड उठवली. त्यांना दिगंबर देसाई यांचीही नेटकी साथ लाभली. गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे, संग्रामसिंह कुपेकर यांनी सभांना लावलेली हजेरी, विक्रम देसाई, अनिकेत कवळेकर, आबुताहेर तकिलदार,रशीद पठाण, देवदास बोलके, अमित सामंत आदींनी दुसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पडद्याआडून हलवलेली सूत्रे राष्ट्रवादी आघाडीच्या पथ्यावर पडली.
उत्तूर भागातून उमेश आपटे यांच्यासारखा खंदा मोहरा आपल्या सोबत आहे त्यामुळे उत्तूर भागातील मतांची पोकळी भरून काढण्यात यश मिळणार, पश्चिम भागात शिंपी -चराटी गटाचे वजन आहे, तर पूर्व भागात स्वतः गोकुळच्या संचालिका अंजनाताई, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विद्यमान अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे या उमेदवार असल्याने काहीच अडचण नाही अशी साधी सोपी व सरळ गणिते विरोधकांकडे होती. प्रत्यक्षात मतपेट्या उघडल्यानंतर मात्र ही गणिते केवळ कागदावरच होती हे स्पष्ट झाले. विरोधकांच्या अति आत्मविश्वासामुळे संपूर्ण पॅनलला गटांगळ्या खाव्या लागल्या. सरासरी एक हजार मतांच्या फरकाने विरोधी पॅनल पराभूत झाले.
शिंपी-चराटी एकत्र आल्यानंतर झालेल्या सलग तिसऱ्या निवडणुकीमध्ये या गटांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्ते आता या युतीचे फायदे-तोटे याची चर्चा करू लागले आहेत. कारखाना निवडणुकीचे पडसाद आगामी नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका यावर निश्चितच होणार आहेत. कारखान्याच्या विजयामुळे राष्ट्रवादीच्या बऱ्यापैकी कार्यकर्त्यांना चांगली संधी मिळाली आहे. तर दुसरीकडे शिंपी-चराटी यांना कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्याबरोबरच गटांची नव्याने बांधणी करण्याचे आव्हान राहणार आहे.
एकंदर सुधीर देसाई यांनी राजकीय मुत्सद्दीपणा दाखवत केलेली खेळी यशस्वी झाली असल्याने विरोधकांना अनेक प्रश्नांना भविष्यात सामोरे जावे लागणार आहे.
उमेदवार एका आघाडीचे… तर मताधिक्य दुसऱ्या आघाडीला
निवडणुकीमध्ये झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहता उमेदवार एका आघाडीचे तर मताधिक्य दुसऱ्या आघाडीला असे प्रकार बऱ्याच ठिकाणी घडल्याचे दिसत होते. मलिग्रे येथे चाळोबा देव विकास आघाडीचे दोन उमेदवार असताना या गावातून विरोधी विकास आघाडीला मताधिक्य मिळाले तर पोळगाव येथे रवळनाथ विकास आघाडीचे दोन उमेदवार असताना येथून चाळोबादेव विकास आघाडीला मताधिक्य मिळाले. हीच परिस्थिती सरंबळवाडी येथे घडली.
हरिभाऊंचा विजय कौतुकास्पद
अनुसूचित जाती जमाती गटातून हरिबा कांबळे यांनी पंचायत समितीचे माजी उपसभापती व कारखान्याचे विद्यमान संचालक भाजपाचे जेष्ठ नेते मलीककुमार बुरुड यांना अनपेक्षितरित्या धक्का दिला. तब्बल एक हजार मतांनी त्यांनी विजय मिळवला.




