बुधवार दि. ६ ऑगस्ट २०२५

आम्हालाही आरोग्याच्या समस्या आहेत याचे भान ठेवा…
आवंडी वसाहतवासीय कचरा प्रश्नी आक्रमक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आवंडी वसाहतवासियांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवून चित्री सारखा प्रकल्प उभारण्याकरता मोठे योगदान दिले आहे. अत्यंत निसर्गरम्य परिसरातून आलेल्या आवडी वसाहतीच्या चारही बाजूला कचरा टाकून नगरपंचायतीने वसाहतवासियांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण केला आहे. हा प्रकार कदापिही खपवून घेतला जाणार नाही अशी भूमिका घेत महिलांनी मोठ्या संख्येने आज आंदोलन केले. कोणत्याही परिस्थितीत येथील कचऱ्याची विल्हेवाट लावा अशी आग्रही मागणी त्यांनी लावून धरली. अखेर सदर कचरा जेसीबीच्या साहाय्याने ढकलून येथील दुर्गंधी कमी करण्यात येईल असे आश्वासन नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
गेली कित्येक वर्षे आवंडी वसाहत परिसरात शहरातील कचरा टाकला जात असल्याने भटकी कुत्री व इतर जनावरांच्यामुळे हा कचरा सर्वत्र विखरून दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. आज सकाळी आवडी वसाहतग्रस्त मोठ्या संख्येने कचरा डेपोजवळ जमा झाले व त्यांनी आंदोलन छेडले.
नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने आरोग्य निरीक्षक अमर कांबळे, संजय यादव आल्यानंतर परशुराम बामणे, गौरव देशपांडे, जावेद पठाण, यांच्यासह संतोष चौगुले, अंकुश चौगुले, आप्पासाहेब पाटील, चंद्रकांत निकम,परशुराम निकम, आदींनी प्रशासनाला धारेवर धरले. आमच्या वसाहतीजवळ कचरा डेपो नकोच अशी भूमिका घेतली. कचरा गाड्या कचरा टाकण्यापासून अडवल्या.
अखेर सदर कचरा जेसिपीच्या साह्याने एकत्र करून त्याची विल्हेवाट लावण्याचे ठरल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
आंदोलनामध्ये अलका येसादे, शीतल चौगुले, कांचन निकम, स्वाती चौगुले, भाग्यश्री निकम, सुगंधा कोले, अलका मांगले यांच्यासह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

मृत्यूस जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करा…
शिवसेनेची (उ.बा.ठा.) मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वैद्यकिय सेवा वेळेत न मिळाल्याने हरपवडे धनगरवाडा येथील रुग्णाच्या मृत्यूस जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चौकशीची मागणी शिवसेना उ.बा.ठा.च्या वतीने आजरा तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
गत आठवड्यात हरपवडे येथील धनगरवाड्यावर एकजण आजारी होता, त्याला उपचाराला नेताना रस्ता नसल्यामुळे वाड्यावर गाडी गेली नाही. शेवटी त्याला घोंगड्यावरुन रुग्णवाहीका उभी होती तिथपर्यंत न्यावे लागले. गडहिंग्लज येथे त्यांच्यावर उपचार झाले नाहीत. शेवटी त्याला सी.पी.आर. मध्ये नेण्यात आले. सायंकाळी ५.०० वा कोल्हापूरात पोहचले. रात्री त्याचा योग्य उपचाराअभावी मृत्यू झाला.
आरोग्य विभागाने आपला कारभार लोकांच्या लक्षात येवू नये म्हणून सकाळी ४ वाजता मृत्यू झाला होता तरी पण त्याला अतिदक्षता विभागात (ICU) मध्ये २ तास ठेवून नंतर मृत घोषित केले. हा सगळा प्रकार गंभीर व निषेधार्थ आहे. या जिल्ह्यात दोन मंत्री असूनही नागरिकांच्यावर अशी वेळ येते हो बाब शोभनिय नाही. तरी या सर्व प्रकाराला जबाबदार असणाऱ्या अधिकारी यांची चोकशी होवून योग्य ती कार्यवाही व्हावी. तसेच या धनगरवाड्यावर जाण्यासाठी रस्त्याची सोय नाही. त्यासाठी संबंधित विभागाला आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे.
याबाबतच्या निवेदनावर उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुका प्रमुख युवराज पोवार, संजय येसादे, तालुका संघटक, अमित गुरव, शिवाजी आढाव, ओंकार माद्याळकर, महेश पाटील गणेश कांबळे आदींच्या सह्या आहेत.
हत्तीच्या उपद्रवाने शेतकरी वैतागले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सिरसंगी, येमेकोंड परिसरातील शेती पिकात हत्तीने धुमाकूळ घातला आहे. भात व ऊस पिकाचे मोठे नुकसान सुरू आहे. यामुळे शेतकरी वन विभागाने हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी करत आहेत.
गेले पंधरा दिवस रात्री सिरसंगी येथील जंगलात वास्तव्य करत असून शिरसंगी व येमेकोंड येथील शिवारात सायंकाळी सहा नंतर धुमाकूळ घालत आहे. रात्रीचे सिरसंगी – आजरा रस्त्यावर वाहनधारकांना दर्शन देत असल्यामुळे वाहन चालकातून भीतीच्या वातावरण पसरले आहे. काही वेळा सायंकाळी पाच वाजताच हत्ती चित्कारत जंगलातून शिवारात येत असल्यामुळे शेतातील महिलांना हातातील कामे टाकून घराकडे धाव घ्यावी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर शेती करायची कशी असा प्रश्न पडला आहे. वन विभागाकडून मिळणारी तुटपुंजी रक्कम आम्हाला नको पण हत्तींचा बंदोबस्त करा अशी मागणी शेतकरी करत आहेत. शिरसंगी येथील चाळू सावंत, अशोक पाटील विजय साठपे, वसंत सुतार यांच्या ऊस व भात पिकांचे नुकसान तर येमेकोंड येथील नारायण तिबीले, तानाजी कातकर , शंकर कांबळे,नामदेव कसेकर यांच्या ऊस व भात पिकांचे नुकसान हत्तीने केली आहे. नुकसानीची पाहणी वनरक्षक तानाजी कवळीकट्टीकर व तानाजी खांडेकर यांनी पाहणी करून पंचनामे करत आहेत.
सध्या नांदणी येथील महादेवी हत्तींनीचा प्रश्न चर्चेला येत असताना तालुक्यात धुमाकूळ घालत असलेल्या हत्तींना पकडून गुजरातच्या वनतारा हत्ती कल्याण केंद्रात घेऊन जावे असे मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. दरवर्षी आजरा तालुक्याला हत्तीकडून झालेल्या नुकसान भरपाई ही लाखो रुपये शेतकऱ्यांना दिले जाते. शासनाकडून दिली जाणारी ही नुकसान भरपाई आम्हाला नको पण धुमाकूळ घालत असलेल्या या हत्तीला गुजरातमधील वनतारा हत्ती कल्याण केंद्रात वन विभागाने व शासनाने घेऊन जावे अशी मागणी शिरसंगी व येमेकोंड येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

