

खणदाळ येथे डासांना घालवण्यासाठी केलेल्या धुमित गुदमरून पाच म्हैशींसह शेळ्या व कोंबड्यांचा मृत्यू
तीन लाखांचे नुकसान

गडहिंग्लज : प्रतिनिधी
खणदाळ ता. गडहिंग्लज येथे नंदकुमार भिमा दिवटे यांच्या गोठ्यामध्ये डास घालवण्याकरता लागलेल्या धुमीचा प्रचंड धूर होऊन यामध्ये पाच म्हैशींसह शेळ्या व कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. सुमारे तीन लाख रुपयांचे दिवटे यांचे नुकसान झाले आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की नंदकुमार दिवटे यांचे शेतामध्ये घर आहे. घराशेजारीच गोठा आहे. काल सायंकाळी गोठ्यामध्ये झालेले डास घालवण्याकरता त्यांनी धुमी केली व गोठा बंद करून ते शेजारीच असलेल्या आपल्या घरी निघून गेले. दरम्यान धुमीच्या शेजारी असलेल्या शेणीनी पेट घेऊन त्या बराच वेळ धुमसत राहिल्याने गोठ्यामध्ये धूर झाला. बांधलेल्या स्थितीत असणारी जनावरे यामुळे गुदमरली गेली व टाचा घासून त्यांचा बांधलेल्या ठिकाणीच मृत्यू झाला.आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सदर घटना उघडकीस आली.
शेतकरी कुटुंबातील नंदकुमार यांच्या दुभत्या पशुधनाबाबत घडलेल्या या प्रकाराने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

ग्रामपंचायतीपाठोपाठ आजरा साखर कारखाना निवडणुकीचे धुमशान… राजकीय हालचाली गतिमान झाल्या

आजरा : प्रतिनिधी
सद्यस्थितीत आजरा तालुक्यामध्ये दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला असतानाच आजरा साखर कारखान्याचा निवडणुकीचा कार्यक्रम सहा नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा खाली बसतो तोच साखर कारखाना निवडणुकीचा कार्यक्रम सुरू होणार आहे. एकापाठोपाठ एक होणाऱ्या या महत्त्वाच्या निवडणुकांमुळे राजकीय वर्तुळात हालचाली वेगावल्या आहेत.
अद्यापही साखर कारखान्याकरीता आघाडीची निश्चिती झालेली नाही. कोण कोणासोबत राहणार हे अस्पष्ट असतानाच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यातील बदललेली राजकीय स्थिती या निवडणुकीतील समीकरणे ठरविण्यातही अडचणीची ठरणार आहेत .
असे असले तरीही पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील राष्ट्रवादी काँग्रेस व जुनी भाजपा,शिवसेना (उबाठा गट) अशी एक आघाडी तर त्या विरोधात अशोक चराटी, जयवंतराव शिंपी व त्यांना बळ देणारे खासदार धनंजय महाडिक,आमदार प्रकाश आबिटकर,शिवसेना शिंदे गट अशा दोन आघाड्या तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आठवडाभरातच आघाड्यांचे चित्र स्पष्ट होईल असे दिसते.


गंगामाई वाचन मंदिरात अशोकअण्णांची हुकुमशाही…
बगलबच्च्याना दिले जाते कार्यकारणीत स्थान

