बुधवार दि.५ फेब्रुवारी २०२५


पेद्रेवाडीत काजूच्या ४५० झाडांसह गवत आगीच्या भक्ष्यस्थानी…
सूडबुद्धीने आग लावल्याची पोलीसांत तक्रार…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेद्रेवाडी तालुका आजरा येथील सौ. विद्या वसंतराव चव्हाण यांच्या मालकीच्या गट नंबर ७१९/३ मधील ४५० काजूची झाडे व गवत हद्दीच्या वादातून सूडबुद्धीने पेटवले असल्याची तक्रार आजरा पोलिसात दिली आहे.
मंगळवार दिनांक ४ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास या काजू झाडांना व गवताला आग लागली. यामध्ये मोहरलेली ४५० काजूची झाडे व गवत आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले व सुमारे लाखभर रुपयांचे नुकसान झाले. शेजारी असणाऱ्या शेत जमिनीशी संबंधित मंडळींशी जमिनीच्या हद्दीचा वाद असून या वादातूनच हेतू पुरस्सर सुडबुद्धिने सदर आग लावली असल्याची तक्रार सौ. विद्या चव्हाण यांनी पोलिसात दिली आहे.

‘व्यंकटराव’ बनले सायन्स ॲकॅडमी…
स्थानिक डॉक्टर इंजिनिअर बनवण्यासाठी पुढाकार

आजरा तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या प्रवेश परिक्षांना सामोरे जाण्यास सज्ज करण्यासाठी आजरा एक महाल शिक्षण संस्था संचलित व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे ‘ व्यंकटराव सायन्स ॲकॅडमी ‘ सुरु करण्यात आली आहे. ज्यामध्ये इयत्ता आठवी, नववी व दहावी करीता फाउंडेशन कोर्स, इयत्ता अकरावी व बारावी करिता पुर्णवेळ ॲकॅडमी कोर्स व बारावी परिक्षा झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षा क्रॅाश कोर्स असे सर्व अभ्यासक्रम घेण्यात येणार आहेत यामुळे आता तालुक्यातील विद्यार्थ्यांचे डॉक्टर व इंजिनिअर बनण्याचे स्वप्न अल्प खर्चात व स्थानिक पातळीवर साकार होण्यास मदत होणार आहे अशी माहिती आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी दिली.
मेडिकलसह इंजिनियर क्षेत्रात स्वतःचे भवितव्य घडवण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे. या अकॅडमी अंतर्गत आठवी नववी व दहावीसाठी फाउंडेशन कोर्स, अकरावी व बारावीसाठी पूर्ण वेळ अकॅडमी, बारावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी क्रॅश कोर्स सुविधा NEET, IIT- JEE, BOARD + MHT + CET परीक्षा तयारीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तज्ञ व मार्गदर्शक शिक्षकांची स्वतंत्र फळी याकरीता तयार करण्यात आली आहे. याबरोबर बोर्ड परीक्षा भाषा विषय व प्रॅक्टिकलची पूर्तता एका छताखाली होणार असून वैयक्तिक मार्गदर्शन, ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डेड लेक्चर्स, टेस्ट सिरीज व इव्हॅल्युशन, डाऊन सेशन आणि विकली पॅरेंट रिव्ह्यू ,बायोमेट्रिक हजेरी प्रणाली अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.सन २०२५-२६ वर्षाकरिता प्रवेश सुरू असल्याचे अध्यक्ष शिंपी यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी संस्थेशी संपर्क साधण्याच्या आवाहनही त्यांनी केले आहे.

आज-यातील रिक्षा चालक रस्त्यावर…?
जागेचा प्रश्न ऐरणीवर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरातील बस स्थानक परिसरात रिक्षा लावण्यास व्यवस्थापनाने प्रतिबंध केल्याने रिक्षा चालकांवर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. बस स्थानक आवारात रिक्षा लावण्यास एस.टी. प्रशासनाचा विरोध तर बस स्थानकाबाहेर रिक्षा लावण्यास राष्ट्रीय महामार्ग विभागाचा अडसर अशा विचित्र परिस्थितीत रिक्षा चालक दिसत आहेत.
शहरामध्ये मोठ्या संख्येने असणारे सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी रिक्षा व्यवसाय उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पत्करला आहे. संकेश्वर – बांदा महामार्गाचे काम सुरू असताना बस स्थानकाच्या बाहेरील बाजूस रस्त्याशेजारी रिक्षा थांबवून व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांना पर्यायी व्यवस्था म्हणून बस स्थानकाच्या आतील बाजूस रिक्षा उभा करण्याची तात्पुरती मुभा देण्यात आली होती.
रस्त्याचे काम पूर्ण होताच एसटी व्यवस्थापनाने रिक्षा बस स्थानक परिसरात उभा करण्यास प्रतिबंध केला आहे. यामुळे सध्या बस स्थानकाच्या बाहेरील बाजूस पूर्वीच्या जागी रिक्षा स्टॉप तयार करण्यात आला आहे. परंतु सध्या हा महामार्ग बनल्याने व मुळातच येथे रस्त्याची रुंदी कमी असल्याने उभा केल्या जाणाऱ्या रिक्षा वाहतुकीला अडसर ठरू लागलेल्या आहेत. मर्यादित जागेवर मोठ्या संख्येने असणाऱ्या रिक्षा लावताना रिक्षा चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. हा प्रश्न एसटी महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग यांच्या अखत्यारीतील आहे असे स्पष्ट करून नगरपंचायतीने या प्रश्नी हात झटकले आहेत.
या सर्व प्रकारात हातावरचे पोट असणाऱ्या रिक्षा चालकांना मात्र रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.
तीन फूट जागेचा प्रश्न...
बस स्थानकाच्या समोरील बाजूस असणाऱ्या सुरक्षा कुंपणाजवळ तीन फूट जागा एसटी महामंडळाने उपलब्ध करून दिल्यास सदर प्रश्न मार्गी लागू शकतो असे रिक्षा चालकांचे मत आहे. तशी मागणीही केली जात आहे. एसटी महामंडळ या मागणीकडे कितपत गांभीर्याने पाहणार यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.

