मेंढोली येथे शेतकऱ्याचा मृत्यू…

आजरा तालुक्यातील मेंढोली येथील बयाजी बाळू कोकीतकर या ८० वर्षीय शेतकऱ्याचा शेतातून गवत कापून आणत असताना आकस्मिक मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसल्याने याबाबतची वर्दी आजरा पोलिसात देण्यात आली असून आजरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत आहे.
सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे कोकितकर हे आपल्या शेतात जनावरांकरता गवत आणण्यासाठी गेले होते. ज्या ठिकाणी त्यांचा मृतदेह आढळला त्याच्या शेजारी गवताचा भारा पडलेला होता. मृत्यू नेमका कशाने झाला हे स्पष्ट झाले नसल्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे.कोकितकर यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.

जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आज-यात गुन्हा नोंद
आजरा शहर व परिसरातील बिगर शेतीचे परवाने चुकीच्या पध्दतीने दिले जात आहेत याची चौकशी व्हावी म्हणुन तहसिलदार, आजरा यांना दिलेल्या निवेदनाची बातमी स्थानिक वृत्तवाहिनीवर आली होती. याचा राग मनात धरून सुरेश गणपती होडगे रा. मसोली ता.आजरा यांनी सामाजिक कार्यकर्ते व मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम संतराम सावंत रा.गडहिंग्लज यांना फोनवरून अरेरावीची भाषा वापरुन जिवे मारणेची धमकी दिल्याच्या सावंत यांच्या फिर्यादीवरून होडगे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संग्राम सावंत यांनी संघटनेच्या वतीने सदर निवेदन गुरुवार दिनांक ५ रोजी दिले आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष घस्ती पुढील तपास करीत आहेत.

‘आजरा अर्बन ‘ ला बँको ब्ल्यू रिबन चा पुरस्कार

‘ अविस ‘ पब्लिकेशन यांचेमार्फत दमण येथे घेणेत आलेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये भारतातील अग्रगण्य को-ऑपरेटीव्ह बँकांचा सहभाग होता. गेली ६३ वर्षे अत्यंत उत्कृष्ठ बँकिंग सेवा देणार्या मार्च २०२३ अखेरच्या संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये अर्बन बँकामधून सर्व निकषामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केले बद्दल (ठेवी रु.८०० कोटी च्या वरील बँक) अविस पब्लिकेशन यांचे मार्फत दिला जाणारा “बँको ब्लू रिबन -२०२३” चा पुरस्कार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे चिफ जनरल मॅनेजर पी. के. आरोरा यांचे हस्ते देणेत आला.
सदर पुरस्कार बँकेच्या वतीने अण्णा – भाऊ संस्था समूह प्रमुख व बँकेचे संचालक अशोकअण्णा चराटी, बँकेचे चेअरमन डॉ.अनिल देशपांडे, व्हा.चेअरमन रमेश कुरूणकर, संचालक सुरेश डांग, विलास नाईक, डॉ.दीपक सातोसकर, सुनील मगदुम, किशोर भुसारी,संजय चव्हाण,जयवंत खराडे यांनी स्वीकारला.
याबद्दल अविस पब्लिकेशन यांनी बँकेचे अभिनंदन केले. नुकताच बँकेला जिल्हा नागरी बँक असोसिएशनच्या वतीने दिला जाणारा सर्वोत्कृष्ठ बँक म्हणून सलग दुसऱ्या वर्षी मिळाला आहे. यामुळे बँकिंग हा केवळ व्यवसाय म्हणून न मानता समाजपयोगी आणि आणि सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचविण्यासाठी बँकेचे सर्व व्यवस्थापन आणि कर्मचारी कार्यरत आहेत यासाठी या बँकेचे कौतुक होत आहे.
ग्रामीण भागातील कारागिरांसाठी विनातारण प्रधानमंत्री विश्वकर्मा कर्ज योजना, जेष्ठ नागरिकांसाठी घरपोच सेवा देण्यासाठी Helpline, WhatsApp द्वारे बँकिंग या सारख्या सुविधा बँक लवकरच सुरू करीत आहे. भविष्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने गरजू व्यावसायिक व उद्योजकांना व त्यांच्या गरजाना अर्थ पुरवठा करून देशाच्या प्रगतिमध्ये योगदान देण्याचा मानस बँकेचा असल्याचे अध्यक्ष डॉ. देशपांडे यांनी सांगितले.

