mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरठळक बातम्याभारतमहाराष्ट्रराजकीयसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

मंगळवार  दि. १९ ऑगस्ट २०२५         

शक्तिपीठ विरोधासाठी भर पावसात शेतकरी रस्त्यावर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा निर्धार करत आजरा चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील शेतकऱ्यांनी भर पावसात मोर्चा काढला. माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, विजय देवणे, कॉ. संपत देसाई, मुकुंदराव देसाई, प्रा.सुनिल शिंत्रे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

आजरा शहरातील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मोर्चाला सुरुवात झाली. सरकार विरोधी घोषणा देत मोर्चा आजरा तहसील कार्यालयाजवळ आला.

यावेळी बोलताना आमदार सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले, यापूर्वीही अनेक प्रकल्प झाले आहेत त्या प्रकल्पांना आम्ही कधीही विरोध केला नाही. मात्र शक्तिपीठ महामार्ग हा ठेकेदारासाठी होत असल्यामुळे याला आमचा विरोध आहे. यापूर्वी देशाच्या स्वातंत्र्याची लढाई झाली, आता शेतीच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा स्वातंत्र्याची लढाई लढावी लागेल. शेतकऱ्यांनी पैसे मिळण्याचे आमिषाला बळी पडू नये. शेतीमुळे समाजात आपण ताठ मानेने उभे आहोत. गणेशोत्सवानंतर शक्तिपीठ विरोधातील लढा आणखी तीव्र केला जाईल. हजारो एकर शेती उद्योजकांच्या घशात घालण्यासाठी शेतकऱ्यांकडून शेती काढून घेण्याचे षडयंत्र रचले जात आहे. गरज नसलेल्या शक्तीपीठ विरोधात ताकतीने सर्वजण एकसंघ राहू या असे आवाहन केले.

माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांनी कष्टाने सिंचनाखाली आणलेल्या जमिनी चोरांना देणार नाही. केवळ जमिनी जाणाऱ्यांना नव्हे तर अनेक शेतकऱ्यांना शक्तीपीठ महामार्गाचा फटका बसणार आहे. या शक्तिपीठाच्या माध्यमातून अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. शक्तिपीठामुळे कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागाला महापुराचा फटका बसणार आहे. शक्तिपीठच्या माध्यमातून इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये उत्खनन करून बॉक्साइड तस्करी करण्याचा डाव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी आमचा बळी का ? अदानींनी गडचिरोलीत अडीच हजार एकर जंगलात उत्खनन केले आहे, हे खनिज वाहतुकीसाठी शक्तीपीठाचा अट्टा सुरू आहे. देशातील उद्योगपतींचे लाड करण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी दिला जात आहे. कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही.

विजय देवणे म्हणाले, शक्तिपीठाच्या समर्थनात सरकारने जमा केलेले सातबारा हे बाधित शेतकऱ्यांचे नाहीत. झोपडपट्टीवर बुलडोजर चालवणारे शेतमजुरांना चिडणारे आणि गोरगरीब यांच्या जमिनी काढून घेणारे हे सरकार आहे. अदानी अंबानीच्या पैशाचा मोह या सरकारला आहे. जिल्ह्याचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्तिपीठाच्या संदर्भात आपली नेमकी भूमिका स्पष्ट करावी. सर्व कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी जागे राहून पुढील लढाईला तयार राहावे. कॉ. संपत देसाई म्हणाले, शेतकऱ्यांचा शक्तिपीठाला विरोध आहे. आमदार शिवाजीराव पाटील हे शक्तिपीठ चंदगड तालुक्यात नेऊन शेतकऱ्यांना उध्वस्त करत आहेत. शक्तिपीठ विरोधी आंदोलन चिरडण्याचे काम सुरू आहे. या शक्तीपीठाला बारा जिल्ह्यातून विरोध सुरू आहे. सध्याच्या सरकारचे धोरण शेतकरी विरोधी आहे. शक्तीपीठ रद्द झाल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही.

कॉ. संजय तर्डेकर तानाजी देसाई,राजेंद्र गड्डयान्नावर, राहुल देसाई , सुनील शिंत्रे, कॉ. सम्राट मोरे, शिवाजी गुरव, अमर चव्हाण कॉ. अतुल दिघे, संभाजी सरदेसाई यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी अंजना रेडेकर, प्रकाश पाटील, उमेश आपटे, विद्याधर गुरबे, गोपाळराव पाटील, सत्यजित जाधव, दिग्विजय कुराडे, अभिषेक शिंपी, संभाजी पाटील, किरण कांबळे, शामराव देसाई, प्रकाश वास्कर, रियाज शमनजी, प्रभाकर कोरे, रवींद्र भाटले, संजयभाऊ सावंत, नौशाद बुड्ढेखान, उत्तम देसाई, संकेत सावंत, प्रभाकर खांडेकर, सुभाष देसाई, रणजीत देसाई, विक्रम देसाई, अनिल फडके, नारायण भडांगे, प्रकाश मोरुस्कर, अल्बर्ट डिसोजा, धनाजी राणे, सचिन घोरपडे, कॉ. संजय घाटगे, राजू होलम, शांताराम पाटील, विलास पाटील, अशोक पोवार, आरिफ खेडेकर, निसार दरवाजकर, निवृत्ती कांबळे, बाकीव खेडेकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

