mrityunjaymahanews
अन्य

गुरुवार – सातच्या बातम्या

 

गुरुवार 

३० जुलै २०२६

पं.स.सभापतीपदाचा तिढा आज सुटणार…?
तालुकावासियांचे लक्ष

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा पंचायत समितीच्या सभापती सौ. जयश्री गाडे यांचा जातीचा दाखला अवैध ठरविण्यात आल्यामुळे नव्याने आज निवड होणार आहे.आयुक्तांच्या आदेशाने जिल्हाधिकारी यांनी निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.या अनुषंगाने उद्या तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली निवडीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

जयश्री गाडे यांचा कुणबी जातीचा दाखला जात पडताळणी समितीने अवैध ठरविला.यानंतर याला स्थगिती मिळवण्यासाठी गाडे यांनी प्रयत्न केले मात्र त्यांना न्यायालयातून स्थगिती न मिळाल्याने अखेर नव्याने निवडीची प्रक्रिया राबवली जाणार आहे.

आजरा पंचायत समितीचे सभापती आरक्षण महिला मागास प्रवर्गासाठी आहे.भादवण पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या जयश्री गाडे या सभापती विराजमान झाल्या मात्र याच गणातून पराभूत झालेल्या साधना संजय केसरकर यांनी गाडे यांच्या दाखल्यावर हरकत घेत जात पडताळणी समितीकडे धाव घेतली.याबाबत अनेक सुणावण्या झाल्या.पुराव्या अभावी समितीने गाडे यांचा जातीचा दाखला अवैध ठरविला.यानंतर याला स्थगिती मिळवण्यासाठी गाडे यांचे प्रयत्न राहीले आहेत.

सभागृहात आता उपसभापती यशोदा पोवार ह्या एकमेव महिला सदस्या आहेत.पेरणोली पंचायत समिती गणातून त्या सर्वसाधारण महिला प्रवर्गातून निवडून आल्या आहेत.मागास प्रवर्गाचा त्यांचा दाखला असल्यास त्या उद्याच्या निवडीत भाग घेऊ शकतात अन्यथा आजरा पंचायत समिती सभापती पद रिक्त राहणार आहे.

पावसाचे धुमशान
अतिवृष्टीची नोंद
आणि प्रकल्प तुडुंब
घरांची पडझड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यामध्ये गेले दोन दिवस झालेल्या धुवाधार पावसामुळे अतिवृष्टीची नोंद झाली आहे.पावसामुळे चित्री, उचंगी, सर्फनाला प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. प्रकल्पात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्याने चित्री व हिरण्यकेशी नदीपात्रातील पाणी वाढले असून पुन्हा एक वेळ साळगाव बंधारा पाण्याखाली गेला आहे. जेऊर येथील संदीप विश्राम तिबिले यांचे घर पडून घराचे नुकसान झाले आहे. आजपर्यंत सुमारे पन्नास वर घरांची पडझड झाली आहे.नदीकाठच्या गावातील नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

चित्री,उचंगी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले; चित्री सांडव्यातून १२४ क्युसेक विसर्ग सुरू

आजरा व गडहिंग्लज तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला चित्री मध्यम प्रकल्प बुधवारी (ता. २९) दुपारी पूर्ण क्षमतेने भरला. प्रकल्पातील पाणीसाठा १८८६ दशलक्ष घनफूट इतका झाला असून धरण शंभर टक्के भरल्याने सांडव्यातून १२४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच प्रकल्पातून १८० क्युसेकने वीज निर्मितीलाही सुरुवात झाली आहे. यामुळे आजरा व गडहिंग्लज तालुक्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यंदा पावसाला झालेल्या विलंबामुळे चित्री प्रकल्प भरण्यासही उशीर झाला. गतवर्षी ५ जुलै रोजी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला होता. मात्र यंदा पावसाचे आगमन उशिरा झाल्याने प्रकल्पाला पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी गतवर्षीच्या तुलनेत तब्बल २४ दिवसांचा विलंब झाला. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चित्री प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आणि अखेर प्रकल्पाने शंभर टक्के पाणीसाठ्याची पातळी गाठली.

चित्री प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत १७८६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाची संततधार कायम राहिल्याने प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. बुधवारी दुपारी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सांडव्यातून विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे नदीपात्रातील पाणीपातळी वाढण्याची शक्यता असून प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
चित्री प्रकल्पापूर्वीच आजरा तालुक्यातील धनगरवाडी व एरंडोळ हे लघु पाटबंधारे तलाव तसेच सर्फनाला मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे तालुक्यातील जलसाठ्याच्या दृष्टीने यंदाची स्थिती समाधानकारक बनली आहे. दरम्यान, आंबेओहोळ मध्यम प्रकल्प ८७ टक्के भरला असून त्याच्या परिसरात आजअखेर १०२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच उचंगी लघु पाटबंधारे तलाव १०० टक्के भरला आहे.

