शनिवार दि. २३ ऑगस्ट २०२५

आजऱ्यात आठवडा बाजार हाऊसफुल्ल…
सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ नटली

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असताना काल शुक्रवारी पार पडलेल्या आजरा येथील आठवडा बाजारामध्ये तालुकावासीयांनी प्रचंड गर्दी केली होती. पावसाने उघडीप दिल्यानेही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारामध्ये सजावटीचे साहित्य, रांगोळ्या फटाके, विद्युत रोषणाईचे साहित्य, फळे, नारळ यासह विविध साहित्य खरेदीला प्राधान्य देताना तालुकावासीय दिसत होते.
तौलनिक दृष्ट्या भाज्यांचे दर आवाक्यात असतानाच नारळाने मात्र आठवडा बाजारात दाराचा उच्चांक गाठला. नारळा पाठोपाठ टोमॅटोचे दरही वधारलेले दिसत होते.
दूध संस्थांचा हातभार…
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील अनेक दूध संस्थांनी दूध उत्पादक सभासदांना आर्थिक मदतीचा हात दिल्यानेही बाजारपेठेत गर्दी दिसत होती.

सभासदांचा विश्वास, शिस्तबध्द सहभाग व एकजूट हेच रवळनाथ संस्थेचे भांडवल : अभिषेक शिंपी
संस्थेला २५ लाखांवर नफा रवळनाथ पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्री रवळनाथ पतसंस्थेवर सभासदांचा व ठेवीदारांचा असणारा विश्वास विश्वास, शिस्तबध्द सहभाग व एकजूट हेच संस्थेचे भांडवल आहे. संस्थेला आर्थिक वर्षात २५ लाखांवर नफा झाला असून मागील वर्षापेक्षा चालू आर्थिक वर्षात संस्थेला साडेपाच लाखांवर जादा नफा झाला आहे. ठेवीमध्येही ६ कोटीने वाढ झाली असून सध्या संस्थेकडे २१ कोटींवर ठेवी असल्याचे प्रतिपादन चेअरमन अभिषेक शिंपी यांनी केले. ते संस्थेच्या ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी संस्थेचे संस्थापक व जि. प. चे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी प्रमुख उपस्थित होते.
संस्था सभागृहात संस्थेची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. स्वागत संस्थेचे मॅनेजर विश्वास हरेर यांनी केले. श्रध्दांजलीचा ठराव संचालक इब्राहीम इंचनाळकर यांनी मांडला. पुढे अध्यक्षस्थानावरून बोलताना अध्यक्ष अभिषेक शिंपी म्हणाले, गेल्या वर्षभरात बँकेने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. ठेवींमधे वाढ होत असून कर्ज वितरणात पारदर्शकता ठेवली आहे. हळदी-कुंकू कार्य क्रमाच्या माध्यमातून महिलांचा सहभाग वाढवून बचतीच्या माध्यमातून ठेवी सुरू केल्या आहेत. भविष्यात या माध्यमातून महिलांकरिता एखादा उदयोग उभारण्याकरिता मदत होणार आहे. चांगल्या वसुलीमुळे चांगला नफाही झाला असून याचे सर्व श्रेय केवळ संचालक मंडळालाच नव्हे तर प्रत्येक सभासदाला जाते ही एक सामुदायिक शक्ती असून संस्थेला प्रगतीपथावर नेण्याकरिता याहीपुढे आपण सर्वांनी विश्वास ठेवून अधिकाधिक लोकांचा सहभाग वाढवून ठेवी वाढविण्यावरोवरच कर्जे यासह संस्थेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सर्वाचे सहकार्य व मदतीची गरज असल्याचे स्पष्ट केले.
संस्था नुसती आर्थिक व्यवहार करणारी संस्था नसून ती लोकजीवन उन्नत करणारी, रोजगार निर्माण करणारी आणि समाजाला आधार देणारी चळवळ असून भविष्यात डिजीटल बैंकिंग सेवा सुरू करण्यासह शेतकरी, उदयोजकांना आर्थिक मदतीचा हात देणे, पर्यावरण उपक्रम राबविण्याचेही नियोजन असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर सभेपुढील विषय व अहवाल वाचन संस्थेचे मॅनेजर विश्वास हरेर यांनी केले.यावेळी संस्थेचे संस्थापक जयवंतराव शिंपी यांनी मार्गदर्शन केले.
सभेत सभासदांच्या दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत पााल्यांचा व ज्येष्ठ सभासदांचा सत्कार करण्यात आला.
सभेला व्हा. चेअरमन समीर गुंजाटी, सर्व संचालक यासह सचिन शिंपी, एस. पी. कांबळे, आप्पासो पाटील, सदाशिव डेळेकर, विलास पाटील, अहमदसाब मुराद, अशोक पोवार, सिकंदर दरवाजकर, हुसेन दरवाजकर यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संचालक विक्रम पटेकर यांनी मानले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आजऱ्यात पोलिसांचे संचलन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आजरा पोलीस ठाणे यांच्या वतीने शहरातून संचलन करण्यात आले.
गडहिंग्लजचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या संचलनामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्यासह आजरा पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी,राज्य राखीव पोलीस दलाचे कर्मचारी सहभागी झाले होते.

