mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शुक्रवार  दिनांक २ मे २०२५       

जयवंतराव शिंपी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव…
वर्षभरात अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

            आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व आजरा महाल शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छांचा वर्षाव केला.

      व्यंकटराव प्रशालेमध्ये झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी शिंपी प्रेमी नागरिकांनी मोठी उपस्थिती दर्शवली. अनेक राजकीय, सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी उपस्थित राहून शिंपी यांना शुभेच्छा दिल्या.

     येते वर्ष हे शिंपी यांचे अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी लोकनेते जयवंतराव शिंपी अमृत महोत्सव गौरव समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

      अत्यंत संघर्षातून आपली जडणघडण झाली असून राजकीय कारकिर्दीमध्ये आपण अनेक चढउतार पाहिले आहेत. समाजभान ठेवून सर्वसामान्यांना कशी मदत करता येईल याकरिता आपला नेहमीच प्रयत्न राहिला आहे. आजरा कारखाना अध्यक्ष पदासह जिल्हा परिषदेमध्ये मानाच्या पदावर काम करत असताना जमिनीशी असणारी नाळ आपण तोडू दिली नाही. यापुढेही सर्वसामान्यांकरिता आपण नेहमीच उपलब्ध असू असा विश्वास यावेळी शिंपी यांनी उपस्थितांना दिला.

गर्जा महाराष्ट्र माझा…
महाराष्ट्र दिन उत्साहात

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा शहर व परिसरामध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र दिनानिमित्त तहसील कार्यालय आजरा येथे तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

       पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांच्या हस्ते तर आजरा नगरपंचायतीमध्ये मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांच्या हस्ते ध्वजा रोहण झाले.

        तालुक्यातील विविध सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, वाचनालये, ग्रामपंचायती येथेही मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.

उचंगीचे काम बंद पाडण्याचा इशारा

प्रकल्पग्रस्तांचे पाटबंधारेला निवेदन : जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठकीची मागणी


           आजरा : मृत्युंजय महा न्यूज वृत्तसेवा

      उचंगी  प्रकल्पाची दोन मीटरने उंची वाढवल्यामुळे बुडीत होणाऱ्या क्षेत्राचे नवीन कायद्याने संपादन होऊन पुनर्वसनाचा लाभ मिळाला पाहिजे. यासाठी श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने अधीक्षक अभियंता पाटबंधारे, कोल्हापूर यांना निवेदन दिले. प्रकल्पग्रस्तांसोबत जिल्हाधिकाऱ्यांची (ता.५) मे पूर्वी बैठक घ्यावी अन्यथा प्रकल्पग्रस्त मोचनि जाऊन काम बंद केले जाईल असा इशारा दिला आहे. याबाबतचे लेखी निवेदन दिले आहे

      निवेदनात म्हटले आहे की, उचंगीची उंची दोन मीटरने वाढवण्याची प्रक्रिया चालू झाली झाली आहे. नव्याने बाधित होणाऱ्या क्षेत्राचे रेखांकन केले आहे. उंची वाढवल्यानंतर बाधित होणाऱ्या क्षेत्राचे संपादन नवीन भूसंपादन कायद्याने करणे, भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर नव्याने बाधित होणाऱ्या क्षेत्राची ६५ टक्के रक्कम कपात करून घेऊन, संकलन दुरुस्त करून प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनाचा लाभ देणे. वरील दोन विषयांची व काही जुन्या प्रलंबित प्रश्नांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींची निर्णायक चर्चा होणे गरजेचे आहे.