आजरा व गडहिंग्लज तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या चित्री मध्यम प्रकल्पात २००१ पासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यास सुरुवात झाली. या प्रकल्पामुळे दोन्ही तालुक्यांतील शेतीला मोठा आधार मिळाला असून पावसाळ्यानंतरही सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता राहण्यास मदत होते. त्यामुळे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकरी वर्गालाही मोठा दिलासा मिळाला आहे. चित्री प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे किमान ५८५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील सुमारे ६० गावांना या प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ मिळतो. त्यामुळे शेतीसाठी आवश्यक असलेले पाणी उपलब्ध होण्याबरोबरच खरीप व रब्बी हंगामातील पिकांना मोठा आधार मिळणार आहे.

पाणीसाठा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

चित्री प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने सध्या प्रकल्प परिसरात पर्यटकांचीही गर्दी वाढू लागली आहे. आजरा, गडहिंग्लजसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने चित्री प्रकल्पावर येऊन ओसंडून वाहणारा पाणीसाठा व सांडव्यातून सुरू असलेला विसर्ग पाहण्याचा आनंद घेत आहेत. पावसाळ्यात चित्री परिसरातील निसर्गसौंदर्य अधिक खुलून दिसत असल्याने पर्यटकांसाठीही हा परिसर आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्यातून मोठ्या प्रमाणावर मासे येऊ लागले असल्याने मासे पकडण्यासाठी मत्स्यप्रेमी गर्दी करू लागले आहेत.

आजरा – आंबोली रस्त्यावर भरधाव बुलेटची धडक, एकजण गंभीर जखमी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

दि. २८ रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास आजरा-आंबोली रस्त्यावर लक्ष्मीच्या ओढ्याजवळ, वेळवट्टी ता. आजरा येथे अज्ञात बुलेट मोटरसायकल( क्र. MH-04-KB-7130) चा चालक भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवत असताना रस्त्याच्या उजव्या बाजूने पायी जाणाऱ्या रामचंद्र लक्ष्मण पोवार ( वय 6्६१, रा. वेळवट्टी ) यांना मागून जोरात धडकला. यात पोवार यांच्या डोके, तोंड, छाती, पोट व दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. धडक देऊन चालक पळून गेला.

फिर्यादी आनंदा शंकर पोवार यांच्या तक्रारीवरून आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार अनिल सरंबळे करत आहेत.

आजरा महाविद्यालयातील व्यावसायिक विभागाच्या विद्यार्थ्यांची शिक्षकांना गुरुवंदना

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा महाविद्यालयातील व्यावसायिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा वेगळ्या पद्धतीने साजरी करून आपल्या शिक्षकांना गुरुवंदना दिली. गुरुंनी केलेल्या संस्कारामुळे आपण आयुष्यात येणाऱ्या सर्व संकटावर निश्चितपणे मात करू शकतो असा आत्मविश्वास स्वयंपूर्णपणे घेतलेल्या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांमध्ये दिसून आला.

विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना फुलांची उधळण करीत व औक्षण करून कार्यक्रमाच्या ठिकाणी आणले. स्वागत व प्रास्ताविक सिद्धी जाधव यांनी केले. सर्व शिक्षकांना गुलाब फूल व भेटवस्तू देऊन त्यांचे स्वागत केले. भारतीय संस्कृतीत गुरूला ईश्वराचे स्थान दिले आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात आई वडील हे पहिले गुरू त्यानंतर आपले शिक्षक गुरु आहेत. गुरु आपल्याला अज्ञानातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात. गुरुंनी केलेल्या संस्कारामुळे आपण आयुष्यात येणाऱ्या सर्व अडचणीवर निश्चितपणे मात करू शकतो असे मनोगतातून ऋतुजा नाईक, हर्षदा कांबळे, गौरी बागडी, मानस दळवी, श्रेयश डांगरे, साक्षी करमळकर या विद्यार्थ्यांनी मनोगतातून शिक्षकांबद्दल ऋण व्यक्त केले.

पर्यवेक्षक मनोजकुमार पाटील, सदाशिव मोरे संदीप देसाई, नेहा पेडणेकर, सुषमा नलवडे यांनी मनोगता व्यक्त केले.

कार्यक्रमास शिक्षक गिरीश कुरुणकर, पल्लवी नार्वेकर, तेजस्विनी जाधव, शिवाजी कांबळे यासह विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन साक्षी मराठे तर आभार रितू जाधव हिने मानले.

निवड…


येथील उत्तूर विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी माजी सरपंच रमेश ढोणुक्षे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

गुरुपौर्णिमेनिमित्त देवर्डे येथे वृक्षारोपण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

जागतिक निसर्ग संवर्धन दिन व गुरुपौर्णिमेचे या औचित्य साधून वन विभाग आजरा व ग्रामपंचायत देवर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने काजूच्या ४०० फळझाडांच्या रोपांची लागण करण्यात आली.

देवर्डे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. कल्पना चाळके, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष इंजि.जी. एम. पाटील, आजरा परिक्षेत्र वन अधिकारी श्री.सचिन सावंत यांच्या हस्ते रोपांची लागण करण्यात आली.

