रविवार दि. २४ ऑगस्ट २०२५

भविष्यात गोकुळच्या माध्यमातून तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार : अध्यक्ष नवीद मुश्रीफ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येत्या काही वर्षात पारंपारिक पध्दतीने केला जाणारा दुधव्यवसाय मागे पडणार आहे. नवीन पिढी या व्यवसायात उतरली पाहीजेत, यासाठी गोकुळ टीएमआरचा प्रकल्प अमुलच्या धर्तीवर हाती घेणार आहे. यातून युवक व्यवसायाकडे वळतील. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या दुध उत्पादनात वाढ होईल, रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल असे प्रतिपादन गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी केले.
येथील अण्णा भाऊ सांस्कृतिक सभागृहात गोकुळची संपर्क सभा उत्साहात झाली. गोकुळचे अध्यक्ष श्री. मुश्रीफ अध्यक्षस्थानी होते. माजी अध्यक्ष विश्वास पाटील, अरुणकुमार डोंगळे, अंबरीश घाटगे, अजित नरके, शशिकांत पाटील- चुयेकर, अभिजीत तायशेटे, कर्णसिंह गायकवाड, मुरलीधर जाधव, चेतन नरके, बाबासाहेब चौगले आदीसह संचालक उपस्थित होते.
संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात त्यांनी आजरा तालुक्यातील गोकुळच्या कारभाराचा आढावा घेतला. गतवर्षी पेक्षा तालुक्यात गोकुळचे संकलन २९०० लिटरने वाढलेले आहे. शेतकऱ्यांची पशुखाद्याची अडचण दूर केली आहे. तालुक्यातून म्हैस दुधाचे ७० टक्के संकलन होते. यामधे वाढ होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी जातीवंत म्हैशी शेतकऱ्यांनी घ्याव्यात यासाठी गोकुळच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यत पोहचवण्यात येत आहेत. शेतकरी, दुध उत्पादकांच्या अडचणी दूर करण्यावर भर दिला आहे.
श्री. डोंगळे म्हणाले, अडीचशे कोटींच्या ठेवींमधे गेल्या वर्षात भरघोस वाढ झाली असून त्या पाचशे कोटींच्यावर गेल्या आहेत. जाजम व घड्याळ खरेदी ही गोकुळच्या हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त दुधसंस्थाच्या खर्चातून केली आहे. यामध्ये कोणताही गैरप्रकार झालेला नाही.
विश्वास पाटील म्हणाले, गडहिंग्लज, चंदगड व आजरा येथून श्रीमती रेडेकर या एकमेव संचालिका आहेत. यामुळे पक्षविरहीत राजकारण अधोरिखेत होते.

जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, के. व्ही. येसणे, प्रकाश देशपांडे, तुळसाप्पा पोवार, श्री. कुंभार, संजय येजरे, दशराज आजगेकर, उतम रेडेकर, जंबो गोरुले यांनी प्रश्न विचारले.
कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, विभाग प्रमुखांनी उतरे दिली. मुकुंदराव देसाई, अल्बर्ट डिसोजा, एम. के. देसाई, सुभाष देसाई, राजू होलम, महादेव पाटील- धामणेकर, संभाजी तांबेकर, रणजित देसाई, दशरथ अमृते, भीमराव वांद्रे, अंकुश पाटील, अनिल फडके, विजय देसाई, रविंद्र भाटले, दीपक देसाई, मारुती घोरपडे, मधुकर यलगार, गणपतराव सांगले, किरण पाटील उत्तम होडगे डॉ. धनाजी राणे, बी.टी. जाधव, संजय येसादे, तानाजी बुगडे यांसह दूध उत्पादक प्रतिनिधी उपस्थित होते.
संचालक रणजित पाटील यांनी आभार मानले.
शिळ्या कढीला ऊत
‘गोकुळ’ बाबत तक्रारी करून कांही मंडळी शिळ्या कढीला ऊत आणत आहेत. पुर्वीच्या लेखापरीक्षणाबाबत काही जण न्यायालयात गेले आहेत. याची वार्षिक सभेत मंजुरीही घेतली आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे प्रकार सुरु असून राजकीय रंग दिला जात असल्याचा श्री. डोंगळे यांनी आरोप केला.

एसटी चालली मुंबईला…
तालुकावासीय आले घाईला...

