मंगळवार
२२ जुलै २०२६

आजरा तालुक्यात अतिवृष्टी ; घरांची पडझड..
लाखोंचे नुकसान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यात गेल्या २४ तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्या-नाल्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड सुरू झाली आहे.
आवंडी येथे वन विभागाच्या शेततळे फुटून जानू कोकरे यांच्या घरात पाणी शिरले असून गवताचे मोठे नुकसान झाले आहे.
देवर्डे पैकी माद्याळ येथे प्रकाश आनंदा बोलके यांच्या घराची भिंत कोसळून सुमारे ५० हजार रुपये तर पोल्ट्री शेडवर झाड पडून ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड सुरू झाली आहे.
तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून हिरण्यकेशी व चित्रा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जंतर-मंतर वरील लाठी हल्ल्याचा आजऱ्यात निषेध
शिवतीर्थ येथे निदर्शने

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेपर फुटी प्रकरणी दिल्ली येथे सनदशीर मागनि आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर दिल्ली पोलीसांनी अमानुष लाठीहल्ला केला. या हल्ल्याच्या निषेधार्थ आजरा येथे विविध संघटना, नागरीकांनी संघटीतपणे निदर्शने केली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
पेपर घोटाळ्यातून एका मंत्र्याला वाचविण्यासाठी देशातील लाखो तरूणांचे करीअर पणाला लावले असल्याचा आरोप कॉ. संपत देसाई यांनी केला. शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक गेल्या २० दिवसांपेक्षा अधिक काळ आंदोलनासाठी बसले असताना शासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही. उलट आंदोलन दडपण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात आला. तर अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात संसदेवर काढण्यात आलेल्या मोर्चातील आंदोलकांवर लाठीहल्ला करून शासनाने लोकशाहीला काळीमा फासण्याचे काम केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
यानंतर शिवतीर्थ पासून मोर्चाने जाऊन तहसीलदार समीर माने यांना निवेदन देण्यात आले. तहसीलदार कार्यालय परीसरात झालेल्या सभेत कॉ. संपत देसाई, सुभाष विभुते, अजय देशमुख, कॉ. शांताराम पाटील, डॉ. गौरी भोसले, डॉ. रोहन जाधव, प्रा. मीना मंगळूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांवर केलेल्या बाठीहल्ल्याचा निषेध करून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वच वक्त्यांनी मनोगतातून केली.
या आंदोलनात डॉ. नवनाथ शिंदे, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा उपप्रमुख संभाजी पाटील, तालुका प्रमुख युवराज पोवार, कॉ. काशिनाथ मोरे, कॉ. संजय घाटगे, प्रभाकर कोरवी, रवींद्र भाटले, पुष्पलता घोळसे, दिनेश कांबळे, नगरसेवक परशराम बामणे, निसार लाडजी, नौशाद बुड्ढेखान, संजयभाऊ सावंत, सुधीर सुपल, प्रकाश मोरूस्कर, सरीता कांबळे यांच्यासह संविधानप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात अन्याय निवारणचे आंदोलन