यावेळी धनगरमोळा बीटच्या वनपाल सौ. कविता सावंत,ग्रामपंचायत अधिकारी श्री. सुभाष येळणे यांनी या उपक्रमासाठीचे नियोजन केले.

यावेळी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष इंजि. जी.एम. पाटील म्हणाले, मानवाच्या संपूर्ण जीवनप्रवासामध्ये सर्वात पहिला, सर्वात पुरातन आणि अदिम गुरु कोणता असेल तर तो म्हणजे हा अथांग पसरलेला निसर्ग असून
निसर्गरूपी गुरुमुळे मानवासाठी अन्न, वस्त्र, निवारा,शुद्ध हवा,पाणी त्याचबरोबर शिक्षणही मिळते.

आजरा परिक्षेत्र वन अधिकारी सचिन सावंत यांनी घटत चाललेले जंगल क्षेत्र व त्यामुळे होत
असलेल्या जैवविविधतेच्या ऱ्हासामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडलेले आहे आणि त्यामुळे तापमानवाढ, अतिवृष्टी, दुष्काळ इत्यादी संकटाना सामोरे जावे लागत आहे असे स्पष्ट केले.

ग्रामपंचायत अधिकारी सुभाष येळणे यांनी आभार व्यक्त केले. या उपक्रमासाठी वनरक्षक श्री. शशिकांत टेके, वनसेवक रमेश पाटील (गवसे), देवर्डे ग्रामपंचायतीचे सदस्य, हत्ती हकारा टीमचे सर्व सदस्य उपस्थित होते.

छाया वृत्त…

कित्येक वर्ष चित्रानगर ता. आजरा जि. कोल्हापूर गावातील पाण्याची वीज ही रात्री शेती पंप वेळापत्रका नुसार असल्या मुळे पाणी भरण्याला व सोडण्याला त्रास होत होता यावर कायमचा उपाय म्हणून अष्टप्रधान प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार राजेश पाटील यांच्या समोर अडचण मांडली व त्यांनी तात्काळ जिल्हा नियोजन समिती अंतर्गत निधी उपलब्ध करून देऊन वीज लाईन शेती पंपावरून बदलून गावठाण फिटर मध्ये बदलून दिली. आता चित्रानगर गावामध्ये २४ तास पाण्याकरीता वीज उपलब्ध झाली.

गुरुपौर्णिमेनिमित्त पंडित दीनदयाळ विद्यालयात माता-पालकांचे पाद्यपूजन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पंडित दीनदयाळ विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त माता-पालकांच्या पाद्यपूजनाचा उपक्रम उत्साहात पार पडला.

विद्यार्थ्यांनी मातांचे पाद्यपूजन करून ‘मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्यदेवो भव’ या भारतीय संस्कृतीतील मूल्यांचा प्रत्यय घडविला.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. मीरा हरेर हिने प्रास्ताविकातून गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांनी पुष्प अर्पण करून शिक्षकांचा सन्मान केला.

दूर्वा बुरुड, दुर्वा घेवडे, शरण्या कुंभार, स्वरदा तेजम, धारा रांगणेकर, शर्वरी परीट, प्रांजल सावंत आणि संस्कृती चव्हाण या विद्यार्थिनींनी गुरुपरंपरा व गुरूंच्या ऋणावर मनोगते व्यक्त केली.

शुभांगी निर्मळे यांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व सांगितले. प्रमुख पाहुण्या श्रीम. प्रेमा साठे यांनी गुरूप्रती आदर दैनंदिन आचरणातून व्यक्त करावा, असे सांगितले. सौ. आरती हरणे यांनी गुरू हे व्यक्तिमत्त्व घडवणारे शिल्पकार असल्याचे नमूद केले. अध्यक्षा डॉ. स्मिता कुंभार यांनी गुरुपरंपरेचा आढावा घेत मार्गदर्शन केले.

समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांनी मातांचे पाद्यपूजन करून कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमास मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

       आजचे पंचांग 

दिनांक : ३० जुलै २०२६
वार : गुरुवार
माह (अमावस्यांत) : आषाढ
माह (पूर्णिमांत) : श्रावण
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : प्रथम तिथी (रात्री ०९.३० पर्यंत) त्यानंतर द्वितीया तिथी
नक्षत्र : श्रवण नक्षत्र (सायंकाळी ०५.४२ पर्यंत) त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र
योग : आयुष्मान योग (३१ जुलै रात्री १२.०४ पर्यंत) त्यानंतर सौभाग्य योग
करण : बलवा करण (सकाळी ०८.५० पर्यंत) त्यानंतर कौलव करण
चंद्र राशी : मकर राशी
सूर्य राशी : कर्क राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०२.२२ ते दुपारी ०३.५९ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१९ ते दुपारी ०१.११
सूर्योदय : सकाळी ०६.१६
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१४
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा शहराला वादळी पावसाने झोडपले

mrityunjay mahanews

देवर्डे येथील अल्पवयीन मुलाचे सांगलीतून अपहरण…??

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!