चोरट्यांचा बंदोबस्त करा… उबाठा सेनेची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
तालुक्यात होणाऱ्या चो-या रोखून चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने करण्यात आली आहे.आजरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर याना निवेदन देण्यात आले.
निवेदनात गेल्या काही दिवसांपासून आजरा शहर परिसरात चोरीचे प्रमाण वाढले आहे. चोरट्यांकडून बंद धरे लक्ष्य केली जात आहेत. तालुक्यातील सर्वसामान्य व गरीब जनतेने कष्टाने मिळवलेले पैसे व दागिने तसेच संसारोपयोगी साहित्य लंपास केले जात आहे. तालुक्यात झालेल्या चोऱ्यांचा तात्काळ तपास लावून चोरट्यांचा शोध घ्यावा व त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे म्हटले आहे.
युवा सेना उपजिल्हा प्रमुख महेश पाटील, शहर प्रमुख ओमकार माद्याळकर, उपशहर प्रमुख अनपाल तकिलदार, रविंद्र सावंत, हनमंत पाटील, साहिल देसाई, समीर याद दिलीप चव्हाण, प्रसाद कांबळे यांच्या निवेदनावर सहया आहेत.


त्रिवेणी चे गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

उत्तुर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर येथील त्रिवेणी सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा संस्थेचे सन २०२५ चे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. संस्थेमार्फत प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा पुरस्कार देवून गौरव करण्यात येतो.
यंदा या पुरस्काराचे मानकरी पुढील प्रमाणे –
दादा नाईक गुणवंत शिक्षक पुरस्कार:- (राज्यस्तरीय) गिरीश कुलकर्णी, अरुणा कुलकर्णी
पद्मभूषण डॉ. जे. पी. नाईक गुणवंत शिक्षक पुरस्कार : – डॉ. शिवाजी रायकर, डॉ. सतीश देसाई, संजय कालकुंद्रीकर, शरद पाटील, उषा मोहिते, चिदानंद हुंचगोंड, अरुणा कांबळे, विकास पाटील, संतोष गुरव, सुरेश वडराळे, संतोष चौगुले, सुधाकर मुळीक, सुजाता गीरीबुवा.
प. पू. बाबा आमटे व साधनाताई आमटे सामाजिक कृतज्ञता पुरस्कार : – उर्मिला कदम.
त्रिवेणी जीवन गौरव पुरस्कार : – बाळकृष्ण जोशी, वामन कुलकर्णी, एम. ए. कुलकर्णी, शंकर खोराटे, गुरुनाथ हेरलेकर, विजय चिंचनीकर, निवृत्ती पाटील, गोविंद कोरी, एम. डी. तेलवेकर, एम. जी. चव्हाण, जोतिबा पाटील, साताप्पा कांबळे.
पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. ९ फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत दुपारी दोन वाजता डॉ. जे. पी. नाईक स्मारक, बहिरेवाडी येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपास्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९

आजरा ग्रामीण रुग्णालय येथे जागतिक कर्करोग दिन साजरा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा ग्रामीण रुग्णालय येथे जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल पाटील यांनी कर्करोगाविषयी माहिती देत रोगापासून बचाव होण्यासाठी कोणती दक्षता घ्यावी याची सविस्तर माहिती सांगितली.
डॉ. प्राचीका धारकर यांनी मौखिक आरोग्य कसे राखावे या विषयी माहिती सांगितली.४ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत मोफत यामध्ये मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग व गर्भाशयाचे कर्करोग याचे निदान करण्यात येणार आहे. त्याची तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले.
डॉ. सुरजित पांडव यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी डॉ. स्वाती रेडेकर,मंदिरा सातवेकर व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

डॉ.अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत श्रेया केसरकर तालुक्यात प्रथम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ विज्ञान विषय समितीमार्फत डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये विद्यार्थीनी श्रेया अनिल केसरकर हिने ८८ गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. धनश्री मयेकर गणेश दळवी अथर्व नाईक ,साक्षी पाटील, वेदांत संकपाळ हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक एम.एम. नागुर्डेकर, वर्गशिक्षक ए. एम.प्रभू , ए.एम.देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.



