
चंद्रकांत सांबरेकर यांचे अपघाती निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कट्टर कार्यकर्ते व सचिव चंद्रकांत अंबाजी सांबरेकर (वय ५२ वर्षे) रा.चितळे ता.आजरा यांचे शुक्रवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास हिंडगाव फाटा, चंदगड येथे दुचाकीच्या अपघातात निधन झाले.
मनसेच्या विविध उपक्रमात ते नेहमीच सक्रिय राहिले आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. चंदगड पोलीस पाटील तपास करीत आहेत.

विजेच्या धक्क्याने म्हैशीचा मृत्यू
. आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आनंदा विठोबा भूतूर्ले या आजरा तालुक्यातील भावेवाडी येथील शेतकऱ्यांच्या मालकीच्या म्हैशीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.
वादळी वाऱ्यामुळे लोखंडी पोलला विद्युततारांचा स्पर्श झाल्याने पोल विद्युत प्रवाहित झाला. चरण्यासाठी सोडलेल्या म्हैशीचा या पोलला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून म्हैस जागीच गतप्राण झाली.
दुभत्या म्हैशीचा मृत्यू झाल्याने भूतुर्ले कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

शासकीय काजू बागेची लूट थांबवा...
देवर्डेकरांची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
देवर्डे येथे असणाऱ्या शासकीय काजू बागेचा २०२३-२४ सालाकरिता लिलाव शासनाने थांबवला आहे. वन्य प्राण्यांसाठी सदर बाग या वर्षी राखीव ठेवण्यात आली असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात येते. पण वन्यप्राणी, माकडे नदीकाठी असून गवारेड्यांचा ऊस पिकात धुमाकूळ चालू आहे. तसेच हत्तीचा वावर चाळोबा डोंगरांमध्ये आहे. असे असताना वन्य प्राण्यांना राखीव ठेवण्यात आलेल्या या काजू बागेतील काजू पीक हे काही मंडळी चोरून नेत आहेत. तर काही मंडळी झाडांची तोडही करत आहेत. याकडे वनविभागाची दुर्लक्ष आहे.
एकीकडे झाडे लावा… झाडे जगवा यासारखा उपक्रम वन विभागाकडून राबवला जात असताना दुसरीकडे वृक्षांची प्रचंड तोड सुरू आहे. देवर्डे येथील काजू बागेचे नुकसान न थांबवल्यास आंदोलनाचा इशारा माजी उपसभापती निवृत्ती कांबळे, राजेंद्र देशमुख आदी ग्रामस्थांनी परिक्षेत्र वन अधिकाऱ्यांना दिला आहे.

ऐतिहासिक निवडणुकीत शाहू छत्रपतींना ऐतिहासिक मतांनी विजयी करा : अभिषेक शिंपी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
होऊ घातलेली लोकसभेची निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक आहे . इंडिया आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना विजयी करण्यासाठी सर्वपक्षीय मंडळी मानापमान व अंतर्गत हेवेदावे बाजूला ठेवून ताकतीने निवडणूक प्रचारात उतरली आहेत. एकीकडे भरमसाठ महागाई वाढवून दुसरीकडे वर्षाला सहा हजार रुपयांची भीक देणाऱ्या मोदींनी देशामध्ये अघोषित अशी आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण केली आहे. अशावेळी या ऐतिहासिक निवडणुकीमध्ये शाहू छत्रपतींना ऐतिहासिक मताधिक्य देऊन विजयी करूया असे आवाहन नगरसेवक व आजरा महाल शिक्षण मंडळाचे संचालक अभिषेक शिंपी यांनी केले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या गवसे येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
यावेळी शिंपी म्हणाले, सरकार सर्व सामान्यांचे की अंबानी आदरणीय यांचे असा प्रश्न निर्माण होण्याची परिस्थिती आहे एका बाजूला महिलांवर सर्वसामान्य वर अमानुष अत्याचार होत असताना दुसरीकडे राहुल गांधी प्रेमाचा संदेश देशभर पसरवत आहेत. अन्नसुरक्षा सारखा महत्त्वपूर्ण कायदा काँग्रेसने केला पण त्याची श्रेय मोदी लाटण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप ही त्यांनी केला.
कॉ. संजय तर्डेकर म्हणाले ,देशामध्ये घातक स्वरूपाची धोरणे राबवली जात आहेत .शेतकऱ्यांचा पैसा कर रूपाने भरमसाठ स्वरूपात वसूल करून किरकोळ मदतीचा डांगोरा पिटण्याचे काम भाजपा करीत आहे. संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपा सरकारला पराभूत करा असे आवाहन त्यांनी केले.
‘ वंचित ‘ चे तालुकाध्यक्ष संतोष मासोळे यांनी वंचित आघाडी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू छत्रपतींच्या पाठीशी आहे. त्यांना विजयी करण्यासाठी बांधील आहे असे सांगितले.
श्री शाहू छत्रपती म्हणाले, देशामध्ये विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्या देशांमध्ये हुकूमशाही सुरू झाली आहे.आता पुन्हा एक वेळ लोकशाहीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी भाजपा सरकारला पराभूत करण्याची गरज आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक गेली चार वर्षे झालेली नाही. भविष्यामध्ये विधानसभा व लोकसभा निवडणुकांबाबतही अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
सभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील,गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर,ए.वाय.पाटील, कॉ.संपत देसाई,प्रा.सुनिल शिंत्रे, संभाजी पाटील, उमेश आपटे, मुकुंदराव देसाई, उत्तम देसाई शिवाजी पाटील, उदय पवार, रणजीत देसाई,संजयभाऊ सावंत, राजेंद्रसिंह सावंत,प्रकाश मोरुस्कर,निवृत्ती कांबळे, युवराज पोवार, अंकुश पाटील, मुकुंदराव तानवडे, कॉ. शांताराम पाटील, अविनाश हेब्बाळकर संतोष नेवगे, उदयराज पवार किरण तानवडे, किरण कांबळे, सिद्धार्थ तेजम, अनिकेत कवळेकर यांच्यासह मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

