


चतुर्थी आली…
शिमगा सुरू…खाजगी आराम बस चालकांकडून प्रवाशांची लूट सुरू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गणेश चतुर्थी जसजशी जवळ येईल तसतसे तालुक्यातील मुंबईकर चाकरमान्यांना चतुर्थीसाठी गावी येण्याचे वेध लागले आहेत. याचा फायदा उठवत खाजगी आराम बस व्यावसायिकांनी प्रवास दरामध्ये प्रचंड वाढ करण्यास सुरुवात केली असून प्रति प्रवासी मुंबईहून आजरा येथे येण्याचे दर आत्ताच पंधराशे रुपये प्रमाणे आकारून बुकिंग सुरू केले आहे. चतुर्थी पर्यंत हे दर दोन हजार रुपये पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. मे महिन्यामध्ये उन्हाळी सुट्टीला आलेला चाकरमानी परत चतुर्थीच्या निमित्ताने गावी येण्यास इच्छुक आहे. गावी परतण्याची इच्छा असली तरीही प्रवास भाड्याचा अडसर कायम आहे. लग्नाचे वीस… आणि वाजपाचे तीस अशी अवस्था चाकरमान्यांची झाली आहे. प्रवास खर्चालाच भरमसाठ पैसे जाणार असल्याने गावी यावे की नाही ? अशी संभ्रमावस्था मुंबईकरांमध्ये आहे.
सामाजिक संस्थांनी तसेच गावागावातील लोकप्रतिनिधींनी या खाजगी बस दर आकारणीवर आवाज उठवून नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. अन्यथा सर्वसामान्यांचे गावी परतण्याचे स्वप्न भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आगाराने बसफे-या वाढवण्याची गरज…
आजरा आगाराने मुंबई मार्गावरील बस फेऱ्यांचे तातडीने नियोजन करण्याची गरज आहे. ते नियोजन प्रवाशांपर्यंत पोहोचवून आरक्षण सुरू करणे आवश्यक आहे.

‘व्यंकटराव’ समोरील वाहनांची गती रोखणार तरी कधी ?

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
नव्याने करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजराचे वर्ग भरतात. या ठिकाणी विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. या परिसरातील महामार्गाचे काम पूर्ण होऊन दोन ते तीन महिन्यांचा कालावधी होत आला आहे परंतु वाहनांच्या वेग मर्यादांना आवर घालण्यासाठी शाळा असणारे फलक,गती मर्यादा दर्शवणारे फलक, नो पार्किंग फलक कोठेही दिसत नाहीत.
अपघातास प्रतिबंध करण्यासाठी रस्त्यावर पांढरे पट्टे व गतिरोधकपण नाहीत. भरीस भर म्हणून पंचायत समिती ते संभाजी चौक परिसरात मनमानी पद्धतीने दुचाकी व चारचाकी गाड्यांचे पार्किंग केलेले दिसते.
स्थानिक तहसीलदार , प्रांत , सार्वजनिक बांधकाम, आमदार , हायवे ॲथॉरीटी ऑफ इंडिया व जिल्हा अधिकारी कोल्हापूर यांचेकडे लेखी पाठपुरावा सुरू असूनही याकडे अद्याप दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.
या मार्गावर विद्यार्थ्यांबाबत एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण ? असा सवालही आता उपस्थित केला जात आहे.

देवस्थान जमीन धारक व खंडकरी शेतकऱ्यांची उत्तुर येथे बैठक संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
देवस्थान जमीन धारक खंडकरी शेतकऱ्यांचा व पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या २३ ऑगस्ट रोजी निघणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर उत्तूर येथे बैठक पार पडली.
तालुक्यातून जास्तीत जास्त देवस्थान जमीन धारक शेतकरी सहभागी होण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. बैठकीसाठी अखिल भारतीय किसान सभा नेतृत्व करणार आहे. या आजरा तालुक्याच्या बैठकीसाठी बाळासाहेब कामत व शिवाजी गुरव यांनी मार्गदर्शन केले.
नुकताच महाराष्ट्र शासनाने मराठवाड्यातील देवस्थानच्या वर्ग दोन च्या जमिनी वर्ग एक मध्ये करण्यास तात्विक पातळीवर निर्णय घेतला आहे त्याप्रमाणे किसान सभेला लेखी आश्वासन दिल्याप्रमाणे संपूर्ण राज्यासाठी कायदा करून देवस्थान इनाम जमीन असणाऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या नावे करावी यासाठी हा मोर्चा निघणार असल्याचे शिवाजी गुरव यांनी बैठकीत सांगितले .
बैठकीला उत्तुर,आरदाळ, मुुम्मेवाडी, होन्याळी भादवण,पेंढारवाडी इत्यादी गावचे शेतकरी उपस्थित होते.

मानवी जीवन शांतीमुळे सुख व समाधानी : भगवान भाई

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आपल्या विचारांचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. सकारात्मक विचारांचा व नकारात्मक विचारांचे विविध परिणाम होत असतात. क्रोधामुळे आत्मबल व मनोबल कमजोर होते अनेक समस्या निर्माण होतात माणसाचे जीवन उध्वस्त होते. याउलट शांती मुळे माणसाचे जीवन सुख-समाधानाने भरून जाते.मनामध्ये चालणाऱ्या नकारात्मक विचारांचा समाजावर काय परिणाम होतो क्रोधामुळे समस्या कशा वाढतात याची माहिती ब्रह्माकुमारी आजरा या ठिकाणी आयोजित कार्यक्रमांमध्ये माउंट आबूहून आलेले बी के भगवानभाई यांनी दिली. अध्यक्षस्थानी डॉक्टर संजय चराटी होते.
आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त सारिका गुरव तसेच ब्रह्माकुमारीच्या आजरा- चंदगड – गडहिंग्लज विभागाच्या प्रमुख संध्या बहेनजी उपस्थित होत्या.
डॉ. संजय चराटी यांनी ‘भारताच्या विकासातील तरुणांची भूमिका’ यावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमास आजरा, उत्तुर, मडिलगे, देवर्डे येथून मोठ्या संख्येने नागरिक आले होते.