आजरा येथील पत्रकार बैठकीत प्रा. डॉ. सुधीर मुंज व संभाजी पाटील यांचा आरोप
आजरा : प्रतिनिधी
आजरा तालुक्याचा मानबिंदू अशी ओळख असणाऱ्या .श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरामध्ये अशोक चराटी हे मनमानी व हुकूमशाही पद्धतीने वागत आहेत . आपल्या संस्थेचे नोकर पदाधिकारी म्हणून घ्यायचे व इतरांना दाबायचे आणि संस्था आपल्याच ताब्यात कशी राहील यासाठी हेतू पुरस्सर प्रयत्न करायचे असा प्रकार सध्या वाचनालयामध्ये सुरू असून वाचन मंदिर बाळकावण्याचा प्रयत्न आजरेकरांनी हाणून पाडावा . यासाठी आपण सनदशीर मार्गाने लढा देणार आहोत असे प्रतिपादन वाचनालयाचे संचालक प्रा. डॉ. सुधीर मुंज व शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांनी आजरा येथे पत्रकार बैठकीत बोलताना केले .
यावेळी प्रा . सुधीर मुंज म्हणाले, वाचनालयाची कार्यकारिणी नवीन इमारत झाल्याशिवाय बदलायची नाही असा ठराव सर्वानुमते झाला होता असे असताना अशोकअण्णा चराटी व त्यांच्या समर्थकांनी पक्षातील वाद वाचनालयात आणून सुकाणू समिती नेमून जनरल सभेचा अपमान करून आपणाला संचालक मंडळातून बाजूला केले . केवळ राजकारण म्हणून वाचनालयासारख्या बिगर राजकीय संस्थेमध्ये राजकारणाचा प्रवेश झाला आहे हा प्रकार निषेधार्थ आहे .ही संस्था कोणाही एका समूहाची नाही याचे भान ठेवण्याची गरज आहे .
आपली समर्थक मंडळी सभेमध्ये बोलवायची त्यांच्याकडून आपणाला हवे त्या पद्धतीने ठराव करून घ्यायचे असे प्रकार करून या वाचनालयाचे पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे
अण्णा भाऊ संस्था समूहाच्या विविध राजकीय प्रचार सभांना सुद्धा अध्यक्ष व कार्यवाह यांच्या सहीने पत्रे काढून संबंधितांना सभेस उपस्थित राहण्यास सांगितले जाते हा प्रकार योग्य नाही .या सर्व प्रकारांच्या पार्श्वभूमीवर सनदशीर मार्गाने आपण लढा उभा करणार आहोत असेही प्रा . मुंज यांनी स्पष्ट केले
शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील म्हणाले अशोकअण्णानी वाचनालयामध्ये राजकारण करू नये .या संस्थेचा राजकीय अड्डा करून संस्था अडचणीत आणू नये . वाचनालय म्हणजे पतसंस्था अथवा बँक नाही याचे भान ठेवावे .सुकाणू कमिटी नको असे सांगत असतानाही सुकाणू कमिटी नेमण्यात आली . बांधकाम करण्याकरता साडेचार कोटींचा निधी मंजूर झाल्यावर सुकाणू समिती कशी काय उगवली ? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला .वाचनालयासंदर्भातल्या अनेक गोष्टींचे आपण साक्षीदार आहोत योग्य वेळ येताच त्या गोष्टींचा उलघडा करू असा इशाराही संभाजी पाटील यांनी दिला .
बैठकीस भाजपाचे सुधीर कुभार ,अरुण , नाथा देसाई उपस्थित होते.


मतदार म्हणून नव्हे तर माणूस म्हणून नागरिकांना योजनांचे लाभ :
समरजितसिंह घाटगे

आजरा : प्रतिनिधी
शासनाच्या योजना गट-तट न पाहता राबवित आहोत.नागरिकांना मतदार म्हणून नव्हे तर माणूस म्हणून लाभ देत आहोत.असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी केले.
मडीलगे (ता.आजरा)येथे ‘समरजितसिंह आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांच्या मंजुरी पत्रांचे वाटप,विकासकामांचे उद्घाटन,गुणवंताचा सत्कार व हळदीकुंकू अशा संयुक्त कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
त्याआधी घाटगे यांनी मडिलगे,आरदाळ, मासेवाडी येथे प्रतिनिधिक स्वरूपात एकवीस लाभार्थ्यांच्या घरी जाऊन मंजुरीपत्रांचे वाटप केले.
घाटगे पुढे म्हणाले,शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत राजकारण करणाऱ्या विरोधकांच्या ठराविक कार्यकर्त्यांची मक्तेदारी तयार झाली आहे.ते लाभार्थ्यांवर उपकाराची भाषा करतात.आमचे कार्यकर्ते राजकारणविरहितपणे सर्वांचीच कामे करतात.हाच त्यांच्या व आमच्या कामाच्या पद्धतीतील फरक आहे.