      सोमवार (ता. ५) पूर्वी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत प्रकल्पग्रस्तांची बैठक लावावी, अन्यथा मंगळवार (ता.६) प्रकल्पग्रस्त मोचनि येऊन उचंगीचे काम बंद करणार असल्याचा इशारा दिला आहे. पुनर्वसनाचे प्रश्न प्रलंबित असतानाच धरणाची दोन मीटरने उंची वाढण्याचे नियोजन केले जात आहे. कोणाचे किती क्षेत्र जाते, याची माहिती संकलित केली आहे. यामुळे नव्याने बाधित होणाऱ्या क्षेत्राचे संपादन न करता थेट खरेदी करून पुनर्वसनाचा हक्क मिळणार नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून प्रकल्पग्रस्तांना दिली जात असल्याने प्रकल्पग्रतामध्ये संभ्रम तयार झाला आहे. त्यामुळे तातडीने बैठक घेऊन स्पष्टता होणे गरजेचे आहे.

      निवेदनावर श्रमिक मुक्ती दलाचे राज्य कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, नारायण भडांगे, निवृत्ती बापट, दशरथ घुरे, विजय पाटील, शामराव पोवार, शिवाजी बापट यांच्यासह प्रकल्पग्रस्तांच्या सह्या आहेत.

सलग विजयाचा सिक्सर…
मुंबई टॉपला

             मृत्युंजय  महान्यूज वृत्तसेवा

    आयपीएल स्पर्धेत सुरुवातीला पिछाडीवर असणाऱ्या मुंबईने सलग सहावा विजय मिळवताना एकतर्फी रंगलेल्या सामन्यात राजस्थानचा १०० धावांनी धुव्वा उडवला. या धमाकेदार विजयासह मुंबईने गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर २० षटकांत २ बाद २१७ धावा उभारलेल्या मुंबईने राजस्थानला १६.१ षटकांत ११७ धावांवर गुंडाळले. तसेच, यंदाच्या सत्रातून चेन्नई पाठोपाठ राजस्थानचे आव्हानही संपुष्टात आले आहे.

साथीच्या रोगाबाबत आज उपविभागीय अधिकाऱ्यांसोबत बैठक

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा शहरातील दूषित पाणी थेट नदीत मिसळत असल्यामुळे जानेवारी – फेब्रुवारी महिन्यापासून शहरात कावीळ सदृश्य रुग्णांसह टायफाईडच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे या पार्श्वभूमीवर ७ फेब्रुवारी रोजी शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते.

       या निवेदनाची दखल घेत आज शुक्रवार दिनांक २ मे रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय येथे राधानगरी भुदरगड आजाराचे उपविभागीय अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे.

कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू… अभियानाचा पेरणोलीत शुभारंभ

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा 2 अंतर्गत
कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू” अभियानाचा शुभारंभ ग्रामपंचायत पेरणोली, ता., आजरा येथे श्री. दिनेश शेटे, सहा. गटविकास अधिकारी, पंचायत समिती, आजरा यांचे हस्ते झाला.

       यावेळी सरपंच सौ. प्रियांका जाधव उपसरपंच, श्री. संदीप नावलकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी श्री. संदीप चौगले, गट समन्वयक श्री. सर्जेराव घाटगे, ग्रामपंचायत कर्मचारी संभाजी दळवी तसेच अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.

निधन वार्ता
प्रवीण बाटे


      कोवाडे तालुका आजरा येथील प्रवीण मारुती बाटे वय ४० वर्षे यांचे अल्पश: आजाराने निधन झाले.

      त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील ,भाऊ यांच्यासह मोठा परिवार आहे.

निधन वार्ता 

शेखर करंबळी

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

    आजरा येथील स्टॅम्प विक्रेते व वृत्तपत्र विक्रेते शेखर बसाप्पा करंबळी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ८२ वर्ष होते.

     त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुली, मुलगा, जावई,सून, नातवंडे असा परिवार आहे.

 

संबंधित पोस्ट

भूमी अभिलेखचा कर्मचारी लाचलूचपतच्या जाळ्यात…

mrityunjay mahanews

Crime News

mrityunjay mahanews

तणाव निवळला… बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा अर्बन बँकेच्या गारगोटी शाखेचे नूतनीकरण व उद्घाटन..

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!