


धमकी दिल्याप्रकरणी आरदाळ येथील तिघा विरोधात गुन्हा नोंद…

आजरा:प्रतिनिधी
शेतात नांगरणी सुरू असताना ट्रॅक्टर अडवून शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरदाळ (या.आजरा) येथील मधुकर शेळके, आनंदा सोळांकुर यांच्यासह मडीलगे येथील अनिता जनार्दन शेळके यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद सौ.सुचिता सुभाष गोईलकर रा. वसई, बेस जि. पालघर सध्या राहणार भादवण यांनी आजरा पोलिसात दिली आहे. गोईलकर व त्यांच्या परिवारातील मंडळी आरदाळ येथील गट नंबर ३६३ ही जमीन नांगरणी करण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन गेले असता तेथे शेळके व सोळांकूर यांनी येऊन ट्रॅक्टर अडवून ट्रॅक्टर चालकासह गोईलकर परिवारातील मंडळींना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे.




सन्मानजनक तोडगा निघाल्यास बिनविरोधसाठी तयार : अशोक चराटी

प्रतिनिधी:आजरा
आजरा साखर कारखाना चांगल्या पद्धतीने चालला पाहिजे अशी आपली भूमिका आहे. त्यामुळेच कारखाना निवडणूक बिनविरोधसाठी आपण प्रयत्नशील असल्याचे मत अशोक चराटी यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केले. या पत्रकार बैठकीला संचालक दिगंबर देसाई, मलिककुमार बुरूड, दशरथ अमृते उपस्थित होते.
कारखान्याचे हित डोळ्यासमोर ठेवून निवडणूक बिनविरोध करण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. यासाठी खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे यांच्या भेटी घेऊन आपल्या गटाची भूमिका मांडली आहे. गेल्या निवडणुकीत आमच्या पॅनेलचे ११ संचालक निवडून आले होते. त्यापैकी दोन संचालक विरोधी आघाडीत गेले असले तरी ९ संचालक आमचे आहेत. याशिवाय जयवंतराव शिंपी आणि आम्ही एकत्र असून शिंपी यांचे तीन संचालक कारखान्यात आहेत, त्याअनुषंगाने चराटी- शिंपी आघाडीला योग्य जागा देऊन सन्माजनक तोडगा जिल्ह्यातील नेते काढतील अशी अपेक्षा असल्याचे संचालक मलिककुमार बुरूड यांनी सांगितले.

गेल्या दोन वर्षात आम्ही विरोधी बाकावर असतानाही कारखाना सुरू करण्यासाठी आणि तो चालविण्यासाठी चेअरमन आणि सत्ताधारी गटाला सर्वतोपरी सहकार्य केले आहे. त्यापूर्वी काय झाले हे सर्वज्ञात आहे. काठावरच्या बहुमताचा फटका कारखान्याला बसू नये यासाठी कारखाना बिनविरोध झाला पाहिजे, कारखाना बिनविरोध करण्यासाठी विद्यमान संचालकांना थांबावे लागले तरी आमच्या सर्व उमेदवारांची तयारी असून उमेदवारीचे सर्वाधिकार चराटी यांना असल्याचे दशरथ अमृते, मलिक बुरूड यांनी स्पष्ट केले. आम्ही आमच्या गटाकडून उमेदवारी अर्ज भरलेल्या सर्वांच्या माघारीच्या अर्जावर सह्या घेतल्या आहेत.
आता लक्ष सत्तारुढांच्या भूमिकेकडे…
अशोकअण्णा चराटी यांनी दोन पावले मागे येण्याची तयारी दर्शवत बिनविरोधची भूमिका थेट पत्रकार परिषदेद्वारे समोर ठेवल्याने आता सत्तारूढ मंडळी काय भूमिका घेणार ? यावरही कारखान्याच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे




मोटरपंपधारकांची
सोमवारी व्यापक बैठक

आजरा:प्रतिनिधी
पाटबंधारे खात्याने सर्व मोटरपंप धारकांना जलमापकयंत्र (वॉटर मीटर) बसविण्याच्या केलेल्या सक्तीविरोधात निर्णय करण्यासाठी व जलमापक यंत्र न बसवल्यास दीड पट दंडाची पाणी पट्टी शेतकऱ्यांवर लादणाऱ्या शासन निर्णयासह अन्यायी पाणीपट्टी वाढ करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणाऱ्या शासन निर्णयाला विरोध करण्यासाठी उद्या सोमवार दि २७ नोव्हेंबर २०२३ रोजी ठीक ११.३० वाजता तालुक्यातील मोटार पंप धारक शेतकऱ्यांची व्यापक बैठक किसान भवन येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती काँ. संपत देसाई यांनी दिली.




संविधान दिनानिमित्त आजऱ्यात आज विशेष कार्यक्रम

आजरा:प्रतिनिधी
७४ व्या संविधान दिनानिमित्त आजरा येथे आज रविवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
उर्दू हायस्कूल येथे सकाळी साडेदहा वाजता सदर कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमानिमित्त प्राचार्य डॉ.आनंद मेणसे यांचे व्याख्यान होणार आहे.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. नवनाथ शिंदे हे राहणार आहेत.




छायावृत्त…

आजरा येथील शिवसेना (उ.बा.ठा.)चे शहर प्रमुख ओंकार माद्याळकर व उद्योजक अश्विन डोंगरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.





