mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

 

राजकीय फेरमांडण्यांचे संकेत

                ✍️✍️✍️✍️ ज्योतिप्रसाद सावंत

      आजरा साखर कारखान्याची निवडणूक झाल्यानंतर तालुक्यामध्ये राजकीय फेरमांडणीचे संकेत असून लवकरच नवी गटबंधने अस्तित्वात घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

     आजरा कारखाना निवडणूक माध्यमातून अनेक राजकीय घडामोडी घडल्या. परस्परांचे पारंपारिक विरोधक एकत्र आले. तर नेहमी एकत्र असणारे एकमेकांपासून दुरावले गेले. राष्ट्रवादीने कारखाना निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवली असली तरी नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सह विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना इतर गट-तट व पक्षांशी हातमिळवणी करून सामोरे जावे लागणार आहे.

     जिल्हा बँक, तालुका संघ, साखर कारखाना येथे पूर्वीपासून राष्ट्रवादीचे वर्चस्व आहेच. पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीचा कस निश्चितच लागणार आहे. राष्ट्रवादीच्या नेतेमंडळाची भूमिका पाहता भविष्यात पुन्हा एकवेळ राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेस एकत्र येण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादीला काँग्रेसचे वावडे नाही हे तालुकावासीयांना सांगण्याची गरज नाही.

     कारखाना निवडणुकीत शिंपी-चराटी गटाला फटका बसला असला तरीही सार्वत्रिक निवडणुकांमध्ये या दोन्ही गटांचे राजकीय वजन नाकारता येत नाही. वरिष्ठ मंडळींनी वेळीच व योग्य ते सहकार्य न केल्याने त्याचा परिणाम मताधिक्य घटण्यात आला होता. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वरीष्ठांचे बारीक लक्ष राहणार आहे. सहजासहजी येथील वर्चस्व शिंपी-चराटी गटाकडून कमी होऊ दिले जाणार नाही.

     साखर कारखान्यातील पराभवामुळे पश्चिम भागातील राष्ट्रवादीचे वर्चस्व वाढत असल्याचे अधोरेखित झाले आहे. यामुळे येथे आमदार प्रकाश आबिटकर यांनाही लक्ष घालावे लागणार आहे. आगामी निवडणुकांमध्ये शिंपी-चराटी गट,आम.प्रकाश आबिटकर गट, शिवसेना शिंदे गट एकीकडे तर दुसरीकडे राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उ.बा.ठा.गट) अशा लढती होतील असे दिसू लागले आहे. एकंदर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्यापूर्वी तालुक्यात राजकीय फेरमांडण्या होण्याची शक्यता आहे.

स्थानिक पातळीवर शिंपी- चराटी गटाची अडचण

       राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्याने मंत्री मुश्रीफ यांनी थेट भाजपा- शिंदे गटाच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पदासह जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळवले आहे. स्थानिक अशोक चराटी हे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. मुश्रीफ यांच्या राजकीय वजनामुळे व ते सरकारात असल्याने स्थानिक निवडणुकांमध्ये इतर पक्षाची वरीष्ठ नेतेमंडळीं त्यांच्या विरोधात थेट उतरण्यास राजी नसताना दिसते.एकीकडे याचा अप्रत्यक्षरीत्या फटका शिंपी- चराटी गटाला बसत आहे. तर दुसरीकडे जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई याचा पद्धतशीरपणे लाभ उठवताना दिसतात.

मंत्री मुश्रीफ यांच्यामुळे राष्ट्रवादीला उभारी

       पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीला कार्यकर्ते सामोरे जात असताना मंत्री मुश्रीफ यांची मोठी ताकद राष्ट्रवादीला मिळताना दिसते. मंत्री मुश्रीफ रिंगणात उतरल्यानंतर आमदार राजेश पाटील व माजी आमदार के.पी. पाटील हे देखील त्यांना साथ देत असल्याने राष्ट्रवादीचे बळ निश्चितच वाढत आहे.

