mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शनिवार  दिनांक ३ मे २०२५       

मिरवणुकीत मारामारी एक जखमी…
तिघां विरोधात गुन्हा नोंद

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      शिवजयंती मिरवणुकीत नाचताना धक्का लागण्याच्या कारणावरून पार्थ विजय कांबळे (रा. गांधीनगर ता. आजरा ) या तरुणाच्या डोक्यात हातातील कडे घालून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याबाबत पार्थ याने दिलेल्या फिर्यादीवरून संदेश शशिकांत कांबळे, श्रावण परसु कांबळे, सुरज संजय पाटील (सर्व रा. गांधीनगर,आजरा ) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

     आजरा येथील छञपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सुरू असणाऱ्या मिरवणुकीत नाचत असताना संदेश याला पार्थचा धक्का लागला. त्यावेळी संदेश याने मला तु धक्का का मारलास असे म्हणुन शिवीगाळ करत श्रावण व सुरज यांना तेथे बोलावुन घेतले. ते आल्यानंतर तिघांनी पार्थ याला आजरा बस स्टॅंड येथे बोलावुन घेतले व तुला सोडणार नाही. तुझे घर पेटवणार अशी धमकी देत हाताने व लाथाबुक्यानीं मारहाण केली. दरम्यान सुरज याने त्याचे हातातील कडे पार्थ याच्या डोक्यात मारुन त्याला जखमी केले‌.

       पोलीस पुढील तपास करीत आहेत.

चारचाकी पलटी…

चौघे जखमी…

एक गंभीर

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजरा – गडहिंग्लज मार्गावर सुलगाव फाट्यानजिक चार चाकी पलटी होऊन झालेल्या अपघातात हिरलगे येथील चौघे जखमी झाले असून त्यापैकी ऋषिकेश पुंडलिक शिंदे या १३ वर्षीय मुलाची प्रकृती गंभीर आहे.

       आज-याहून हिरलगेच्या दिशेने जाणारी वॅगन आर गाडी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास सुलगाव फाट्यावर आली असता रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडीमध्ये जाऊन पलटी झाली. यामध्ये विनायक मनोहर शिंदे, मंगल पुंडलिक शिंदे व रुद्र पुंडलिक शिंदे यांच्यासह ऋषिकेश पुंडलीक शिंदे असे चौघेजण जखमी झाले. यापैकी ऋषिकेश याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला गडहिंग्लज येथे उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले असल्याचे आजरा ग्रामीण रुग्णालयातून सांगण्यात आले. तर इतरांवर प्राथमिक उपचार आजरा ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.

आजऱ्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणार

नगरपंचायत प्रशासनाकडून माहीती

शिवसेना पदाधिकाऱ्यासोबत तहसीलमध्ये बैठक

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा शहरातील सांडपाणी नदीपात्रात मिसळू नये म्हणून नगरपंचायतीकडून कार्यवाही केली जात आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा प्रकल्पाला मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे यावर कायम स्वरुपी ठोस उपाययोजना करण्यावर नगरपंचायत प्रशासनाचा भर आहे. असे आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांनी सांगीतले.

      नगरपंचायत प्रशासनासोबत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची तहसीलदार कार्यालयात बैठक झाली. सांडपाणी व शहरात खोदलेले रस्ते यावर चर्चा झाली. भुदरगडचे उपविभागीय अधिकारी हरेश सुळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. तहसीलदार समिर माने, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज सुर्वे, प्रमुख उपस्थित होते.

       शिवसेना उबाठाचे तालुका प्रमुख युवराज पोवार म्हणाले, चित्री नदीच्या पात्रात आजरा शहरातील सांडपाणी मिसळत आहे. यामुळे शहरासह बुरुडे, हात्तीवडे या गावातील नागरीकांना दुषीत पाणी मिळते. त्यामुळे काविळ, विषमज्वरची साथ पसरली. अजूनही रुग्ण आढळत आहेत. जिल्हा प्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे म्हणाले, नद्या प्रदुषीत होवू नयेत म्हणून प्रदुषण महामंडळाबरोबर बैठक झाली होती. नदीमध्ये मैला, इतर वेस्टेज, घाण मिसळते ती गोळा करून त्याची योग्य रित्या विल्हेवाट लावली पाहीजेत. नगरपंचायत प्रशासनाने पुन्हा आरोग्याचे प्रश्न उद्भभवू नयेत यासाठी दक्षता घ्यावी. उपविभागीय अधिकारी श्री. सुळ यांनी सांडपाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उपाय योजनेबाबत सुचना दिली.

      श्री. सुर्वे यांनी शोष खड्डे घेणे यासह प्राथमिक उपाययोजना सुरु असल्याचे सांगीतले. उपजिल्हा पमुख संभाजी पाटील, माजी नगरसेवक किरण कांबळे, विक्रमसिंह देसाई, रवि भाटले, आरोग्य अधिकारी यांनी चर्चेत भाग घेतला. संजय येसादे, अमित गुरव, महेश पाटील, शरद कोरगावकर, ओमकार मा‌द्याळकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

आजरा साखर कारखान्याचे चेअरमन मुकुंद देसाई व संचालक मंडळाने घेतली  उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांची सदिच्छा भेट

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मुकुंद देसाई व संचालक मंडळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांची सदिच्छा भेट घेवून कारखान्याच्या शासन दरबारी असलेल्या अडचणीबाबत निवेदन दिले व सविस्तर चर्चा केली.

