गुरुवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२४

अखेर जमलं…
अशोकअण्णा आमदार आबिटकरांच्या पाठीशी…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
एकीकडे कागल व चंदगड विधानसभा मतदारसंघातील भूमिका स्पष्ट करत असताना राधानगरीचे आमदार प्रकाशराव आबिटकर यांना वेटिंगवर ठेवणाऱ्या अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांनी अखेर आमदार आबिटकर यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतल्याने आबिटकर प्रेमी कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला आहे.
गेल्या काही दिवसापासून राधानगरी मतदारसंघातील आपल्या कार्यकर्त्यांशी छोट्या- मोठ्या बैठकांच्याद्वारे संवाद साधण्याचे अशोकअण्णांचे काम सुरू होते. या बैठकांमधील बाहेर होणारी चर्चा ही संभ्रमावस्था निर्माण करणारी होती. आमदार आबिटकर यांना पाठिंबा द्यायचा की त्यांच्या विरोधात जायचे याविषयीचा निर्णय होण्यास विलंब लागला होता. लोकसभा निवडणुकीतील या मतदार संघाची स्थिती पाहता आमदार आबिटकर यांनाही अण्णांनी बाजूला होणे हे फारसे परवडणारे नव्हते.त्यांनीही वेळोवेळी स्वतः व बंधू प्रा. अर्जुन आबिटकर यांच्या माध्यमातून अण्णा गटाच्या कार्यकर्त्यांशी व अशोकअण्णा चराटी यांच्याशी बोलणी सुरू ठेवली होती.
गेले पंधरा दिवस पाठिंब्याबाबतचे काथ्याकूट सुरू होते. एकीकडे राजकीय वैर असणाऱ्या मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी महायुती धर्म म्हणून पाठीशी राहण्याचा निर्णय घेतलेल्या अशोकअण्णा चराटी यांनी राधानगरी मतदारसंघात केवळ कांही कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळे आबिटकर यांना विरोध करणे हे इतर कार्यकर्त्यांना रुचलेही नव्हते.
गेले दोन दिवस याबाबत मुंबई येथे चराटी व आबिटकर यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. अखेर दोघांच्यात दिलजमाई झाली असून विधानसभा निवडणुकीत अण्णाभाऊ गट आमदार आबिटकर यांच्या पाठीशी राहील असे चराटी यांनी स्पष्ट केल्याचेही समोर येत आहे.
शुक्रवारी याबाबत कार्यकर्त्यांचा मेळावा बोलवण्यात आला असून यामध्ये कागल व राधानगरी मतदारसंघातील भूमिका अधिकृतरित्या स्पष्ट केले जाणार असल्याचे चराटी यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

शिवाजीराव सावंत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस साहित्य कृती भेट

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
‘मृत्युंजय महान्यूज’ परिवाराच्या वतीने आजरा येथील शिवाजीराव सावंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस (ITI)’मृत्युंजय’ कार शिवाजीराव सावंत यांच्या साहित्यकृती मुख्य संपादक ज्योतिप्रसाद सावंत व सुधीर कुंभार यांच्या हस्ते भेट देण्यात आल्या.
यावेळी संस्थेचे प्राचार्य ए. एस. देसाई, बी. आर. मंगल, ए.टी. मस्करे, अमित ढवळ यांच्यासह संस्थेचे शिक्षक उपस्थित होते.

वादळी पावसात शिरसंगी परिसरातील पिके भुईसपाट

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिरसंगी परिसरात काल सायंकाळी सहा वाजता वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पडलेल्या पावसाने ऊस पिक भुई सपाट झाले असून भात पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गेले पंधरा दिवस पाऊस सुरूच असून यामुळे भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. काल सायंकाळी सहा वाजता वादळी वारे व गारांसह ढगफूटी सदृश्य पाऊस झाल्याने या भागातील ऊसपिक भुईसपाट झाले आहे. तर गारा पडल्यामुळे आता तोंडाशी आलेल्या भातपिकाचेही नुकसान झाले आहे.

दालमिया फौंडेशन कडून वाटंगी शाळेला ई-लर्निंग संच

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वाटंगी येथील प्राथमिक शाळेला दालमिया भारत फौंडेशन , आसुर्ले पोर्ले पन्हाळा यांचेवतीने ई- लर्निंग संच प्राप्त झाला आहे. वाटंगी येथील दालमिया शुगर हेड शिवप्रसाद दादा देसाई यांच्या माध्यमातून हा संच उपलब्ध झाला आहे .
या कामी माजी सरपंच संजय पोवार , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल तेजम, कारखाना संचालक शिवाजी नांदवडेकर, शाळा व्यवस्थापन शिक्षण तज्ज्ञ शिवाजी गिलबिले , श्री. विजय देसाई, सरपंच मधुकर जाधव, उपसरपंच सौ.मिनाक्षी देसाई , शाळा व्यवस्थापन उपाध्यक्ष सौ. मनिषा बिरजे , संदिप देसाई, उमेश घोरपडे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य तसेच मुख्याध्यापक श्री सुनिल कामत यांनी विशेष प्रयत्न केले .

निधन वार्ता
मारुती कांबळे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिरसंगी ता.आजरा येथील रहिवासी व सेवानिवृत्त शिक्षक मारुती लक्ष्मण कांबळे (वय ८३ वर्षे) यांचे अल्पश: आजाराने पुणे येथे निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुलगी व एक मुलगी असा परिवार आहे. शिरसंगी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सांगलीत महापालिका शाळेत तब्बल ४० विद्यार्थ्यांना मारहाण,
शिक्षिका निलंबित!

सांगली
महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील ४० मुलांना मारहाण केल्या प्रकरणी एका शिक्षिकेला निलंबित करण्यात आले असून मुख्याध्यापकांची अन्य शाळेत बदली करण्याचे आदेश आयुक्त शुभम गुप्ता यांनी मंगळवारी आदेश दिले.
सांगली महानगरपालिका प्राथमिक शाळा क्र. ३९ मध्ये १७ ऑक्टोबर रोजी सहायक शिक्षिका विजया सुरेश शिंगाडे यांच्याकडून सुमारे ४० विद्यार्थ्यांना मारहाणीचा प्रकार घडला होता. याबाबत पालक व विद्यार्थी यांनी तक्रार केलेली होती.
या प्रकरणी महापालिकेच्या उपायुक्त विजया यादव, सहायक आयुक्त सचिन सागावकर व प्रशासन अधिकारी रंगराव आठवले यांनी चौकशी केली असता विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचे निष्पन्न झाले. ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याने आयुक्त गुप्ता यांनी नोंद घेऊन शाळेचे मुख्याध्यापक मारुती माळी यांची बदली तर शिक्षिका श्रीमती शिंगाडे यांच्यावर निलंबनाची कारवाई मंगळवारी केली.
(viral news…online news)
लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..
तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त…
✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
✅ इतर अनेक सुविधा


🏡साईटचा पत्ता :
समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा
☎️ संपर्क –
+91 9527 97 3969