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
विविध मागण्यांसाठी आजरा नगरपंचायतीवर विरोधकांनी ढोल ताशा वाजवत आंदोलन केले. शहरातील प्रलंबित विकासकामांच्या पूर्ततेची मागणी त्यांनी लावून धरली. नगराध्यक्ष अशोक चराटी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. विविध मुद्यावर चर्चा झाली. या वेळी काही मागण्यावरून सत्ताधारी व विरोधकात शाब्दिक चकमक झडली. सत्ताधाऱ्यांकडून काही मागण्याच्या पूर्ततेची ग्वाही देण्यात आली. निधी उपलब्ध झाल्यावर अन्य मागण्या पूर्ण करणार असल्याचे सांगण्यात आले.
विरोधी आघाडी व अन्याय निवारण समितीच्यावतीने १३ मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी त्यांनी नगरपंचायतीसमोर मांडव उभा करून ढोल ताशा वाजत आंदोलन केले. मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोरही आंदोलकांनी ढोल ताशा वाजवत नाराजी व्यक्त केली. सत्ताधाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत विविध मुद्यावर चर्चा झाली. नगरसेवक परशराम बामणे म्हणाले, अन्याय निवारण जेंव्हा विकासकामांसाठी अॅक्शन मोडमधे येते तेव्हाच कामाला सुरवात होते. त्यामुळे आमच्यावर श्रेयवादाचा आरोप केला जातो हे चुकीचे आहे. घनकचऱ्याबाबत संबधीत कंपनीने नगरपंचायतीला सहकार्य केले नाही. त्यांना काळ्या यादीत टाकावे. सुधीर कुंभार म्हणाले, आजरा शहरातील कामे ही पालकमंत्री आबिटकर यांच्या निधीतून होत आहेत. ते सर्वाचे नेते आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यानी निधी आणला म्हणण्याचे कारण नाही. शहरात कोणालाही कामे दिली जातात. त्यामुळे कामाचा दर्जा रहात नाही. यापूढील काळात चांगले ठेकदार नेमावेत. डॉ.स्मिता कुंभार म्हणाल्या, प्रशासनाकडून काही नगरसेवकांना माहीती दिली जात नाही. टी.. एस. ठरवतांना सभागृहातील काही नगरसेवकांना मुख्याधिकारी विश्वासात घेत नाही, नौशाद बुड्डेखान यांनी कृषी चिकित्सालय ते संभाजी चाक दरम्यानचा रस्ता बांधकाम विभागाकडून नगरपंचायतीकडे हस्तांतरणाची सूचना मांडली. गटर, रस्ते, पाण्याबाबत नागरीकांनी विविध प्रश्न मांडले.
श्री. चराटी म्हणाले, गत संभागृहाची मंजूर कामे केली जात आहेत. पावसाळ्यामुळे अडचणी आहेत. शहरातील कामे निधी मिळेल त्या नुसार टप्प्या टप्प्याने पूर्ण केली जातील. घनकचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. मिनीन डिसोझा, बंडोपंत चव्हाण, जोतीबा आजगेकर, पांडरंग सावरतकर यांनी सूचना मांडल्या. नगरसेवक परेश पोतदार, निसार लाडजी, नगरसेविका रेश्मा बुड्डेखान, कलावती कांबळे, रवि पारपोलकर, सुभाष कांबळे, जावेद पठाण यांनी चर्चत भाग घेतला. मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली.

चार महिन्यांनी गुन्हा दाखल ; तरुणाचा अपघाती मृत्यू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील एरंडोळ येथील १९ वर्षीय पारस प्रभाकर होलम या महाविद्यालयीन तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर तब्बल चार महिन्यांनी आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक १९ मार्च २०२६ रोजी सकाळी प्रभाकर होलम यांचा मुलगा पारस ( वय १९ वर्षे ) हा महिंद्रा पिकअप (MH-09-CU-2682) च्या पाठीमागील फाळक्यावर बसून आजरा ते उत्तुर रोडने जात होता. यावेळी चालक आकाश राजाराम नाईक रा. एरंडोळ याने वाहन भरधाव चालविल्याने पारस हा चालत्या वाहनातून खाली पडून गंभीर जखमी झाला. उपचारासाठी कोल्हापूरच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी फिर्यादी प्रभाकर शंकर होलम रा. एरंडोळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून काल दि. २१ जुलै रोजी आकाश नाईक याच्याविरुद्ध आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत.

संकेश्वर-वांदा महामार्गावरील अंतर कमी झाल्याने बस तिकीट दर कमी करा – शिवसेनेची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संकेश्वर ते बांदा हा महामार्ग आजरा तालुक्यातून जात असून या मार्गावरील अनेक वळणे काढल्यामुळे रस्त्याचे अंतर कमी झाले आहे. त्यामुळे आजरा-गडहिंग्लज आणि आजरा-आंबोलीकडे जाणाऱ्या एसटी बसच्या स्टेजेसही कमी झाल्या आहेत. तरी देखील प्रवाशांकडून जुन्या दरानेच पैसे घेतले जात आहेत.
या पार्श्वभूमीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आजरा तालुका प्रमुख श्री. युवराज पोवार यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी आजरा आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, विभागामार्फत सर्वे करून स्टेज कमी झालेल्या बस फेऱ्यांचे तिकीट दर तात्काळ कमी करण्यात यावेत. दिनांक या निवेदनावर शिवसेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
निवेदन देतेवेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख युवराज पोवार , दिनेश कांबळे,समीर चांद, युवा सेनेचे महेश पाटील, अमित गुरव, हरिश्चंद्र व्हरकटे, महादेव गुरव, उमेश डेळेकर, विजय कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