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमी मुंबई येथील चाकरमान्यांची व्यवस्था म्हणून आजरा आगाराच्या बऱ्याचशा बसेस मुंबई मार्गावर धावत आहेत. याचा फटका तालुक्यातील स्थानिक प्रवाशांना बसत असून अनेक मार्गावरील बसफेऱ्या रद्द होत आहेत.
बाहेरगावच्या प्रवाशांची सोय करत असताना स्थानिक प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी आगाराने घेणे गरजेचे आहे. मोठ्या प्रमाणावर बस बाहेर गेल्यामुळे स्थानिक वेळापत्रक पूर्णपणे कोलमडून गेले आहे. बाजारहाटीसाठी आलेल्या तालुका वासियांसह शालेय विद्यार्थ्यांचे यामुळे मोठे हाल होत आहेत.
शनिवारी विविध मार्गावरचे प्रवासी रात्री उशिरापर्यंत बस अभावी बस स्थानकातच दिसत होते.

औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणाचा प्रश्न लवकरच मार्गी
प्रा. अर्जुन आबिटकर
पेरणोली येथे सत्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी जमिनीचा प्रश्न सुटला आहे. काही तांत्रिक अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर यांनी केले.
पेरणोली (ता. आजरा) येथे संत तुकाराम दूध संस्था व भावेश्वरी सेवा संस्था यांच्या वतीने आकूर्डे (ता. भुदरगड) येथील शरद सूतगिरणीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल प्रा.आबिटकर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी प्रा. आबिटकर यांनी मार्गदर्शन केले. शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख राजेंद्र सावंत अध्यक्षस्थानी होते.
प्रा. आबिटकर म्हणाले, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पाठपुराव्यामुळे आजऱ्यातील आद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. यासाठी जमिनही मिळाली आहे. तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. येथे उद्योग आणून बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. साळगाव येथील हिरण्यकेशी नदीवरील पूलाचा प्रश्न ही मार्गी लावणार आहे. पेरणोलीसह पंचक्रोशीतील गावासाठी विकास निधी देऊ. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र सावंत यांचाही वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
यावेळी भावेश्वरी सेवा संस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानदेव सासूलकर, विजय थोरवत, इंद्रजित देसाई, संतोष भाटले, विलास जोशीलकर, रणजीत सरदेसाई, अमित सावंत, नामदेव वांद्रे, निलेश चव्हाण यासह ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.

‘मृत्युंजय’कार जयंती उत्सव – संवेदना फाउंडेशनचा उपक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्याचा अभिमान आणि मराठी साहित्यविश्वात अजरामर ठसा उमटवणारे ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांच्या जयंतीनिमित्त संवेदना फाउंडेशनतर्फे ३१ ऑगस्ट रोजी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. हा कार्यक्रम शिवाजीराव सावंत स्मृतिदालन, आजरा येथे पार पडणार आहे.
कार्यक्रमाचे स्वरुप…
पहिले सत्र : साहित्य दिंडी (सकाळी ८ ते ९)
सरस्वती पूजन, पालखी पूजन व शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन
साहित्य दिंडीची सांगता स्मृतिदालन येथे
मान्यवर : श्री. ए. के. पावले, श्री. शेखर बटकडली
दुसरे सत्र : “मृत्युंजयकारांचा वारसा – विचारांचा खजिना” (सकाळी ९ ते १२)
प्रमुख अतिथी : डॉ. सुनीलकुमार लवटे
अध्यक्ष : डॉ. शिवशंकर उपासे
कार्यक्रमांतर्गत “मृत्युंजय” कादंबरी अभिवाचन, एकपात्री सादरीकरण, “कलेचा वारसा” व “मृत्युंजयकार आजची प्रेरणा” या विषयांवरील सत्रे
मराठी साहित्य क्षेत्रातील योगदानावरील चर्चा
स्पर्धांचे पारितोषिक वितरण (झोका कथाकथन, गड्या आपला गाव बरा, निबंध स्पर्धा)
“साहित्य संवेदना : पुढील दिशा” व समारोप
तिसरे सत्र : साहित्यिकांचा मेळावा – मुक्त संवाद (दुपारी १ ते ४)
प्रमुख अतिथी : श्री. लक्ष्मण हंबाडे
अध्यक्ष : कवी विलास माळी
सूत्रसंचालन : शरद आजगेकर व आरती लाटणे
“ज्या मातीत जन्मलो, त्या मातीतूनच उठलेला एक सूर्य…” अशा शब्दांत संवेदना फाउंडेशनने या जयंती उत्सवासाठी युवक, वाचक, साहित्यिक व सर्व रसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
कुंभार समाजाच्या कलाकुसरीतून फुलत आहे उत्तूरचा गणेशोत्सव…

