mrityunjaymahanews
अन्य

रविवार सातच्या बातम्या

रविवार दि.१ नोव्हेंबर २०२६


मसोली येथे वाघाच्या हल्ल्यात गवारेडा ठार…?

आजरा : प्रतिनिधी

मसोली ता. आजरा येथे गायरान परिसराच्या हद्दी मध्ये वाघाने हल्ला करून गवारेडा ठार केल्याची घटना घडली असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली याला वनविभागानेही दुजोरा दिला आहे.

गायरान हद्दीमध्ये शनिवारी दुपारी सदर हल्ल्याचा प्रकार घडला. हल्ल्यानंतर येथे गवा अर्धवट खाल्लेल्या स्थितीत आढळून आला. रात्री उशिरा सदर माहिती वनविभागाला समजल्याने आज रविवारी सकाळी लवकर वनविभागाचे पथक घटनास्थळी जाणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.

बहिरेवाडीतील घरफोडीचा गुन्हा उघड…

८ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त

आजरा : प्रतिनिधी

आजरा तालुव्यातील बहिरेवाडी येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावष्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. या प्रकरणी संशयित कपिल प्रकाश सातवेकर (रा. बसवेश्वर देवालय, पिंपळगाव खुर्द, ता. कागल) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ८ लाख २२ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. २५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत बहिरेवाडी (ता. आजरा) येथील संजय दत्तात्रय इंचनाळकर यांच्या राहत्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेले होते. याप्रकरणी आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस अधिक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपासाची चक्रे फिरवली. गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेतला आला. पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्यांची कबुली दिली.चोरीचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले. त्याच्याविरुद्ध कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे १५ गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक नीलोत्पल, अपर पोलीस आधेक्षक अनंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच युवराज पाटील, योगेश गाळ, अमित सजेग्वेर, रोहित मदाने, समीर कांबळे, संदीप गायकवाड, राजू कोरे, सतीश जंगम, संजय हुबे, अशोक पवार, सतीश सूर्यवंशी आणि अमित मर्दाने यांनी केली.

(छायाचित्र : संशयित आरोपी-कपिल सातवेकर व कारवाई सहभागी झालेले स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस कर्मचारी )

उत्तूर–चव्हाणवाडी रस्त्यावर रात्री ८ च्या सुमारास बिबट्याचे दर्शन

उत्तूर : प्रतिनिधी

उत्तूर–चव्हाणवाडी रस्त्यावर शनिवारी रात्री आठच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. विजय कुराडे व कुटुंबीय रात्री घरा शेजारी शतपावली करत असताना अचानक बिबट्या समोरून जाताना दिसला. तसेच परिसरातील ऊसतोड कामगारांनाही बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

उत्तूर परिसरातील चव्हाणवाडी, बेलेवाडी आणि आसपासच्या भागांत गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे समोर येत आहे. यापूर्वीही या परिसरात बिबट्या दिसल्याच्या घटना घडल्या आहेत. आता उत्तूर-चव्हाणवाडी रस्त्यावर रात्रीच्या वेळी बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
या घटनेची माहिती मिळताच बिबट्याचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. वनविभागाने परिसरात पाहणी करून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना सावधगिरी बाळगावी. बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला हुसकावण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आले आहे.

व्यंकटराव हायस्कूलमध्ये  कायदेविषयक मार्गदर्शन संपन्न

आजरा : प्रतिनिधी

व्यंकटराव शिक्षण संकुल आजरा व वकील बार असोसिएशन तालुका विधी समिती आजरा यांचे संयुक्त विद्यमाने व्यंकटराव हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम दिवानी न्यायाधीश आर. पी. थोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.. या कार्यक्रमात आजरा बार असोसिएशनचे अध्यक्ष एस.आर. पोवार यांनी कायदेविषयक मार्गदर्शन करताना महिला कायदे वारसा हक्क जमीन कायदे व शिक्षणाचा हक्क हा मूलभूत अधिकार, फौजदारी कायदे ,दिवाणी कायदे, याविषयी माहिती सांगितली. व लैंगिक आकर्षनापासून दूर रहावे बालविवाह विरोध करावा अशी भावनिक साद घातली.

श्रीमती ॲड. सुनिता पाटील यांनी “ज्ञमाझे शरीर माझी सुरक्षा ” यांविषयी माहिती व मार्गदर्शन केले. पोक्सो कायदा व चाइल्ड हेल्पलाइन नंबर याविषयीची माहिती एडवोकेट एस आर चव्हाण यांनी दिली. या कार्यक्रमासाठी आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयंतराव शिंपी प्राचार्य एस. एन. पाटील पर्यवेक्षिका व्हि. जे. शेलार उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. न्यायमूर्ती आर.पी.थोरे व आजरा बार असोसिएशनचे अध्यक्ष संजय पवार यांचा सत्कार व स्वागत आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते करण्यात आले. ॲड. आजगेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले . सूत्रसंचालन व आभार डी.आर. पाटील यांनी केले.