संकेश्वर-बांदा महामार्ग बाधित शेतकरी संघटनेच्यावतीने जाहीर मेळावा
रविवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी संकेश्वर-बांदा महामार्ग बाधित शेतकरी संघटनेच्या वतीने खेडे ,ता. आजरा येथील हनुमान मंदिरात जाहीर मेळावा होणार आहे.
मेळाव्यामध्ये आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. सरकारच्या वतीने वेगवेगळ्या दैनिकांमधून जाहीर नोटीस दिल्या आहेत. स्थानिक पेपरना दिल्या नाहीत .त्यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना नोटीस दिली जाण्याची शक्यता कमी आहे.
सदर जाहीर नोटीसीला उत्तर देण्याची मुदत दिनांक १२ ऑक्टोबर पर्यंत दिली आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र वेळेत आपले म्हणणे देणे शक्य नाही. कागदोपत्री रेकॉर्ड करून कागदी घोडे नाचवण्याचे काम यंत्रणा करत आहे.यामुळे सर्वांनी संघटनेमार्फत एकच सामाईक म्हणणे देण्याबरोबरच पुढील दिशा मेळाव्यामध्ये ठरवण्यात येणार आहे असे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
आण्णाभाऊ स्मृती पंधरवडा विविध उपक्रमानी संपन्न

येथील जनता एज्युकेशन सोसायटी,आजरा संचलित बापूसाहेब सरदेसाई आर्दश हायस्कूल गवसे मध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. काशिनाथअण्णा चराटी व मुख्य कार्यकारी अधिकारी कै. माधवराव ( भाऊ) देशपांडे यांना अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक चंद्रकांत घुणे होते.
यावेळी नुतन सरपंच सौ. रेखा रणजित पाटील उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते कै. आण्णा व भाऊच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले स्मृती पंधरवड्या निमित्त आयोजित रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर आण्णा भाऊच्या आठवणीना उजाळा मुख्याध्यापक घुणे व प्रगतशील शेतकरी रणजित पाटील यांनी आपल्या मनोगतातून दिला.
यावेळी गवसेच्या संरपंच पदी निवड झालेबद्दल शाळेच्या वतीने सौ. रेखा रणजित पाटील यांचा सत्कार करण्यात आला. शाळेसाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन सौ.पाटील यांनी दिले. विविध स्पर्धेत बक्षिस पात्र विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.यावेळी विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कांबळे यांनी केले तर आभार संतोष कालेकर यांनी मानले.

आजरा महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न

आजरा महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन लायन्स क्लब ब्लड बँक गडहिंग्लज यांच्या सहकार्याने करण्यात आले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आजरा नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी-पाटील यांनी केले. उद्घाटन प्रसंगी बोलताना त्यांनी रक्तदानाचे महत्त्व व आवश्यकता याबाबत मार्गदर्शन केले
कार्यक्रमाचे अध्यक्ष उप- प्राचार्य दिलीप संकपाळ यांनी रक्तदाना बद्दल असणारे गैरसमज दूर करण्याची गरज प्रतिपादन केली याप्रसंगी अधीक्षक योगेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. लायन्स ब्लड बँकेचे प्रमुख डॉ. सुभाष पाटील यांनी रक्तदानासंदर्भात असणारे गैरसमज याबाबत सर्वांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांनी केले डॉ. रणजीत पवार यांनी प्रास्ताविक केले. तर आभार मल्लीकार्जुन शिंत्रे यांनी केले तर सूत्रसंचलन विठ्ठल हाके यांनी केले कार्यक्रमास व्होकेशनल प्रमुख एम. एच. देसाई उपस्थित होते.
निधन वार्ता
डॉ. सुमन बुवा

शिवाजी विद्यापीठातील आजीवन अध्ययन या विस्तार विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉ. सुमन कृष्णा बुवा (वय ५८) यांचे निधन झाले. आजरा तालुक्यातील निंगुडगे हे त्यांचे मूळ गाव असून राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी शोध प्रबंध सादर केले आहेत. त्यांच्या पश्चात आई, बहीण, भाऊ, भावजय असा परिवार आहे. पत्रकार यशवंत गिरी यांच्या त्या पुतणी होत.
धुरळा ग्रामपंचायत निवडणुकांचा…
ग्रामपंचायत निहाय सरपंच पदाचे आरक्षण…
▪️पेरणोली
सर्वसाधारण महिला
▪️मेंढोली-बोलकेवाडी
सर्वसाधारण
▪️मसोली
नाग. मागास प्रवर्ग
▪️बुरूडे
नाग.मा.प्रवर्ग महिला
▪️ईटे
अनु.जाती महिला
▪️वेळवट्टी
सर्वसाधारण
▪️चांदेवाडी
सर्वसाधारण महिला
▪️सुलगाव
सर्वसाधारण
▪️देऊळवाडी
सर्वसाधारण महिला
▪️हरपवडे सर्वसाधारण