प्रभागवार भौगोलिक सीमा प्रसिद्ध…
आजरा नगरपंचायत निवडणूक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुक २०२५ चा प्रारुप प्रभाग सीमा रचनेचा नकाशा व मसुदा आजरा नगरपंचायत कार्यालयात प्रसिध्द करण्यात आला आहे. याबाबत हरकती व सुचना मागवण्यात येत आहेत. याची अंतीम मुदत गुरुवार (ता. २१) दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.

नगरपंचायत निवडणुक प्रक्रिया कार्यक्रमाला ११ जूनपासून सुरुवात झाली आहे. यातील पहिला टप्पा प्रभाग रचनेचा आहे. १७ प्रभागाची रचना करण्यात आली आहे. आज प्रारुप प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आलेली आहे. याबाबत हरकती, सुचना मागवण्यात येत आहेत. याची अंतीम मुदत गुरुवारी आहे. आलेल्या आक्षेप, सुचनाबाबत सुनावणी घेण्यात येईल. त्यानंतर अंतीम प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात येईल. नागरीकांनी आक्षेप व सुचना लेखी स्वरुपात आजरा नगरपंचायत निवडणुक विभागाच्या कार्यालयात लेखी स्वरुपात आणून द्याव्यात. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नगरपंचायतीचे पुर्वी १७ प्रभाग होते. आताही एक सदस्य प्रभाग रचना करण्यात आली आहे. १५ सप्टेंबर पर्यंत प्रभाग रचना अंतीम करण्यात येणार आहे. प्रभाग रचनेचा प्रथम टप्पा, दुसरा आरक्षण सोडत, तिसरा प्रभाग निहाय मतदार या‌द्यांची विभागणी असे टप्पे करण्यात आले आहेत.

प्रभाग १ – रामतीर्थ पर्यटन स्थळ, औद्योगिक शासकीय प्रशिक्षण संस्था व साळगाव रोड, पंचायत समिती परिसर, मयुर
पेट्रोल पंप परिसर

प्रभाग २ – व्यंकटराव हायस्कूल, तहसील कार्यालय, शासकीय धान्य गोडावून परिसर, नबापूर नदी घाट परिसर

प्रभाग ३ – मशिद आमराई गल्ली, मार्निंग स्टार हॉटेल परिसर,

प्रभाग ४ – डॉ. झाकीर हुसेन हायस्कूल, भाई भाई सिनेमागृह, नैनिताल हॉटेल परिसर

प्रभाग ५ – एसटी आगार, न्यायालय परिसर, बीज वितरण कार्यालय

प्रभाग ६ – रवळनाध राइस मिल, मदरसा कॉलनी परिसर, मिनर्वा पेट्रोल पंप, गंगाबाग
परिसर.

प्रभाग ७ – नवीन पोलीस ठाणे, संघाचे गोडावून, सुतार सॉ मिल परिसर

प्रभाग ८ – बसस्थानक परिसर, रवळनाथ पेट्रोल पंप, नाईक गल्ली

प्रभाग ९ – बैंक ऑफ महाराष्ट्र, महागाव रस्ता, देसाई कॉम्प्लेक्स, मुख्य बाजारपेठ, दर्गा गल्ली मशीद परिसर

प्रभाग १० – रवळनाथ मंदिर, आजरा हायस्कूल, वाडा गल्ली मशिद, व्यंकटेश मंदिर परिसर

प्रभाग ११ – नगरपंचायत इमारत, भाजी मंडई, शिवाजी पुतळा, गणपत गल्ली, भारतीय स्टेट बैंक इमारत परिसर.

प्रभाग १२ – गंगामाई वाचन मंदिर, दुरदुंडेश्वर मठ, कृषी चिकित्सालय परिसर, पाटील ॲटो परिसर

प्रभाग १३ – नित्यश्रध्दा हॉस्पिटल,बीएसएनएल कार्यालय परिसर, दत्त मंदिर, सोमवार पेठ, रोजरी चर्च, चर्च गल्ली, रोझरी हायस्कूल, वाडाचा गोंड नदीघाट

प्रभाग १४ – आजरा महाविद्यालय, गणेश बुक स्टॉल कॉर्नर, भगवा रक्षक चौक, आजरा महाल शिक्षण मंडळ मुलीची शाळा.

