
विहिरींनी तळ गाठला..
बोअरवेलचे पाणी गायब…पाणी प्रश्न गंभीर

आजरा ; मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यामध्ये यावर्षी पाणी संकट प्रकर्षाने जाणवत असून अनेक ठिकाणचे बोअरवेल आतापासूनच बंद पडू लागले आहेत तर विहिरींच्या पाण्याने तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. उष्णतेत प्रचंड वाढ होत असल्याने स्थानिक प्रकल्प, छोटे-मोठे तलाव यामधील पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणी पातळी झपाट्याने खाली येऊ लागले आहे. या सर्वांचा परिणाम पाहता यावर्षी तालुक्यावरील पाणीटंचाईचे सावट गडद होऊ लागले आहे.
मुळातच यावर्षी पाऊस तौलनिकदृष्ट्या कमी झाला आहे. जमिनीमध्ये पाणी मुरलेले नाही. नद्यांचे पाणीही प्रवाहित होणे थांबले आहे. भूगर्भातील पाणी पातळी कमी झाल्याने विहिरी व बोअरवेल मधून पाणी उपसा करण्यावर मर्यादा येऊ लागली आहे. एप्रिल व मे या दोन महिन्यांसह जून महिन्याचे पहिले दोन आठवडे पावसाच्या प्रतीक्षेत जाणार आहेत.या कालावधीत वळवाचे जोरदार पाऊस झाले नाहीत तर मात्र पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.
शेजारील गडहिंग्लज तालुका यावर्षी दुष्काळग्रस्त तालुका म्हणून शासनाने जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर गडहिंग्लजला पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाकडून नियोजन सुरू आहे. चित्री प्रकल्पातील पाण्याची उचल गडहिंग्लजकरता केली गेली तर मात्र आजरा शहरवासीयांसह तालुका वासीयांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. एकंदर यावर्षी पाण्याची संकट गंभीर होऊ लागले आहे हे निश्चित.
आता पावसाची प्रतिक्षाच…
पावसाच्या दृष्टीने समृद्ध असा समजल्या जाणाऱ्या किटवडे गावासह तालुक्याच्या पश्चिम भागातही दिन यावर्षी पाणीटंचाई जाणवू लागली आहे. महामार्गासाठी झालेली प्रचंड वृक्षतोड व वृक्षतोडीमुळे उघडे होत चाललेले डोंगर यामुळे यापुढे पावसाची प्रतीक्षा करावी लागेल असेही दिसत आहे.
पुन्हा एक वेळ विहिरींचा आधार
चित्री प्रकल्प झाल्यापासून शहरवासीयांचा पाणी प्रश्न संपुष्टाचा आल्याने अनेक ठिकाणच्या विहिरी मध्यंतरीच्या कालावधीत बंद पडल्या आहेत तर काही विहिरी बुजवण्यात आलेल्या आहेत .सध्या पाणीप्रश्न गंभीर होईल तस तसा पुन्हा एकदा या विहिरींच्या आधार घ्यावा लागत आहे.

आता तरी कचरा टाकणे थांबेल का…?
कचरा डेपो कडे जाणारे रस्ते केले बंद

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आवंडी कचरा डेपोचे मुख्य रस्ता सोडून बाकीचे सहा रस्ते अन्याय निवारण समितीच्या पुढाकाराने चर मारून बंद करण्यात आले. त्यामुळे आता तरी दुर्गंधीपासून या परिसरातील नागरिकांची सुटका होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
गेल्या चार महिन्यापासून वेळोवेळी नगरपंचायतीकडे तक्रार व लेखी अर्ज देऊनही आवंडी तील कचरा डेपोकडे नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांचीी दुर्लक्षच होते .त्यामुळे आवंडी वसाहत ग्रामीण रुग्णालय गांधीनगर व जवळच्याच मैदानावर खेळणारे क्रिकेट प्रेमी यांना दुर्गंधीमुळे फार त्रास होत होता. आजऱ्यातील चिकन सेंटर व इतर कचरा ,भटकी कुत्री ग्राऊंडवर घेऊन जात होती तसेच बाजूलाच असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात व गांधीनगर वसाहतीमध्येही कुत्र्यांनी कचरा पसरवला होता.त्यामुळे आज सकाळी अन्याय निवारण समितीच्या परशुराम बामणे, गौरव देशपांडे अमित येसादे यांच्या उपस्थितीमध्ये चोरून कचरा टाकणाऱ्या गाड्यांचे सहा मार्ग जेसीबी मशीनच्या सहाय्याने चर मारून बंद करून टाकले.
त्यातूनही रात्री अपरात्री घाणीचा कचरा टाकणारी गाडी तिथे सापडली तर कायदेशीर कारवाई करावी असे निवेदन देण्यात येईल त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधीचा पासून दिलासा मिळेल असे समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे यांनी सांगितले.

हरपवडेच्या नितीन यांनी जपानमधून केली पी.एच.डी. प्राप्त

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हरपवडे ता.आजरा येथील नितीन श्रीकांत सावंत यांनी जपानमधील
कोबे विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी पूर्ण केली. लोकेशन समारंभपूर्वक पीएचडी प्रधान करण्यात आली.
कोबे विद्यापीठ हे जपानमधील एक प्रतिष्ठित विद्यापीठ आहे. पीएचडीचा विषय हा “विशिष्ठ ॲस्ट्रोसाइट्स” या पेशींचा मेंदूची इजा बरी करण्यामध्ये महत्वाचा वाटा आहे हे सिद्ध केले. हे संशोधन ‘एक्सपेरिमेंटल न्यूरोलॉजी’ या आंतरराष्ट्रीय नियतकालीकामध्ये प्रसिद्ध झाले आहे. या अभ्यासासाठी प्रोफेसर मोरिता यांनी मार्गर्शन केले. सावंत यांचे प्राथमिक शिक्षण हरपवडे प्राथमिक शाळेत, माध्यमिक शिक्षण पेरणोली येथे, बारावीपर्यंत शिक्षण आजरा महाविद्यालयात तर पुढे पुण्यामध्ये मॉडर्न कॉलेजमध्ये त्यांचे पदवी शिक्षण झाले.
कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय खरात, सध्या शिव-नादार विद्यापीठातील डॉ. निलेश डहाणूकर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रोफेसर भार्गव यांचे मार्गदर्शन लाभले.
हरपवडेसारख्या ग्रामीण भागातून शेतकरी कुटुंबातील सावंत यांनी जपानमधून पीएचडी शिक्षणापर्यंत मारलेली मजल निश्चितच कौतुकास्पद आहे.

निवड
मनोहर पाटील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ग्रुप ग्रामपंचायत मौजे कोळिंद्रे च्या उपसरपंच पदी मनोहर पाटील यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवड प्रसंगी , सरपंच सौ. वंदना सावंत , ग्रामपंचायत सदस्य , सदाशिव हेब्बाळकर , नंदा जाधव , दिपाली पाटील , मनिषा आमृस्कर , विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष , सुरेश सावंत , प्रकाश पाटील , सुभाष सावंत , रामचंद्र पाटील रमेश बुगडे , नागोजी पाटील , अनिल उशिनकर , व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निधन वार्ता…
बंडू गुरव

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सिरसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक बंडु अर्जुना गुरव (वय ७५ वर्षे )यांचें अल्पश: आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली,पत्नी असा परिवार आहे.