देव कांडगाव मार्गावरील बंदोबस्त फेरी तातडीने सुरू करावी
भूमिपुत्र फाउंडेशनची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गेल्या अनेक दिवसापासून रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे आजरा – देवकांडगाव मार्गावरील बस फेरी बंद करण्यात आली आहे. याबाबत आगार प्रमुखांशी बराच वेळा संपर्क साधून चर्चा केली असूनही कोणतीच दखल घेतली गेली जात नाही. बस सेवा बंद झाल्यामुळे लोकांना कोरीवडे पर्यंत चालत जावे लागते. या सर्व प्रकारांमध्ये वयोवृद्ध नागरिक व शालेय मुले यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून ही बस फेरी तातडीने सुरू करावी अशी मागणी भूमिपुत्र युवा फाउंडेशनने केली आहे.
याबाबतचे लेखी निवेदन देण्यात आले असून निवेदनावर फाउंडेशनचे अध्यक्ष रणजीत सरदेसाई, विष्णू कुंभार, संभाजी तेजम,बचाराम राणे, भुजंग राणे, गोपाळ राणे, आदींच्या सह्या आहेत.

उत्तूरची गावसभा उत्साहात संपन्न.
व्यापारी वर्गाची विशेष उपस्थिती

उत्तूर:मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा (मंदार हळवणकर)
ग्रामपंचायत उत्तूर (ता. आजरा) ची १५ ऑगस्ट तहकूब झालेली गावसभा नुकतीच उत्साहात पार पडली. सरपंच किरण आमणगी अध्यक्षस्थानी होते. स्वागत उपसरपंच समीक्षा देसाई यांनी केले तर ग्रामसेवक प्रकाश पाटील यांनी विषयवार वाचन केले.
गावसभेत ग्रामस्थांनी अनेक महत्त्वाचे विषय मांडले. प्रदीप लोकरे यांनी गठित समित्यांच्या नियमित सभा घ्याव्यात तसेच गावातील रस्ते उकरून करावेत, अशी मागणी केली. पराग देशमाने यांनी व्यापारी असोसिएशनच्या वतीने स्टँड पूर्व–पश्चिम व्हावे, संरक्षण भिंत जशी आहे तशी ठेवावी व दारूबंदी शिथिल करावी, बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांना प्राथमिक सुविधांची सोय करावी अशी मते व्यक्त केली. व्यापारी वर्गाच्या मागणीनुसार दारूबंदी साठी विशेष गाव सभा घेण्याचे ठरले.
विठ्ठल उत्तूरकर यांनी जलजीवन मिशनचे काम पूर्ण होईपर्यंत ग्रामपंचायतीने ते हस्तांतरित करून घेऊ नये, तसेच मंजूर टेंडरची संख्या व पद्धत पारदर्शकपणे जाहीर करावी, अशी मागणी केली. घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची नावे जाहीर करावीत तसेच डॉ. रवीकांत शर्मा यांचा सत्कार करण्यात यावा, असे सुचविण्यात आले.
महेंद्र मिसाळ यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, स्मशानभूमी शेडचे टेंडर जाहीर करावे तसेच इतर राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांना उत्तूरमध्ये शाखा सुरू करण्यासाठी जागा व एन.ओ.सी. द्यावी अशी सूचना केली.
स्वप्निल मांडे यांनी वैद्यकीय महाविद्यालयास गायरानातील जागा द्यायची असल्यास प्रथम गावातील तरुणांना रोजगारात प्राधान्य द्यावे, असा ठराव करण्याची सूचना केली.
मंदार हाळवणकर यांनी जिल्हा परिषदेच्या किमान स्थानिक शिक्षकांच्या बदल्या थांबवाव्यात, तसा ठराव करून जिल्हा परिषदेस पाठवावा हे सुचित केले. घरकुल योजनेतील निधी व निकष स्पष्ट करावेत तसेच डॉ. सौरभ कसबे यांची बदली थांबवावी, अशी मागणी केली. गठित समित्यांच्या सभा दर दोन महिन्यांनी घेणे बंधनकारक करावे, असे आवाहन केले.