प्रभाग १५ – रोजरी बॉईज हॉस्टेल, गंगा बाग, संत निरंकारी सत्संग भवन, होली मुलींचे वसतीगृह

प्रभाग १६ – क्रीडासंकुल आजरा, ग्रामिण रुग्णालय, प्राथमिक विद्द्यामंदिर गांधीनगर, फिल्टर हाऊस.

प्रभाग १७- कर्पेवाडी दुधसंस्था, चाफेगल्ली, अभिषेक काजू फॅक्टरी, विठ्ठल मंदिर, आवंडी वसाहत, प्राथमिक वि‌द्यामंदिर आवंडी वसाहत.

आजरा तालुक्यात पावसाचा धुमाकूळ… साळगाव बंधाऱ्यावर पुन्हा पाणी…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहरासह तालुक्यात काल सोमवारी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. साळगाव बंधाऱ्यावर या हंगामात तब्बल सातव्यांदा पाणी आले आहे.

गेले चार दिवस पावसाचा जोर कायम असला तरीही काल सोमवारी पावसाच्या जोरदार सरी कोसळताना दिसत होत्या. दिवसभर पावसाने जोरदार हजेरी लावली. पश्चिम भागात सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे हिरण्यकेशी नदी पात्रा बाहेर पडू लागली असून साळगाव बंधाऱ्यावर पाणी आले आहे. जोरदार पावसाच्या सरी कोसळल्याने आजरा शहरातील मुख्य बाजारपेठेत वारंवार पाणी येताना दिसत होते.

गणेशोत्सव अवघ्या आठ-दहा दिवसांवर आला असताना पावसाच्या जोरदार हजेरी मुळे गणेश मूर्तीकारांना मुर्त्या वाळवताना अडचणी येऊ लागल्या आहेत. कुंभार बांधव पावसाने उघडीप देण्याची प्रतीक्षा करत आहेत.

‘गोकुळ’ कारभाराविरोधात सर्किट बेंचकडे प्रकाश बेलवाडे यांनी मागितली दाद


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

‘गोकुळ’ दूध संघात २०२१-२२ या आर्थिक वर्षात अनेक खरेदीमध्ये बेकायदेशीरपणा असल्याचे चाचणी व विशेष लेखापरीक्षणात निदर्शनास आल्यानंतर संबंधित लेखापरीक्षकांनी कारवाई करणे अपेक्षित होते. पण, त्यांनी पाठीशी घातल्याने याविरोधात सर्किट बॅचमध्ये सोमवारी याचिका दाखल केली असून दोषींकडून वसुली करून संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी केली असल्याचे वडकशिवाले (ता. आजरा) येथील महादेव दूध संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संचालक मंडळाने २०२१-२२ मध्ये दूध संस्था देण्यात येणाऱ्या गवत कांड्या खरेदी २५
पैसे ऐवजी चाळीस वर्षांनी केली आहे, सात लाखांच्या देणग्या दिल्या आहेत, मुंबईतील गोकुळ शॉपी ला सरसकट ३२ हजार रुपये सजावटीसाठी दिली आहे, एका दूध संस्थेला वासाच्या दुधापोटी एक लाख रुपये दिले यासह विविध आरोप केले असून याबाबत एका संचालकाने दूध विभागाकडे तक्रार केल्यानंतर विशेष लेखापरीक्षण झाले पण त्यावरही कार्यवाही झाली नसल्याचे बेलवाडे यांनी स्पष्ट केले आहे.

या याचिकेवर मंगळवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तर गुरुवारी रास्ता रोको करणार…
मराठा महासंघाचा इशारा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

आजरा तालुक्यातील जिल्हा परिषद मतदार संघ व पंचायत समिती मतदार संघाबाबत
सन १९९३-९४ पर्यंतच्या जिल्हापरिषदेचे ४ मतदार संघ व पंचायत समितीचे ८ मतदार गण होते. ते तसेच रहावेत म्हणून केलेल्या मागणीला विरोध केल्यामुळे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आजरा शाखेच्या वतीने रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

आजरा तालूका दुर्गम, डोंगराळ व मागास म्हणून शासनानेच ‘डी’ झोनमध्ये घालून त्याप्रमाणेच शासनाचे कामकाज सुरू आहे आणि सदरच्या नियमानूसारच आमच्या तालूक्यात ४ जिल्हा परिषद व ८ पंचायत समिती मतदार संघ करावे यासाठी आम्ही आजरा तालूका वासीयांनी निवेदनानूसार सनदशीर मागणी केली आहे. त्याची दखल निवडणूक आयोगाने अजूनही घेतलेली नाही. त्यामुळेया मागण्यांचा प्रश्न अजूनही प्रलंबीत आहे. पण या विभागाने याची दखल ‘न’ घेता आपल्याच पध्दतीन कामकाज चालू केले आहे असे समजते.

