

आज साखर कारखाना अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड

आजरा:प्रतिनिधी
आजरा साखर कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड आज कारखाना कार्यस्थळी बोलवण्यात आलेल्या विशेष बैठकीमध्ये करण्यात येणार आहे.
कारखान्यात राष्ट्रवादी काँग्रेसने एकतर्फी विजय मिळवल्यानंतर प्रथमच होणाऱ्या या बैठकीमध्ये अध्यक्ष पदाकरिता वसंतराव धुरे व मुकुंदराव देसाई हे प्रमुख दावेदार रहाणार आहेत. समोर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा विचार करतात ही संधी मंत्री मुश्रीफ यांच्या मतदारसंघात येणाऱ्या उत्तूर येथील धुरे यांना दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्व संचालकांच्या मुलाखती घेतल्या असून बंद पाकीटातून ते अध्यक्षपदाचे नाव निवडीपूर्वी सुचवणार आहेत.
धुरे यांची अध्यक्षपदी निवड झाल्यास उपाध्यक्ष पदाची संधी एम. के. देसाई यांना दिली जाणार आहे असेही खात्रीलायक वृत्त आहे. मुकुंदराव देसाई यांना अध्यक्षपदाची संधी दिल्यास उपाध्यक्षपदी उत्तूर विभागातील संचालकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.



रस्त्याची खुदाई… पाण्याची बोंब

आजरा: प्रतिनिधी
महामार्ग तयार करण्याचे काम आजरा शहराच्या हद्दीत येऊन पोहोचले असून या कामाच्या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटर्स तयार करण्याच्या उद्देशाने जोरदार खुदाई सुरू आहे. या खुदाईकरता मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्रीचा वापर केला जात असल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन गळती लागली आहे. तर शहरवासीयांची खाजगी कनेक्शनही उसपून टाकण्यात येत असल्याने पाण्याच्या नावाने शिमगा सुरू झाला आहे.
सध्या पंचायत समितीपासून आजरा बसस्थानकाच्या दिशेने जोरदार खुदाई सुरू आहे. जेसीबीसह मोठ-मोठ्या यंत्रांच्या सहाय्याने ही खुदाई सुरू असल्याने कोणाचीही भिडभाड न ठेवता पाण्याची कनेक्शन उपसून टाकली जात आहेत. त्यामुळे शहरवासीयांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
एकीकडे महामार्ग विभागाकडून हे खोदकाम सुरू असताना नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित राहून झालेल्या तोडफोडीची लगेच डागडुजी करताना दिसत नाहीत. यामुळे शहरांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. अनेक ठिकाणी पर्यायी पाण्याची व्यवस्था नसल्याने नगरपंचायतीने महामार्गाच्या कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने यंत्रणा राबवून तातडीने डागडुजी करावी अशी मागणी केली जात आहे.
नगरपंचायतीला कोणी वाली आहे का?
पाण्याच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत वारंवार नगरपंचायतीकडे संपर्क साधण्याचा शहरवासीय प्रयत्न करतात. परंतु जुजबी उत्तरे देऊन संबंधितांचे समाधान केले जाते. प्रत्यक्षात मात्र नागरिकांना या कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नगरपंचायतीला कोणी वाली आहे का ? असा सवाल आता उपस्थित होत आहे.



रामलला प्राणप्रतिष्ठा अभियान आजरा शहर आज बैठक

आजरा: प्रतिनिधी
२२ जानेवारी २०२४ ला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आमंत्रण स्वरूपात मंगलअक्षता कलश आलेले आहेत. तर त्या निमित्ताने कलश यात्रा आणि अक्षता वाटपाचे अभियान व २२ जानेवारी २०२४ ला होणा-या भव्य कार्यक्रमाच्या नियोजनासाठीची बैठक
आज गुरुवार दि. २८/१२/२०२३ रोजी दुपारी ३:३० वा.रवळनाथ मंदिर, आजरा येथे आयोजित करण्यात आली असून सर्व रामभक्तांनी वेळ उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.



नगरपंचायतीने शहरवासीयांच्या आरोग्याचा कचरा केला…

आजरा: प्रतिनिधी
शहरातील आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने कचरा व्यवस्थापनाकरता नगरपंचायतीने गेल्या पाच सहा वर्षांमध्ये लाखो रुपयांचा चुराडा केला आहे प्रत्यक्षात मात्र एकीकडे हे स्वच्छतेचे नाटक होत असले तरी दुसरीकडे आवंडी वसाहत, गांधीनगर परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा कचरा करण्याचे काम नगरपंचायतीकडून पद्धतशीरपणे सुरू असल्याचे दिसते.
शहराची घाण गोळा करून गांधीनगर व आवंडी वसाहत येथील क्रीडा संकुल परिसरामध्ये टाकून ती पेटवली जाते. यामुळे विषारी वायू हवेमध्ये पसरून हवेचे प्रदूषण होत आहेच परंतु त्याचबरोबर या भागातील पाळीव जनावरे व नागरिक यांचेही आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवर येऊ लागला आहे.
शहरात जमा होणारा संपूर्ण कचरा या भागामध्येच टाकला जातो यामध्ये वैद्यकीय कचऱ्यासह इतर कचऱ्याचाही समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. या मार्गावरून पुढे आवंडी वसाहतीकडे जाताना नागरिकांना नाकावर रुमाल ठेवूनच जावे लागते .
वारंवार या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मागणी केली जाऊनही याकडे सोयीस्करित्या नगरपंचायत दुर्लक्ष करताना दिसत आहे. यामुळे येथील नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
स्वच्छतागृहांसह इतर दूषित पाणी थेट नदीत
शिवाजीनगर परिसरामध्ये शासकीय गोदामाशेजारी असणाऱ्या घरांचे टाकाऊ पाणी थेट नदीमध्ये मिसळत आहे तर लेंडओहोळ नाल्याचे पाणीही नदीमध्ये मिसळत आहे. यासाठी शोषखड्डा मारणार असण्याचे सांगितले जात होते. परंतु अशी कोणतीही कार्यवाही आजपर्यंत झाली नसल्याने हे दूषित पाणी थेट नदीमध्ये मिसळत आहे.



निधन वार्ता
सुभाष केसरकर

आजरा येथील हॉटेल व्यावसायिक सुभाष नारायण केसरकर (वय ७३ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, जावई,सून असा परिवार आहे.



