गुरुवार दि.१२ जून २०२५

वाटंगी परिसरात बिबट्याचा वावर…
पंजाचे ठसे मिळाले...

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वाटंगी ता.आजरा परिसरात बिबट्याचा वावर सुरु आहे. मंगळवारी अडकरहून वाटंगीकडे परत येणाऱ्या मोटारसायकलवरील युवकांना त्याचे दर्शन झाले. त्यांनी गावात पट्टेरी वाघ आल्याची माहीती ग्रामस्थांना दिली. त्याच्या पायाचे ठसे मिळाले असून वनविभागाने तो बिबट्या असल्याचे सांगीतले. यामुळे वाटंगी परिसरात भितीची छाया पसरली आहे.
मंगळवारी अडकूरला गेलेले दोन युवक मोटारसायकलवरून गावी वाटंगीकडे परतत होते. वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ आल्यावर त्यांच्या समोरून वन्यप्राणी गेला. अंधार असल्यामुळे त्यांना स्पष्ट दिसले नाही. पण त्यांनी अंगावर पट्टे असल्याचे ग्रामस्थांना सांगीतले. त्यामुळे गावाजवळ वाघ आल्याची बातमी वाटंगीत पसरली. ग्रामस्थामध्ये खळबळ उडाली. याची माहीती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाच्या पथकाने काल परिसरात पहाणी केली. आज सकाळी वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ ग्रामस्थांना वन्यप्राण्याच्या पायाचे ठसे मिळाले. तो बिबट्या असावा. या परिसरात तरस व बिबट्याचा वावर असल्याचे वनरक्षक तानाजी कवळीकट्टीकर यांनी सांगीतले. श्री. कवळीकट्टीकर, सरपंच मधुकर जाधव, पोलीस पाटील पुंडलिक नाईक, आदींनी याबाबत माहिती घेतली.
कुठेही नुकसान नाही...
दरम्यान सदर बिबट्याने कोणावरही हल्ला केल्याचे अथवा पाळीव जनावरांची जीवित हानी केल्याचे वृत्त नाही. 
दिव्यांग लाभार्थ्यांनी ७ जुलै पर्यंत कागदपत्रे सादर करावीत : मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांचे आवाहन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायत हद्दीतील दिव्यांग व्यक्तींना ५ टक्के राखीव निधीचे वाटप करण्यात येणार आहे. या योजनेसाठी पात्र असलेल्या लाभाथ्यांनी ७ जुलै पर्यंत आजरा नगरपंचायतीकडे योग्य ती कागदपत्रे सादर करावीत असे आवाहन मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांनी केले आहे.
आजरा नगरपंचायत स्थापनेपूर्वी तत्कालीन ग्रामपंचायत कालावधीतील सन २०१२-१३ ते सन २०१५-१६ या चा वर्षांपैकी दुसऱ्या टप्यामधील सन २०१५-१६ या वर्षातील अखर्चित निधीचा सन २०२५-२६ मध्ये लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी आजरा नगरपंचायतीच्या हद्दीतील दिव्यांग लाभार्थ्यांनी हयातीचे स्वयंघोषणापत्र, डिजीटल दिव्यांग प्रमाणपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, आधारकार्ड झेरॉक्स आदि कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ज्या दिव्यांग लाभार्थ्यांनी गतवर्षी डिजीटल प्रमाणपत्र नगरपंचायतीच्या दिव्यांग विभागाकडे जमा केलेले नाही, अशा लाभार्थ्यांनी यावर्षी प्रमाणपत्र सादर करावे. तर नव्या लाभार्थ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडील दिव्यांग प्रमाणपत्र सादर कावे. दिव्यांग लाभार्थ्यांनी वेळेत आपली कागदपत्रे सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नगगरपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

शनिवारी स्व. राजारामबापू देसाई फौंडेशनच्यावतीने रक्तदान शिबीर
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथे शनिवार दि. १४ जून रोजी स्व. राजारामबापू देसाई फौंडेशनच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता शिबीराला सुरवात होणार आहे. राजारामबापू फौंडेशन व लायन्स ब्लड बैंक, गडहिंग्लज यांच्या सयुक्त विद्यमाने शिबीर पार पडणार आहे. येथील आजरा तालुका संघाच्या इमारतीमध्ये शिबीर होणार असून या शिबीराला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल फडके, फौंडेशनचे अध्यक्ष वृषाल हुक्केरी, उपाध्यक्ष युवराज पोवार, सचिव रविंद्र देसाई यांनी केले आहे.

एक हात मदतीचा…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भादवण ता आजरा येथील कष्टाळू शेतकरी ह.भ.प. श्रीपती देवरकर यांनी दोन वर्षापूर्वी सुरती जातीची जातीवंत म्हैस आणली होती गाभण कालावधी मध्ये चांगली जोपासना केली. आठ दिवसापूर्वी व्याल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हैस मरण पावली. यामुळे देवरकर कुटुंबीय अडचणीत आले.
शिवसेना शाखा भादवण व मा. बाळासाहेब ठाकरे सह दूध संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री. संजय पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह त्यांच्या घरी भेट देऊन डेअरी मार्फत आर्थिक मदत केली. म्हैस घेण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचा निर्धारही बोलून दाखवला.
त्यावेळी व्हा. चेअरमन अर्जुन कुंभार, संचालक उदय नेसरीकर, शामराव मुळीक, संभाजी कांबळे, संजय देसाई, ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण सुतार, शिवसेना शाखा प्रमुख श्रीकांत देवरकर मार्गदर्शक पि.जे. मुळीक उपस्थित होते.

मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वस्तीगृहात प्रवेश अर्ज करण्याचे आवाहन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वस्तीगृहामध्ये सन-२०२५-२६ करिता मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये इयत्ता ८ वी पासून महाविद्यालयीन अभ्यासक्रमाकरिता शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांनी मोफत प्रवेश घेण्याचे आवाहन वस्तीगृहाच्या अधिक्षक प्रियांका पाटील दुंडगेकर यांनी केले आहे. विद्यार्थ्यांना जेवण, राहण्याची सोय, शैक्षणिक साहित्य यासारख्या सुविधा मोफत देण्यात येणार आहेत. प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन पाटील-दुंडगेकर यांनी केले आहे.

फोटो क्लिक



पाऊस पाणी
कोल्हापूर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट. आजरा शहर व परिसर वगळता तालुक्यात ठीक ठिकाणी काल जोरदार पाऊस झाला आहे…

कोरोना अलर्ट
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवार अखेर कोरोनाचे एकूण २८ रुग्ण…६५ वर्षीय व्यक्तीचा काल मृत्यू. एकूण मृतांची संख्या… ३