या कार्यक्रमासाठी आजरा बार असोसिएशनचे सर्व सदस्य, प्रशालेतील सर्व शिक्षक ,विद्यार्थी उपस्थित होते.

 जनता सहकारी बँकेच्या सभासदांना १०% डिव्हीडंड, कर्मचाऱ्यांना दहा हजार पर्यंत पगार वाढ व २०% बोनस जाहीर

आजरा : प्रतिनिधी

जनता सहकरी बँक लि., आजरा या बँकेच्या कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोबर २०२६ पासून रु.३००० ते रु.१०००० पर्यंत अशी भरघोस पगार वाढ व सन २०२५-२६ साठी २०% बोनस देण्याची घोषणा बँकेचे चेअरमन मा. मुकुंददादा देसाई यांनी केली.

बँकेच्या प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान असून बँकेचे संचालक / कर्मचारी यांचे प्रयत्नाने बँकेच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे बँकेकडे ३० सप्टेंबर २०२६ अखेर ५०१.४१ कोटीच्या ठेवी व ३३३.२४ कोटीचे कर्जे वितरीत केले आहेत अशी भरघोस वाढ झाली आहे.

बँकेची दिवसेंदिवस नेत्रदीपक प्रगती होत असून मार्च २०२७ अखेर ५५०.०० कोटीच्या ठेवी व ३७५.०० कोटीचे कर्ज उद्दिष्ट ठेवेलेले आहे. बँकेकडे ३० सप्टेंबर २०२६ अखेर ७०००० हजार खातेदार असून सभासद संख्या ३५०९९ इतकी आहे. बँकेने रिझर्व बँक ऑफ इंडिया चे ECBA (FSWM) यांचे निकष पूर्ण केले असून रु. ९०० कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला असून बँकेला देशातील सर्वोत्कृष्ट बँक म्हणून सहाव्यांदा सन्मानित केले आहे.

बँकेने दसरा- दिपावाली सनानिमित्त कार लोन ९%, व्यावसाईक वाहन १०%, घरबांधणी कर्ज ९%, सोनेतारण १०% यासारख्या अनेक कर्ज योजना जाहीर केल्या आहेत त्याचा लाभ सभासदांनी घ्यावा. बँकेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजनेमार्फत १३७३ सभासदांना १५०.६० कोटी कर्जवाटप केलेले आहे. बँकेने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया कर्ज योजना यासारख्या योजनांना कर्ज पुरवठा केलेला आहे. बँकेचे चेअरमन मुकुंददादा देसाई यांनी जनरल मिटींगमध्ये केलेल्या घोषणेप्रमाणे सभासदांना १०% डिव्हीडंड व नोकरांना पगारवाढ या घोषणेची पूर्तता केलेली आहे. त्यामुळे सभासद व कर्मचारी यासह सर्व घटकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

बँकेचे चेअरमन मुकुंददादा देसाई, व्हा. चेअरमन अमित सामंत, जेष्ठ संचालक जयवंतराव शिंपी, महादेव टोपले, रणजीतदादा देसाई, विक्रम देसाई, शिवाजी पाटील व अन्य संचालक तसेच बँकेचे सीईओ एम. बी. पाटील, असि. मॅनेजर पी. ए. सरंबळे, अकौंटंट एस. एच. चौगुले, वसुली अधिकारी एम. वाय. सावंत व अन्य कर्मचारी यांचे बँकेच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान आहे.

कैलासवासी बाबुरावजी कुंभार स्मृती चषकावर शृंगारवाडी वॉरियर्सचे वर्चस्व

आजऱ्यातील भव्य ओपन कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न; १६ संघांचा सहभाग

आजरा : प्रतिनिधी

आजरा तालुक्याचे ज्येष्ठ लोकनेते तथा भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत नेते कैलासवासी बाबुरावजी कुंभार यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त कैलासवासी बाबुरावजी कुंभार विचार मंचच्या वतीने आयोजित भव्य ओपन कबड्डी स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या. गुरुवार, दि. २९ व शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी पंडित दीनदयाळ विद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील नामांकित १६ कबड्डी संघांनी सहभाग घेतला. विविध क्षेत्रांतील पदाधिकारी, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. चुरशीच्या आणि रंगतदार सामन्यांमुळे कबड्डीप्रेमींना दर्जेदार खेळाचा आनंद घेता आला. आजऱ्यातील क्रीडाप्रेमींसाठी ही स्पर्धा पर्वणी ठरली.