वाटंगी येथे पाणंद रस्त्याच्या दुतर्फा झाड लागवडीचा शुभारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वाटंगी ता.आजरा येथिल पाणंद रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीचा सुरुवात आजरा तहसिलचे नायब तहसिलदार म्हाळसाकांत देसाई, पंचायत समिती आजराचे माजी सभापती अल्बर्ट डिसोझा , सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र) चे जिल्हाध्यक्ष इंजि.जी.एम.पाटील, वाटंगी गावच्या सरपंच सौ.इंदूबाई कुंभार, उपसरपंच सौ. सुनिताताई सोनार, देऊळवाडी गावचे उपसरपंच संजयभाई सावंत याच्या हस्ते करणेत आली.
यावेळी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी एस. एम. कुरणे, ग्राम महसूल अधिकारी डि.एस. पोरे,माजी सरपंच व ग्राम पंचायत सदस्य मा.संजय पोवार, वाटंगी गावचे गावकामगार पोलिस पाटील पुंडलिक नाईक व ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

सर्पदंश झाल्याने वृद्ध शेतकरी अत्यवस्थ
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
देवकांडगाव तालुका आजरा येथील सदाशिव भाऊसो देसाई या ६५ वर्षीय शेतकऱ्याला शेतामध्ये काम करत असताना सर्पदंश झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असून उपचारासाठी रात्री उशिरा गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम ठेवावी: अशोकअण्णा चराटी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुका हा गुणवंताची खाण आहे. येथील अनेक जण विविध क्षेत्रात चमकले आहेत. विद्यार्थांनी यशाची परंपरा कायम राखावी असे आवाहन जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांनी केले.
जनता एज्युकेशन सोसायटी संचलित आजरा हायस्कूलमधे पारितोषक वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम झाला. संस्थेचे अध्यक्ष अशोक चराटी अध्यक्षस्थानी होते. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे, सचिव रमेश कुरुणकर, आजरा तालुका भाजपचे अध्यक्ष अनिकेत चराटी, मिनल होळणकर, संचालक, सल्लागार आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पारितोषक वितरण झाले.
मुख्याध्यापक अजित तोडकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. भाजपचे नुतन अध्यक्ष अनिकेत चराटी यांचाही यावेळी सत्कार झाला. शाळेचे माजी मुख्याध्यापक बी. एम. दरी यांचाही शाळेला खुर्च्या भेट दिल्याबद्दल सत्कार झाला. दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यासह गुणवंताचा सत्कार झाला. गरीब होतकरू विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. श्रेयस तानाजी नेवरेकर यांनी ‘ आधुनिक काळातील शिक्षकांची बदलती भूमिका व पुढील आव्हाने ‘ या विषयावर व्याख्यान दिले. या वेळी विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते. सौ. एस. एस. पाटील, बी. डी. कांबळे, सौ. व्ही. एच. अडकुरकर यांनी सुत्रसंचालन तर उपमुख्याध्यापिका सौ. एच. एस. कामत यांनी आभार मानले.

छायावृत्त

रक्षाबंधन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आजरा शहरात राखी स्टॉल्स सजू लागले आहेत. पावसाची उघडीप असल्याने राखी खरेदीसाठी महिला वर्ग स्टॉल्सकडे आकर्षित होत असल्याचे दिसते.

निधन वार्ता
सौ.मंगल देसाई

उचंगी ता. आजरा येथील सौ. मंगल शहाजीराव देसाई (वय ६२ वर्षे )
यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती,मुलगा,सून,मुलगी ,नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन गुरुवार दि. ७ रोजी सकाळी आहे.

गणेश मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी प्रमोद गुरव

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर येथील श्री गणेश मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी प्रमोद गुरव व उपाध्यक्षपदी धोंडीराम आजगेकर आणि खजिनदारपदी संदीप चव्हाण व सचिव पदी वैभव घेवडे यांची निवड करण्यात आली. निवडीच्या वेळी सर्व सभासद उपस्थित होते