प्रभाकर भाईंगडे गायरानाची जमीन सरसकट देऊ नये तर भावी काळासाठी ती राखून ठेवावी, असे मत व्यक्त केले .
रमेश ढोणुक्षे यांनी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना पक्षपात न करता सरसकट लाभ द्यावा, अशी मागणी केली. प्रवीण लोकरे यांनी व्यापाऱ्यांना चलन उपलब्ध करून देण्यासाठी बँक ऑफ इंडियाशी पाठपुरावा करण्याची सूचना केली. गावसभेत ग्रामपंचायतीच्या खुल्या जागांची माहिती ग्रामस्थांना द्यावी, बाजार लिलावासाठी स्वतंत्र नियमावली तयार करावी, ग्रामपंचायतीचे गाळे बी.ओ.टी. तत्वावर देण्याबाबत चर्चा झाली. तसेच व्यापारी संघटनेच्या पत्रानुसार दारूबंदी उठवण्यासाठी स्वतंत्र सभा घेण्याचे ठरले.
प्रास्ताविक महेश करंबळी यांनी केले. सभेसाठी माजी उपसरपंच धोंडीराम सावंत, विशाल उत्तूरकर, सचिन उत्तूरकर, विजय वांद्रे, अभिजीत रणनवरे, स्वप्निल इंगळे,दत्ता माने, बाळू सावंत, वसंतराव धुरे, सदानंद व्हनबट्टे, स्वागत परुळेकर, आजी-माजी सैनिक, तरुण वर्ग यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन संजय उत्तूरकर यांनी मानले.

बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा अधिवेशन उद्या उत्तूरमध्ये
कॉ. प्रकाश कुंभार यांची माहिती

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
लालबावटा बांधकाम कामगार संघटनेचे चौथे जिल्हा अधिवेशन उद्या २४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता उत्तूर (ता. आजरा) येथील धुरे मंगल कार्यालयात होणार आहे. या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष कॉ. भरमा कांबळे असतील अशी माहिती कॉम्रेड प्रकाश कुंभार यांनी दिली.
उत्तूरसारख्या छोट्या गावात हे अधिवेशन आयोजित होण्यामागे खास कारण आहे. २००९ पासून कॉ. प्रकाश कुंभार या गवंड्याने गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातील दुर्गम भागातील बांधकाम कामगारांना संघटित करण्याचे कार्य हाती घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे. खऱ्या बांधकाम कामगारांपर्यंत संघटना पोहोचावी, त्यांना उपयोगी योजनांचा लाभ मिळावा, बोगस बांधकाम कामगारांवर आळा घालावा, जाहीर केलेला बोनस वेळेत मिळावा यासाठी कोणती आंदोलने करावीत याबाबत अधिवेशनात ठोस दिशा ठरणार आहे.या अधिवेशनाचे उद्घाटन रेशन बचाव समितीचे राज्य सरचिटणीस व कामगार नेते कॉ. चंद्रकांत यादव यांच्या हस्ते होईल.
तसेच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष कॉ. शिवगोंडा खोत यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.मागील तीन वर्षांचा कामाचा अहवाल जिल्हा सचिव कॉ. शिवाजी मगदूम सादर करतील, तर खर्चाचा अहवाल जिल्हा कोषाध्यक्ष कॉ. प्रकाश कुंभार मांडणार आहेत.या अधिवेशनात जिल्ह्यातील १२ तालुक्यांमधून निवडक २०० बांधकाम कामगार सहभागी होऊन पुढील तीन वर्षांसाठीचे नियोजन करतील. अधिवेशन सकाळी १० ते सायं.५ या वेळेत पार पडणार आहे.