अत्यंत अटीतटीच्या सामन्यांनंतर शृंगारवाडी वॉरियर्स संघाने अंतिम विजेतेपद पटकावत कैलासवासी बाबुरावजी कुंभार स्मृती चषकावर आपले नाव कोरले. शिवमुद्रा कवलव संघाने द्वितीय, मडिलगे संघाने तृतीय, तर नवभारत शिरोली संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला.

वैयक्तिक व विशेष पुरस्कार पुढीलप्रमाणे :

– आदर्श संघ : रवळनाथ कडलगे
– उत्कृष्ट खेळाडू : निखिल बर्गे
– उत्कृष्ट पकड : राजवर्धन लोंढे
– उत्कृष्ट चढाई : अभिषेक गुंगे

स्पर्धेच्या समारोपप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, भैय्यासाहेब आबिटकर, भारती ताई जाधव, श्रीमती सोनाबाई बाबुराव कुंभार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना आकर्षक चषक आणि पारितोषिके प्रदान करण्यात आली..

रवळनाथ पतसंस्थेकडून कर्मचाऱ्यांना १६ टक्के बोनसची दिवाळी भेट

आजरा : प्रतिनिधी

श्री रवळनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, आजरा यांच्या वतीने दिवाळीनिमित्त संस्थेतील कर्मचाऱ्यांना १६ टक्के बोनस म्हणजेच दोन पगारांची रक्कम देण्यात आली. याशिवाय दिवाळी फराळ आणि आवश्यक साहित्याचेही वाटप करण्यात आले. संस्थेच्या या निर्णयामुळे कर्मचारीवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचा आणि संस्थेच्या प्रगतीतील त्यांच्या योगदानाचा गौरव म्हणून दरवर्षी दिवाळीनिमित्त बोनस दिला जातो. यंदाही संस्थेने १६ टक्के बोनस देत कर्मचाऱ्यांना दोन पगारांची भेट दिली आहे. त्याचबरोबर दिवाळी फराळ आणि साहित्य देऊन सणाचा आनंद द्विगुणित केला आहे.

यावेळी संस्थेचे चेअरमन अभिषेक शिंपी यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीची माहिती देताना संस्थेच्या ठेवी २७ कोटी रुपयांच्या पुढे गेल्याचे सांगितले. सभासद, ठेवीदार आणि ग्राहकांनी संस्थेवर दाखविलेला विश्वास तसेच संचालक मंडळ आणि कर्मचारीवर्गाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे संस्थेची आर्थिक वाटचाल अधिक भक्कम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी व्हा. चेअरमन समीर गुंजाटी, संचालक माजिद मुराद, युसुफ गवसेकर, विक्रम पटेकर, किरण कांबळे, इब्राहिम इंचनाळकर, विलास कुंभार, विश्वास जाधव, सुधीर नार्वेकर, सौ. अर्चना मराठे, सौ. माधुरी पाचवडेकर व व्यवस्थापक विश्वास हरेर उपस्थित होते. कर्मचाऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत त्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक पाठबळ देण्याच्या संस्थेच्या या निर्णयाचे कर्मचारीवर्गातून स्वागत होत आहे.

आजचे पंचांग 

दिनांक : १ नोव्हेंबर २०२६
वार : रविवार
माह (अमावस्यांत) : आश्विन
माह (पूर्णिमांत) : कार्तिक
ऋतु : हेमंत
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : सप्तमी तिथी (दुपारी ०२.५१ पर्यंत) त्यानंतर अष्टमी तिथी
नक्षत्र : पुष्य नक्षत्र (१ नोव्हेंबर पहाटे ०४.३० पर्यंत) त्यानंतर आश्लेषा नक्षत्र
योग : साध्य योग (दुपारी ०२.३८ पर्यंत) त्यानंतर शुभ योग
करण : भाव करण (दुपारी ०२.५१ पर्यंत) त्यानंतर बलवा करण
चंद्र राशी : कर्क राशी
सूर्य राशी : तूळ राशी
अशुभ मुहूर्त :
राहु काळ : सायंकाळी ०४.३८ ते सायंकाळी ०६.०४ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : सकाळी ११.५९ ते दुपारी १२.४५
सूर्योदय : सकाळी ०६.४०
सूर्यास्त : सायंकाळी ०६.०४
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

विजय गवंडळकर यांचे निधन

mrityunjay mahanews

गुरुनाथ यांचा अखेर मृत्यू….

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!