आण्णा-भाऊ समूहाचे अध्यक्ष अशोक चराटी म्हणाले, ‘हनुमान’ व ‘लोकमान्य’ ग्रुप एकत्र आल्यास काय घडू शकते याची चुणूक या कार्यक्रमातून दिसत आहे. मागील चुका दुरुस्त करून एकत्र येऊन विनाकारण त्रास देणाऱ्यांना घरात बसवूया.मतदारसंघातील दुष्ट प्रवृत्तींचा वध करुन कोणतेही संविधानिक पद नसताना सर्वसामान्यांसाठी झटणाऱ्या समरजितसिंह घाटगेंना आमदार करण्याचे काम नवदुर्गाच करतील.
यावेळी जितेंद्र टोपले यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास अनिरुद्ध केसरकर,विजय परुळेकर, विठ्ठल उत्तूरकर, मारुती येसणे, शाहूच्या संचालिका रेखा पाटील, सुजाता तोरस्कर,निवृत्ती पाटील, अभिजीत मोहिते, आतिशकुमार देसाई आदी उपस्थित होते.
स्वागत जनार्दन निऊंगरे यांनी केले.
परिवर्तनात कागलकरांच्या पुढे आजरा-गडहिंग्लजकर….!
समरजितसिंह घाटगे यांचा गट-तट न पाहता सर्वसमावेशक कामाचा धडाका पाहता विधानसभेच्या निवडणुकीत कागल विधानसभा मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे.या परिवर्तनात कागलकरांच्या पुढे आजरा-गडहिंग्लजकरअसतील.असा विश्वास लोकमान्य संस्था समुहाचे संस्थापक जनार्दन निऊंगरे यांनी व्यक्त केला.


दुसऱ्या दिवशीही सर्व्हर डाऊन
आता ५.३० पर्यंत अर्ज दाखल करता येणार
आजरा : प्रतिनिधी
तालुक्यातील दहा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये समोरील सर्वर डाऊनचा प्रश्न आज दुसऱ्या दिवशीही कायमच होता दिवसभरात सर्वर डाऊन मुळे एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. सलग दुसऱ्या दिवशी सर्वरचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. याची प्रशासनाने दखल घेऊन आज दिनांक १८ पासून पत्र दाखल करण्याचा कालावधी वाढवला असून दुपारी तीन ऐवजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत.
एकीकडे अर्ज दाखल करण्याचा कालावधी संपत असताना दुसरीकडे सर्वर डाऊनची समस्या भेडसावत असल्याने ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल करून घेण्याची गरज निर्माण झाली होती तशी मागणीही होत होती. परंतु नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी वाढवल्याने इच्छुकांना दिलासा मिळाला आहे.


आज शहरात…
नवरात्र विशेष
♦श्री रवळनाथ नवरात्र उत्सव – चाफवडे येथील विठ्ठलदेव भजनी मंडळाचे भजन ( वेळ – रात्री ९ वा.)
♦लायन्स किंग फ्रेंड्स सर्कल – होम मिनिस्टर…खेळ पैठणीचा (वेळ – रात्री ८ वाजता )
♦भगवा रक्षक नवरात्र उत्सव मंडळ – स्थानिक मुलांच्या रेकॉर्ड डान्स स्पर्धा ( वेळ – सायं.७-३० वाजता)
♦छ.शिवाजी नगर नवरात्र उत्सव मंडळ – झिम्मा फुगडी ( वेळ – रात्री ८.वाजता )
♦क्रांतिकारी तरुण मंडळ नवरात्र उत्सव – भावेश्वरी भजनी मंडळ बुजवडे यांचे भजन ( वेळ- रात्री ८ वाजता )

