

लव्हरला फोन …?
आजऱ्यात मारामारीत दोघे जखमी…
तिघांविरोधात
पोलिसात गुन्हा नोंद..
आजरा येथील पटेल कॉलनीतील वसीम इलीयास पटेल यांना फोनवरून तू माझ्या लव्हरला फोन का करतोस तुझा काय संबंध ? असे म्हणून शिवीगाळ केल्याचे पर्यवसान मारामारीत होऊन लोखंडी सळी, लाकडी टोणे व कोयत्याने झालेल्या या मारामारीत वसीम पटेल यांच्यासह जानशेर मुस्ताक पटेल याला बेदम मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी पोलिसांनी जावेद मोहम्मद पटेल, सलमान जावेद पटेल व अरबाज जावेद पटेल या तिघा विरोधात गुन्हा नोंद केला आहे.सदर प्रकार हा येथील संताजी पुलावर व पटेल कॉलनी येथे घडला.
याबाबत आजरा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवार दिनांक 17 रोजी जावेद मोहम्मद पटेल याने वसीम पटेल याला फोन करून तू माझ्या लव्हरला फोन का करतोस ? तुझा काय संबंध ? असे म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर वसीम याने मोटरसायकलवरून जाणा-या जावेद पटेल याला थांबवून आपणाला फोन करून शिव्या का देत होतास ? अशी विचारणा केली. याचा राग मनात धरून जावेद याने आपल्या हातात असणाऱ्या लोखंडी सळीने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याला अडवण्यासाठी जानशेर पटेल हे पुढे आले याच वेळी जानशेर व वसीम यांना जावेद यांच्यासह त्याच्या सोबत असणारे सलमान जावेद पटेल व अरबाज जावेद पटेल यांनी मारहाण करून जखमी केले असे या फिर्यादीत म्हटले आहे.
वसीम पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आजरा पोलिसात तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


देवर्डे येथून तरूण बेपत्ता..

देवर्डे (ता. आजरा) येथून अनिकेत सोमनाथ तेजम हा 22 वर्षीय तरुण राहत्या घरातून निघून गेला असून तो अद्याप परतला नाही अशी वर्दी आजरा पोलीस स्टेशनला सोमनाथ धोंडीबा तेजम यांनी दिली असून त्याचा शोध सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक 16 ऑगस्ट रोजी अनिकेत हा देवर्डे येथील राहत्या घरातून जनावरांच्या गोठ्याकडे जाऊन येतो असे सांगून बाहेर पडला तो अद्याप घरी परतलेला नाही.आजरा पोलिस पुढील तपास करीत आहेत.


पुनर्वसनासाठी संघटित संघर्ष करण्याचा सर्फनाला प्रकल्पग्रस्तांचा निर्धार…
पारपोली येथे रामलिंग मंदिरात मेळावा…

सर्फनाला प्रकल्पाने बाधित होणाऱ्या पारपोली, खेडगे आणि गावठाण मधील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली संघर्ष करण्याचा निर्धार आज पारपोली येथील रामलिंग मंदिरात झालेल्या मेळाव्यात करण्यात आला.
गोपाळ ढोकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि कॉ. संपत देसाई, निवृत्ती शेटगे व हरी सावंत यांच्या यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला. यावेळी तिन्ही गावांची श्रमिक मुक्ती दल प्रणित सर्फनाला प्रकल्पग्रस्त संघटना करण्यात आली. अध्यक्ष म्हणून अशोक मालव, उपाध्यक्ष म्हणून संतोष पाटील आणि धोंडिबा सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली.
मेळाव्याच्या सुरवातीला अमरसिंह ढोकरे यांनी प्रस्तावना करून सर्फनाला प्रकल्पातील तिन्ही गावे आता ईथुनपुढे पुनर्वसनासाठी संघटितपणे संघर्ष करतील असे सांगितले.
कॉ. संपत देसाई यांनी येणारे वर्ष हे आपल्यासाठी संघर्षाचे वर्ष आहे. पाटबंधारे खात्याने धरणात पाणी अडविण्याचे नियोजन केले आहे अशावेळी कोणीही प्रकल्पग्रस्त पुनर्वसनापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. यासाठी संघटितपणे संघर्ष करण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागणार आहे. पावसाळ्यानंतर आपला संघर्ष सुरू होणार असून त्याची तयारी आतापासूनच करावी लागणार आहे असे सांगितले.
अध्यक्षस्थानावरून बोलतांना गोपाळ ढोकरे म्हणाले , आम्ही कांही काळ गैरसमजातून थोडे बाजूला होतो पण आता तिन्ही गावे एकत्र आली असून या लढयात मी शेवटपर्यंत लोकांच्या सोबत आहे.
यावेळी अशोक मालव, प्रकाश शेटगे, संतोष पाटील, गंगाराम ढोकरे, गोविंद पाटील यांनीही मनोगते व्यक्त केली. ज्ञानेश्वर गुंजाळ, महादेव पाटील, श्रावण पवार, कमलाकर नालंग यांच्यासह तिन्ही गावचे प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने हजर होते.
लवकरच डॉ. भारत पाटणकर यांच्या उपस्थितीत सर्व प्रकल्पग्रस्त स्त्री पुरुषांसह व्यापक मेळावा घेण्याचे नियोजन करण्यात आले.