उत्तूर मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
(मंदार हळवणकर)
गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आल्याने उत्तूर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजारपेठ सजावटीच्या साहित्याने फुलली असून गेल्या दोन दिवसांपासून बाजारपेठ गजबजून गेली असल्याचे दिसून येत आहे. भाविकांच्या चेहऱ्यावर गणरायाच्या स्वागताची आतुरता स्पष्टपणे झळकत आहे.
यामध्ये गावातील कुंभार समाजाचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे.
गेल्या अनेक पिढ्यांपासून कुंभार बांधव उत्तूर परिसरात मूर्तीकलाकुसरीची परंपरा जपून आहेत. जून महिन्यापासूनच त्यांनी मूर्तीकामास सुरुवात केली असून लहान कौटुंबिक मूर्तींपासून ते मोठ्या मंडळांच्या भव्य मूर्तींपर्यंत सर्व प्रकारच्या मूर्तींची निर्मिती सुरू आहे.माती मळणे, साचे तयार करणे, मूर्ती घडवणे, रंगकाम आणि सजावट या प्रत्येक टप्प्यात कुंभार बांधव दिवसरात्र श्रम घेत आहेत. शेतीची कामे, घरची जबाबदारी आणि मूर्तीकाम यांचा समतोल साधत ते परंपरेचे जतन करत आहेत. त्यांच्या मेहनतीमुळे गणेशमूर्तींना वेगळे तेज व आकर्षक सौंदर्य प्राप्त होत आहे.
फक्त गणेशोत्सवापुरतेच नव्हे, तर नागपंचमी, पोळा, दहीहंडी यांसारख्या सणांसाठी लागणारे साहित्य देखील कुंभार बांधवांनी वेळोवेळी तयार करून गावकऱ्यांना मदत केली आहे. त्यामुळे त्यांचा सण-उत्सवातला सहभाग महत्त्वाचा ठरतो.
दरम्यान गावातील समता तरुण मंडळ, गणेश मित्र मंडळ, महादेव तरुण मंडळ, नेहरू चौक तरुण मंडळ, हनुमान तरुण मंडळ, बाजारपेठ मित्र मंडळ, आदर्श युवा ग्रुप, निर्मिती युवा ग्रुप, मराठा तरुण मंडळ, इंदिरानगर गणेश उत्सव मंडळ व अवधूत कला व क्रीडा मंडळ या मंडळांनी सजावट, ढोल-ताशे व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी तयारी सुरू केली आहे.कुंभार समाजाच्या कलाकुसरीसोबतच गावातील विविध मंडळांचा उत्साही सहभाग यंदाचा गणेशोत्सव अधिक मंगलमय, भव्य आणि अविस्मरणीय होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जनावरांची कायदेशीर खरेदी विक्री व वाहतूक पूर्ववत सुरू ठेवावी
गोकुळ अध्यक्षांना मातोश्री दूध संस्थेचे निवेदन
आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भाकड जनावरे विक्री बंदीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. विक्री योग्य जनावरांना बाजार मिळणे अत्यंत आवश्यक आहे. कुरेशी समाजाच्या खरेदी विक्री बंद मुळे शेतकऱ्यांना त्यांच्या भाकड जनावरांच्या पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी जनावरांची कायदेशीर खरेदी विक्री व वाहतूक पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी लवकरात लवकर शासन दरबारी हा विषय मांडावा अशी मागणी मातोश्री दूध संस्थेच्या वतीने अध्यक्ष मेहताब आगा यांनी गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.

पाऊस पाणी…
आजरा शहरासह परिसराला पुन्हा एकदा पावसाने झोडपण्यास सुरुवात केली असून शनिवारी रात्री सुरू झालेला पाऊस रविवारी सकाळपर्यंत सुरूच होता. रात्रभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पावसाने आता पूर्ण विश्रांती घेण्याची गरज आहे.

गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांची तालुका खरेदी विक्री संघाला सदिच्छा भेट

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे गोकुळ अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी आजरा तालुका खरेदी विक्री संघाला सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थितांचे स्वागत व प्रस्ताविक जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक संभाजी तांबेकर यांनी केले.
मुश्रीफ यांचा सत्कार तालुका संघाचे अध्यक्ष महादेवराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना नवीन मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात अनेक संघ अडचणीत येत असताना आजरा तालुका संघ सतत नफ्यात आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. जिल्हा दूध संघ तालुका संघाच्या पाठीशी असून कोणत्याही प्रकारची मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आभार उपाध्यक्ष दौलती पाटील यांनी मांडले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुधीरभाऊ देसाई,आजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष देसाई, कारखान्याचे संचालक अनिल फडके, अल्बर्ट डिसोजा, एम.के. देसाई, विठ्ठलराव देसाई, गणपती सांगले, राजाराम पाटील,सुनील देसाई, मधुकर यलगार, भाऊसो किल्लेदार, जोतिबा चाळके, जयराम संकपाळ व्यवस्थापक जनार्दन बामणे यांच्यासह पोश्रातवाडी दूध संस्थेचे नूतन संचालक उपस्थित होते.