कामगार, शेतकरी आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी इंडिया आघाडीला विजयी करा…डॉ. नंदाताई बाभूळकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गेल्या दहा वर्षात या देशातील कामगार, शेतकरी आणि स्त्रिया कोणीच सुरक्षित नसून भाजपा आणि मित्र पक्षांच्या सरकारला हद्दपार करण्यासाठी यावेळी इंडिया आणि महाविकास आघाडीच्या बाजूने उभे राहा असे आवाहन डॉ. नंदाताई बाभूळकर यांनी केले. इंडिया आणि महाविकास आघाडीचे उमेदवार श्री.शाहू छत्रपती यांच्या पोळगाव येथील झालेल्या प्रचारसभेत बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या, जनतेला भूलथापा देऊन सत्तेवर आलेल्या या सरकारने दिलेले एकही वचन पाळलेले नाही. त्यामुळे या सरकारला आता घालविण्याशिवाय पर्याय नाही.

यावेळी उमेदवार श्री. शाहू छत्रपती म्हणाले, लोकांच्या आग्रहाखातर निवडणुकीला सामोरे जात आहे. या देशातील आजची परिस्थिती पाहता आपल्याला या रणांगणात उतरावे लागेल असे ठरवून मी या निवडणुकीत इंडिया आणि महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढवत आहे. आपण दाखवलेल्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही.
श्रमुदचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई यांनी या निवडणुकीबाबत विस्ताराने भूमिका मांडताना सांगितले की आम्ही या निवडणुकीत केवळ लोकशाही वाचविणे आणि हुकूमशाहीचा पराभव करणे यासाठी या इंडिया आघाडी सोबत आहोत. न्याय हक्कासाठी उभी असलेली आंदोलने चिरडली जात आहेत त्यामुळे हे सरकार आम्हला कोणत्याही परिस्थितीत घालवायचे आहे.
यावेळी उमेश आपटे, युवराज पवार, संजय तर्डेकर, अभिषेक शिंपी यांनीही मनोगते व्यक्त केली. सुरुवातीला राजू होलम यांनी प्रास्ताविक केले. सभेला मुकुंदराव देसाई, उदय पवार, सुनील शिंत्रे, अंजनाताई रेडेकर, संभाजी पाटील, उदय पवार, आजरा साखर कारखान्याच्या संचालिका व माजी सभापती रचना होलम यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निधन वार्ता
समीर तकीलदार

आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक इस्माईल अलाउद्दीन तकीलदार यांचे चिरंजीव समीर इस्माईल तकीलदार (वय ३६ वर्षे) यांचे अकस्मिक निधन झाले .यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, भाऊ असा परिवार आहे.
माजी पंचायत समिती सदस्य अबूताहेर तकीलदार यांचे ते पुतणे होत.



