शुक्रवार १३ फेब्रुवारी २०२६

भरधाव ट्रक झाडावर आदळला
तरुण ठार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा-आंबोली मार्गावरील गवसे येथे आल्याचीवाडी शेजारी असलेल्या हॉटेल घरचा दरबार जवळील झाडाला ट्रकवरील चालकाचा ताबा सुटून ट्रक झाडावर जोरदार आदळल्याने ट्रकमधील सुमित भाऊ पाटील (वय: २१, रा. घाटकरवाडी, ता. आजरा) याचे जागीच निधन झाले. तर चालक राज आनंदा कांबळे कराड (वय: २१) हा किरकोळ जखमी झाला आहे.
पेपर रोल भरून गोव्याहून घाटकरवाडी येथे मुक्कामास आलेला ट्रक सकाळी साडेनऊ वाजता कोल्हापूरच्या दिशेने चालला होता. ट्रक केबिनमध्ये चालकाच्या डाव्या बाजूला सुमित बसला होता. भरधाव वेगात रस्त्याशेजारील झाडावर आदळला. यामध्ये ड्रायव्हर केबिनचा चक्काचूर झाला व सुमितचा जागीच मृत्यू झाला. चालकाने उडी मारल्याने तो बचावला.
सुभाष बुधाजी पाटील रा. घाटकरवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुमित याच्या मृत्यूस जबाबदार धरत राज आनंदा कांबळे या ट्रक चालकावर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सिमेंटच्या रस्त्याचा ना दर्जा, ना रस्त्यावर पाणी…
हात्तीवडे ग्रामस्थांचा रास्ता रोको

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा-महागाव मार्गावरील रस्ता कामाच्या दिरंगाईमुळे अखेर हात्तिवडे येथील ग्रामस्थांच्या संयमाचा बांध सुटला. सिमेंट बांधकामासाठी पाण्याचा वापर कमी होत असल्याच्या निषेधार्थ आज संतप्त गावकऱ्यांनी या मार्गावरील वाहतूक आणि गाड्या रोखून धरल्या. कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे रस्ता कामाचा दर्जा खालावत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
पाण्याचा वापर नसल्याने बांधकामाला धोका निर्माण झाला आहे. वाहनचालक व स्थानिक नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.
पाणी मारण्याकडे कंत्राटदाराने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कामाचा दर्जाचा प्रश्न उत्तर निर्माण झालाच आहे परंतु पाण्याचा वापर कमी असल्याने सिमेंटला तडे जाण्याची आणि रस्ता निकृष्ट होण्याची भीती हात्तिवडेकरांनी व्यक्त केली आहे. “आम्हाला केवळ रस्ता नको, तर तो उत्कृष्ट दर्जाचा हवा,” अशी भूमिका गावकऱ्यांनी मांडली आहे.
नागरिकांनी रस्त्यावर उतरून गाड्या अडवल्या. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी आणि कंत्राटदार कामात सुधारणा करण्याचे आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत काम पुढे सरकू देणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. यामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