सहयाद्री सेवा मंडळ, भादवण शिवनेरी शारदीय सार्वजनिक नवरात्रौत्सव

सहयाद्री सेवा मंडळ,भादवण संचलित शिवनेरी शारदीय सार्वजनिक नवरात्रोत्सव
गेली २१ वर्ष मल्लीकार्जुन मंदीरामध्ये दुर्गा मातेच्या मुर्तीची प्राण प्रतिस्थापना करून नवरात्रोत्सव साजरा केला जातो. यावर्षीही नवरात्र उत्सव दणक्यात सुरू आहे.
भादवण मधील सर्व थरातील नागरीकांना प्रत्येक दिवशी महाआरतीला निमंत्रण केले जाते. हळदी – कुंकू व्याख्यान उखाणे स्पर्धा, रास दांडीया स्पर्धेचे नेटके नियोजन शिवसेना तालुका प्रमुख श्री. संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली केले आहे. यास दरवर्षी महिला युवक युवती, ज्येष्ठ नागरीक, नोकर वर्ग यांची उपस्थिती लक्षणीय असते.
मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळकृष्ण सुतार उपाध्यक्ष अरुण सुतार, सचिव बाळासाहेब पाटील, कार्याध्यक्ष बाळासाहेब कुंभार, खजिनदार तानाजी उंडगे आनंदा जोशिलकर चंद्रकांत गोडसे विठ्ठल डोंगरे त्याच बरोबर मुंबई कमीटी श्री दतात्रय जाधव व पुणे कमीटी विश्वजीत डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे.
रोज पंचोपचार पुजा ह.भ.प . नामदेव सुतार व त्यांचे सहकारी करून टाळ मृंदगाच्या निनादात महाआरती केली जाते. यावर्षी धार्मिक कार्यात ओढ लागावी म्हणून युवकांची कमिटी स्थापन करून त्यांच्या कडे जबाबदार्या दिल्या गेल्या आहेत. गावातील मानकरी, ग्रामपंचायत यांच्या सल्ल्याने सर्व धार्मिक विधी केले जातात. प्रत्येक दिवशी हातप्रसाद ज्या पद्धतीने तिरुपती बालाजी मंदीर मध्ये दिला जातो तसाच या ठिकाणी दिला जातो.यावर्षीच्या मुर्ती देणगीदार सौ.मालन प्रकाश चव्हाण या माजी सैनिक कुटुंबाकडून दिली आहे.
आजरा तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील सर्वात मोठा नवरात्रोत्सव शिवसेनेचा म्हणून गणला जातो.तालुक्यातील विविध पक्षांचे मान्यवर या नवरात्र उत्सव मंडळास आवर्जुन भेट देतात.
.…………….(विशेष प्रतिनिधी)……………….


दुर्गामाता दर्शन...
भगवा रक्षक नवरात्रोत्सव मंडळ

अध्यक्ष : रवी तळेवाडीकर
उपाध्यक्ष: अतुल पाटील
सचिव : प्रदीप पाचवडेकर
खजिनदार : विजय नेवरेकर,प्रसाद ओतारी,विशाल केसरकर
मूर्ती देणगीदार : निलेश रावसाहेब चौगुले ( काँट्रक्टर, कोल्हापूर ).

श्री रवळनाथ नवरात्रोत्सव समिती

अध्यक्ष : आनंदा कुंभार
उपाध्यक्ष : सुजीत देसाई
सचिव : सुभाष नेवगी
खजिनदार: दिपक कुरुणकर
मूर्ती देणगीदार; योगेश इराण्णा पाटील

निधन वार्ता
शंकर रेडेकर

मंगुसवाडी ता. आजरा येथील शंकर जयराम रेडेकर ( वय ८५ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे.