गणेश मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्यासाठी मूर्तिकारांची लगबग

शिरसंगी : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
फक्त पाच दिवसांवरती येऊन ठेपलेल्या गणेश चतुर्थी निमित्त सिरसंगीतील कुंभारवाडा व सुतार वाड्यात गणेशमूर्तीकरांची लगबग पाहायला मिळत आहे. गेले पंधरा दिवस पावसाने झोडपून काढल्याने सततच्या पडणारे पावसाचा फटका मूर्ती व्यावसायिकांना सुद्धा बसला आहे. गेले दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याने मूर्तीकरांचे दिवस रात्र रंगरंगोटी करून शेवटचा हात फिरवण्याकडे कल असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कुंभार वाड्यात विष्णू कुंभार, मारुती कुंभार, बंडू कुंभार, सागर कुंभार, नारायण कुंभार, संजय कुंभार ,बाळू कुंभार, तर सुतार वाड्यात पांडुरंग सुतार युवराज सुतार,अनंत सुतार हे पिढ्यान पिढ्या गणेश मूर्ती बनविण्याचे काम करतात.
सध्या शिरसंगी हे गणेशमूर्तींचे हब, मानले जाते. येथील गणेश मूर्ती या चंदगड गडहिंग्लज आजरा तालुक्यातील खेडोपाडी वितरित होतात तर मोठ्या मोठ्या मूर्तींना सुद्धा बेळगाव जिल्ह्यातील काही गावांमध्ये सुद्धा मागणी आहे. येथील बाळू कुंभार हे गेले ३० ते ४० वर्षाच्या परंपरा जपत सावंतवाडी येथील शिरसंगी ,गोठवेवाडी या दोन तीन गावांना मूर्ती बनवून विक्रीचे काम करतात. तर गोवा येथे उच्चपदावर कार्यरत असणारे संजय कुंभार हे खास गणेश मूर्तींची रंगरंगोटीसाठी आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी प्रत्येक वर्षी पंधरा दिवसाच्या सुट्टीवर गावी येतात.
सध्या रंगरंगोटीचे काम जोरात सुरू असून मूर्तिकार मंडळी रात्रीचा दिवस करून गणेश मूर्ती सजवण्याचे कार्य करत आहेत.
निधन वार्ता
द्रोपदी होडगे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मसोली ता. आजरा येथील द्रौपदी भीमराव होडगे ( वय ७० वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक सोमनाथ उर्फ रवींद्र होडगे यांच्या त्या मातोश्री व उद्योजक सुरेश होडगे यांच्या काकी होत.
सुंदराबाई तोरस्कर

आरदाळ या.आजरा येथील सुंदराबाई गंगाराम तोरस्कर (वय १०८वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
रक्षाविसर्जन उद्या दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी उत्तूर स्मशानभूमी येथे होणार आहे.
स्वभावाने त्या शांत, संयमी व कष्टाळू होत्या. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.
आज आजऱ्यात...
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ /गोकुळ ची संपर्क सभा दुपारी एक वाजता गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली अण्णाभाऊ सांस्कृतिक हॉल, आजरा येथे बोलावण्यात आली आहे.


