बुधवार दि. २० ऑगस्ट २०२५

तालुक्यातील सर्व बंधारे पाण्याखाली
घरांची पडझड सुरू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यामध्ये पावसाचा जोर कायम असून तालुक्यातील सर्वच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी घरांची पडझड सुरू असून सर्फनाला, चित्री, चिकोत्रा, आंबेओहोळ व उचंगी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्याने तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून दीडशे घरांसह सहा गोठ्यांची पडझड झाली आहे. अंदाजे ३० लाख ९४ हजार रुपयांचे नुकसान झाले असून संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडून घर पडझडीचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे.

सतत पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
विद्युत पुरवठा खंडित…
जोरदार पाऊस व वाऱ्यामुळे ठिकठिकाणी वृक्ष विद्युत तारांवर पडल्याने विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याचा अनुभव तालुकावासीय अनुभवत आहेत.

सुधीर देसाई यांच्या याचिकेचा चेंडू सर्किट बेंचच्या कोर्टात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा जिल्हा परिषद मतदार संघ रद्द केल्याप्रकरणी जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांनी उच्च न्यायालयाकडे याचीकेद्वारे दाद मागितली आहे. यापूर्वी विभागीय आयुक्तांनी याबाबतच्या स्थानिक मंडळींनी केलेल्या हरकती फेटाळल्या आहेत. याचबरोबर जिल्हा परिषदेचे दोनच मतदार संघ राहतील असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
शुक्रवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद मतदार संघाचा अंतिम आराखडा जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर देसाई यांच्या वकिलांनी मंगळवारी सर्किट बेंचसमोर युक्तिवाद केला. याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाला नोटीस काढण्याचा निर्णय झाला असून याबाबत उद्या गुरुवारी/२१ रोजी सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भर पावसात दहीहंडीचा जल्लोष…
नेताजी पालकर व्यायाम शाळा व वाघाची तालीम मंडळाने पटकावला मान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पावसाची जोरदार हजेरी असूनही आजारा येथे राघव सरदेसाई युवा मंचसह माजी उपनगराध्यक्ष बाळ केसरकर यांच्या स्वराज्य तालमीच्या वतीने बांधण्यात आलेल्या दहीहंडीला युवा वर्गाने उस्फूर्त प्रतिसाद दिला.
स्वराज्य तालमीच्या वतीने बांधण्यात आलेली दहीहंडी फोडण्याचा मान वाघाची तालीम मंडळाने पटकावला तर राघव सरदेसाई युवा मंचच्या वतीने बांधण्यात आलेली दहीहंडी गडहिंग्लज येथील नेताजी पालकर व्यायाम शाळेच्या गोविंदानी फोडली.
दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर मर्दानी खेळांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत संगीताच्या तालावर युवा वर्गाने चांगलाच ठेका धरला होता.

भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदी सुधीर कुंभार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी आजरा येथील भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते स्वामी विवेकानंद पतसंस्था व अण्णाभाऊ सूतगिरणीचे विद्यमान संचालक सुधीर बाबुराव कुंभार यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीने समर्थकांतून आनंद व्यक्त केला जात आहे.

उत्तूरच्या रिंगरोडला दुतर्फा गटर्स बांधा : अन्यथा आंदोलन

उत्तूर : मृत्यूंजय महान्यूज वृत्तसेवा(मंदार हळवणकर)
गडहिंग्लज–उत्तूर–गारगोटी रस्ता रुंदीकरण व काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. यामध्ये घोरपडे वसाहत – लक्ष्मी देवालय – स्वास्तिक इंडस्ट्रीज या रिंगरोडलगतच्या वसाहतीसमोरील पाणी निचऱ्याचा प्रश्न गंभीर असून, दुतर्फा काँक्रीट गटार बांधण्याची मागणी होत आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, जर प्रथम गटार न बांधता थेट रस्ता उंच झाला, तर वसाहतीचे पावसाळ्यातील व सांडपाणी वाहून जाण्यास मार्ग मिळणार नाही. यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन दररोजचे सांडपाणी रस्त्यावर साचण्याचा धोका आहे.
‘प्रथम गटार, मग रस्ता’ हा आमचा स्पष्ट पवित्रा आहे. अन्यथा रस्ता काम थांबवून आम्ही आंदोलन उभारू, असा पायाभूत विकास महामंडळ कार्यालयाला निवेदनाद्वारे इशारा नागरिकांनी दिला आहे.
निवेदनावर बाळासो सावंत, दादू घोरपडे, सुनील बामणे, शिवाजी मुळीक, धनाजी गुरबे यांच्या सह्या आहेत.

निधन वार्ता
सरिता महाजन

आजरा येथील सौ. सरिता शशिकांत ( बबन) महाजन ( वय ६२ वर्षे ) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, मुलगा केदार, मुलगी, सून, जावई असा परिवार आहे.

निधन वार्ता
अशोक दोरुगडे

सोहाळे बाची येथील अशोक अण्णा दोरुगडे ( वय ६५ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे.
मुंबई येथील बेस्टचे ते सेवानिवृत्त कर्मचारी होते.

छायावृत्त

जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त आजरा तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने कॅमेरा पूजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ फोटोग्राफर संजय सावंत,अनिल पाटील, श्रीकांत देसाई यांच्यासह विक्रांत वाळके, राकेश करमळकर व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