      यावेळी झालेल्या चर्चेत प्रामुख्याने कारखाना उभारणी काळात महाराष्ट्र शासनाकडून प्रकल्प दुरावा कर्जापोटी ३ कोटी रुपये प्राप्त झाले होते. सदर कर्जाच्या परतफेडीसाठी कारखान्याने महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार विक्री पोत्यांवर २५ रुपये प्रमाणे तसेच एन.सी.डी.सी.चे मंजुर कर्जातुन उपलब्ध झालेली रक्कम अशी शासकीय कर्जाची पूर्ण रक्कम शासनाकडे जमा केलेली आहे. तथापी सदर कर्जावर शासनाने आकारलेले व्याज १२ कोटी ७५ लाख रुपये कारखान्याचे आर्थिक अडचणीमुळे सदरची व्याजाची रक्कम भरणे फारच अडचण झालेली आहे. वरीलप्रमाणे कर्जाच्या व्याजाची रक्कम राज्य सरकारने माफ करावी. यासह प्रमुख मागण्या करण्यात आल्या. उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी मागण्यांचा सकारात्मक विचार करून आपल्या कारखान्याच्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले.

      यावेळी वैद्यकिय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार राजेश पाटील, कारखान्याचे व्हा. चेअरमन सुभाष देसाई, माजी चेअरमन वसंतराव धुरे, उदयसिंह पोवार, जिल्हा बँक प्रतिनिधी श्री. सुधिर देसाई, माजी व्हा. चेअरमन मधुकर देसाई, मारूती घोरपडे, संचालक अनिल फडके, दिपक देसाई, रणजित देसाई, कार्यकारी संचालक संभाजी सावंत, सेक्रेटरी व्यंकटेश ज्योती, डे. चिफ अकौंटंट रमेश वांगणेकर उपस्थित होते.

तुम्ही साथ द्या… मी शाळेचा चेहरा मोहरा बदलतो : आलम नाईकवाडे

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     शाळेची सूत्रे हातात घेतल्यानंतर अल्पावधीत मी व  संचालक मंडळाने शाळेचे भौतिक सुविधांचे काम जोमाने सुरू केले असून विज्ञान विभाग व सिनियर कालेज (उर्दू माध्यम) तात्काळ सुरू करण्याचा आमचा मानस आहे. तुम्ही मला साथ द्या, मी शाळेचे नाव निश्चितच देशपातळीवर नेऊन नवा आदर्श निर्माण करीन असे प्रतिपादन अंजुमन इत्तेहादूल इस्लाम आजराचे अध्यक्ष आलम नाईकवाडे यांनी केले. संस्थेच्या डॉक्टर झाकीर हुसेन ॲंग्लो उर्दू हायस्कूलच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्र संचालन  श्री. यासिन सय्यद यांनी केले तर कुरानशरीफ पठण मौलाना जकरीया काकतीकर यांनी केले.

      श्री. रिजवान चमनशेख आखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना, नियाज पटेल (आ. भा. शि. संघटना राज्याध्यक्ष), शौकत लाडजी माजी शिक्षण विस्तार अधिकारी,श्री. इब्राहिम लक्ष्मेश्वर ( पूणे विभागाध्यक्ष आ. भा. शि. संघ), संस्थेचे सचिव श्री हुसेन दरवाजकर,जकी पटेल आ भा शि संघांचे नेते, अष्कर लष्करे, इकबाल पटेल ( शिरोळ तालुका अध्यक्ष), श्री. अ. अजीज दरवाजकर, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चंदगड तालुकाचे संघटनेचे माजी अध्यक्ष, आफताब पटेल (जिल्हा उपाध्यक्ष आ भा शि संघ, न्यामत पीरखान, मोअज्जम बुखारी (ता.सचिव आ भा शि संघ) अ. सत्तार ढालाईत या मान्यवरांच्या हस्ते विविध कौशल्यावर कला गुणांवर विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.पी. एम.उर्दू मराठी विद्यामंदिर आजरा यांचे मार्फत व राहत फौंडेशन ग्रुप, आजरा यांचे मार्फत ही विद्यार्थ्यांना ट्रॉफी वितरण करण्यात आले.

      श्री. रमजान मुजावर यांनी सर्वांचे आभार मानले.

शिरसंगी येथे आजपासून साई भंडारा उत्सव...

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      सिरसंगी ग्रामविकास मंडळ, मुंबई आयोजित श्री साई भंडारा उत्सव व महाप्रसाद २०२५ चे आज शनिवार दि. ३ मे २०२५ रोजी आयोजन करण्यात आले आहे.

        सकाळी नऊ वाजता श्रींचा अभिषेक, सकाळी ९.३० ते २.०० पर्यंत सुस्वर भजन सायंकाळी ४.३० वा.भव्य मिरवणूक व पालखी सोहळा,सायंकाळी ८.३० वा. : सांस्कृतिक कार्यक्रम खास महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम

      रविवार दि. ४ मे २०२५ रोजी सकाळी ९.३० वा. श्री रवळनाथ मंदिर पूजा सकाळी १०.३० वा.श्री साई मंदिर महापूजा, मोफत आरोग्य शिबीर सकाळी १०.३० ते २ पर्यंत

       दुपारी १२.०० ते ४.०० पर्यंत हरिपाठ कीर्तन,सायं. ६.०० ते ७.०० पर्यंत,महाआरती
सायं. ७.३० नंतर महाप्रसाद,रात्री १०.०० नंतर सांस्कृतिक कार्यक्रम-महाराष्ट्रातील सुप्रसिध्द संमोहन तज्ञ राज गोंधळी, कोल्हापूर यांचा मनोरंजन आणि प्रबोध करणारा हिप्नॉटिझम स्टेज शो असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

३१ डिसेंबर रोजी कुरकुंदेश्र्वराची यात्रा…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!