आदर्श युवा ग्रुपच्या गणेशोत्सव कार्यकारिणीची निवड

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर येथील आदर्श युवा ग्रुपच्या बैठकीत सन २०२६-२७ च्या गणेशोत्सवासाठी नवीन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली.
कार्याध्यक्षपदी जोतिबा पोवार, अध्यक्षपदी युवराज सपकाळ, उपाध्यक्षपदी सत्यजित देसाई, खजिनदारपदी सुधीर साळोखे, सचिवपदी ओंकार फाळके आणि प्रसिद्धीप्रमुख म्हणून रोहित बेडगे यांची बिनविरोध निवड झाली.आगामी गणेशोत्सव धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

पं.स.सभापती निवड कार्यक्रम जाहीर
सभापती अपात्रतेमुळे ३० जुलै रोजी फेरनिवड
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा पंचायत समिती सभापती जयश्री गाडे यांचा जात पडताळणी समितीकडून कुणबी जातीचा दाखला अवैध ठरविण्यात आला आहे. सौ.गाडे यांना उच्च न्यायालय मुंबई यांच्या सर्किट बेंच कोल्हापूर येथे दाद मागितली होती मात्र तांत्रिक कारणामुळे दाखला अवैध ठरला आहे.
सभापती अपात्र ठरल्याने जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी सभापती निवडीची विशेष सभा ३० जुलैला तहसीलदार समीर माने यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर केली आहे. या सभेच्या नोटीसा सदस्यांना लागू झाल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
सभापती हे नागरिकांचा मागास प्रवर्गा महिला राखीव आहे. आजमीतीस सभागृहात उपसभापती सौ. यशोदा पोवार ह्या एकमेव महिला प्रतिनिधी आहेत. त्यांच्या इतर मागास प्रवर्गाच्या दाखल्याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
दरम्यान जयश्री गाडे ह्या न्यायालयात स्थगिती मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना स्थगिती मिळाल्यास ही निवड प्रक्रिया थांबू शकते. आता उपसभापती निवडीचा कार्यक्रम हा जर-तर वर अवलंबून आहे. तांत्रिक अडचणींशी सामना करत याबाबतची पुढची कार्यवाही करण्याचे दिव्य करावे लागणार आहे.

आजचे पंचांग
दिनांक : २२ जुलै २०२६
वार : बुधवार
माह (अमावस्यांत) : आषाढ
माह (पूर्णिमांत) : आषाढ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : नवमी तिथी
नक्षत्र : स्वाती नक्षत्र (रात्री ११.०२ पर्यंत) त्यानंतर विशाखा नक्षत्र
योग : साध्य योग (सायंकाळी ०६.४१ पर्यंत) त्यानंतर शुभ योग
करण : बलवा करण (सायंकाळी ०६.०६ पर्यंत) त्यानंतर कौलव करण
चंद्र राशी : तूळ राशी
सूर्य राशी : कर्क राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी १२.४५ ते दुपारी ०२.२३ पर्यंत
सूर्योदय : सकाळी ०६.१३
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१७
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत
विशेष सूचना
बऱ्याच वेळा ‘ मृत्युंजय महान्यूज’ ची लिंक ओपन होत नाही अशा तक्रारी वाढलेल्या आहेत. लिंक ओपन करताना वायफाय वर ओपन न करता ती मोबाईल नेटवर्क सुरू करून ओपन केल्यास लवकर बातम्या पहावयास मिळतात.
कांही वेळा ट्राफिक जाममुळे/सर्वर मधील अडथळ्यामुळे लिंक लवकर ओपन होत नाही. थोडा वेळ थांबून लिंक ओपन करावी. काही तांत्रिक अडचणी सुरू आहेत. आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत.
….मुख्य संपादक