राष्ट्रीय महामार्ग संकेश्वर – बांदा वरील खड्डे भरणे व इतर मागण्या मान्य

आजरा:प्रतिनिधी
बुधवार दिनांक २० डिसेंबर रोजी आजरा तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आलेल्या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग ठेकेदार यांनी आजरा MIDC ते मडीलगे मार्गावरील खड्डे येत्या आठवड्यात भरून रोज तीन ते चार वेळा रस्त्यावरील धुळ उडून वाहतुकीस अडचण होऊ नये यासाठी टँकरने पाणी मारण्याचे देखील मान्य केले.
त्याचसोबत सध्या महामार्गावरील गटारीच्या कामामुळे जी नळपाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन तोडली गेली ती पुन्हा नव्याने जोडून पिण्याचे पाणी पुरवठा सुरळित करण्याचे आजरा नगरपंचायत व महामार्ग प्रशासन यांनी मान्य केले.
गेल्या २०० वर्षापासूनची जी जुनी झाडे तोडली गेली आहे त्याबदल्यात पुन्हा नव्याने स्थानिक प्रजातीची झाडे (आंबा,वड,पिंपळ इ) लावण्याची मागणी आजरेकर रहिवाशांनी केली.तसेच आजरा कचरा डेपोमध्ये लावण्यात येत असलेल्या आगीमुळे गांधीनगर मधील रहिवासी व ग्रामीण रुग्णालय यांना होणारा त्रास कसा कमी करता येईल ही मागणी नगरपंचायत प्रशासन यांनी मान्य केली.
यावेळी आजरा तहसीलदार श्री.समिर माने, महामार्गाचे प्रदिप पाटील,पोलीस उपनिरीक्षक श्री.कुमार ढेरे व नगरपंचायत अधिकारी राकेश चौगुले, निवासी तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, यांसोबत आजरा अन्याय निवारण संघाचे अध्यक्ष परशुराम बामणे (भाऊजी),ऍड.शैलेश देशपांडे, प्रभाकर कोरवी, नाथ देसाई, सुधिर कुंभार,गौरव देशपांडे,संदीप पारळे,सी.डी.सरदेसाई, विजय थोरवत,राजेश विभूते,अभिषेक रोडगी, प्रशांत गजरे,रौनक कारेकर,महेश दळवी, अर्जुन भुइंबर, सदानंद रोडगी, अभि गोवेकर,गुरु गोवेकर,वाय.बी.चव्हाण, समीर चांद, समीर तकिलदार, समीर मोरजकर,दयानंद भोपळे, सुशिल लतिफ, अरुण नाईक, गणपतराव डोंगरे, तळेवाडीकर, दिनकर जाधव, दत्तात्रय मोहिते नौशाद बुड्डेखान,आकाश शिंदे,सलीम लतीफ व आजरेकर रहिवासी उपस्थित होते.
घसा व श्वसन विकारामुळे दवाखाने फुल्ल
शहरामध्ये सर्वत्र धूळ व खड्ड्यांचे साम्राज्य आहे. यामुळे रस्त्यावरून चालताना या धुळीचा वयोवृद्धांसह लहान मुलांना प्रचंड त्रास होत आहे. याचा परिणाम म्हणून गेल्या चार महिन्यांमध्ये घसा व श्वसनाच्या विकारात वाढ झाली आहे. अनेक रुग्ण यावर रुग्णालयात उपचार घेताना दिसत असून या आजाराच्या रुग्णांनी दवाखाने भरू लागले आहेत असे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
धोकादायक ऊस वाहतूकीवर कारवाईची गरज
सध्या ऊस वाहतूक करणारी वाहने या मार्गावर वाढली असून क्षमतेपेक्षा जादा ऊस वाहतूक करणे, ट्रॅक्टरमध्ये मोठ्या आवाजाने स्पीकर लावणे, मागील बाजूस रिफ्लेक्टर नसणे अशा गोष्टी सर्रास दिसत आहेत. अशा वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली.
नगरपंचायतीच्या रस्ते कामांचा दर्जा तपासा
नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरांमध्ये झालेल्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा तपासण्याची गरज आहे. अतिशय निकृष्ट पद्धतीने सदर रस्त्यांचे कामे सुरू असून नगरपंचायत प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप यावेळी सुधीर कुंभार यांनी केला.



लक्षणे वेळीच दिसत नसल्याने एड्स हा सायलेंट किलर आजार : डॉ. पद्मजा गावडे

आजरा:प्रतिनिधी
राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स समज आणि गैरसमज या विषयावर डॉ. पद्मजा गावडे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे होते.
याप्रसंगी बोलताना डॉ. गावडे म्हणाल्या, एचआयव्ही एड्स सारख्या रोगावर खुलेपणाने बोलले पाहिजे पण आपण बोलत नाही. एच.आय.व्ही. झाल्यानंतर व्यक्तीच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंब समाजावर त्याचा परिणाम होत असतो. एच. आय. व्ही. एड्सच्या सुरुवातीला फारशी लक्षणे दिसत नसल्याने या आजाराकडे दुर्लक्ष होते. परिणामी लवकर निदान व उपचार करणे कठीण होऊन जाते. म्हणूनच याला सायलेंट किलर म्हणून सुद्धा समजले जाते. सामाजिक दृष्ट्या वाईट समजले जाते. संसर्ग झालेल्या व्यक्तीबरोबर भेदभाव ही केला जातो. एचआयव्ही एड्स पूर्णपणे बरा होत नसला तरी योग्य औषध उपचार करून रूग्ण तीस ते पस्तीस वर्षे सुदृढ जीवन जगू शकतो.
या आजारामध्ये मनुष्याची प्रतिकार क्षमता कमी होते तेव्हा त्याला इतर आजार होतात. बाधित व्यक्तीला क्षयरोग होण्याची शक्यता जास्त असते.एच.आय.व्ही. चार मार्गाने होतो एका व्यक्तीचे अनेक व्यक्तीशी असुरक्षित लैंगिक संबंध आल्याने, निर्जंतुकीकरण न केलेल्या दूषित इंजेक्शन केल्याने, एचआयव्ही बाधित मातेकडून होणाऱ्या बाळाला. तथापि योग्य औषध उपचार करून जन्माला येणाऱ्या बाळाला एड्स पासून वाचवता येते.
एका ताटात जेवणे, एका ग्लासात पाणी पिणे, आलिंगन देणे, संडास -बाथरूम शेअर करणे, एकमेकांचे कपडे वापरणे यामुळे एड्स होत नाही. एच.आय.व्ही. बाधित प्रत्येक व्यक्ती एड्स पर्यंत पोहोचतोच असं नाही.
प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे होते. त्यांनी
अध्यक्षीय मनोगतात एचआयव्ही एड्स बाबतीत असलेले समाज गैरसमज दूर करण्याची आवश्यकता व्यक्त केली.
उपस्थिततांचे स्वागत प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. रणजित पवार यांनी केले आभार विठ्ठल हाके यांनी मानले.सूत्रसंचलन डॉ. अविनाश वर्धन यांनी केले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थी महाविद्यालयातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