जनगणना पूर्वतयारी पार्श्वभूमीवर तहसील मध्ये बैठक

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर आजरा तहसील मध्ये तहसीलदार समीर माने यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिल्या टप्प्या अंतर्गत बैठक पार पडली.
२०२७ ची जनगणना ही स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना असून पहिल्या टप्प्यामध्ये घरांची यादी, घरांची गणना जनगणना मे- जून २०२६ च्या दरम्यान केली जाईल. आणि दुसरा टप्पा लोकसंख्या गणना जी फेब्रुवारी – मार्च २०२७ दरम्यान केली जाईल. या दोन टप्प्यांमध्ये गोळा केली जाणारी माहिती भिन्न स्वरूपाची आहे आणि त्यात सहभागी असलेले कर्मचारी देखील विभिन्न असू शकतात. जनगणनेतील या सर्व प्रक्रियेचे उद्दिष्ट संपूर्ण कव्हरेज अचूकता आणि आकडेवारीचे वेळेवर संकलन सुनिश्चित करणे हे आहे. संपूर्ण जनगणनेचे काम निर्धारित वेळेत करणे बंधनकारक आहे. कोणतेही काम कितीही सोपे असले तरी ते चुकले तर जनगणनेच्या सुरळीत कारभारावर परिणाम करेल आणि म्हणून प्रत्येक कामाचे वेळापत्रक अचूकपणे आणि काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. असे यावेळी तहसीलदार समीर माने यांनी सांगितले. यावेळी त्यांनी जनगणना पूर्वतयारीच्या अनुषंगाने करावयाची कामे, जनगणना अधिकाऱ्यांची कर्तव्ये यासह विविध प्रकारची माहिती दिली.
यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेटे, निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांच्यासह यामध्ये समाविष्ट होणारे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पेरणोली पं.स. गणाकरीता झालेले गाववार उमेदवार निहाय मतदान
अनुक्रमे स्मिता देसाई / श्वेता सरदेसाई / यशोदा पोवार
किटवडे ११८/१०६/२८५
अंबाडे
२६/५४/१३०
एरंडोळ
१२८/१८९/२३०
आवंडी
८/१३४/४६
इटे
२९/१८७/२४१
वेळवट्टी
९७/२८९/५३९
हरपवडे
१४१/१६६/१६२
हाळोली
१३७/५७/१९३
मेढेवाडी
१६२/५९/१६३
धनगरमोळा
११९/१६४/३०१
साळगाव
२५७/१८२/४१६
पेरणोली
५२१/२६४/४०९
पारपोली
१०५/७०/२२०
पोळगाव
२४२/९९/३५५
मसोली
९४/१०८/२६२
शेळप
७५/१३२/१७१
देऊळवाडी
५४/६८/२०७
देवर्डे
२००/३४७/३८२
देवकांडगाव
१८९/२३२/१५६
दाभिल
१३५/३१२/१६८
लाटगाव
३२/२१६/१६२
कासार कांडगाव
३२०/१२५/४५२
खानापूर
१४७/१५६/१७२
कोरीवडे
९०/२००/१७३
गवसे
२९५/१९३/५२९
सौ.स्मिता देसाई ३७३७
सौ.श्वेता सरदेसाई ४१२६
सौ.यशोदा पोवार ६५४२
सौ.यशोदा पोवार/शिवसेना/ उबाठा गट विजयी
(एकूण मतदानामध्ये टपाली मतदानाचा समावेश आहे. आकडेवारी छपाईत एखादी चूक असू शकते. )

साळगाव येथे रविवारपासून महाशिवरात्री उत्सव

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
साळगाव ता. आजरा येथे रविवार दिनांक १५ फेब्रुवारी व सोमवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते दहा या वेळेत वारकरी दिंडी, कलश मिरवणूक त्यानंतर जलाभिषेक दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत चहापान त्यानंतर शिवपंचाक्षरी स्तोत्र दुपारी तीन ते सात या वेळेत भजन व रात्री दहा वाजता सोंगी भजनाचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर जागर होईल.
सोमवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते बारा पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. कलश मिरवणुकी दरम्यान रविवारी विद्यामंदिर साळगावच्या विद्यार्थ्यांच्या सांज पथकाचेही आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती स्वामी समर्थ सेवा मंडळ, साळगाव व ह.भ.प. तुकाराम माडभगत स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे.
आजरा येथे आजपासून नगरसेवक चषक क्रिकेट स्पर्धा
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलामध्ये कै. उदय पारपोलकर यांच्या स्मरणार्थ आजरा नगरसेवक चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
आज गुरुवार दिनांक १३ फेब्रुवारीपासून सदर स्पर्धा सुरू होत असून स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे २१,०००/- रुपये ११०००/- रुपये व ७०००/- रुपये रोख व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त इतर वैयक्तिक बक्षीसेही देण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले .
छाया वृत्त
हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या आजरा येथील हजरत दावल मलिकसो यांचा उरुस उत्साहात पार पडला. उरुसाच्या पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक ११ रोजी संदल व गंधरात्र मिरवणूक व गुरुवार दिनांक १२ रोजी भर उरूस व गलेफ मिरवणूक काढण्यात आली. मोठ्या संख्येने स्थानिक नागरिकांनी या प्रसंगी हजेरी लावली होती.
फोटो क्लिक

छे…छे…पाऊस नव्हे, हा तर नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा योजना विभागाचा गलथानपणा…