राष्ट्रवादीतील दोन गट नावालाच

    राष्ट्रवादीचे शरद पवार व अजित पवार अशा दोन गटांमध्ये विभाजन झाले असले तरीही आजरा तालुक्यातील निवडणुकांमध्ये मात्र असे दोन गट असल्याचे कुठेही जाणवत नाही. याचा फायदा देखील राष्ट्रवादीला होताना दिसत आहे. आजरा साखर कारखाना निवडणुकीत हे प्रकर्षाने जाणवत होते.


चित्रीतील पाण्याचा एकही थेंब कोणत्याही कंपनीला देणार नाही…


                   आजरा: प्रतिनिधी

       चित्री धरणातील पाण्याचा एकही थेंब कोणत्याही कंपनीला देऊ देणार नाही. पाटगाव धरण अदानी कंपनीला देण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेतला असून त्या पाठोपाठ चित्री धरण ही वीज निर्मितीसाठी आंध्रातील खाजगी कंपनीला देण्याचा निर्णय घेतला असल्याचे वर्तमान पत्रात आलेल्या बातमीतून समजते.

       हा प्रकल्प सिंचन प्रकल्प असून आजरा गडहिंग्लज तालुक्यातील शेतक-यांचाच त्यावर पहिला हक्क आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचे हे पाणी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा हा प्रकार आहे. शासनाचा हा प्रयत्न आजरा गडहिंग्लज तालुक्यतील शेतकरी हाणून पाडतील याबाबत लवकरच बैठक घेऊन जन आंदोलन उभा करू असा इशारा आज आम्ही देत आहोत.

       असे पत्रक श्रमिक मुक्ती दल व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने कॉ. संपत देसाई, दशरथ घुरे, प्रकाश मोरुस्कर, नारायण भडांगे, अशोक बांदेकर, युवराज जाधव, नामदेव फगरे, बाळू जाधव यांनी काढले आहे.


सौ.सुनिता रेडेकर यांची निवड


                   आजरा: प्रतिनिधी

       माजी.जि.प.सदस्या सौ.सुनिता रमेश रेडेकर यांची भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापूर जिल्हा ग्रामीण महिला कार्यकारिणी उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. सौ. रेडेकर या आजरा साखर कारखान्याच्या माजी संचालिका असून त्यांचे सामाजिक कार्यात चांगले योगदान आहे.


स्व. वसंतराव देसाई यांची पुण्यतिथी साजरी


                   आजरा: प्रतिनिधी

        आजरा साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व. वसंतराव देसाई यांची १८ वी पुण्यतिथी कारखाना कार्यस्थळावर साजरी करण्यात आली. मुकुंदराव देसाई आणि वसंतराव धुरे यांच्या हस्ते स्व. वसंतराव देसाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला.

       यावर्षी चार लाख मे. टन गाळप करण्याचे उद्दिष्ट असून आज अखेर एक लाख मे. टन ऊसाचे गाळप झाल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे नोव्हेंबर अखेरची ऊस बिले जमा करण्यात आली असून कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस आपल्या कारखान्यास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. वसंतराव धुरे आणि मुकुंद देसाई यांनी मनोगत व्यक्त करताना वसंतराव देसाई यांच्या आठवणीना उजाळा दिला.

      यावेळी मुकुंदराव देसाई, वसंतराव धुरे, मारुती घोरपडे , रणजित देसाई, काशिनाथ तेली, गोविंद पाटील, दीपक देसाई यांचे बरोबर प्र. कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती, प्रो. मॅनेजर एस के सावंत, सिव्हिल इंजिनिअर आजगेकर, शेतीअधिकारी भूषण देसाई, सुरक्षा अधिकारी शरद पाटील अकाउंटंट वांगणेकर कामगार संघटना अध्यक्ष प्रकाश सरदेसाई तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

अजातशत्रू ‘ दादा ‘

mrityunjay mahanews

आज आजरा येथील रामतीर्थ यात्रा

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!