अशा शासनाच्या निर्णयाविरूध्द गुरूवार दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी रास्ता रोको आंदोलन आजरा येथील संभाजी चौक येथे सकाळी ठीक १० वाजता सनदशिर मार्गाने आंदोलन करून शासनाला जागे करण्याचा प्रयत्न करणार आहे याची दखल घेऊन शासनाने योग्य ती कार्यवाही न केल्यास पुढे आजारा तालुका बंद सारखे आंदोलन करणार असल्याचे लेखी पत्र तहसीलदारांना दिले आहे.

पत्रावर संघटनेचे तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण, जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, संभाजीराव इंजल, शिवाजीराव पाटील, प्रकाश देसाई, शंकरराव शिंदे आदींच्या सह्या आहेत.

चिमणे येथे निबंध स्पर्धा उत्साहात

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा ( मंदार हळवणकर)

चिमणे ता. आजरा येथील वाचनालयाचे वतीन निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी अधक्षस्थानावरुन बोलताना कर्मवीर विद्यालयाचे मुख्याध्यापक इकबाल मुल्ला म्हणाले की, जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर,वाचनाला पर्याय नाही, ग्रंथ हेच गुरू असतात. यासाठी गावातील वाचनालयाचा वापर विद्यार्थ्यांनी करावा.

स्पर्धेत गुणानुक्रमे मोठ्या गटात श्रावणी खडे, सई पाटील, वेदांत अस्वले यांनी तर लहान गटात समिक्षा खेडकर, राजवीर पाटील, प्रणिता चव्हाण आरोही खाडे यांनी यश मिळवले.

यावेळी मेजर शिवाजी नादवडेकर, सहदेव शिवणे, धोंडीबा चव्हाण, शिवाजी चव्हाण, मारूती गुरव, भाऊ तारळेकर, नामदेव चव्हाण, हणमंत सुतार, एकनाथ पाटील, सुरेखा कांबळे उपस्थित होते.

संजय खोचारे यांनी प्रास्ताविक तर शिक्षक प्रभु यांनी आभार मानले.

साहित्यिक प्रकाश नवलकर यांची पुस्तके माध्यमिक विद्यालय आरदाळला भेट.

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

माध्यमिक विद्यालय, आरदाळला लेखक-साहित्यिक प्रकाश नवलकर यांनी त्यांच्या स्वलिखित ‘बांधावरची बाभळ’ आणि ‘प्रकाश वाटा’ ही मौल्यवान पुस्तके माध्यमिक विद्यालय आरदाळ शाळेला भेट स्वरूपात दिली.

विद्यार्थ्यांनी ही पुस्तके वाचावीत आणि त्यांच्या मनात वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उदात्त हेतूने ही पुस्तक भेट देण्यात आली.
या पुस्तक भेटीचा कार्यक्रम शाळेत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सामाजिक कार्यकर्ते अमोल भांबरे यांच्या हस्ते ही पुस्तके शाळेचे मुख्याध्यापक श्री. शरद पाटील यांनी सन्मानपूर्वक स्वीकारली. मुख्याध्यापकांनी साहित्यिक प्रकाश नवलकर यांच्या या प्रेरणादायी कृतीबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

यावेळी लक्ष्मण लोहार, किरण चव्हाण, रणजीत सुतार, स्वप्नाली बांबरे, चंद्रकांत गुरव, धनाजी ससाने, शेखर कांबळे आणि मधुकर चोथे,सातापा कांबळे तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

निधन वार्ता
धनाजी पाटील

आरदाळ तालुका आजरा येथील माजी सैनिक धनाजी विष्णू पाटील ( वय ७० वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन विवाहित मुली, नातू, पत्नी, असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार दिनांक २१ रोजी आहे.

निधन वार्ता 

राजाराम नावलकर

पेरणोली ता. आजरा येथील ज्येष्ठ वारकरी ह.भ.प. श्री. राजाराम धोंडिबा नावलकर यांचे वयाच्या ऐंशीव्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात्य पत्नी , दोन मुले , सुना , नातवंडे असा परिवार आहे.
मुंबईस्थित अभियंता श्री. आनंदा नावलकर यांचे ते वडील आहेत.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पोलिसांना मारहाण पडली महागात: तिघांविरोधात आजरा पोलिसात गुन्हा नोंद

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

प्रा. संजय मंडलिक हेच योग्य उमेदवार

mrityunjay mahanews

सिरसंगी येथे नवविवाहितेची आत्महत्या…नामदार मुश्रीफ यांच्यावरील चराटी यांचे आरोप म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’….. ना. मुश्रीफ समर्थक कारखाना संचालकांचा पत्रकार बैठकीत आरोप

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews
error: Content is protected !!